महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी.
यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतील हा प्रसंग. त्यांचं वास्तव्य दिल्लीत होतं. पण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचं महाराष्ट्रात येणं व्हायचं. यापैकी बहुतेक समारंभ सांस्कृतिक आणि वाङ्मयीन विश्वाशी संबंधित असायचे. राजकीय सभांपासून ते काहीसे दूर पडत चालले होते.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी 'स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था' स्थापन केली आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासाचे चक्र गतीमान केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांना गुरू मानणाऱ्या बापूजींनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार हे ध्येय उराशी बाळगून खेडोपाडी माध्यमिक शाळांचं जाळं विणलं. यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि पुढे केंद्रात गेल्यावरही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला सढळ हाताने मदत केली होती.
बापूजींचं आता वय झालं होतं. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा भव्य सत्कार करायचं ठरवलं. बापूजींचा सत्कार करण्यासाठी यशवंतरावांहून अधिक योग्य व्यक्ती कोण असणार होती? साताऱ्यातील लालबहाद्दूर शास्त्री कॉलेजचे प्राचार्य मो. नि. ठोके यांनी १९८२ च्या मार्चमधे यशवंतरावांना दिल्लीच्या पत्त्यावर पत्र पाठवलं.
यशवंतरावांनी हे निमंत्रण आनंदानं स्वीकारलं. 'एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मला वेळ आहे. तारीख आणि वेळ आयोजकांनी ठरवावी' असं त्यांनी पत्राने ठोकेंना कळवलं. त्याप्रमाणे सत्कारसमारंभ सकाळी ११ ला होईल असं आयोजकांनी यशवंतरावांना कळवलं. हा कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी कोरेगाव तालुक्यातील यशवंतराव पिंपोडे इथं दुसऱ्या एका छोट्या घरगुती समारंभाला जाणार होते. पण कार्यक्रमापूर्वी काही दिवस अगोदर सत्कारसमारंभाची वेळ बदलून ती दुपारी चारची करण्यात आली. आयोजकांनी केलेला हा बदल मो. नि. ठोकेंनी यशवंतरावांना पत्र लिहून कळवला. सत्कार समारंभाची वेळ बदलल्याने यशवंतराव अस्वस्थ झाले. या बदलामुळे त्यांचं पुढील अनेक कार्यक्रमांचं वेळापत्रक कोलमडणार होतं. मग यशवंतरावांनी स्वहस्ताक्षरात ठोकेंना पत्र लिहिलं. या पत्रात ते म्हणतात,
तुमचे पत्र मिळाले. समारंभाची वेळ सकाळची अकरा वाजताची (मला तसे सांगण्यात आले होते) बदलून आपण माझी मोठी गैरसोय केली आहे. मला हा कार्यक्रम झाल्यावर पिंपोडे येथे पाच वाजता पोहोचायचे आहे. तेव्हा कृपा करून सायंकाळची चार वाजताची वेळ बदलून अडीच- तीनची केल्यास मला मदत होईल. अधिक काय लिहावे?
आपला,
यशवंतराव चव्हाण
या छोट्याशा पत्रातून यशवंतरावांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची पुरेपूर ओळख पटते. खरंतर साहेब सांगतील त्या दिवशी आणि सांगतील त्या वेळी आयोजकांनी कार्यक्रम घेतला असता इतका त्यांच्या शब्दाला मान होता. पण आदेश देण्याचा अधिकार असतानाही विनंती करूनच काम सांगायचे हा यशवंतरावांचा स्वभाव होता. म्हणूनच सत्तेने साथ सोडली तरीही त्यांच्या सुसंस्कृतपणाला ओहोटी लागली नाही. आजचा महाराष्ट्र साहेबांची आठवण काढतो ती या अभिजात आणि निखळ सुसंस्कृतपणासाठीच!
साताऱ्याचे बन्याबापू गोडबोले हे यशवंतरावांचे बालपणापासूनचे मित्र होते. १९६२ पासून यशवंतराव दिल्लीत रहात होते, तर बन्याबापू साताऱ्यात राहूनच समाजकारण करीत राहिले. १ जून १९८३ रोजी वेणूताईंचे निधन झालं आणि यशवंतराव एकटे झाले. राजकीय जीवनात अनेक आघात झेलणारे यशवंतराव या कौटुंबिक आघाताने मात्र घायाळ झाले. यशवंतरावांचे महाराष्ट्रातील अनेक चाहते दिल्लीला जाऊन त्यांचे सांत्वन करून आले.
एकदा मुंबईतील रिव्हेरा या निवासस्थानी यशवंतराव आले असताना, बन्याबापू साहेबांना भेटायला आले. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर एकटेपणा वाट्याला आलेल्या आपल्या मित्राला सांत्वनपर दोन शब्द सांगावेत म्हणून ते गेले होते. वेणूताईंचा विषय निघाला आणि यशवंतरावांचा चेहरा कधी नव्हे इतका शोकाकुल झाला. भावनातिरेकामुळे त्यांना नीट बोलतासुद्धा येईना.
स्वत:ला सावरत ते म्हणाले, 'बन्याबापू, माझ्या जीवनातली ही पोकळी मला सर्वांगाने वेढून टाकत आहे. उभ्या आयुष्यात कशाचीच मागणी न करणारी माझी पत्नी मला सोडून गेली.... मी पोरका झालो आहे. आय़ुष्याच्या चढउतारावर तिने माझी फक्त सेवाच केली. सावलीप्रमाणे ती नेहमी माझ्या समवेत राहिली. माझे आयुष्य तिनेच घडविले. तिच्याविना माझी ही जीवननौका भरकटू लागलीय. लवकरच ती काळाच्या भोवऱ्यात सापडणार आणि संपणार.'
लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. यशवंतराव सातारा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार होते. इंदिराजींच्या हत्येमुळे राजीव गांधी सैरभैर झाले होते आणि त्यांना यशवंतरावांचं मार्गदर्शन हवं होतं. निवडणूक जिंकून 'पुनश्च हरिओम' करण्याचं स्वप्न यशवंतराव पहात होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एकाकी अवस्थेत दिवस कंठणाऱ्या यशवंतरावांना आजाराने घेरलं.
२१ नोव्हेंबर १९८४ ची सकाळ उगवली तीच मुळी एक उदास गारवा घेवून. यशवंतरावांना सकाळपासूनच अस्वस्थ वाटू लागले. संध्याकाळी त्यांना भेटण्यासाठी मदन भोसले आपल्या मित्रांसह आले. साहेबांच्या नोकराने- गंगारामने त्यांची प्रकृती बरी नसल्याचं सांगितलं. पण यशवंतरावांनी सर्वांना आत पाठवायला सांगितलं. मदनदादांनी या अखेरच्या दिवसांत साहेबांची मनोभावे शुश्रुषा केली होती. साहेबांचा चेहरा आणि एकूण अवस्था पाहून मदनदादांनी दिल्लीत जमलेल्या प्रमुख मराठी नेत्यांना निरोप दिला.
एन. के. पी. साळवे, वसंतदादा पाटील आदी नेत्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केलं. पण साहेबांची तब्येत बिघडतच गेली. २३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून गेले. त्यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या मात्र साहेबांची तब्येत खालावतच गेली. २५ नोव्हेंबरला सायंकाळनंतर ते अत्यवस्थ झाले आणि पाहता पाहता ते जग सोडून गेले.
हिमालयाच्या मदतीसाठी धावून गेलेला सह्याद्री उत्तरेत धारातीर्थी पडला. कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमावर सुरू झालेला हा प्रवास यमुनेकाठी संपला. आता उरल्या आहेत त्या या रोमहर्षक प्रवासाच्या अस्विस्मरणीय आठवणी!
(प्रा. नवनाथ लोखंडे संपादित ‘कथारूप यशवंतराव’ पुस्तकातून साभार.)