शरणकुमार लिंबाळे: भूमिका घेऊन लिहिणारा लेखक

०८ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे.

भारतीय भाषा आणि साहित्यात दलित साहित्याने क्रांतिविज्ञान घडवलं. आंबेडकरी प्रज्ञेचा तो वैचारिक आविष्कारच होता. दलित लेखक हा भूमिका घेऊन जगतो, बोलतो आणि लिहितो. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध पुरोगामी, परिवर्तनवादी जीवनसन्मुख अशी त्याची भूमिका असते. अशाच भूमिकानिष्ठ सम्यक लेखकांपैकी शरणकुमार लिंबाळे हे एक महत्त्वाचे कवी, आत्मकथनकार, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत आहेत.

टेलिफोन खात्यात केली नोकरी

शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यात असलेल्या हन्नूर या गावात १ जून १९५६ ला झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावी, तर माध्यमिक शिक्षण चुंगी, चपळगाव इथं झालं. बीएची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना एमएचं शिक्षण घ्यायचं होतं. दरम्यानच्या काळात त्यांना लातूरच्या अहमदपूर इथं टेलिफोन खात्यात नोकरी मिळाली.

पुढे आकाशवाणी सोलापूर केंद्रात नोकरी करत असताना दयानंद कॉलेजचे प्राचार्य बनसोडे यांच्या आग्रहामुळे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर डॉक्टर ल.रा. नसिराबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी युनिवर्सिटीतून त्यांनी ‘दलित साहित्याच्या समीक्षेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर रिसर्च पूर्ण करून पीएचडी मिळवली.

पुढे ते यशवंतराव चव्हाण ओपन युनिवर्सिटी, नाशिक इथं प्राध्यापक आणि विविध केंद्रांचे संचालक म्हणून काम करत राहिले. २०१६ ला सेवानिवृत्त झाले.

हेही वाचा:  राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका

विविधांगी ग्रंथसंपदा

शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या लेखनाची सुरवात ‘अस्मितादर्श’ या दलित साहित्याचं मुखपत्र असलेल्या त्रैमासिकातून केली. त्यांची ग्रंथसंपदा मोठी आणि विविधांगी आहे. त्यात ‘उत्पात’, ‘श्वेतपत्रिका’, ‘धुडकूस’ हे कवितासंग्रह, ‘हरिजन’, ‘रथयात्रा’, ‘उद्रेक’ हे कथासंग्रह, ‘उचल्या’, ‘भिन्नलिंगी’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘दंगल’, ‘रामराज्य’, ‘ओ’ आणि ‘सनातन’ या कादंबर्‍या, ‘अक्करमाशी’, ‘बारामाशी’ आणि ‘राणीमाशी’ ही त्यांची आत्मकथने आहेत.

समीक्षा ग्रंथात साहित्याचे निकष बदलावे लागतील, ‘ब्राह्मण्य’, ‘दलित’, ‘आत्मकथा - एक आकलन’, ‘वादंग’ आणि ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ यांचा समावेश होतो. त्यांची ‘शतकातील दलित विचार’, ‘दलित प्रेमकविता’, ‘प्रज्ञासूर्य’, ‘गावकुसाबाहेरील कथा’, ‘रिपब्लिकन पक्ष : वास्तव आणि वाटचाल’, ‘भारतीय दलित साहित्य’, ‘साठोत्तरी मराठी वाङ्मयीन प्रवाह’, ‘सांस्कृतिक संघर्ष’ ही संपादनं महत्त्वाची आहेत.

आत्मकथनाचा इंग्रजीत अनुवाद

त्यांचं वेगवेगळं साहित्य भारतातल्या भाषांमधे भाषांतरित झालंय. त्यामुळे भारतीय परिप्रेक्ष्यातले दलित लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. लिंबाळे यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. दलितांचं दाहक जीवन, त्यांच्या जगण्यातली भीषण वास्तवता, संघर्ष यामधून साकारू पाहणारं भविष्य, परिवर्तनवादी चळवळींना येत असलेलं अपयश, समाजात बोकाळत चाललेल्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरची परखड भाष्य आलेली आहेत.

त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाचा अनुवाद अनेक भाषेत झालेला आहे. ऑक्सफर्ड पब्लिकेशनने याचा इंग्रजी अनुवाद ‘द आऊट कास्ट’ या नावाने केला आहे. नांदेड इथं २०१८ ला झालेल्या १२ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २००४ ला इचलकरंजी इथं झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय.

हेही वाचा:  कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

सनातनमधे संस्कृतीतला संघर्ष

त्यांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामधे अलीकडे २०१९ ला पुण्यात झालेल्या २० व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात त्यांना ‘प्रा. रा.ग. जाधव साहित्य साधना’ पुरस्कार देण्यात आला.

आता भारतीय एकवीस भाषांमधल्या सर्वश्रेष्ठ कलाकृतीसाठी दिला जाणारा २०२० चा ‘सरस्वती’ पुरस्कार त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला जाहीर झालाय. विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांच्यानंतर हा सन्मान शरणकुमार लिंबाळे यांना मिळतोय ही मराठी भाषा आणि साहित्यविश्वासाठी आनंदाची घटना आहे.

‘सनातन’ ही कादंबरी २०१८ मध्ये दिलीपराज प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रसिद्ध झाली आहे. या कादंबरीचं नाव ‘सनातन’ असल्यामुळे काहींना ती पारंपरिकतेचं दिग्दर्शन करणारी वाटू शकते. मात्र, तसं नाही. उलट त्यातून लिंबाळे यांनी पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक संस्कृती यांच्यातला संघर्ष चितारलेला आहे. सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य केलेली आहेत.

‘सनातन’ हे आजचं वर्तमान

भारतीय संस्कृतीच्या नावाखाली या देशातल्या मूळनिवासी असलेल्या दलित, आदिवासींचं ऐतिहासिक काम, कर्तृत्व नाकारलं जातं. त्यांना उपेक्षित ठेवलं जातं. वास्तविक, हे लोक शूर, वीर, पराक्रमी होते. त्यांनी इतिहासात क्रांतिकारक काम केलेलं आहे. रायनाक महार, सिदनाक महार, गोविंद महार यांची यशोगाथा सर्वश्रुत आहे.

कोरेगाव भीमाच्या लढ्यात याची ऐतिहासिक प्रचिती आलेली आहे. हाच मूळ गाभा केंद्रस्थानी ठेवून लिंबाळे यांनी ‘सनातन’ ही कादंबरी लिहिलीय. कोरगाव भीमा लढाईच्या शतकमहोत्सवी टप्प्यावर या कादंबरीचं लेखन केल्याचं लिंबाळेंनी मनोगतात मांडलेलं आहे.

‘गो हत्या केली म्हणून हत्या केली त्यांना’ हे कादंबरीच्या अर्पणपत्रिकेतलं वाक्य अतिशय महत्त्वाचं असून, त्यातून समकाळातला सांस्कृतिक दहशतवाद अभिव्यक्त होतो. इथूनच कादंबरीचा रोख आपल्या लक्षात येतो. पुढे ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात या कादंबरीचा पट आविष्कृत होतो.

कादंबरीच्या मागच्या पानावर लिहिलेला मजकूर महत्त्वाचा असून, त्यावर लिहिलंय, ‘सनातन’ हे वर्तमान आहे अर्ध्या-अधिक भारताचे. नाकारलेल्या इतिहासाचे उत्खनन आहे. शेकडो माणसं, शेकडो मैल आणि शेकडो वर्षे व्यापणारी ही कादंबरी वाचायला हिंमत लागते. कल्पना आणि इतिहासाच्या सरमिसळीतून तयार झालेला सत्याचा नवा प्रयोग वाटतो.

हेही वाचा: आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत? 

कादंबरीत मानवतावादी विचार

‘सनातन’ ही कादंबरी व्यापक सामाजिक हिताची जाणीव करून देते. त्यामुळेच जातीच्या संकुचित परिघात जगणार्‍यांना ती धारदार शस्त्रासारखी वाटेल. ही शस्त्रपूजा नाही, तर माणसाची प्रार्थना आहे. एकूणच लिंबाळे यांच्या या कादंबरीचं महत्त्व ऐतिहासिक आणि सामाजिक स्वरूपाचं आहे. त्यातला आशय सांस्कृतिक संघर्षाचा आहे. त्याची अभिव्यक्तीसुद्धा तितक्याच परखड आणि बेधडकपणे लिंबाळेंनी केलेली आहे.

पारंपरिकदृष्ट्या ही ऐतिहासिक कादंबरी नाही. मात्र, सर्जनशीलपणे इतिहासाचा अन्वयार्थ लावून हजारो वर्षांचा दलित, आदिवासींचा क्रांतिकारक इतिहास उजागर करण्याचं काम या कादंबरीच्या माध्यमातून लिंबाळे यांनी केलेलं आहे.त्यामुळे ही कादंबरी सांस्कृतिक इतिहासमिमांसा आपल्यासमोर मांडते. व्यापक मानवतावादी विचारांकडे घेऊन जाते. हीच या कादंबरीची मूल्यात्मकता आहे. जी शरणकुमार लिंबाळे यांचं भारतीय साहित्यातलं योगदान अधोरेखित करते.

हेही वाचा: 

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)