पॅथॉलॉजीविषयी १: पॅथॉलॉजिस्टना थँक्स का म्हणायला हवं?

०७ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. सध्या कोरोनाच्या निमित्ताने आज आपल्याला आरोग्यावर बोलावं लागेल. तेही आरोग्य विज्ञानावर, हेल्थ सायन्सवर. सध्या यातली पडद्यामागची एक ब्रांच खूप चर्चेत आहे, पॅथॉलॉजी. कोरोनाशी लढायचं तर टेस्ट ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना आपल्याला पॅथॉलॉजी समजून घ्यावी लागेल. त्याची बारीक बारीक माहिती देणारी ही लेखमाला.

कोणत्याही साथरोगाच्या डॉक्टर आणि त्यांच्यासोबच्या इतर स्टाफबरोबर सगळ्यात ताण येतो तो पॅथॉलॉजी विभागावर. पेशंटचं रक्त, थुंकी, लघवी इत्यादी गोष्टींची तपासणी करून साथरोगाच्या वायरसचं निदान करण्याचं महत्त्वाचं काम त्याच्याकडे असतं. त्यामुळेच इतरवेळी दुर्लक्षित राहिलेली वैद्यकशास्त्राची ही ब्रांच एकदम प्रकाशझोतात येते.

सध्या कोरोनाच्या काळातही हेच चित्र आपल्याला दिसतं. कोरोना संशयित पेशंटच्या थुंकीचं सॅम्पल घेऊन जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर पेशंटला कोरोनाची लागण झालीय की नाही हे शोधून काढण्याची जबाबदारी या पॅथॉलॉजिस्टवर असते. कोरोना भारतात आला तेव्हा ही टेस्ट करायला साधारण २४ तास लागायचे. त्यानंतर हळूहळू १० मिनिटांत, २० मिनिटांत अशी टेस्ट करण्यासाठी किट तयार करण्यासाठी भारतासोबतच इतर देशातही प्रयत्न केले गेले. त्या सगळ्यात पॅथॉलॉजिस्टची भूमिका महत्त्वाची होती.

पण पॅथॉलॉजिस्ट होणं ही काही सोपी गोष्ट नाही. डॉक्टरांएवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त अभ्यास करावा लागतो. एखाद्या पॅथॉलॉजिस्टला काय काम करावं लागतं, कोणत्या टेस्ट कराव्या लागतात आणि पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करताना काय अनुभव आले याविषयी सांगणारी एक लेखमालिका डॉ. मंजिरी मणेरीकर यांनी फेसबुकवर चालवली होती. या लेखमालेचं संपादन करून तीन भागात इथं देत आहोत. कोरोनापासून आपल्याला वाचवणाऱ्या डॉक्टर आणि नर्सच्या कामाची आठवण ठेवताना आपण आता पॅथॉलॉजिस्टलाही थॅंक्स म्हणायला हवं.

हेही वाचाः कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

पॅथोलॉजिस्टही डॉक्टरच असतात

पॅथॉलॉजी हा विषय आहे आणि पॅथोलॉजिस्ट ही पोस्ट आहे. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला सर्वांनाच या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर पॅथॉलॉजीमधे डीपीबी आणि बीसीपी हे डिप्लोमा कोर्स, एमडी ही डिग्री आणि डीएनबी म्हणजे डिप्लोमा ऑफ नॅशनल बोर्ड एवढे कोर्सेस असतात.

एमडी करताना ३ वर्ष म्हणजे ६ महिन्यांच्या ६ पोस्ट मेडिकल कॉलेजशी संलग्न हॉस्पिटलमधे किंवा युनिवर्सिटीने प्रमाणित केलेल्या हॉस्पिटलमधे कराव्या लागतात. डिग्रीचा फुलफॉर्म डॉक्टर ऑफ मेडिसिन असा आहे. म्हणजेच पॅथोलॉजिस्टही एखाद्या गायनॅकोलॉजिस्ट किंवा पिडियाट्रिशनसारखे डॉक्टर असतात.

डिप्लोमा करण्यासाठी २ वर्षांत ४ पोस्ट कराव्या लागतात. त्यांना थेसिस नसतो. या कारणामुळे कदाचित टिचिंगसाठी त्या विषयात एमडी असणं आवश्यक असतं. मात्र डिप्लोमा किंवा डीएनबी हेसुद्धा पॅथोलॉजिस्ट म्हणून काम करू शकतात.

रात्रीचा दिवस, तरी काम संपत नाही

मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागात हिमॅटोलॉजी, ओपीडी, ब्लडबँक, पोस्ट मॉर्टेम, सायटोलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी असे अनेक विभाग येतात. ६ महिन्याच्या काळात या प्रत्येक विभागात काम करावं लागतं. आपल्याला एक टीचर मिळतात. ते आपल्याला थेसिसचा विषय देतात. त्या विषयावर काम करावं लागतं. तसंच एकीकडे अभ्यास करावा लागतो.

पॅथॉलॉजी ओपीडीमधे दिवसा एक लेक्चरर, २ ते ३ शिकणारे डॉक्टर, अनेक टेक्निशिअन असतात. तसंच दिवसा पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदनाचे लेक्चरर आणि दुसऱ्या वर्षांपासून शिकणारे डॉक्टर करतात. पण रात्री मात्र पहिल्या वर्षाच्या स्टुडंटना हे काम करावं लागतं. एक जण इमर्जन्सी लॅबसाठी तर एक जण पोस्टमॉर्टमसाठी असतो. म्हणजेच ६ डॉक्टर असतील तर दर तिसऱ्या दिवशी आपली ड्युटी येणार. रविवार आणि सुट्टीला पूर्ण वेळ ड्युटी असते. त्याचं टाईम टेबल वेगळं बनवावं लागतं. साधारण महिन्यात एक रविवार तरी ड्युटी येतेच.

ड्युटी असेल त्या दिवशी ८ ते ४ रुटीन काम करून नंतर रात्रभर ड्युटी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी ८ ते ४ ड्युटी करून मगच घरी जायला मिळतं. यात आपल्याला एमबीबीएस करताना शिकलेल्या गोष्टीच कराव्या लागत असल्यानं याचा परीक्षेच्या दृष्टीने काही फायदा नसतो. परीक्षेत थिअरी, नव्याने झालेलं संशोधन यासंबंधी वाचावं लागतं. तसंच प्रॅक्टिकलसाठी खूप स्लाईड बघाव्या लागतात. थोडक्यात रोजचं काम म्हणजे रोजचा पोळी भाजी भात आमटीचा स्वयंपाक तर परीक्षा म्हणजे पार्टीसाठी बनवण्याचे पदार्थ.

कामाचा वेळ सोडला तर सतत पुस्तक वाचत किंवा स्लाईड बघत राहावं लागतं. मेडिकलच्या परीक्षेत प्रॅक्टिकलसाठीही थिअरी इतकेच मार्क असतात. त्यामुळे फक्त पुस्तकं वाचून परीक्षेत यश मिळत नाही.

हेही वाचाः आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

अभ्यास करावा तितका कमीच

पॅथॉलोजीला मराठीत विकृतीशास्त्र असं म्हणतात. आता विकृती शोधायची तर प्रकृती म्हणजे नॉर्मल काय ते आधी माहिती हवं. पहिल्या वर्षी अनाटॉमी आणि फिजिओलॉजी या विषयांत आम्हाला प्रत्येक अवयव शरीरात कुठं असतो, त्याचा आकार, वजन, कट सरफेस म्हणजे कापल्यावर कसा दिसतो आणि त्याचं कार्य हे शिकावं लागतं. बायोकेमिस्ट्रीमधे रक्तातली साखर, प्रोटीन, लिपिड, आणि इतर पदार्थ कसे मोजायचे, त्यांच्या नॉर्मल लेवल किती हे सगळं शिकवलं जातं.

रेडिओलॉजीमधे अवयवामुळे निर्माण होणाऱ्या सावलीचा अभ्यास होतो. उदाहरणार्थ फुप्फुसात हवा असते. त्यामुळे नॉर्मली सावली नसते. पण टीबी किंवा ट्युमर दोन्हीमुळे सावली येते. त्याचा तुलनात्मक निदान म्हणजे हे किंवा ते असा रिपोर्ट येतो. आम्ही मात्र प्रत्यक्ष पेशी बघत असल्यामुळे परफेक्ट निदान देऊ शकतो. यासाठी नॉर्मल काय आणि प्रत्येक रोगात काय बदल होतात याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. यासाठी जितक्या केस पाहू तितक्या कमीच असतात.

हेही वाचाः डिलिवर कुठं व्हायचं हे बाईला ठरवू द्याः डॉ. अभय बंग

हिमॅटोलॉजी म्हणजे काय?

सर्वात आधी हिमॅटोलॉजीबद्दल लिहिते. आपल्या शरीरात साधारण ५ ते ७ लिटर रक्त असतं. रक्ताचं मुख्य कार्य म्हणजे सर्व अवयवांना ऑक्सिजन पुरवणं. त्यासाठी हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असावं लागतं. पूर्वी हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशींची संख्या, प्लेटलेटची संख्या हे वेगवेगळं करायचं. हे करताना पिपेटने अगदी थोडं रक्त घेऊन त्यावरून ती संख्या मोजली जायची. यात चुकांना खूप वाव होता. पण आता मशिनवर सगळ्या संख्या लगेच मिळतात. मशिनच हवं तेवढं रक्त शोषून घेते. पण यासाठी रक्त एका विशिष्ट ट्यूबमधे घ्यावं लागतं आणि ते घेताना काही चुका झाल्यास चुकीचे रिझल्ट मिळतात.

साधारणपणे महिलांमधे हिमोग्लोबिन कमी असतं. पुरुषांमधे ते कमी असेल तर पुन्हा सॅम्पल घेऊन किंवा त्याला काही आजार आहे का, हे नक्की करूनच रिपोर्ट द्यावा लागतो. हिमोग्लोबिन कमी म्हणजे ऍनिमिया नावाचा आजार. त्याचेही अनेक प्रकार आहेत. ते शोधण्यासाठी रक्ताचा डाग बनवून लाल पेशी बघून कोणता प्रकार आहे ते सांगावं लागतं. त्यासाठी काही स्पेशल टेस्ट सांगाव्या लागतात.

इन्फेक्शन असेल तर पांढऱ्या पेशींची संख्या थोडी वाढलेली असते. कॅन्सरमधे लाखाच्या वर जाते. डेंग्यू, मलेरिया यात प्लेटलेट्स कमी होतात. हे सर्व स्लाईड डोळ्यांनी बघून कन्फर्म करावं लागतं. हिमॅटोलॉजीमधे ब्लड ग्रुप हीसुद्धा टेस्ट येते. ही टेस्ट आपल्या डोळ्यासमोर करायला लावून  पेशंटचं नाव पुन्हा पुन्हा चेक करून मगच रिपोर्ट द्यावा लागतो. चुकीच्या ग्रुपचं रक्त दिल्यास पेशंटचा जीवही जाऊ शकतो. अशा सध्या टेस्टही कधीकधी पॅथॉलॉजिस्टची प्रतिष्ठा घालवू शकतात.

हिमॅटोलॉजीमधे काही स्पेशल टेस्ट असतात. उदाहरणार्थ, हेमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेईस, आयर्न स्टडीज या टेस्ट मोठ्या लॅब करतात. कारण त्यासाठी महागडी मशिन लागतात. छोट्या लॅब अशा टेस्टस त्यांच्याकडून करून घेऊन त्यांचाच रिपोर्ट देतात. यात फक्त आपलं निदान बरोबर होतं का एवढंच आम्ही बघू शकतो.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

तबलीगने भारतात कोरोना पसरण्याचा कट केलाय का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

तैवान कोरोना डायरी: एक छोटा देश कोरोनाशी लढत होता

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

समाधानानं कष्ट करण्याचा उत्साह वाढतो

ब्लड कॅन्सरचं निदान फक्त बोनमॅरो टेस्टनं होतं. पूर्वी पेशंटचा बोन मॅरो काढणं, तो बघून रिपोर्ट देणं हे आम्ही करायचो. पण आता क्लिनिकल हिमॅटोलॉजी ही सुपर स्पेशालिटी आहे. तेच ही टेस्ट करतात.

आपल्या शरीरात मेंदूच्या भोवती, छातीमधे किंवा पोटात थोडं पाणी असतं. काही रोगांमधे हे पाणी काढून तपासणीसाठी पाठवतात. यामधे त्यातली शुगर आणि प्रोटिन, सेल्स तपासाव्या लागतात. यातून टीबी आहे की नुसतं बॅक्टेरियल इन्फेक्शन की कॅन्सर ते समजतं.

इमर्जन्सीमधे या टेस्ट मोठ्या हॉस्पिटलमधे रेसिडेंट डॉक्टर करतात. पण खासगी हॉस्पिटलमधे एकच पॅथोलॉजिस्ट असतो. त्यामुळे कधी कधी घरी गेल्यानंतरही परत येऊन या टेस्ट कराव्या लागतात. मेट्रोपोलिस, लाल पॅथ लॅबसारख्या लॅबमधे पॅथॉलॉजिस्ट दोन शिफ्टमधे असतात. एकाची शिफ्ट संपली की दुसऱ्याची सुरू होते.

मलेरियाचे, हत्तीरोगाचे वायरस रक्तात सापडतात. या टेस्टसुद्धा हिमॅटोलॉजीमधे होतात. कधी कधी फिजिशियननं सांगितलं नसतानाही मलेरियाचा वायरस दिसतो किंवा दुसरं काही निदान होतं. असं मिळणारं समाधान कष्ट करण्याचा उत्साह देतं.

हेही वाचाः मंदीतही पॅथॉलॉजीच्या धंद्यात खुणावतेय संधी

गुंतागुंतीची शरीरसंस्था रक्तातून समजते

आणखी काही टेस्ट हिमॅटोलॉजी मधे होतात. त्यातली एक म्हणजे प्रोथ्रोमबीन टाइम. रक्त जेव्हा रक्तवाहिनीत असतं तेव्हा ते गोठत नाही. पण त्यातून बाहेर आल्यावर मात्र गोठतं. हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे. मात्र हार्ट वॉल्व म्हणजे हृदयाच्या झडपेची रिप्लेसमेंट झालेल्या लोकांमधे त्या झडपेमुळे रक्त शरीरात गोठण्याची शक्यता असते. तसं होऊ नये म्हणून त्यांना अँटिकॅगुलंट औषध म्हणजे रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारं औषध देतात. यात नॉर्मल माणसाचा पीटी म्हणजे रक्त गोठण्यासाठी लागणारा वेळ १४ असेल तर त्या तो अडीच ते तीन पट करतात. त्याला आयएनआर म्हणतात.

अशा पेशंटना अधून मधून ही टेस्ट करून पीटी कमी किंवा जास्त झाला नाहीय ना हे बघावं लागतं. तसंच सर्जरी होणार आहे अशा पेशंटचा पीटी नॉर्मल आहे की नाही ते बघावं लागतं. लिवरच्या रोगांतही हा पीटी वाढतो. ही टेस्ट अबनॉर्मल येत असेल तर पेशंट गोळ्या घेतो का किंवा दुसरा काही रोग आहे का हे विचारून मगच रिपोर्ट द्यावा लागतो. कधीकधी सॅम्पल ठीक नसेल तरी ही टेस्ट अबनॉर्मल येऊ शकते.

आणखी एक टेस्ट म्हणजे HbA1C. डायबेटिसच्या पेशंटची ३ ते ४ महिन्यांची साधारण साखर यातून कळते. रक्तातलं ग्लुकोज हिमोग्लोबिनबरोबर एक बॉण्ड फॉर्म करतं. हे बॉण्ड तयार होणं हे रक्तातल्या ग्लुकोजच्या पातळीवर अवलंबून असतं. डायबेटिसमुळे होणारे किडनी, रेटायना, नर्व डॅमेज हे त्या ग्लुकोजच्या पातळीवर अवलंबून असतं. त्यामुळे ही टक्केवारी आपल्याला ग्लुकोजची पातळी दाखवते. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल अर्थात रक्तातल्या लाल पेशी १२० दिवस जगते. त्यामुळे साधारण ४ महिन्यांची साखर आपल्याला समजते.

हेही वाचाः अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!

रोज नवीन आव्हान असतं

अर्थात छोट्या लॅब आणि हॉस्पिटलमधे एकाच ठिकाणी सगळ्या टेस्ट होतात. मी लिहिण्याच्या सोयीसाठी वेगवेगळे भाग केले आहेत. या सगळ्या टेस्ट टेक्निशियन करतात मग तुम्ही काय करता? हा प्रश्न नेहमी विचारला जातो.

सर्व इन्स्ट्रुमेंट नीट चालू आहेत ना? यासाठी इंटर्नल आणि एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल, खूप कमी किंवा खूप जास्त वॅल्यू येत असेल तर फिजिशियनशी बोलून कन्फर्म करणं किंवा सॅम्पल पुन्हा घेऊन पुन्हा तपासणं, रिपोर्ट नीट तपासून मगच सही करणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. यात कधी रसायनं संपतात, कधी मशीन बिघडतं, कधी लाईट जाते, कधी टेक्निशियन येत नाही, टायपिस्ट नसतो किंवा नवीन असतो, तो खूप चुका करतो. अनेक अडचणी येतात.

एकदा सॅम्पल स्वीकारलं की रिपोर्ट वेळेत देणं ही पॅथोलॉजिस्टची जबाबदारी असते. वर दिलेल्यापैकी एकही कारण पेशंटला सांगू शकत नाही. त्यामुळे वेळ पडली तर स्वतः सगळ्या टेस्ट कराव्या लागतात. तसंच रिपोर्ट टाइपसुद्धा करावं लागतं. अशी रोजची अडथळ्यांची शर्यत पार करून सगळे रिपोर्ट वेळेत देऊन घरी येताना एक वेगळंच समाधान मिळतं. पण त्याचबरोबर उद्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी मनाची तयारीही करावी लागते.

हेही वाचाः 

वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

आपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघींना बिग थँक्यू

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

(डॉ. मंजिरी मणेरीकर या गेली २५ वर्ष पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरिअल कॉलेजमधून एमडी पॅथॉलॉजी केलंय.)