आयपीएलला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर भारतात वेगवेगळ्या खेळांच्या लीगचं वादळच आलं. या लीग सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, इतर खेळही त्यात उतरले. आपल्याकडे तर कुस्तीच्या लीगवरून चक्क दोन चॅनलमधेच झुंज लागली. पण यातून कुस्तीला नवा प्रेक्षक मिळताना दिसला नाही. त्यापेक्षा तर राणादादाने कुस्तीचं ग्लॅमर वाढवलं.
झी टॉकीज हे चॅनल तसं मराठी सिनेमासाठी प्रसिद्ध आहे. या चॅनलवर मराठीतले नवे जुने सिनेमे लागतात. त्यातून चॅनल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलंय. चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचलेल्या चॅनलची लोकप्रियता कॅश करून नवा बिझनेस आणण्यासाठी झी ग्रुपनं एक नवा प्रयोग केला. त्या प्रयोगाचं नाव आहे, झी महाराष्ट्र कुस्ती दंगल. कालच्याच रविवारी १८ नोव्हेंबरला त्याची फायनल झाली. तसं हा प्रयोग झीसाठी नवा नाही. कारण त्यांनी यापूर्वी अशा लीगच्या एडिशनच्या एडिशन काढल्यात.
जवळपास ११ वर्षांपूर्वी असाच प्रयोग सोनी मॅक्स या सिनेमा दाखवणाऱ्याच आणखी एका चॅनलनेही केला होता. तो प्रयोग होता इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल. हा प्रयोग इतका यशस्वी ठरला की, भारतातील प्राईम टाईमवर लीगचाच बोलबाला सुरू झाला. त्यामुळे आता दैनंदिन मालिकांचा टीआरपी मार खाऊ लागला. त्यामुळे एंटरटेन्मेंट चॅनलवाल्यांनी सीरियलच्या बरोबरीनं अशा लीगचाही हात धरला. खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून आमचा चॅनलाश्रय असल्याचं सांगितलं जाऊ लागलं.
सुरवातीला क्रिकेटपुरतं असलेलं लीगचं लोण हळूहळू दुसऱ्या खेळांमधेही पसरायला लागलं. जसं मेंढ्यांच्या कळपाचं असतं तसं या लीगचंही झालं. एका मेंढीच्या पाठोपाठ दुसऱ्या मेंढ्याही लीगच्या मार्गाने जावू लागल्या. आता हा लीगचा कळप खूपच वाढलाय. त्यामुळे त्या लीगची नावं ध्यानात ठेवणंही चाहत्यांसाठी अवघड झालंय. आता त्यात झी टॉकिजच्या ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’चीही भर पडलीय.
भारतात लीगचं लोण पसरवण्यात क्रिकेटचा पर्यायाने आयपीएलचा सगळ्यांत मोठा वाट आहे. पण ही काही भारतातील पहिली लीग नाही आणि सोनी मॅक्स या सिनेमाच्या चॅनललाही हा मान नाही. हा मान जातो तो झी टीवीला. झीचे मालक आणि आता राज्यसभेचे खासदार सुभाष चंद्रा यांनी त्यावेळी बीसीसीआयवर नाराज असलेल्या कपिल देव यांना हाताशी धरुन ‘इंडियन क्रिकेट लीग’ सुरू केली.
पण बीसीसीआयने या विरोधात कोर्टात धाव घेतली. बीसीसीआयने या लीगला मान्यता देण्यास नकार दिला. त्याचबरोबर बीसीसीआयने आपली स्वतःची इंडियन प्रिमीयर लीग काढली. यामुळे आयसीएल ही अल्पायुषी ठरली. वादग्रस्त ठरली. आता झी टॉकिजची महाराष्ट्र कुस्ती दंगलही वादामुळेच प्रकाशझोतात आलीय.
या लीगचं सुरवातीला ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ असं नाव होतं. कलर्स मराठी चॅनलनंही याच्याशी मिळतंजुळतं असलेल्या नावानं लीग सुरु करणार असल्याची जाहिरात केली. त्यातून कुणाची स्पर्धा आधी होणार यावरून वाद झाला. हा वाद थेट महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या दारात गेला. पर्यायानं परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुप्रीम कोर्टाकडे केस गेली. त्यांनी दोन्ही लीगच्या प्रतिनिधींना कुस्तीगीर परिषदेच्या बैठक बोलवून वाद मिटवला.
‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’ नाव असलेल्या कलर्सच्या स्पर्धेची ऑक्टोबरमधे बालेवाडीत फायनल मॅचही झाली. कुस्तीपटूंना बक्षिसंही वाटली गेली. काही कुस्तीपटूंना ‘पवाराश्रय’ही मिळाला. परंतु दोन वर्षांसाठी. कारण कुस्तीच्या वाऱ्याने अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या पोटात घेतलं नाही. कलर्सपाठोपाठ महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगच्याही स्पर्धा झाल्या.
त्याआधी झीच्या महाराष्ट्र कुस्ती लीगची खुद्द शरद पवार यांनी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी कुस्ती टिकवण्यासाठी तिच्यात होणारे बदल स्वीकारायला तयार राहायलं पाहिजे, असं पवार म्हणाले होते. रांगड्या कुस्तीने जगभरात भारताचं प्रतिनिधित्व करणारे कुस्तीगीर या स्पर्धेतून तयार होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता.
लीगमधील काही खेळाडूंचा दोनएक वर्षांसाठी खर्च उचलून कुस्ती मोठी करायची असती तर मग ‘दंगल लीग’चा घाट का घातला गेला? हा प्रश्न कायम राहतो. याआधी म्हटल्यासारखं भारतात विविध खेळांच्या लीगचा ‘मेंढीबाजार’ झालाय. एक मेंढी गेली की त्याच्या मागून सर्व मेंढ्या जातात. मग इतक्या मोठ्या मेंढ्यांच्या कळपाला चरण्यासाठी पुरेसा चारा आहे की नाही याची चाचपणी, शहानिशा करायची नाही. एका धष्टपुष्ट मेंढीच्या मागे इतरांनीही जायचं.
भारतात सध्या जवळपास प्रत्येक खेळाची आपली लीग आहे. प्रत्येक खेळाच्या संघटनेला वाटतं की जसं बीसीसीआयला आयपीएलच्या रुपाने सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडलीय, तसं आपणही लीगची कोंबडी पाळू. ती नक्कीच आपल्याला सोन्याचं अंडं देर्इल. पण प्रत्येक खेळाची लीग त्या त्या खेळाच्या संघटनेला सोन्याचं अंडं देते का? याचं उत्तर नाही असं आहे.
प्रो कबड्डी आणि काही प्रमाणात इंडियन सुपर लीग या फुटबॉल लीगचा अपवाद वगळला तर बाकीच्या खेळांच्या लीगला प्रेक्षकांचा पुरेसा रिस्पॉन्स नाही. जिथे प्रेक्षक नाहीत तिथे चॅनलला टीआरपी कसा मिळणार? टीआरपी नाही तर मग जाहिरात कोण देणार? जाहिरात नाही तर पैसा नाही. पैसा नाही म्हणजे नफा नाही. नफा नाही तर संघमालक आपला पैसा का लावतील? या आर्थिक चक्रातून क्रिकेटही सुटलं नाही. आयपीएलच्या यशानंतर राज्या राज्यातल्या क्रिकेट संघटनांनी आपली लीग सुरू केली. पण, तामिळनाडू आणि कर्नाटकची लीग सोडली तर इतर राज्यांच्या लीग चालल्या नाहीत.
भारतात खेळाची संस्कृती नाही. भारतात फक्त क्रिकेट संस्कृती आहे. जगात फिरल्यावर कळतं की निव्वळ क्रिकेट म्हणजे अख्खं क्रीडा विश्व नाही. भारतात क्रिकेटची लीग प्रचंड प्रसिद्ध झाली. त्यातून पैशाची मोठी उलाढाल झाली. म्हणून इतरही खेळाला सुगीचे दिवस येतील असा तर्क मांडून लीग सुरू करणं व्यवहाराच्या सोयीचं नाही.
झी चॅनलनंही पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात नुकतीच ‘झी कुस्ती दंगल’ घेतली. मैदानात प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला. पण या प्रेक्षक गॅलरीवर नजर फिरवली तर त्यात कुस्ती खेळणाऱ्यांची, कुस्तीशी संबंधित लोकांचीच गर्दी दिसली. दैनंदिन आयुष्यात कुस्तीशी संबंध येत नाही, असा प्रेक्षक त्या गॅलरीत नव्हता. झी टॉकिज प्रायोजित कुस्ती दंगलला सर्वसामान्य प्रेक्षकांचा प्रेक्षक गॅलरीत तसंच थेट प्रक्षेपणाला पाठिंबा मिळेल, त्याचवेळी हा दंगल लीगचा प्रपंच यशस्वी ठरेल.
महाराष्ट्राच्या मातीतल्या रांगड्या खेळाला जनमानसात प्रतिष्ठा आणि गतवैभव मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला सलामच. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल, अशी अपेक्षा नाही. पण लीग सुरू झाली म्हणजे कुस्तीचं घोडं गंगेत न्हालं असं नाही. तसं आता झालेलं नाही, पुढे झालं तर चांगलंच. पण होण्याची शक्यता कमीच. यापेक्षा तर कुस्तीला तुझ्यात जीव रंगलाच्या राणादादा या पैलवानाच्या भूमिकेने जास्त ग्लॅमर मिळवून दिलं होतं. त्याच्यामुळे तालमी पुन्हा फुलू लागल्या आहेत. ते या लीग आणि दंगलींना जमलं नाही.