कवी अरुण कोलटकर यांच्या 'जेजुरी' या काव्यसंग्रहाला भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यात फार मानाचं स्थान आहे. ही कविता आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी म्हणून डॉ. शुभांगी रायकर यांनी त्यावर पुस्तक लिहिलं. हे काही परीक्षेत मार्क मिळवून देणारं गाईड नाही. तर विद्यार्थी घडवणारं मार्गदर्शक आहे. तरीही गेली २५ वर्ष ते दुर्लक्षित राहिलं. नव्या पिढीतले महत्वाचे विचारवंत डॉ. दिलीप चव्हाण यांनी या पुस्तकावर लिहिलेला महत्वाचा लेख.
एखाद्या नामांकित कॉलेजात शिकत असताना अभ्यासक्रमातील एखाद्या मोठ्या कवीच्या दीर्घकवितेवर कॉलेजातील प्राध्यापिकेने अभ्यासपूर्ण पुस्तक सिद्ध करावं आणि त्या पुस्तकाची निर्मितीप्रकिया आपल्याला लांबून का होईना बघता यावी, हा अनुभव मला घेता आला.
वर्ष : १९९५.
ठिकाण : फर्ग्युसन महाविद्यालय.
प्राध्यापिका : डॉ. शुभांगी रायकर.
पुस्तकाचं शीर्षक : Arun Kolatkar’s Jejuri : A Commentary and Critical Perspectives.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेतलं पहिलंच वाक्य पुस्तकाचा हेतू सांगतं : 'This commentary with annotations on Arun Kolatkar’s long poem 'Jejuri' has been written with the modest aim of helping the undergraduate and post graduate students in our universities.'
एखादी कविता समजून घेत असताना त्या कवितेवर इतरांनी केलेली भाष्यं, कवितेतल्या अवघड संदर्भांत केलेली स्पष्टीकरणं हे समजून घेणं मी आवश्यक समजतो. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन एखादं असं पुस्तक निर्माण करणं, ही कृतीच खूप मौलिक आहे. आजकालच्या पीएचडाळलेल्या जगात अशा पुस्तकाचं मोल समजून घेणारं किती निघतील?
शुभांगी रायकर यांनी लिहिल्याप्रमाणे, ‘जेजुरी’ ही कविता टी. एस. एलियट यांच्या ‘द वेस्ट लँड’ या दीर्घकवितेप्रमाणे वाचकासांठी एक आव्हान उभी करते. हे आव्हान विद्यार्थी आणि वाचकांनी पेलण्यासाठी काही मदत व्हावी, असा माफक उद्देश या पुस्तकाचा आहे. या पुस्तकातून कवितेचा संपूर्ण उलगडा होईल, असाही दावा नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलंय.
या पुस्तकात अरुण कोलटकरांवर एक छोटे टिपण आहे. जेजुरी गाव आणि खंडोबावरदेखील एक टिपण आहे. पन्नास पानांचा मजकूर ‘जेजुरी’ या कवितेतील प्रत्येक कडव्यावर भाष्य आणि स्पष्टीकरणं यांचा आहे. तसंच प्रा. एस. के. देसाई, प्रा. एम. के. नाईक, प्रा. रवींद्र किंबहुने, प्रा. भालचंद्र नेमाडे, ब्रुस किंग आणि शुभांगी रायकर यांचे लेख आहेत.
रायकर मॅडम आम्हाला भारतीय इंग्रजी साहित्य ही विषयपत्रिका शिकवत असत. यामधे जेजुरी ही कविता अभ्यासक्रमाला होती. त्यांनी ती कविता आम्हाला समजेल अशा पद्धतीने शिकवली. फर्ग्युसनमधे प्राध्यापकांची व्याख्यानं समजून घेणं, ही एक वेगळीच समस्या मला भेडसावत असे. प्राध्यापकांकडे विद्वत्ता असायचीच असं नाही, पण पुणेरी दर्प मात्र असायचाच! पण रायकर मॅडमची व्याख्याने आम्हाला सर्वाधिक समजत असत.
त्यांच्या वागण्याबोलण्यात एक मायेचा ओलावा होता. तो ओलावा एवढा होता की, एक वर्ग त्यांनी चक्क त्यांच्या घरी घेतला. सगळ्या विद्यार्थ्यांना खाऊपिऊ घातलं. सत्यशोधक चळवळीचे एक मोठे अभ्यासक प्रा. सीताराम रायकर यांच्याशी ओळख करून दिली. असं बरंच काही. या ‘घरगुती’ व्याख्यानासाठी मी मॅडमकडे सायकलवर गेलो होते. तेव्हा पुण्यातील वर्गमैत्रिणी माझ्या सायकलकडे बघून बऱ्याच हसल्याचं मला आठवतं. आता तर पुण्यातून सायकल जवळपास हद्दपार झालीय. सायकल चालवणं, ही श्रीमंतांची हौस वगैरे बनलीय पुण्यात.
हेही वाचा : दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’
कोलटकरांची जेजुरी शिकणं, सोबत रायकर यांचं हे पुस्तक वाचणं आणि सत्राच्या मधोमध त्यांच्याच पुढाकाराने जेजुरीला शैक्षणिक सहलीचंही आयोजन करण्यात येणं. हे सगळं एखाद्या कवितेच्या बाबतीत घडावं आणि विद्यार्थी म्हणून आपल्याबाबत घडावं, हे नक्कीच मोलाचं होतं. ही कविता शिकवताना रायकर यांनी जर्मनीतल्या अभ्यासक गुंथुर सोनथायमर यांच्याविषयी वर्गात सांगितलं होतं.
मध्यंतरी गुंथुर सोनथायमर यांनी आयुष्यभर ज्या विषयाचा अभ्यास केला त्या विषयावर मराठवाड्यातल्या एका विद्यापीठातल्या मराठीच्या विद्यार्थ्याची पीएचडीच्या अंतिम मौखिकीला हजर राहण्याची 'अपूर्व' संधी मला मिळाली. मी सहजच त्या विद्यार्थ्याला विचारले, गुंथुर सोनथायमर यांचं काम माहिती आहे का? कसलं काय? जाऊ द्या!
जेजुरी ही कविता एका मेट्रोपॉलिटन मध्यमवर्गीय कवीची कविता आहे. त्यात जेजुरीतल्या भाविकांच्या अंधश्रद्धांविषयी संशयानं लिहिलंय. त्यामुळे भालचंद्र नेमाडे कोलटकरांवर एकदम चिडले. त्यांच्या लेखात त्यांनी 'देशीवादी' आकलन असं सादर केलंय,
'Similar philistinism is over bearing in Kolatkar’s Jejuri. 'Scratch a rock and a legen springs', he writes with little sympathy for the poor pilgrims, beggars, priests and their quite happy children at Jejuri. Kolatkar comes and goes like a week-end tourist from Bombay. He should know that the ancient culture which stores up everything in its rocks also stores up the English language he uses and Jejuri pilgrimage is after all not so degenerate as for example a Juhu beach cocktail party.'
त्याकाळी हा डिबेट समजून घेणंही थोरपणाचं होतं. भालचंद्र नेमाडे, गणेश देवी, निस्सीम एझिकेल यांना प्रत्यक्ष बघणं, ऐकणं, त्यांच्यातला वाद समजून घेणं, असा तो महाविद्यालयीन काळ होता. आता मराठी साहित्यातल्या वर्तमानपत्री पाठराखण करणारी कौतुकपर ‘समीक्षा’ वाचली की, एकंदरच सांस्कृतिक विश्वाचं काय होईल, याची चिंता वाटतेच वाटते.
फर्ग्युसन सोडल्याच्या पंधरा वर्षांनंतर मी रायकर त्यांच्या घरी गेलो. एव्हाना माझी प्रत ही कुठल्यातरी विद्यार्थ्याकडे गेली होती. मी रायकरांकडे जाऊन परत दुसरी प्रत आणली.
हे पुस्तक रायकर यांनी स्वत:च प्रकाशित केलं होतं. माळ्यावर ठेवलेल्या पुस्तकांच्या गठ्ठ्यातून मीच एक पुस्तक काढलं. पुस्तकाची किंमत मोजली. आजही या गठ्ठ्यांत या पुस्तकाच्या अनेक प्रती वाचकांच्या प्रतिक्षेत असतील.
हेही वाचा :
गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र
मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत
(लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी शिकवतात.)