झोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ

२१ जुलै २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


या आठवड्यात झोमॅटो या फूड डिलिवरी करणार्‍या अ‍ॅपच्या आयपीओची नोंदणी झाली. म्हणजेच झोमॅटोचे शेअर्स शेअर मार्केटमधे खुले झाले. म्हटलं तर ही एक छोटी गोष्ट आहे; पण या गोष्टीसोबत भारतात एका नव्या पर्वाची सुरवात झालीय. नवीन उद्योग काढणार्‍या आणि रोजगाराची निर्मिती करणार्‍या भारतातल्या प्रत्येक कंपनीसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

२००० मधे अमेरिकेत डॉट कॉम क्रॅश झाला आणि २००८ ला जागतिक मंदी आली. या दरम्यान कुठंच नवीन उद्योग येत नव्हते. भारतीय उद्योग क्षेत्रातही विशेष हालचाल घडत नव्हती.

गेल्या दशकात म्हणजे २०१० ते २०२० मधे भारतात वेगवेगळे स्टार्टअप उभे राहू लागले. नवनवीन संकल्पना भारतात येऊ लागल्या. या संकल्पना वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित होत्या. या संकल्पनांना पहिल्यांदा भारतात आलेल्या कमी किमतीच्या स्मार्टफोननी आणि नंतर जिओच्या डेटा क्रांतीने बळ दिलं.

हेही वाचा: कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

स्टार्टअपबद्दल अनेक शंका होत्या

२०१४ ला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर स्टार्टअप इंडिया या मिशनची सुरवात झाली. या सगळ्याचा परिणाम म्हणून नवे उद्योजक तयार होण्याला बळ आणि प्रतिष्ठा मिळाली. मग यात फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगी, पेटीएमसारखे स्टार्टअप आघाडीवर होते.

या नव्या कंपन्यांचे संस्थापक हळूहळू तरुणाईचे आयकॉन बनू लागले. पण तरीही असं म्हटलं जायचं की, या सर्व स्टार्टअपचं पुढे काय होणार? हे स्टार्टअप कल्चर म्हणजे एक फुगा आहे का? यातून खरंच व्यवसाय उभा राहिल का?

जे परदेशी गुंतवणूकदार आहेत जे अशा स्टार्टअपमधे मोठी गुंतवणूक करत आहेत, त्यांना नेमका कसा परतावा मिळणार? एक रुपयांचा नफा नाही आणि तरी कंपनीची किंमत १ लाख कोटी हे कसं शक्य आहे? अशा अनेक शंका अनेकांच्या मनात होत्या.

कंपन्यांचं बाजारमूल्य ठरवणारे अ‍ॅप्स

या सर्व शंकांना उत्तर झोमॅटोच्या या आठवड्यातल्या शेअर बाजारातल्या लिस्टिंगने मिळालंय. कारण शेअर बाजारात लिस्ट होणं हा नवीन कंपनीच्या यशस्वी होण्याचा जागतिक मापदंड आहे. भारतीय स्टार्टअप हे यशस्वी होऊ शकतात. ते शेअर्स मार्केटमधे लिस्ट होऊ शकतात आणि त्यापुढेसुद्धा ते यशस्वी प्रवास करू शकतात, हे यातून अधोरेखित झालंय.

ही घटना किती महत्त्वाची आहे, हे समजून घेण्यासाठी आपण थोडं अमेरिकेकडे पाहिलं पाहिजे. अमेरिकेतल्या ज्या बलाढ्य टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत, ज्यांचे शेअर्स मार्केटमधे लिस्ट आहेत. अशा कंपन्यांना फँग स्टॉक म्हणतात. म्हणजे फेसबुक, अमेझॉन, अ‍ॅपल, नेटफ्लिक आणि गूगल.

यातला अ‍ॅपल वगळता बाकी सर्व टेक्नॉलॉजी आधारित सेवा देणार्‍या कंपन्या आहेत. म्हणजेच ते वेगवेगळे अ‍ॅप्स आहेत. आणि या अ‍ॅप्सद्वारे मोठे बाजारमूल्य तयार होऊन कित्येक ट्रिलियन डॉलरच्या घरात या कंपन्यांचं बाजारमूल्य तयार झालेलं आहे.

हेही वाचा: कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?

झोमॅटोच्या आयपीओमुळे नवी संधी

तुलनाच करायची झाली तर अ‍ॅमेझॉनचं बाजारमूल्य १ ट्रिलियन डॉलर आहे. तर भारताचा जीडीपी तीन ट्रिलियन डॉलर इतका आहे. भारतात अजून अशा अ‍ॅप्स कंपन्या शेअर मार्केटमधे आजपर्यंत आल्या नव्हत्या. जे अ‍ॅप आपण रोज वापरतो, त्यांचे शेअर्स आपण विकत घेऊ शकत नव्हतो. मात्र झोमॅटोच्या आयपीओमुळे एक नवीन संधी निर्माण झाली आहे.

याच आठवड्यात पेटीएम या फिनटेक कंपनीने सोळा हजार कोटींचा आयपीओ बाजारात घेऊन येणार असल्याचं जाहीर केलंय. सोबतच मोबिक्विक आणि देलहीवरी या कंपनीचे शेअर बाजारात केव्हाही येऊ शकतात.

तेव्हा अमेरिकेत जे घडलं ते म्हणजे मोबाईल अ‍ॅप्स कंपन्या ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. बाजारात आल्या आहेत तसाच काहीसा प्रकार येणार्‍या काही महिन्यात भारतात होणार आहे. आणि जो भारतीय हे अ‍ॅप्स वापरतो, त्याला त्या कंपनीचा मालक बनायचीसुद्धा संधी मिळणार आहे.

भारतातल्या उद्योग कंपन्यांसाठी खुशखबर

असं म्हटलं जातं की, भारतात डेमोग्राफिक डिवीडंड आहे. म्हणजे काय? तर या सर्व कंपनीसाठी लागणारा तरुण टेक्नोसॅवी युजर्सचा सर्वात मोठा बेस भारतात आहे. फेसबुक, गुगलसारख्या कंपनीसाठी भारत ही एक गोल्ड माईन आहे. भारतात इतके वापरकर्ते असूनही या डेमोग्राफिक डिवीडंडचा फायदा भारताला कसा होणार हे कळत नव्हतं. ते आता झोमॅटोच्या शेअर्समधल्या लिस्टिंगमुळे स्पष्ट झालंय.

भारतातही येणार्‍या दशकात सेवा क्षेत्रातल्या कंपन्या ज्यांच्या आयपीओ सध्या बाजारात येत आहेत, त्या सर्वाधिक बाजारमूल्य असणार्‍या कंपन्या असू शकतात आणि सध्या ज्या कंपन्या भारतीय शेअर मार्केटमधे मोठ्या आहेत, त्या कदाचित तशा राहणार नाहीत आणि त्यांची जागा या नव्या कंपन्या घेतील. २०३० च्या सेन्सेक्समधल्या कंपन्या कदाचित आजपेक्षा खूप वेगळ्या असतील.

झोमॅटोचे शेअर्स बाजारात येत असताना झोमॅटोचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखली जाणारी कंपनी स्विगीनेही त्यांच्या ग्राहकांना नोटिफिकेशनद्वारे कळवलं की स्विगी या बदलाचं स्वागत करत आहे. यातून असं दिसून येतं की, भारतातले नवीन उद्योग काढणार्‍या आणि रोजगाराची निर्मिती करणार्‍या प्रत्येक कंपनीसाठी ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

हेही वाचा: सरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय?

आर्थिक क्षितिज रुंदावणाऱ्या घटना

भारतातली स्टार्टअप इकोसिस्टिम आता मॅच्युअर होत असल्याचं हे लक्षण आहे. याचवेळेला आपल्या आजूबाजूला अनेक युनिकोर्न कंपन्या तयार होत आहेत. युनिकोर्नचा अर्थ आहे, ज्या कंपनीचं मार्केटमधलं मूल्य सहा हजार कोटींहून अधिक असतं, अशा कंपन्या.

२०२१ च्या पहिल्या सहामाहीत तीसहून अधिक युनिकोर्न भारतात तयार झाले. आता यातल्या काहींनी शेअर मार्केटमधे उतरून एक नवीन उडी घेतलीय. पुढील दशक भारतातल्या या नवीन कंपन्या ज्या आता स्टार्टअप्स आहेत, त्या गाजवतील अशी चिन्हं दिसतायत.

याला अजून आयाम असा आहे की, या कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांनीही शेअर मार्केटमधे चंचूप्रवेश केलाय. आजकाल कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातली तरुणाईही शेअरमार्केटमधे शेअर खरेदी करत आहे.

नव्या आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षात दीड कोटीहून अधिक नवीन गुंतवणूकदार या मार्केटमधे आलेले आहेत. त्यामुळे भारतातला युवावर्ग शेअर मार्केटमधे पैसे गुंतवत आहे. या दोन्ही घटना म्हणजे भारतातील आर्थिक क्षितिज अधिक रुंदावत आहे, हे दाखवणार्‍या आहेत.

उद्योग क्षेत्रातलं नवं पर्व

असं म्हणतात की, विकसित देशाचा प्रवास हा शेतीपासून चालू होतो. त्यानंतर उद्योग आणि मग सेवा क्षेत्राकडे होतो. आज भारतीय शेअर मार्केटमधल्या मोठ्या कंपन्या या उद्योग क्षेत्रातल्या अधिक आहेत. म्हणजेच पारंपरिक व्यवसाय असणार्‍या या कंपन्या आहेत.

भारतात सुरवातीला शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती. ती आता सेवाक्षेत्राकडे झपाट्याने वाटचाल करत आहे. अमेरिकेतल्या बहुतेक मोठ्या कंपन्या या सेवाक्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे भारतही विकसित देशाच्या दिशेने काही पाऊलं पुढे गेलाय असं म्हणता येतं. त्यामुळे ही अत्यंत छोटी घटना असली तरी भारतीय उद्योग क्षेत्रातलं नवं पर्व म्हणून ओळखलं जाणार आहे.

गेली कित्येक वर्ष स्टार्टअप इंडियावर दिलेला भर आणि उद्योगपूरक नवनवीन योजना आणि युवा वर्गात उद्यमी वातावरण निर्माण करण्याचं हे फळ आहे. आता उद्योग करण्याला वेगळी प्रतिष्ठा मिळालीय. भारताच्या युवा शक्तीची आर्थिक ताकद मोठी आहे, हेही यातून अधोरेखित झालंय. त्यामुळेच या नव्या पर्वाचं खुल्या दिलाने स्वागत करायला हवं.

हेही वाचा: 

दामदुप्पट परतावा देणारे सेक्टरल फंड कुणाच्या फायद्याचे?

पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?