वडिलांमुळे युवीला स्केटींगऐवजी क्रिकेटमधे यावं लागलं

२२ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


योगराजसिंग हे युवराजसिंगचे वडील. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं क्रिकेट प्लेअर होण्याचं स्वप्न पुर्ण करता आलं नाही. ते त्यांनी युवराजमधे बघितलं. पण युवराजला मात्र स्केटींगचं वेड होतं. एकेदिवशी त्यांनी त्याचं स्केटींगचं सामान, बक्षीसं बाहेर फेकली आणि युवराजच्या मनात नसताना त्यांनी त्याला क्रिकेट प्लेअर करायला घेतला.

फादर्स डेच्या चार दिवस आधी युवराजसिंगने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली निवृत्ती जाहीर केली. तेव्हा त्याच्यासोबत त्याची आई शबनम होती. तिथं त्याचे वडील योगराजही असायला हवे होते. युवराज पत्रकार परिषदेतही वडलांच्या तक्रारीबाबत ते अजून लहानच आहेत असं उपरोधानं म्हणाला. योगराजसिंगनी युवराजला क्रिकेट प्लेअर म्हणून घडवताना त्याला बालपणी उठता बसता क्रिकेटचा सराव करायला लावला होता.

योगराज यांना व्हायचं होत क्रिकेट प्लेयर

पहाटे तोंडावर पाणी मारत त्याला क्रिकेटचे धडे दिले जायचे. त्याला घडवण्याची सुरवात खरंतर इथून झाली होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थोडक्यात दंगल या सिनेमात जसं मुलींनी कुस्तीपटू म्हणुन जो बाप दाखवलाय अगदी तसंच योगराज यांचं वागणं होतं.

योगराज हा खरंतर कपिलदेव सोबतचा वेगवान गोलंदाज. दोघेही दोस्त होते. दोघेही अंगापिंडाने मजबूत. भरपूर उर्जा आणि आवेश असलेले. शर्यतीत मात्र कपिल खुपच पुढे निघुन गेला. योगराजला त्याच्या वडिलांना भरपूर आनंदात पहायचं होतं. क्रिकेटमधे कमाई करुन सगळं सुरळीत करायचं होतं. पण त्या आधीच वडिलांचं निधन झालं. त्यानंतर योगराजच्या पदरी सतत निराशा, अपयश येत राहिलं. त्यामुळे तो एकदम कठोर आणि भावनाहीन बनला.

हेही वाचा: ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

युवराजच्या मनात स्केटींगचं वेड

जे आपल्याला जमलं नाही ते आपल्या मुलाकडून करुन घ्यायचं असा त्याने ध्यास घेतला. पण युवराजला स्केटींगचं भलतंच वेड होतं. तो छान स्केटींग खेळायचाही. बक्षीसंही मिळवत होता. योगराजला हे काही पटलं नाही. त्यांनी त्याचं स्केटींगचं सामान, बक्षीसं यांची विल्हेवाट लावली. नवी बॅट, ग्लोवज्, पॅडस् सतत देऊन युवराजला बळेबळे क्रिकेट प्लेअर करायला घेतला.

खरंतर असं करणारा तो एकटाच नव्हता. असे अनेक पिता होते. पण योगराजकडून काही अपराध, गैरप्रकारही घडले. पंजाबी सिनेसृष्टीत वावरताना तो अधिकच बहकला. तुरुंगातही जाऊन आला. योगराजच्या या बेताल वागण्यामुळे त्याची बायको त्याच्यापासून दूर गेली. युवराज मग आईचा झाला तो कायमचाच. योगराजचं स्वप्न होतं युवराजनं क्रिकेट प्लेअर व्हायचं.

हेही वाचा: वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार

कसोटीपटू व्हावं हे वडलांचं स्वप्न

युवराजने वनडे प्रकारात आपली चमक नक्कीच दाखवली. २०११ ची विश्वचषक स्पर्धा भारताला जिंकून देण्यात त्याचा खारीचा वाटा होता. तो ट्वेंटी ट्वेंटी मधेही झळकला. पण कसोटी क्रिकेटमधे मात्र ढेपाळला. त्याला कॅंन्सरनं कमजोर केलं आणि त्याची कारकीर्द हळुहळु खाली आली. युवराजला तरीही कुणी कमी लेखलं नाही. त्याला लढवय्याच मानलं गेलं. सहा बॉलवर सहा सिक्सर ठोकुन त्यानं जगाला आपलं सामर्थ्य दाखवलं होतं. योगराजला मात्र तो एक यशस्वी कसोटीपटू व्हावा असं वाटत होतं. ते स्वप्न मात्र अधुरंच राहिलं.

युवराजने निवृत्ती जाहीर करताना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं पटलं नाही. त्यांच्यामुळेच तो क्रिकेटपटू झाला हे निर्विवाद सत्य होतं आणि राहणार आहे. त्यांच्याबाबत कटु बोलायचं त्याने टाळायला हवं होतं. त्यांचे आभार मानले असते तरी तो त्याचा दिलदारपणा ठरला असता. असो.

हेही वाचा: विराट असा कसा तू वेगळा वेगळा

काश योगराज रमेश तेंडूलकर असते

युवराज सर्वाधिक मानतो ते सचिन तेंडुलकरला. त्याच्याविषयीचा आदर त्याने वेळोवेळी व्यक्तही केलाय. सचिनचं उदाहरण मात्र युवराजच्या विरुद्ध आहे. त्याचे वडील होते कवी, प्राध्यापक. क्रिकेटचा जराही संबंध नसलेले सचिनचे दोन्ही थोरले बंधू जरुर क्रिकेटमधे होते. पण अजितनं त्याला क्रिकेटपटू व्हायला विशेष प्रोत्साहन दिलं. त्याची किट बॅग घेऊन तो त्याला सोडायला जायचा.

त्याचे हाल होऊ नये म्हणून त्याला आपल्या भावाच्या घरी ठेवला. त्याच्यामागे अभ्यासाचा धोसा लावला नाही. समंजस, मुर्तीमंत पित्याचं ते उदाहरण ठरलं. आणि सचिन क्रिकेटमधला महान भारतरत्न बनला. काश युवराजचे वडीलही रमेश तेंडूलकर बनु शकले असते. थोडा सुजाणपणा दाखवला असता तर चित्र काही वेगळं बनलं असतं.

हेही वाचा: 

सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला

योग दिवसाचे हे दहा फोटो आपण पाहिलेत का?

योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं