यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

११ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


इस्त्रायलच्या ताब्यातून सोडवून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या यासर अराफात यांचा आज १५ वा स्मृतिदिन. पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघटना बांधणीपासून आतंरराष्ट्रीय राजकारण खेळण्यापर्यंत सगळे प्रयत्न त्यांनी केले. पण शेवटी इस्त्राइलशी समझोता करून शांततेच्या मार्गानेच त्यांनी पॅलेस्टाइन स्वतंत्र केला.

पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल या दोन देशांच्या साध्या उच्चारावरून सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतं ते संहारक युद्ध, विनाश, बॉम्बहल्ले, प्रचंड मानवीय जीवित हानी. मध्यपूर्व आशियातला गेल्या सहा-सात दशकातला अत्यंत संवेदनशील आणि कायम युद्धजन्य परिस्थिती असेलला हा प्रदेश. जगातली सगळ्यात रक्तरंजित अशी वादग्रस्त भूमी.

१८ मार्च १९६८. इस्त्रायल-पॅलेस्टाईन कधीही विसरू शकणार नाहीत असा दिवस. या दोन देशांमधे सुरू असलेल्या युद्धाला नवं वळण देणारा हा दिवस आहे. आपल्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांनी इस्त्रायलच्या विरोधात लढण्यासाठी ’पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनाझेशन’(पीएलओ) नावाच्या संघटनेची आणि १९६४ मधे ’अल फतह’ ऊर्फ ’फतह’ नावाच्या दुसऱ्या एका हिंसक संघटनेची स्थापना केली.

इस्त्रायल आणि जॉर्डन यांच्या दरम्यान असलेल्या पॅलेस्टाईनला इस्त्रायलच्या ताब्यातून सोडवून पॅलेस्टाईन स्वतंत्र देश म्हणून स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘फतह’च्या सदस्यांनी इस्त्रायलच्या एका शालेय बसवर हल्ला केला. त्यात दोन लहान मुलं ठार झाली. अनेक मुलं गंभीर जखमी झाली.

टाइम मासिकानं घेतली दखल

इस्त्रायलवर याचा खोल परिणाम झाला. या घटनेचा सूड घेण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी अल फतह संघटनेचा अड्डा असणाऱ्या करामेह या जार्डनमधल्या शहरावर हल्ला चढवायचा निर्णय केला. तीन दिवस आधी इस्त्रायलनं सर्वसामान्य नागरिकांना शहर सोडून जाण्याचा इशारा दिला. इस्त्रायलचे सुसज्ज सैन्य करामेह शहराजवळ पोचलं, तेव्हा मात्र त्यांना जबरदस्त प्रतिकाराला सामोरं जावं लागलं. इस्त्रायलसाठी हा मोठा धक्का होता. या हल्ल्यात इस्त्रायली सैन्याचं फार मोठं नुकसान झालं.

आपल्या लोकांच्या पराक्रमाविषयी जगाला कळावं असं त्या ’फतह’च्या म्होरक्याला मनापासून वाटत होतं. त्यातंच टाईम मासिकानं या युद्धाची दखल घेतली. पहिल्यांदाच पॅलेस्टाईनच्या भूमिकेविषयीची माहिती जगासमोर आली. टाईमनं फतहच्या प्रमुखाचा फोटो मासिकाच्या मुखपृष्ठावर छापला.

पॅलेस्टाईन मुक्ती संघटना अल फतहबद्दल एका रात्रीत प्रचंड आदर निर्माण झाला. यानंतर या संघटनेत सामील होण्यासाठी तरूणांची रीघ लागली. या संघटनेचा म्होरक्या एकारात्रीत प्रकाशझोतात झाला. पॅलेस्टाईन मुक्ती लढ्याचा तो प्रेरक प्रतिक बनला. त्याने अत्यंत नियोजनबद्धपणे संघटनेतल्या लोकांना जॉर्डनच्या मदतीनं इस्त्रायलसोबत लढण्यासाठी प्रेरित केलं. यासर अराफात हे त्याचं नाव. या नंतर यासर अराफात हे पॅलेस्टाईनच्या मुक्तीलढ्याचे हिरो बनले.

खरं तर ते या लढ्याचे अनभिषिक्त सम्राट बनले. फताहला मिळत असलेल्या आर्थिक मदतीत प्रचंड वाढ झाली. सिरिया, जॉर्डन, लेबनॉन इथून अराफात यांनी इस्त्रायल विरोधातला लढा कायम सुरू ठेवला. फेब्रुवारी १९६९ मधे अराफात यांची पीएलओच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

वादळी आयुष्य लाभलेला लढवय्या

आपल्या कार्यातून आणि राजकीय कर्तृत्वातून या लढवय्या सैनिकानं स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या भूमिकेला आणि प्रश्नाला जागतिक राजकारणाच्या पटलावर मोठ्या खुबीने मांडलं. जगाचं लक्ष आपल्या प्रश्नाकडे वेधून घेतलं. आपल्या इस्त्रायलविरोधी टोकाच्या भूमिकेची दखल घ्यायला लावली.

अब्द अल-रहमान अब्द अल-रौफ अराफात अल-कुडवा अल-हुसेनी उर्फ यासर अराफात. अराफात म्हणजे ओळख पटवून देणारा. आपल्या कामातून अरेबिकमधल्या आपल्या नावाचा अर्थच अराफात यांची खरी ओळख सांगतो. यासर अराफात यांचा जन्म २४ ऑगस्ट १९२९ रोजी इजिप्तची राजधानी कैरोमधे झाला. पण अराफात यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा जन्म जेरुसलेममधेच झालाय.

पॅलेस्टाईन लढ्याचं नेतृत्व करणारा माणूस जेरुसलेमसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जन्मला असल्याचा भास निर्माण करणं अराफातच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं. अराफात यांच संपूर्ण आयुष्य अत्यंत वादळी आणि तितकचं वादग्रस्त राहिलं. त्यांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत घडलेल्या सगळ्याच घटनांना वादळी असाच शब्द वापरावा लागेल.

अराफात यांच्या वडलांचा कापडाचा व्यवसाय होता. एकूण सात भावडांपैकी अराफात हे सहावं अपत्य. अराफात यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर वडिलांनी अराफातला जेरुसलेमला आईच्या कुटूंबाकडे पाठवलं. काही काळानं ते तिथून परत आले. पण आपल्या वडलांशी त्यांचं विशेष सख्य राहील नाही. वारंवार लग्न करण्याच्या वडलांच्या सवयीतून त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. १९५२ मधे आपल्या वडलांच्या मृत्युनंतर अराफात त्यांच्या अंतयात्रेलाही ते हजर राहीले नव्हते.

हेही वाचा : शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर

पॅलेस्टिनी राष्ट्रवाद जागृत ठेवण्याचे प्रयत्न

अराफात विद्यार्थी दशेत असताना १९४८ मधे अरब इस्त्रायल दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली. तेव्हा पॅलेस्टाईनच्या मुक्तीलढ्यात भाग घेण्यासाठी अराफात शिक्षण सोडून दिलं. तिथून परतल्यानंतर १९५७ मधे सिविल इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केल्यानंतर अराफात कुवेतमधे काम करण्यासाठी गेले. तिथे अराफात यांची इजिप्तमधल्या मुस्लिम ब्रदरहूड संघटनेचं कामकाज पाहणाऱ्या कट्टर विचारसरणीच्या लोकांशी भेट झाली. इथंच त्यांची पॅलेस्टिनी निर्वासितांशी गाठ पडली. आणि याचवेळी ’फतह’चं काम आकार घेऊन लागलं.

फतह म्हणजे पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठीची चळवळ. फतह या संघटनेचं वेगळेपण म्हणजे पॅलेस्टिनी लोकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं लढलं पाहिजे. १९६५ मधे इस्त्रायलविरोधात गनिमी पद्धतीनं कारवाया सुरू ठेवत फतहने पॅलेस्टिनी राष्ट्रवाद जागृत ठेवण्यात यश मिळवलं.

१९६२ मधे अराफात यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जॉर्डनमधून सिरीयामधे मुक्काम हलवला. त्यांचे सहकारी युद्ध कौशल्यात प्रशिक्षित नव्हते. त्यामुळे त्यांना प्रशिक्षित करणं आणि युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रक्षोभक भाषण देणं अशी कामं अराफात करत. त्यासोबतच त्यांना भरपूर पैसाही देत असे. याच काळात अराफात यांच्या सैन्यानं इस्त्रायलवर अनेक घातक हल्ले केले.

इंदिरा गांधींना बहिण मानलं

इस्त्रायलवर थेट हल्ला करण्याची क्षमता नसल्यानं अराफात यांनी छुपे हल्ले करण्याचा मार्ग अवलंबला. अर्थातच याला दहशतवादी कारवाया असं लोक म्हणायला लागले. त्यावर ’कुठल्याही देशाला आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायचं असेल तर त्यासाठी सगळे वैध अवैध मार्ग वापरण्याचा त्यांना अधिकार असतो’, असं अराफात म्हणत.

पॅलेस्टाईन मुक्तिलढा हा केवळ युद्ध, हल्ले किंवा दशहतवादी कारवाया करून पुढे रेटता येणार नाही हे अराफात यांनी ओळखलं. आणि राजकीय सारिपाटावर पॅलेस्टाईनला ओळख आणि स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी राजकीय डावपेचास सुरवात केली.

इंदिरा गांधी या आपल्या भगिनी आहेत, असं म्हणत अराफात यांनी भारताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. ते अनेकदा भारतात येऊनही गेले. त्यांच्या या राजकारणाला यशही आलं. अरब देशांनंतर भारत हा असा एकमेव देश होता ज्यानं पीएलओस मान्यता दिली. काही राजकीय विश्लेषक भारतानं हे पाऊल उचलण्यामागे भारतातील मुस्लिम मतांना आकर्षित करण्याचं राजकारण कारणीभूत असल्याची टीका  काहींनी केली. पण ते तितकं खरं नाही.

हेही वाचा : तीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार?

संयुक्त राष्ट्रसंघात केलं भाषण

आंतरराष्ट्रीय स्तरावर अराफात यांच्या राजकीय डावपेचांना यश यायला लागलं होतं. १९७४ मधे अरब देशांच्या बैठकीत पॅलेस्टिनी लोकांंचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पीएलओला अधिकृत संघटनेचा दर्जा देण्यात आला. ही महत्त्वाची घटना होती. याचा एक अर्थ असा होता की अरब राष्ट्र हे स्वतंत्र पॅलेस्टाईन म्हणून निर्माण होण्यास अरब देश होकार देत आहेत. जागतिक राजकारणात याचे तात्काळ पडसाद उमटले. 

१९७४ मधे संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला मान्यता दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण अधिवेशनात भाषण करण्याचं आमंत्रण अराफात यांना मिळालं. अराफात यांच्यासाठी हा मोठा राजकीय विजय होता. १३ नोव्हेंबर १९७४ ला अराफात न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्रसंघात आपली भूमिका मांडण्यासाठी लष्करी गणवेशात गेले होते. त्यावेळी त्यांच्या गणवेशाला असलेलं पिस्तुल तिथल्या सुरक्षा रक्षकांनी काढून घेतलं. आपण शांततेच्या दिशेने पावले टाकू पण इस्त्रायलला कायमचं नष्ट करण्याच्या निर्धारापासून कधीही मागं हटणार नाही, असं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

याविषयी पॅलेस्टाईन प्रश्नाचे अभ्यासक अतुल कहाते सांगतात, ‘संयुक्त राष्ट्रसंघामधे तिसऱ्या जगाच्या वाढत्या वर्चस्वामुळे इस्त्रायलला मिळत असलेला पाठिंबा कमी होत गेला. आणि पॅलेस्टिनी लोकांच्या चळवळीचा पाठिंबा वाढत गेला. जितक्या देशांनी इस्त्रायल हे स्वतंत्र राष्ट्र आहे असं मान्य केलं होतं त्याहून जास्त देशांनी अधिकृतरित्या अराफात यांच्या पीएलओसोबत संबंध प्रस्थापित केले.’

अमेरिकेनं केली मध्यस्थी

१९८० च्या दशकात अराफात जगभर दौरे करत होते. डिसेंबर १९८८ मधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर बोलताना एखाद्या देशाने अथवा संघटनेने केलेला दशहतवाद आपल्याला मान्य नाही. आणि भविष्यात इस्त्रायलचं अस्तित्वही आपण मान्य करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेचं स्वागत अमेरिकेनं केलं. पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला.

अमेरिकेनं इस्त्रायलचे तत्कालीन पंतप्रधान इत्झॅक रॉबीन आणि अराफात यांच्यात चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं काम केलं आणि उभयतांनी त्याला मान्यता दिली. १३ सप्टेंबर १९९३ ला वॉशिंग्टन इथे दोघांनी घोषणापत्रावर सह्या करून एक पाऊल पुढे टाकलं.

या दोघांच्या या भूमिकेचं एवढं स्वागत झालं की अराफात आणि रॉबिन या कायम युद्धाची भाषा करणाऱ्या दोन प्रमुखांना शांततेचं नोबेल पारितोषीक बहाल केलं गेलं. प्रत्येक क्षणाला संघर्षाची किनार असलेल्या इस्त्रायल-पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाला जागतिक वाचा फोडण्यापासून ते दोन देशांतील नेत्यांतील शांततेच्या चर्चेची वार्तादेखील अराफात यांच्या नेतृत्वात झाली.

हेही वाचा : मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात

अखेर वाघाला पिंजऱ्यात कोंडलं

अराफात यांचा प्रवास संघर्षाकडून शांततेकडे झाला असला तरी दोन्ही बाजुंकडून शांततेच्या मार्गानं काहीही घडू नये असं वाटणाऱ्यांची संख्याही खूप मोठी होती. इस्त्रायलमधे रॉबिन यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या शेरॉन यांच्या जहाल नेत्तृत्वाने कोण अराफात असा प्रश्न केला. तोवर अराफात यांची संघटनेवरील पकड ढिली झाली होती. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं.

यासर अराफात यांचा ११ नोव्हेंबर २००४ ला फ्रान्समधल्या एका रूग्णालयात मृत्यू झाला. राजकारणात आणि युद्धातही वाघासारखा वावरलेल्या या वाघाला आपल्या आयुष्यातला अखेरचा काळ मात्र पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखा घालवावा लागला.

हा त्यांच्यावर नियतीने उगवलेला सूड होता की काळाचा महीमा की इस्त्रायलच्या कट्टर राजकारणाचा बळी हे काळाच्या ओघात कदाचित कधीच कळणार नाही. पण यासर अराफात हे एक वादळ होतं ज्याने पॅलेस्टीन-इस्त्रायल यांच्यातल्या द्वंद्वांत जगाला सामील करून घेतलं. जगाला त्यावर भूमिका घेण्यास भाग पाडलं. इस्त्रायलने त्यांना अत्यंत शिस्तबद्धपणे विष प्रयोग करून मारल्याची चर्चा आजही होते.

काहीही असलं तरी एका वादळाची सांगता मात्र शोकांतिकेने झाली. हे नियतीचं चक्र आहे की अजून काही हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण आज जगाच्या राजकीय सारीपाटावर अराजकीय भूमिका घेणाऱ्या राजकीय व्यक्तींनी मात्र यासर अराफात यांच्या जीवनकार्यावर आणि करुण अंतावर चिंतन नक्की करावं.

हेही वाचा : 

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

तर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’