होय, मी कोरोना पॉझिटिव आहे!

१४ जून २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्या गोष्टीला आपण अज्ञानामुळे एखाद्या कलंकासारखं हाताळलं त्याच गोष्टीसोबत आता आपल्याला जगायचंय. कोरोनासोबत जगायचंय. काहींनी तर कोरोनाला लपवण्याचा खेळ खेळला. धार्मिक रंग दिला. काहींनी आपल्याला कोरोना झालाय या भीतीनंच आत्महत्या केली. पण आता जगात कोरोना पॉझिटिव असण्यालाचा नव्या जगाचा पासपोर्ट बनवण्याची चर्चा सुरू झालीय.

एअरबीएनबी ही जगभरात नेटवर्क असलेली घरगुती हॉटेलिंग सुविधा देणारी मोबाईल ऍपबेस्ड कंपनी आहे. त्यावर  ब्रुकलिन इथल्या एका होस्टनं म्हणजे घरमालकानं स्वतःचा उल्लेख इंग्रजीतले कॅपिटल लेटर वापरून ‘इम्युन होस्ट’ असा केलाय. इम्युन होस्ट म्हणजे कोविडपासून सुरक्षित असलेला यजमान. सोबतच त्यांनी आपल्या घराचे फोटो टाकलेत. पॉझिटिव अँटीबॉडी टेस्टच्या रिपोर्टचं फोटो टाकलाय. द गार्डियनमधे प्रसिद्ध झालेल्या स्टोरीनुसार, घरमालक मार्टिन एटन हे मार्चमधे कोविड-१९ पॉझिटिव आढळले. रिझल्ट पॉझिटिव आढळल्यानंतरच त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी याची आपल्या प्रोफाईलमधे नोंद करण्याचं ठरवलं.

‘मला न्यूयॉर्कला जायचं असेल तर मी कोविडच्या अँटीबॉडीज असणाऱ्यांकडे राहायला जाण्यास प्राधान्य देईन. अँटीबॉडीज नसणाऱ्यांकडे राहणं टाळेन,’ असं पेशानं लेखक असलेले ४८ वर्षांचे मार्टिन सांगतात. ‘आणि माझ्या या कल्पनेला यश येतंय,’ असंही ते सांगतात.

हेही वाचा : हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

अभूतपूर्व दुहेरी संकट

कोरोनाच्या संकटातून कसं बाहेर पडायचं आणि पुन्हा खांद्याला खांदा लावून कामाला लागायचं यासाठी सगळी माणूसजात कामाला लागलीय. लॉकडाऊनमुळे तर साऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थेचं मातेरं केलंय. लस यायलाही अजून कमीत कमी काही महिने लागू शकतात. कदाचित ५-६ वर्ष लागू शकतात. कोरोना काही २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा एखादा डोस दिल्यावर संपणाऱ्यातला नाही हे आता सरकारच्याही डोक्यात शिरतंय. त्यामुळे सरकारंही आता बाबांनो, तुमचं तुम्ही कोरोनासोबत जगायचं कसं ते शिका, असं सांगू लागलेत.

अभूतपूर्व अशा या आर्थिक किंवा आरोग्य संकटातून बाहेर पडण्यासाठी जग मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे. लस शोधण्यासोबतच आणखी एका मार्गावर सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. तो मार्ग म्हणजे, इम्युनिटी पासपोर्ट. इम्युनिटी पासपोर्ट म्हणजे काय?

कल्पना करा, एखाद्या रक्त चाचणीवर तुमची नोकरीची पात्रता ठरेल, तुम्हाला गृहकर्ज द्यायचं की नाही हे ठरेल. अशा चाचणीत तुमच्या शरीरात पुरेशा अँटीबॉडीज नसतील तर तुम्हाला या साऱ्यांपासून मुकावं लागेल. कारण अर्थव्यवस्थेचं रिस्टार्ट बटन दाबण्यासाठी असं सर्टिफिकेट असणाऱ्याला प्राधान्य देण्यावर अमेरिका, जर्मनी, इंग्लंडसारख्या देशांमधे विचार सुरू आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

इम्युनिटी पासपोर्ट म्हणजे काय?

परदेशात जायचं असेल तर आपल्याकडे पासपोर्टची विचारणा केली जाते. पासपोर्ट आपल्याला चारित्र्याचं सर्टिफिकेट देतो. म्हणजे आपण गुन्हेगारी प्रवृत्तीचे तर नाही ना, कुठल्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी तर आपण फरार होत नाही ना, याची खातरजमा संबंधित देशाकडून पासपोर्टच्या आधारावर केली जाते. आता भविष्यात मात्र आपल्याकडे इम्युनिटी पासपोर्टची विचारणा होऊ शकते. इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती.

इम्युनिटी पासपोर्ट त्याला दिलं जाईल, ज्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल. कुठल्याही आजाराशी लढण्यासाठी आपल्या शरीरात एक यंत्रणा तयार झालेली असते. अनेकजण ताप आल्यावर तो अंगावरच काढतात. कारण त्यांच्या शरीरात तापेसोबत लढायची यंत्रणा तयार असते. यालाच अँटीबॉडी म्हणजेच प्रतिजैविकं असं म्हणतात. तर कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडी शरीरात असणाऱ्या लोकांना दिलं जाणारं सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट म्हणजे इम्युनिटी पासपोर्ट किंवा सर्टिफिकेट होय.

एखाद्या व्यक्तिला लागण झाल्यावर त्याच्या शरीरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार होण्यासाठी १० दिवसांचा वेळ लागतो, असं आतापर्यंतच्या संशोधनावरून दिसून आलंय. एकदा का कोरोना होऊन गेला की आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास मदतच होते. पण या प्रतिकारशक्तीचं प्रमाण प्रत्येकाच्या शरीरात सारख्याच प्रमाणात असेल असं नाही. ती प्रत्येकामधे कमीअधिक असू शकते. म्हणजेच तुमच्या शरीरात अँटीबॉडीज असतील तर तुम्हाला आजार होणार नसला तरी तुम्ही वायरसचे वाहक होणार नाही, असं खात्रीनं सांगता येत नाही.

हेही वाचा : कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

पुन्हा कोरोना होतो का?

चीनच्या वुहान शहरात पहिली लाट येवून गेल्यावर काही जणांना तीन महिन्यांनी पुन्हा कोरोना झाल्याचं समोर आलं. दक्षिण कोरियातही अशा केसेस आढळल्या. यावरून पुन्हा कोरोना होतो, असं म्हटलं जाऊ लागलं. पण आता संशोधनातून दुसऱ्यांदा केलेल्या टेस्टमधे शरीरात अगोदरचेच विषाणुचे मृत अवशेष आढळल्याचं समोर आलंय.

अमेरिकेच्या मेरीलँड युनिवर्सिटीत साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. फहीम युनूस सांगतात, ‘एकदा बरं झाल्यावर पुन्हा कोरोना होतो का, याला दुजोरा देणारी एकही केस माझ्या पाहण्यात नाही. काहीवेळा वायरसचे मृत अवशेष शरीरात असतात. त्यामुळे दुसरी टेस्टही पॉझिटिव येते. अशा रूग्णांना पुन्हा संसर्ग होत नाही किंवा ते आजारी पडत नाहीत. दक्षिण कोरियानं केलेल्या अभ्यासातही टेस्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव आलेले पेशंट दुसऱ्यांना बाधा पोचवू शकत नाहीत. तो वायरस जिवंत नसतो.’ फहीम यांनी यासंदर्भात ट्विटरवर अनेक ट्विट टाकलेत.

शम्स मुनीर नावाच्या एका व्यक्तीने ३४ दिवसांनी दुसऱ्यांदा कोविड टेस्ट केली. ती टेस्ट पॉझिटिव आली. आता तो पूर्ण बरा झालाय. या सगळ्याचा अर्थ कसा लावणार, असा प्रश्न त्याने डॉ. फहीम यांना ट्विटरवर विचारला. त्यावर डॉक्टर फहीम मिश्किलपणे म्हणाले, तुला ज्यांनी दुसऱ्यांदा टेस्ट करायला सांगितलं होतं, त्यांच्याकडून टेस्टचे पैसे घे. तूच सांगतोयस, की मी आता पूर्णपणे बरा झालोय. दुसऱ्यांदा टेस्ट केल्यावर आपल्या शरीरात वायरसचे मृत अवशेष आढळू शकतात. पण त्यामुळे तू पुन्हा कोविडमुळे आजारी पडणार नाही किंवा संसर्ग होणार नाही. आता नव्यानं टेस्ट करू नकोस, असा सल्ला ते देतात.

हेही वाचा : कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

जागतिक आरोग्य संघटनेचा विरोध

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघूनच देशोदेशीच्या सरकारांनी आपापल्या पातळीवर उपाययोजना सुरू केल्यात. चिली सरकारनं पॉझिटिव आढळलेल्या लोकांनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यावर रिलिज सर्टिफिकेट द्यायला सुरवात केलंय. हे सर्टिफिकेट म्हणजे काही इम्युनिटी सर्टिफिकेट नाही. पण एक प्रकारचं फिटनेस सर्टिफिकेट आहे. चीनमधे प्रवास कोण करू शकतं हे सांगणारे एप्स वापरले जात आहेत. एवढंच नाही तर अमेरिकेतल्या साथरोग विभागाचे प्रमुख आणि वायरस हंटर म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉ. अँथोनी फाऊची यांनीही सरकार इम्युनिटी पासपोर्टसारख्या पर्यायाचा विचार करू शकते, असं म्हटलंय.

अमेरिकेतल्या काही ऑनलाईन हॉटेल बुकिंग कंपन्यांनी ही कन्सेप्ट राबवायला सुरवातही केलीय. ते स्वतंत्रपणे इम्युनिटी पासपोर्ट यंत्रणा विकसित करत आहेत. १९ व्या शतकात अमेरिकेमधे कावीळीची साथ आल्यावरही अशा प्रकारची वर्गीकरण प्रणाली राबवण्यात आली होती.

नेचर या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलनं इम्युनिटी पासपोर्ट प्रकाराला विरोध केलाय. यामुळे नव्या भेदभावाला सुरवात होईल. जैवशास्त्र असा भेदभावाला परवानगी देत नाही. असं पासपोर्ट म्हणजे मानवी हक्कांवर निर्बंध घातल्यासारखं आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याऐवजी त्याला धोका निर्माण होईल.

इम्युनिटी पासपोर्टसारख्या कल्पनेला जागतिक आरोग्य संघटनेनं विरोध केलाय. कारण एकदा कोरोना झाला की दुसऱ्यांदा कोरोना होतो किंवा नाही याची पुरेशी माहिती मिळण्यासाठी अजून वेळ द्यावा लागेल. त्यानंतर आपल्याला ठोस निष्कर्ष काढता येईल, असं डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे. डब्ल्यूएचओचं असं म्हणणं असलं तरी कोरोनासोबत जगायचं तर कसं जगायचं याचं उत्तर काही लोक होय, आम्ही कोरोना पॉझिटिव आहोत, असं सांगून शोधू लागलेत. पण कोरोनाला आ बैल मुझे मार, असं म्हणून चालणार नाही.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

माझा कोरोना पॉझिटिव काळातला अनुभव सांगतो, घाबरायचं काम नाही

कोरोनाची जुनी-नवी लक्षणं कोणती? त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!