भविष्यात डेटा डिक्टेटरशिपचा धोकाः युवाल नोआ हरारी

२३ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


युआल नोआ हरारी हा २१ व्या शतकातला एक महत्त्वाचा माणूस. भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालून भविष्याचा वेध घेणाऱ्या त्यांच्या ‘सेपियन्स’ या पुस्तकाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. आपलं भविष्य कसं असणार, असा प्रश्न सगळं जग हरारी यांना विचारतंय. असे हरारी गेल्या आठवड्यात मुंबईत होते. त्यांनी मीडियाशी साधलेल्या संवादाची ही संक्षिप्त नोट.

स्त्रीवादी चळवळीची शांतीत क्रांती

गेल्या हजारो वर्षांत स्त्री पुरुष नातेसंबंधामधे विशेष काही बदल झाले नाहीत. अनेक चढ उतार झाले. पण स्त्री पुरुष नातेसंबंधात सगळं जैसे थे होतं. पण स्त्रीवादी चळवळीने यात मोठी क्रांती केली. २१ व्या शतकातली ही सगळ्यात मोठी क्रांती होती. कुठल्याही रक्तपाताशिवायची. शांतीत क्रांती. 

अनेक युद्धं झाली, क्रांत्या झाल्या. याने स्त्री पुरुष नातेसंबंधात तसुभरही बदल झाला नाही. पण स्त्रीवादी चळवळीने सगळं समाजमन ढवळून काढलं. स्त्री पुरुष नातेसंबंधांना तळापासून ढवळून काढलं. हा सगळा बदल सकारात्मक होता. तुम्ही जर जगभरात झालेली युद्ध, क्रांत्या यांचा इतिहास बघाल, तर स्त्रीवादी चळवळीने जे आपल्याला मिळालंय, त्याचं मोल कळेल. रशियन क्रांतीत मोठी जीवितहानी झाली. भारताच्या फाळणीतही बरेच लोक मारले गेले. पण स्त्रीवादी क्रांतीत असं काहीच घडलं नाही. सगळं शांततेत झालं.

कोण पुढे जाणार, माणूस की कॉम्प्युटर?

इंटेलिजन्स अर्थात बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही कुठलाही प्रश्न सोडवू शकता. इंटेलिजन्स हे समस्या सोडवण्याचं कौशल्य आहे. कॉन्शसनेस अर्थात जाणीव म्हणजे आनंद, भीती, वेदन अशा गोष्टी फील करण्याची क्षमता होय. आपण बऱ्याचदा या दोन्ही गोष्टींमधे एकच असल्याचं समजून मोठा गोंधळ करून घेतो. पण या दोन्ही गोष्टी भिन्न आहे. माणसाकडे या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळेच माणूस आपल्या भावनांचा कौल घेऊन निर्णय घेतो.

कॉम्प्युटरचं असं नाही. कॉम्प्युटरजवळ एका उच्च पातळीवरची बुद्धिमत्ता आहे. त्यामुळेच कॉम्प्युटर समस्या सोडवण्याच्या कौशल्यात माणसाला मागं टाकू शकतो. पण कॉम्प्युटर जाणीवशुन्य आहे. माणूस जसं जाणीवेचा, भावनेचा कौल समजून घेऊन समस्या सोडवू शकतो, सोडवतो, तसं काही कॉम्प्युटरचं नाही. कॉम्प्युटर केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर समस्या सोडवतो.

मग येत्या काळात कॉम्प्युटर माणसासारखा भावनिक प्राणी होईल? तर याचं उत्तर नाही असं आहे. ‘कॉम्प्युटर कॉन्शसनेस’ म्हणजे निव्वळ कल्पनारंजन आहे. नजीकच्या भविष्यातही कॉम्प्युटरकडे अशी क्षमता येण्याची शक्यता दिसत नाही. येत्या काळात तर कॉम्प्युटरचं वर्चस्व आणखी वाढणार आहे. तरीही ‘कॉम्प्युटर कॉन्शसनेस’ ही गोष्ट प्रत्यक्षात येणं शक्य नाही. यंत्रमानवाला प्रेमात पाडणाऱ्या विज्ञानकथा निव्वळ काल्पनिक आहेत.

भविष्यात माणसापुढे एक मोठं संकट येऊन आदळणारंय. त्या संकटाला हाणून पाडण्यासाठी आपण आतापासूनच तयार राहिलं पाहिजे. कॉम्प्युटरला अधिकाधिक इंटेलिजन्ट बनवण्यासाठी आपण खूप कष्ट घेतोय. मानवी जाणीव विकसित करण्यावरही आपल्याला तेवढीच मेहनत घ्यावी लागणार आहे. नाही तर आपण भयंकराच्या दारात जाऊत. कुठलीच जाणीव नसलेल्या शक्ती जगावर राज्य करतील. हे आपण आताच ओळखलं पाहिजे.

टेक्नॉलॉजीमुळे एकसारखं दिसण्याची स्पर्धा

माणूस जसा जसा विकसित होत गेलाय तसं तसं सत्ता आणि सौंदर्य या गोष्टी महत्त्वाच्या झाल्यात. त्यामुळेच आजचा माणूस कधी नव्हे तेवढा देखणा झालाय. त्यामुळे रोज कुठून तरी सगळ्यात देखण्या, सुंदर माणसाची बातमी येते. याचवेळी त्याला आपण खूप कुरूप असल्याची भावनाही सतावतेय. हे सगळं आताच्या युगातच घडतंय. कारण आज माणसाला सौंदर्याच्या, दिसण्याच्या अवास्तव मापदंडांचा सामना करावा लागतोय. त्याला तो बळी पडतोय. ही सगळी एकसारखं दिसण्याची स्पर्धा आहे.

आता हेच बघा की पूर्वी एखाद्या खेड्यात राहणारा पुरुष आपल्याच भोवतालच्या पन्नासेक माणसांशी स्वतःच्या रुपाची तुलना करायचा. कारण त्याचं जगच तेवढं होतं. आता मात्र, त्याचं टीवी, स्मार्टफोन यामुळे त्याचं जग अफाट बदललंय. या माध्यमातून तो जगभरातले शेकडो हॅण्डसम पुरुष बघतोय. आणि इतरांच्या दिसण्याची स्वतःशी तुलना करतोय. मग त्याला स्वतःविषयी उगीचच अस्वस्थ, असमाधानी वाटू लागतं. आताच्या जगात त्याच्या सौंदर्याचे मापदंड घडवले जातायंत. 

या सगळ्यामागे टेक्नॉलॉजीची भूमिका खूप कळीची आहे. कारण टेक्नॉलॉजीमुळे मानवी शरीर आणि मेंदू यांना हवं तसं घडवण्याची सोय झालीय. येत्या काळात तर आपण टेक्नॉलॉजीचा हात धरून मानवी शरीराच्या जडणघडणीचे नियमच आपल्या सोयीने बदलू, असं मला वाटतंय. त्यामुळे आपण आतापर्यंत पुराणकथांमधे ऐकलेला माणूस घडवू. सहा हात, दोन डोकी असलेला माणूस. हवं तसं स्वतःला बदलून घेऊ. हे सगळं मुठीत आल्यावर मग आपण मनाजोगतं दिसण्यासाठी खटाटोप करायला लागू. त्यामुळे सौंदर्याच्या संकल्पनाही बदलतील.

तुमचा डेटा कुणीही वापरू शकतं

माहिती अर्थात डेटाचं संरक्षणही आजघडीला खूप महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट आहे. जमीनजुमला, पैसा यापेक्षाही डेटाच्या मालकीला खूप महत्त्व आलंय. या सगळ्याला राजकीय, आर्थिक पैलूही आहेत. कस्टमरला काय पाहिजे, त्याच्या इच्छा आकांक्षा काय आहेत आणि त्यांच्यावर कसा प्रभाव टाकायचा, त्यांची मन कशी प्रदूषित करायची हे सगळं डेटामुळे तुम्हाला कळू शकतं. राजकारण्यांसाठी तर डेटा मनकवड्यासारखी भूमिका पार पाडतोय. टेक्नॉलॉजी येण्याआधी हे कधीच शक्य नव्हतं. भरमसाठ डेटा गोळा त्याचं आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने विश्लेषणही करता येतं. राजकारण आणि उद्योगधंद्यात यशस्वी होण्यासाठीची ही नव्या काळातली गुरुकिल्ली आहे.

त्यामुळे कधी नव्हे तेवढी माहितीच्या संरक्षणाची डेटा प्रोटेक्शनची समस्या गंभीर झालीय. पण सध्या तरी डेटा प्रोटेक्शन कसं करायचं याचं सोल्यूशन आपल्याला सापडलं नाही. हे शोधणंही तसं अवघडच आहे. कारण डेटाची काही जमीनजुमल्यासारखी राखणदारी करता येत नाही. चार रेघा मारल्या आणि ही माझी प्रॉपर्टी आहे, असं आपण डेटाच्या बाबतीत म्हणू शकत नाही. माझा मेडिकल डेटा, डीएनए यांची माहिती केवळ माझ्याकडेच आहे, असं आपण छाती ठोकून सांगू शकत नाही. त्यामुळे या डेटाचा कुणी गैरवापर करणार नाही, हेही आपल्या हातात नाही. डेटाचं नियंत्रण करणं खूप कठीण गोष्ट आहे.

डेटा कलोनायजेशनबद्दल कधी ऐकलंय?

आतापर्यंत आपण वेगवेगळ्या संदर्भात कलोनायजेशन अर्थात वसाहतवादाबद्दल ऐकलोय. पण डेटाला महत्त्व आल्यापासून एक नवा धोका निर्माण झालाय. तो म्हणजे ‘डेटा कलोनायजेशन’ची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचा. आणि हे प्रत्यक्षात येऊ शकतं. ही एका अर्थाने डेटा डिक्टेटरशिपच आहे.

एकोणिसावं शतक हे वसाहतवादासाठी ओळखलं जातं. ब्रिटन, पोर्तुगीज यांच्या जगभरात वसाहती होत्या. भारतासाठी वसाहतवाद ही काही नवी गोष्ट नाही. तर ब्रिटनसारखा देश गरीब देशांत आपल्या वसाहतीचा तंबू ठोकायचा. मग नाममात्र दरात या देशातून कापूस, कोळसा, लोखंड असला कच्चा माल विकत ब्रिटनला न्यायचा. तिथं त्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करायचे. आणि मग चढ्या भावाने आपली वसाहत असलेल्या देशांना विकायचे. वसाहत काळातलं हे ‘बिजनेस मॉडेल’ आपल्याला माहीत आहे.

कुणीही घेईल डेटाचं पीक

आता डेटाच्या बाबतीत तेच होण्याचा धोका आहे. कुणी भारतासारख्या देशात डेटाचं पीक घेऊन तो कच्चा माल चीनला पाठवेल. मग चीन त्या डेटावर प्रक्रिया करून एक प्रोडक्ट तयार करेल आणि विकायला काढेल.

आता एखादा माणूस म्हणले, की मी माझ्या डेटाचं संरक्षण करणार. पण असं करणं काही एकट्या दुकट्याची आवाक्यातली गोष्ट नाही. याकामी युनियनचं मॉडेल आपल्या फायद्याचं ठरू शकतं. कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कामगार संघटना आहेत. तशा ‘ट्रेड युनियन ऑफ डेटा’ सारखी संकल्पना आपल्याला इथे मदत करु शकते. डेटाधारकांची युनियन. समजा, दहा लाख डेटाधारकांची एक युनियन आहे. त्या युनियनचा एक लीडर असले. त्या लीडरला हा डेटा मॅनेज करण्याचा अधिकार राहील. मग तुम्ही दहा लाख लोक एखाद्या कंपनीला तुमचा डेटा विकू शकता. तुम्ही स्वतः या डेटाच्या नियम आणि अटी ठरवू शकता.