वर्ल्ड कप फायनलमधे जिंकला तो क्रिकेट हा जेण्टलमन्स गेम

१६ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर क्रिकेटचे जनक समजल्या जाणाऱ्या इंग्लंडने वर्ल्डकप जिंकला. १९७५ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेचा यंदा बारावा अध्याय होता आणि तेव्हा कुठे इंग्लंडला यश मिळालं. साहजिकच या टीमचं कौतुक आहे. न्यूझीलंडने फायनलमधे दिलेली कडवी लढत मोडून काढत इंग्लंडने हा विजय मिळवला. ही लढत म्हणजे खऱ्या अर्थाने लढत होती. अशी अंतिम लढत याआधी कधीच झाली नाही.

मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. ते खेळावर लक्ष केंद्रित करत होते.

हेही वाचाः देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

कुठल्याही प्रकारचा वेगळा तणाव घेऊन ते वावरत नव्हते. ही आपल्या धर्माची, जातीची, वर्णाची इभ्रत राखायची घडी आहे असा विचारही कुणात दिसत नव्हता. प्रत्येक धाव मोलाची ठरत होती. ती काढण्यासाठी आणि अडवण्यासाठी शर्थ केली जात होती. डावपेच आखले गेले होते. प्रत्यक्ष मैदानात प्रत्येक खेळाडूची जिगर पणाला लागली होती.

जो कमी पडेल त्याचा संघ पराभूत होणार हे ठरलेलं होतं. घाम, रक्त, ऊर्जा याकडे बघितलं जात नव्हतं. खेळाचा आनंद ते घेत होते आणि बघणाऱ्यांनाही देत होते. कुणी कोणावर डाफरत नव्हतं. कुणी भावनांचं अतिरेकी प्रदर्शन करत नव्हतं. चूक झाली तरी सांभाळून घेतली जात होती. दोन्हीकडचे खेळाडू टीमसाठी खेळत होते. आपल्यापेक्षा टीम मोठी ही भावना त्यांच्यामधे होती. त्रागा न करता, आदळआपट न करता झुंज चालली होती.

क्रिकेटचा दर्जा उंचावला गेला होता. जणू क्रिकेटच्या माहेरघरी क्रिकेट हा खेळ नेमका काय आहे त्याच्या प्रात्यक्षिकांचे धडे दिले जात होते. हे खेळ सांघिक आहे. संघभावना ठेऊन खेळायचा आहे याचं दर्शन दोन्ही टीमनी घडवलं. इंग्लंडने यात बाजी मारली. त्यांची टीम यंदा जिंकणार ही अटकळ खरी ठरली. याचं कारण त्यांच्या टीममधे बराचसा समतोल होता.

त्यांची फलंदाजीची खोली आठव्या क्रमांकापर्यंत होती. त्यांच्याकडे अष्टपैलूंचा भरणा होता. आपल्याच घरच्या खेळपट्ट्या आणि वातावरण याचा फायदा उठवण्याची क्षमता त्यांच्या बॉलर्समधे होती. त्यांची सलामीची जोडी आक्रमक खेळत होती. आणि ही जोडी पाया भक्कम घालून देत होती.

हेही वाचाः टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

इंग्लंडचं नेतृत्व करणारा इडी मॉर्गन यास फारसं वलय नव्हतं. तो इतर देशांच्या कॅप्टनएवढा लोकप्रिय नव्हता. यामुळे तो दबावाखाली नव्हता. मात्र घरच्या खडूस समीक्षकांचा त्याच्यावर दबाव जरूर होता. त्याने टीमला एकत्र ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. क्षेत्ररक्षणात चुका होणार नाहीत याची खबरदारी तो घेऊन होता. ही स्पर्धा क्षेत्ररक्षणाचं महत्व अधोरेखित करणारी ठरली.

उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताला चकवलं ते क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. विल्यम्सनने पकडलेली कॅच आणि मार्टिन गप्टिलची धोनीला रनआऊट करणारी थेट फेक याने मॅच फिरली. आणि फायनलमधे न्यूझीलंडने क्षेत्ररक्षणातील ही सफाई कायम ठेवली. त्यांच्या फर्गुसन आणि बोल्ट यांनी घेतलेले झेल अप्रतिम होते. त्यामुळे इंग्लंडची दौड रोखली गेली. अन्यथा स्टोक्स आणि बट्लर जोडीने मॅच एकतर्फी केली असती.

लढत संपल्यावर न्यूझीलंडच्या काही खेळाडूंना अश्रू आवरत नव्हते. विजयाच्या अगदी नजीक येऊनही वर्ल्डकप आपला झाला नाही या भावनेने ते रडवेले झाले होते. पण त्यांची खिलाडू वृत्ती, इंग्लंडच्या खेळाडूंची व्यावसायिक वृत्ती या दोन्हींचं दर्शन या लढतीत झालं. त्यामुळे ही लढत कायमची स्मरणात राहणार आहे.

हेही वाचाः 

कंदील बलुच: पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

गुड फॅट आणि बॅड फॅट ही नेमकी भानगड काय?

इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

वर्ल्डकप जिंकलेल्या टीममधले खेळाडू नंतर काय करतात?

एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच