कोल्हापूरच्या यशवंत पेठकर यांचा आज जन्मदिवस. व्यवसायाने ते शिक्षक. बालवाडीतल्या लहान मुलांची नाच गाणी बसवत त्यांनी थेट सिनेसृष्टीत प्रवेश केला. चॉकलेट हिरो देव आनंद आणि खलनायक प्राण यांना बॉलिवूडमधे ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय पेठकर मास्तरांना दिलं जातं.
हिंदी सिनेसृष्टीतला सदाबहार, चिरतरुण, तरुणांच्या काळजातला चॉकलेट हिरो, ज्येष्ठ अभिनेता देव आनंद यांना खर्या अर्थाने नायक म्हणून रुपेरी पडद्यावर कोणामुळे मान्यता मिळाली? हिंदी सिनेसृष्टीतला एकमेवाद्वितीय खतरनाक खलनायक आणि अलीकडच्या काळातला एक श्रेष्ठ चरित्र अभिनेता प्राण यांना लाहोरच्या पंजाबी सिनेसृष्टीमधून हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर संधी देणारी व्यक्ती कोण होती.
वाचून आश्चर्य वाटेल की, देवानंद आणि प्राण या दिग्गजांना बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर कलाकार म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरणारी व्यक्ती होती कोल्हापुरातले एक हरहुन्नरी शिक्षक.
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या कामा इतकंच त्यांचं सांस्कृतिक क्षेत्रातलं कामही तितकंच महान आहे. नाटक, गाणं, चित्र आणि शिल्पकले बरोबर शाहू महाराजांनी सिनेसृष्टीलाही प्रोत्साहन दिलं.
आनंदराव आणि बाबुराव पेंटर यांच्या पासून कोल्हापूरात सुरू झालेली सिनेसृष्टी ही परंपरा मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, वी. शांताराम यासारख्या दिग्गजांनी वृद्धिंगत केली. शाहू महाराजांचं स्वप्न असणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलने अनेक विद्यार्थी आणि शिक्षक सिनेसृष्टीला दिले.
विशेषतः मास्टर विनायक, गजानन जहागीरदार, यशवंत पेठकर, कोल्हटकर, दिनकर पाटील यासारखे विद्यापीठाचे विद्यार्थी, दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीला गाजवू लागले. 'वन मॅन शो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांना पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर संधी देण्याचं काम कोल्हापूरचे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी केलं.
हेही वाचा: आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर
त्याप्रमाणेच चॉकलेट हिरो देवानंद आणि खलनायकांचा बादशहा प्राण यांच्या बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावरच्या आगमनाचं श्रेयही कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या यशवंत विठ्ठल पेठकर या शिक्षकाला दिलं जातं. १५ मे १९१३ हा त्यांचा जन्मदिवस. यशवंत पेठकर विद्यापीठ हायस्कूलच्या जवळच रहात होते.
विद्यापीठ हायस्कूलमधलं शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यापीठाच्या 'सांदिपनी बालवर्गा'मधे त्यांनी शिकवायला सुरवात केली. पेठकर मास्तर स्वतःच्या घरी कमी आणि बालवाडीमधे जास्त रमत. लहान मुलांसाठी वेगवेगळी खेळणी तयार करणं, तक्ते बनवणं, शैक्षणिक साहित्य बनवणं यात ते सतत व्यस्त असायचे. लहान मुलांना गाणी शिकवताना, नाच शिकवताना स्वतः लहान मुलाप्रमाणे नाचत.
त्यांची बालवाडी शिकवणीची आवड पाहून विद्यापीठाचे संस्थापक गं. य. दीक्षित गुरुजी यांनी पेठकर मास्तरांना मॉन्टेसरी ट्रेनिंगसाठी मद्रासला पाठवायचं ठरवलं. त्यावेळी जागतिक कीर्तीच्या बाल शिक्षण तज्ज्ञ डॉ. मारिया मॉन्टेसरी मद्रास इथं आल्या होत्या.
विद्यापीठ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर जॉर्ज अरुंडेल यांच्या विनंतीनुसार डॉक्टर मॉन्टेसरी यांनी भारतातल्या शिक्षकांसाठी बालवाडीचे प्रशिक्षण वर्ग घ्यायला सुरवात केली. डॉक्टर मॉन्टेसरी यांच्या हाताखाली प्रत्यक्ष शिकण्याची संधी पेठकर यांना मिळाली. यशवंत पेठकरांनी फर्स्ट क्लास उत्तीर्ण होत हे बालवाडी प्रशिक्षण पूर्ण केलं.
लहान मुलांना शिक्षण देण्याची दृष्टी पेठकर मास्तरांना या प्रशिक्षणामुळे मिळाली. विद्यापीठामधे त्यांनी बालवाडीच्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवून घ्यायला सुरवात केली. गोकुळ अष्टमीच्या रात्री होणारे हे कार्यक्रम पाहण्यासाठी कोल्हापुरातल्या आबाल- वृद्ध नागरिक गर्दी करू लागले. एवढीशी चिमुरडी मुलं पण पेठकर मास्तर त्यांच्याकडून नाटक आणि नृत्य कसे बसवून घेतात याचं लोकांना आश्चर्य वाटायचं.
पेठकर मास्तर छोट्या छोट्या नाटकांचं लेखन स्वतः करत. छोटी वाक्य, परिणाम करणारे संवाद, आवाजातले चढ-उतार, चेहऱ्यावरचे हावभाव हे सर्व शिकवत असताना पेठकर मास्तरांच्या आतला सिने दिग्दर्शक तयार होत होता.
पेठकर मास्तरांचं शिकवण्याचं हे कसब पाहून कोल्हापूर नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष तेंडोलकर आणि एक समाजसेवक मामा मिणचेकर यांनी पेठकर मास्तरांना कोल्हापूर नगरपालिकेतर्फे राजारामपुरीत बालवर्ग सुरू करण्याचा आग्रह केला.
हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा
विद्यापीठ सोसायटीने राजारामपुरीतल्या 'राजाराम हॉल' इथं १९ ऑक्टोबर, १९४२ ला बालवर्ग सुरू केला. पुण्यशील मातोश्री ताराबाई महाराणी छत्रपतींच्या हस्ते या बालवर्गाचं उद्घाटन झालं. विशेष म्हणजे नुकत्याच दिवंगत झालेल्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या सुकन्या प्रिन्सेस पद्माराजे या बालवाडीच्या पहिल्या विद्यार्थिनी झाल्या.
पेठकर मास्तरांच्या शिकवणीमुळे या बालवर्गाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. अभिनय म्हणजे काय हे माहीत नसलेल्या चार-पाच वर्षाच्या लहान मुलांकडून अभिनय करून घेणं हे काम काही सोपं नव्हतं. पेठकर मास्तरांचं हे लहान मुलांना शिकवण्याचं कसब विद्यापीठ हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक असलेले त्यावेळेचे आघाडीचे दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या नजरेत आलं.
यापूर्वीही एकदा १९३७ ला विनायक यांच्या 'प्रेमवीर' या विनोदी सिनेमात पेठकर मास्तरानी अत्यंत अल्पशी खलनायकाची भूमिका केली होती. मास्टर विनायकांच्या आग्रहामुळे १९४६ ला यशवंत पेठकर विद्यापीठ बालवाडी सोडून पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीत काम करू लागले. त्यावेळी देव आनंद हा नवखा तरुण प्रभात कंपनीच्या 'हम एक है' या सिनेमात काम करत होता. 'हम एक है' हा सिनेमा काही फारसा चालला नाही.
सिनेमा फ्लॉप झाल्यावर अनेक अभिनेते घरी बसतात. पण पेठकर मास्तरांनी देवानंदमधल्या अभिनयाचे गुण ओळखले होते. त्यामुळे प्रभात कंपनीच्या 'आगे बढो' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेठकर मास्तरांवर आली.
त्यांनी देव आनंदलाच नायकाच्या भूमिकेसाठी निवडले. त्या काळातली प्रसिद्ध अभिनेत्री खुर्शीद ही देव आनंदची नायिका होती. विद्यापीठ हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले सुधीर फडके यांच्याकडे सिनेमाच्या संगीताची जबाबदारी होती.
सिनेमा प्रदर्शित झाल्यावर देव आनंदचा खऱ्या अर्थाने नायक म्हणून बाॅलिवूडच्या विश्वात बोलबाला सुरू झाला. एक नवा, ताजा, टवटवीत, सदाबहार नायक पेठकर मास्तरांच्यामुळे सिनेसृष्टीला मिळाला. 'आगे बढो' या सिनेमाच्या यशामुळे यशवंत पेठकर यांनाही यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
प्रभातच्या 'अपराध' या पुढच्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेठकर यांच्यावर आली. 'अपराध' सिनेमात नायक होते रामसिंग तर नायिका होती मधुबाला. या सिनेमात एका क्रांतिकारकांच्या भुमिकेत एका नव्या नटाने बॉलिवूडच्या सिनेमासृष्टीत प्रवेश केला. लाहोरच्या पंजाबी सिनेसृष्टीमधून आलेल्या त्या तरुणाचं नाव होतं प्राण.
हेही वाचा: बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
यानंतर पेठकर मास्तरांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. गीताबाली, रेहमान आणि अरुण यांचा 'शादी की रात' गीता बाली, करण दिवाण, बेगम पारा यांचा 'सौ का नोट' या हिंदी सिनेमा बरोबरच, झालं गेलं विसरून जा, चोरावर मोर, मोलकरीण, यासारखे एकापेक्षा एक उत्तम सिनेमा त्यांनी रसिकांना दिले.
'मोती बा' नावाचा गुजराती सिनेमाही त्यांनी दिग्दर्शित केला. या सिनेमाला गुजरात सरकारचा 'सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा' म्हणून पारितोषिकही मिळालं. कधी करशील लग्न माझे, माझा मुलगा, जय राधे कृष्ण, जुने ते सोने, तूच माझी वहीनी, माय माऊली, सून लाडकी यासारखे एका पेक्षा एक दर्जेदार सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केले.
१९९१ साली त्यांनी 'संत नामदेव' हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा सिनेमा दिग्दर्शित केला. त्याची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन पेठकर यांचेच होते.
कोल्हापूर हे कलापूर आहे. इथल्या मातीत कलाकारांना पोषक असणारी सर्व तत्त्व आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारख्या द्रष्ट्या राजानं इथल्या कलांना आणि कलाकारांना राजाश्रय दिला. त्यामुळेच साहित्य, शिल्प, नाट्य, क्रीडा आणि सिनेमा अशा विविध क्षेत्रातली कलाकार रत्न इथं जन्माला आली.
त्यांनी स्वतः बरोबरच कोल्हापूरचंही नाव मोठं केलं. चॉकलेट हिरो देव आनंद आणि खलनायक प्राण यांना बॉलिवूडच्या सिनेसृष्टीत ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय कोल्हापूरच्या यशवंत पेठकर मास्तरांना दिलं जातं, ते यामुळेच.
हेही वाचा:
फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?