‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

१२ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेला काली देशमुख गे आहे. तो पॉर्न स्टार आहे आणि तो सेक्स वर्करही आहे. साताऱ्यातून मुंबईला पळून आलेल्या या शेतकरी घरातल्या मराठी मुलाची कहाणी धक्कादायक आहे. सर्वसामान्य माणसांच्या मेंदूंच्या पलीकडची आहे. पण तेच पलीकडचं जग दाखवणारी ही एका मराठी गे पॉर्न स्टारची मुलाखत. 

‘होय, मी गे पॉर्न स्टार आहे. मला त्याचा गर्व वाटतो. मी गे आहे. मी पॉर्न स्टार आहे, आणि हे सांगायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही. मला कुटुंबाचं पोट भरायचंय म्हणून मी सेक्स वर्कही केलं. मला त्यात चूक वाटत नाही. मी मेहनत करतो.’ त्याच्या बोलण्यातला स्पष्टपणा त्याच्या फेसबूक स्टेटसवरही दिसतो. 'आय एम नॉट हिअर फॉर मिअर टाईम पास, आस्क मी हाऊ मच.' एखाद्या बिजनेसमनला शोभेल असाच त्याचा अॅटिट्यूड आहे.

आझाद मैदानातल्या एलजीबीटीक्यू प्राईड परेडमधे भेटलेल्या कालीशी बोलायचं ठरवलं. त्याला कॉण्टॅक्ट केला. अंधेरीत त्याची बहीण रेणुकाच्या घरी आम्ही भेटलो. कालीचा प्राईडच्या स्टेजवरचा, कम्युनिटीच्या लोकांसमोर बोलताना जो आत्मविश्वास होता, त्यामधे बहिणीच्या घरात बसून बोलताना थोडासा प्रोफेशनलपण अॅड झाला होता. हसऱ्या चेहऱ्याचा काली समोर बसून आपल्या जगण्याची गोष्ट सांगत होता तेव्हा ती एखाद्या सिनेमाची स्क्रिप्टच आहे की काय असंच वाटत होतं. सिनेस्टार बनण्याचं स्वप्न अजूनही जिवंत असल्याचीच तर ही खूण असावी.

हेही वाचाः केंद्रात मोदी आणि राज्यात कुणीही, असा फरक मतदार खरंच करतात?

साताऱ्याहून पळून गाठली मुंबई

काली २०१२ मधे साताऱ्याहून पळून आला. तेव्हा तो १६-१७ वर्षांचा होता. त्याचं मूळ नाव त्याने सांगितलंय पण ते त्याला जाहीर करायचं नाही. म्हणून मग पॉर्नची आणि सेक्सची दुनिया त्याला ज्या नावाने ओळखते त्याच नावाने त्याला समजून घ्यायला हवं 'काली'. घरात दोन बहिणींच्या पाठीवरचा लाडका भाऊ. शेतीचं काम करण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता. मुलांचं आकर्षण वाटायचं.

शेतीतली रांगडी काम करत नाही, म्हणून वडील सतत कालीवर रागवायचे. एके दिवशी त्यानं ठरवलं आणि तो घरातून पळून मुंबईत आला. आतापर्यंत वाई ते वाठार आणि वाठार ते वाई एवढाच प्रवास माहिती होता. घरातून पळताना शंभर रुपयांची चोरी केली. ते पैसे प्रवासात तिकीटासाठी खर्च झाले. रेल्वेत एका कुटुंबाला मदत केली म्हणून प्रवासात कालीच्या पोटाची आग विझली. कालीची पहिली चोरी आणि पहिला लांबचा प्रवास त्याला मुंबईत घेऊन आला.

काली मुंबईत रेल्वेतून उतरला तेव्हा ते कुटूंब त्याला पुन्हा दिसलं. गप्पात त्या कुटुंबातल्या तरुणाने कालीला कामाबद्दल आणि राहण्याबद्दल विचारलं. कालीला हाताला काम हवंच होतं. राहण्याची सोय असल्याचं कालीने खोटंच सांगितलं. त्या तरुणाने कालीला कार्ड देऊन विक्रोळीला ऑफिसला बोलावलं.

पहिल्यांदाच दुनियादारीची ओळख

काली विक्रोळीत कार्डवर दिलेल्या ऑफिसच्या परिसरातल्या फूटपाथवरच थांबला. नंतर कालीला कुरियर कंपनीत नोकरी लागली. शिकण्याच्या ओढीतून ऑफिसातल्या लोकांनी त्याला कम्प्युटर शिकवलं. कालीला शाळेतल्या शिक्षणात रस नव्हता. पण नवीन गोष्टी शिकायच्या होत्या. त्याची त्याला मदत झाली.

काली घरातून पळून आला तो फक्त वडलांच्या शेतात काम करण्याच्या हट्टामुळे नाही तर त्याला सिनेमात अक्टिंग करायची होती. त्यासाठीच तो जीवाची मुंबई करत गावातून इथे आला होता. ‘गावात मोजक्याच लोकांकडे टीवी. त्यातही मी एकदा टीवी बघायला बसलो की उठायचोच नाही. लोक मला हकलायचे. तेव्हा ठरवलं या टीवीत आपण दिसायचं. खूप फेमस व्हायचं. तोपर्यंत माझं जग शेत, घर आणि शाळेतच होतं. दुनियादारी माहीत नव्हती.’

अभिनयाची आवड जपण्यासाठी काली रवींद्र नाट्यमंदिरमधे जायचा. साडेसहा हजार पगारातून ५०० रुपये त्याने खर्चासाठी ठेवले की मग बाकीच्या पैशातून गावचं घर चालवायचं आणि बहिणींच्या लग्नासाठी पैसे जमवायचे असा त्याचा नेम.

काली सांगतो, तो रवींद्रला नाटकं बघायला जायचा. थिएटरमधले तिकिटकीपरही कालीला ओळखू लागले होते. आता तर त्याला तिकिटही काढावं लागत नव्हतं. तो थिएटरसाठी असलेल्या राखीव खुर्चीत जाऊन बसायचा. अशातच एकदा विक्रोळीच्या ऑफिसच्याच खाली त्याला सिनेमाचं शूटिंग सुरू असल्याचं दिसलं.

हेही वाचाः तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

आणि अचानक फोटोशूट झालं!

कालीने ऑडिशन देण्यासाठी धडपड केली. तिथल्या मुलांनी कालीला पोर्टफोलिओबद्दल विचारलं. कालीला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यासाठी लागणारे हजारो रुपयेही त्याच्याजवळ नव्हते. त्या रात्री ट्रेनच्या प्रवासात काली भरपूर रडला. डब्यात एकट्या असलेल्या कालीला पाहून एक माणूस त्याच्याजवळ आला आणि त्याच्याशी गप्पा मारू लागला.  त्याने कालीला पोर्टफोलिओ करुन देण्याचं प्रॉमिस दिलं आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं.

ठरल्या वेळेत दोघंही भेटले. कालीला त्या माणसाने टॅक्सीतून गप्पा मारत अशा ठिकाणी नेलं जे ठिकाण कालीने आजवर पाहिलेलं नाही. ‘आयुष्यात बघितलेलं पहिलं मोठं आणि चकाचक हॉटेल. मी हरखून गेलो. मग त्याने माझं फोटो शूट करायला सुरवात केली. काही वेळानंतर त्याने मला माझी अंडरवेअर काढायला सांगितलं आणि मी घाबरलो. आतले कपडे तर चांगले नव्हतेच पण असं कोणासमोर कपडे काढण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या माणसाने चांगल्या कंपनीचे कपडे देऊन माझ्याकडून फोटो शूट करुन घेतलं.’

फोटोशूट झाल्यावर फोटोबरोबरच पैसेही देणार असल्याचं सांगितलं. फोटो काढणाऱ्या माणसाने कालीला दोन दिवसांनी यायला सांगितलं. दोन दिवसांनंतर ठरल्यावेळी तो माणूस भेटला नाही. फोटो, पैसे काहीच काहीच मिळालं नाही. कालीच्या सगळ्या अपेक्षांचा चक्काचूर झाला. अभिनयात पाय जमवण्यासाठी सुरू झालेल्या खटपटींमधे नोकरीही सुटली होती. खायचेही हाल सुरू झाले. घरी कसं पैसे पाठवायचे हा मोठा प्रश्न होता. घरी परत जाता येणार नव्हतं.

पोटासाठी हे काम करू लागलो

वैतागलेला काली ताज हॉटेल परिसरात फिरत होता तेव्हा रेडिओ क्लबच्या रस्त्यावर असलेल्या एका खांबाखाली वेश्याव्यवसाय करणारे किन्नर, बायका दिसल्या. त्यांच्याशी गप्पा मारताना कालीने निश्चय केला, काही नाही तर पोट भरण्यासाठी हा मार्ग स्वीकारायचा. त्या रात्री गाडीत थांबलेल्या त्या पहिल्या गिऱ्हाईकाने पाचशेपासून सुरू झालेला सौदा पन्नास रुपयांपर्यंत खाली आणला. प्रत्यक्षात काम झाल्यानंतर तीस रुपयेच दिले. ती कालीची सेक्सच्या दुनियेतली पहिली कमाई आणि अनुभव.

कालांतराने त्याच खांबाखाली उभं असताना कालीला एका फॉरेनरने त्याच्याबरोबर यायला सांगितलं. कालीने तोडक्या-मोडक्या इंग्रजीतून संवाद साधला आणि तो जे म्हणेल त्याला येस म्हणत त्याच्याबरोबर गाडीतून गेला. त्याने कालीला ताज हॉटेलच्या एका आलिशान रुममधे नेलं.

ताजच्या त्या आलिशान रुममधे सेक्स टॉइज बघून कालीला वाटलं सेक्ससाठी त्याला तो फॉरेनर घेऊन आलाय. बसल्या बसल्या कालीने रुममधलं मॅगझिन चाळलं तेव्हा त्याच्या लक्षात आल की त्याचा एक फोटो त्या मॅगझिनमधे आहे. पोर्टफोलिओच्या नावाखाली जे फोटो काढले होते त्यातला एक फोटो त्या मॅगझिनमधे होता.

‘तो फोटो पाहून मी घाबरलो. मला घुसमटल्यासारखं वाटू लागलं. मी त्या माणसाला सांगून तिथून निघालो. त्या प्रसंगानंतर वाटू लागलं की आता लोकांनी आपल्याला नागडं पाहिलंय आता इथून परत फिरता येणार नाही. आता बदनाम झालोय तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत. तसं मला लहानपणापासूनच पुरुषांचं आकर्षण होतं. तेव्हा मी निश्चय केला आता जे काही आहे ते हे कामच आहे. एलजीबीटीक्यू कम्युनिटीच्या आधारानं राहू लागलो. पोटासाठी हे काम करू लागलो.’

कालीच्या जगण्याचं आजचं वळण हे त्याला नवरात्रीत मिळालं. त्याला त्याच्या जुन्या नावाबरोबर या धंद्यात यायचं नव्हतं. त्याला बहिणी काळ्या म्हणून हाक मारायच्या. तेच देवीचं 'काली' हे नाव स्वीकारलं आणि त्याबरोबरच कुटुंबाकडे असलेली देशमुखी आडनावात घेतली.

हेही वाचाः तृतीयपंथी हसीना मान जायेगी, पण समाज?

धंद्याचं ट्रेड सिक्रेट असं आहे

कालीच्या शरीराचा ताबा एका पुरुषाने घेतला, तेव्हा तो अवघा नऊ वर्षांचा होता. ‘मला हवं होतं ते असंच मला वाटतं. घरातलाच आमचा नातेवाईक ज्याने हे सर्व केलं. त्याचं लग्न होईपर्यंत असंच सुरू होतं. लग्नानंतर मात्र आम्ही आमच्यात फक्त नातेवाईकाएवढी ओळख ठेवलीय. तेव्हा शरीराला चिकटलेला पुरुष कालीच्या जगण्याचा भाग झाला. कुरियरची नोकरी करायचो पासपोर्ट करुन ठेवला होता. स्वत:ला विकायचं ठरवलं तेव्हा हा पासपोर्ट कामाला आला. त्यासाठी सोशल मीडिया आणि वेबसाईटची मदत झाली.’ असं काली सांगतो.

क्लायंटला सर्विस देण्यासाठी काली मस्कतला जाऊन आलाय. यूएस,  इंडोनेशिया या देशांमधे त्याचे वीडियो पॉप्युलर आहेत. ‘या धंद्यात फार बोलावं लागत नाही. त्यामुळे भाषेची अडसर जाणवत नाही. हाऊ मच आणि हाऊ एवढं महत्त्वाचं असतं बघ आणि तेवढंच माझ्या कामाचं असतं.’ काली त्याच्या धंद्याचं ट्रेड सिक्रेट सांगतो आणि यातली सोप्पी वाटणारी भाषा अंगावर काटा आणते.

`स्वत:ला आहे तसा स्वीकारल्यामुळेच मी उदास किंवा पराभूत मनोवृत्तीचा नाही असं तो सांगतो. प्रसिद्ध व्हायचं त्याचं स्वप्न पॉर्न इंडस्ट्रीने पूर्ण केलं. पॉर्न इंडस्ट्रीत सर्व खोटं असतं. पण हे काम आहे आणि याला लोकांची डिमांड आहे. मग हे काम करायला काय हरकत आहे. जेवण, श्वास त्याप्रमाणे सेक्सची भूक आहे, असंच मी माझ्या दोन्ही कामांकडे बघतो.` काली सांगत राहतो.

फोटो आणि वीडियोच्या माध्यमातून कमाई होत होती. पण पॉर्नसाईट्वर बंदी घातली गेली आणि त्याला पुन्हा रात्री दोन - तीन क्लायंट शोधायची वेळ आली. आता त्याला दिवसाला सहा सात हजार मेसेज येतात. रिप्लाय करत राहतो. क्लायटंच्या टचमधे राहिलं पाहिजे. कालीच्या कामासाठीही कन्सिस्टन्सी लागते हे समजल्यावर नवलच वाटलं.

नवीन काहीतरी देत राहावं लागतं

`लोकांना गे सेक्स वीडियो बघायला आवडतात. मी प्रोमो अपलोड करतो टिंडर, इन्स्टा आणि फेसबूकवर. तिथे लिहितो पूर्ण वीडियो बघायचा असेल तर कॉण्टॅक्ट करा. काही जण रेग्युलर असतात. वॉट्सअॅपवरही संपर्कात असतात. पैसे आले की मी त्यांना वीडियो पाठवतो. मला क्रिएटिविटी वापरावी लागते. लोकांना नवनवीन दिलं की ते बघतात. रेग्युलर कस्टमरसाठी नवीन काहीतरी देत रहावं लागतं. त्यासाठी पॉर्न साईटसाठीच्या कण्टेण्टव्यतिरिक्त मी माझं शूट करत असतो.` काली आपल्या कामाचं स्वरूप सांगतो.

नवीन नवीन काहीतरी द्यावं लागतं. त्यासाठी लोकांच्या आवडी, ट्रेण्डस काली समजून घेतो. तो सांगतो, ‘काही लोकांमधे अंडरवेअरची खूप क्रेझ असते. ते तशी मागणी करतात. एक क्लायंट माझ्याकडून माझ्या अंडरवेअर मागवण्यासाठी कॉण्टॅक्ट करतो. कधी केळं, सफरचंद, कधी दूध वापरुन मी नवनवीन वीडियो बनवतो. पॉर्न वीडियो बनवणारे लोक मला कॉण्टॅक्ट करतात. वीडियोसाठी किंवा इतर काही त्यांची डिमांड असेल तर ते बघूनच कस्टमर फोन करतात. काहीजण डायरेक्ट तर काहीजण वेबसाईटच्या कॉलसेंटरवरुन संपर्क साधतात.’

हेही वाचाः जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल

सेक्सनंतर त्या व्यक्तीशी संपर्क नाही

कालीच्या गोष्टी आपल्या विचारांच्या पलीकडे असतात. तो सांगतो, `पॉर्नच्या भारतीय साईट्स नाहीत फार. फॉरेन पॉर्नसाईट्स तुलनेने जास्त आहेत. तेव्हा फॉरेनर्स जास्त कॉण्टॅक्ट करतात. बऱ्याचदा ते वीडियोसाठी लागणारा एखादा पार्टनर आणतात. मग आम्ही वीडियो शूट करतो. हॉटेलच्या रुममधे हे शूट चालतं. मग सेक्स टॉय किंवा पार्टनर, नाही तर मग वस्तू वगैरे वापरुन वीडियो केला जातो. काहीजण सेक्ससाठी कॉल करतात आणि परमिशन घेऊन वीडियो करुन घेतात. नंतर त्यांना वाटेल तेव्हा तो वीडियो ते त्यांच्या पर्सनल युजसाठी वापरतात.`

काली सांगतो, त्याने अत्यंत साधा माणूस ते वीवीआयपी असं बऱ्याच जणांबरोबर सेक्स केलाय. त्याचबरोबर जंगल ते आलिशान हॉटेल असं अनेक ठिकाणी वीडियो केलेत. सेक्स केलाय. 
‘सेक्सनंतर त्या व्यक्तीशी संपर्क करायचा नाही, हे तत्त्व मी पाळतो. पॉर्नसाईटसाठी वीडियो करणारे लोक त्यांना वाटेल तसा संपर्क करतात. ईमेल आयडी, फोनवरूनही संपर्क करतात. मी हल्ली साईटसाठी कमी आणि स्वत:चंच काम जास्त करतो. मी अरेंजमेण्ट करुन फोटोशूट करतो. सोशल मीडियावर बदल दिसला पाहिजे याची काळजी घेतो.’ सोशल मीडियावर फोटो किंवा वीडियो टाकून काली स्वतःची प्रसिद्धी करतो. लोक फॉलो करतात आणि हवं ते मिळवतात.

‘धंद्यात आलो, तेव्हा मी कवळा होतो. आता मी मला पाहिजे तसं गिऱ्हाईक हाताळतो. नशा केलेल्या गिऱ्हाईकाबरोबर शक्यतो बसणं टाळतो. पण मी दारू पिऊनच धंद्यावर जातो. त्याने मला थोडी ताकद मिळते.’ कालीचं धाडस बाटलीत मिळतं हे ऐकून आश्चर्य वाटलं नाही.

तिला सुख देऊ शकत नाही

तो आईवडील, बहिणींबद्दल बोलतो. एलजीबीटीक्यू कम्युनिटीलाही काली कुटुंब मानतो आणि त्यांच्यात सेफ वाटत असल्याचं सांगतो. कुटुंबाच्या आग्रहाखातर कालीने मुलींवर प्रेम करण्याचाही प्रयत्न केला. तो सांगतो, ‘मी त्या सहवासात एवढं पटवून दिलं की मी तिता चांगलं सांभाळू शकतो. पण स्त्री म्हणून तिला अपेक्षित असणारं सुख नाही देऊ शकत. ती समजूतदार होती. तिने मला सोडून दिलं.’

कालीला त्या दिवशी नीट बसताही येत नव्हतं. दुखत होतं पण तो सांगत होता, ‘हा पण कामाचाच भाग आहे. कधी कधी असे पण लोक भेटतात.’ वीडियो, फोटोचं काम नसतं आणि काली मुंबईत असतो तेव्हा तो त्या खांबाखाली जातो. ‘या धंद्यातली पहिली कमाई इथे झाली, हे मी कसं विसरू.’ संध्याकाळचे सहा वाजले. त्याचा फोन वाजला. ‘कामावर जायची वेळ झाली’, तो धावतो आणि आपण थबकतो.

हेही वाचाः 

‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष

क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा

`होय, मी हिजडा` असं दिशाने गडकरींना का सुनावलं?