‘मिफ’मधल्या लक्षणीय कलाकृतींवर एक नजर

२२ जून २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म आणि अ‍ॅनिमेशनपट यांच्यासाठी हक्काचं विचारपीठ समजला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ नुकताच पार पडला. त्यातून काही लक्षणीय कलाकृती पाहण्यात आल्या. आशय आणि तांत्रिकदृष्ट्या सरस ठरलेल्या या कलाकृतींचा आढावा घेणारा हा लेख.

यावर्षीच्या मुंबई आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती पाहण्यात आल्या. उत्कृष्ट तांत्रिक कौशल्ये आणि आशयाने नटलेल्या या कलाकृती नक्षलवाद, फॅसिझम, निर्घृण प्रथा, युद्ध अशा कितीतरी विषयांना हात घालताना दिसल्या.

सुवर्णशंख विजेती डॉक्युमेंटरी

‘टर्न युवर बॉडी टू द सन’ या सुवर्णशंख विजेत्या डॉक्युमेंटरीमधे सुरवातीलाच द़ृश्यातल्या पडद्यावर एका बाजूला हिटलर, तर दुसर्‍या बाजूला स्टॅलिन यांचे प्रत्यक्षाहून भव्य असे फोटो दिसतात आणि या फोटोंच्या कचाट्यात सापडलेली पडद्यासमोर उभी असलेली ‘साना’ ही सर्वसामान्य स्त्री दिसते. या डॉक्युमेंटरीचं एकूण आशयसूत्रच या द़ृश्यातून प्रेक्षकांच्या मनामधे झिरपतं.

सोवियत सैनिक जेव्हा युद्धात नाझींकडून पकडले गेले तेव्हा त्यांचं त्यानंतर काय झालं, याचा शोध एका सैनिकाच्या रोजनिशी आणि इतर काही कार्यालयीन नोंदींतून घेण्याचा प्रयत्न त्याची मुलगी साना करते. यातून ही डॉक्युमेंटरी घडते.

मायदेशी युद्धवीरांचं तर भव्य स्वागत घडतं; पण पराभूत होऊन परतलेल्या सैनिकांच्या किंवा युद्धकैद्यांसोबत मायदेशातही काय घडतं, याचा अस्वस्थकारी प्रत्यय या डॉक्युमेंटरीमधून मिळतो. रोजनिशीतली वाक्यं निवेदनातून येत असताना ती अगोदर रशियनमधून पडद्यावर उमटतातही आणि नंतर विरघळून इंग्रजीतून येऊ लागतात, ही योजना सर्जनशील वाटली.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

सिनेमाच्या कक्षेपलीकडची ‘सायकल’

‘सायकल’ या देवाशिष माखिजा यांच्या तीन दीर्घ टेक असणार्‍या २० मिनिटांच्या शॉर्टफिल्ममधे नक्षलवाद हे आदिवासींवर प्रस्थापित व्यवस्थेकडून होणार्‍या अत्याचारांच्या शोषणांचं अपत्य आहे, असं आशयसूत्र कमालीच्या वास्तववादी धाटणीत मांडलंय, की जे अगदी अंगावर येतं.

यात सुरवातीच्या आणि शेवटच्या प्रसंगात मोबाईल कॅमेरा फुटेजच्या वर्टिकल फ्रेमचा वापर केलाय आणि दरम्यानच्या प्रसंगात भूमिका दुबे साकारत असलेल्या पत्रकाराच्या हातातला मोबाईल कॅमेराच दलमचा कॅम्पमधला वावर टिपतो. त्यात तो कॅमेरा बेला या नक्षली युवतीच्या हाती येतो, तेव्हा तिनं उलटं पकडल्यानं फ्रेममधे पत्रकार संपूर्ण उलटी दिसते.

त्यामुळे संपूर्ण शॉर्टफिल्ममधे कुठंही फिल्मी अँगल, कम्पोजिशन येत नाहीत. मात्र यातला द़ृश्यतपशील कॅज्युअल आल्यासारखा वाटला, तरी त्यापाठीमागे सूक्ष्म विचार असल्याचं लक्षात येतं. सिनेमा माध्यमाच्या कक्षा विस्तारणारा देवाशिष माखिजा हा एक आजचा महत्त्वाचा दिग्दर्शक आहे.

मुक्त अभिव्यक्तीचा ‘द डान्स’

‘द डान्स’ या पॅट कॉलिन्स दिग्दर्शित डॉक्युमेंटरीमधे एका नृत्यनाटिकेच्या रिहर्सलच्या अगदी पहिल्या दिवसापासून ते पहिल्या प्रयोगापर्यंत संपूर्ण प्रक्रियेचं चित्रण पाहायला मिळतं. आठ आंतरराष्ट्रीय नर्तक आणि काही संगीतकार एकत्र येतात आणि दिग्दर्शकाच्या मूळ संकल्पनेला अनुसरून सुचेल तसं नाचतात, वाजवतात.

त्या उत्स्फूर्त आणि उत्कट अभिव्यक्तीतून आलेल्या रचनांचं इम्प्रोवाइजेशन करीत ही नृत्यनाटिका साकार होते. या प्रक्रियेतले नर्तक आणि वादक तर मुक्त होत जातातच; पण ही डॉक्युमेंटरी पाहता पाहता, या मुक्त करणार्‍या प्रक्रियेमुळे रसिकही मुक्त होत जातात.

आपल्याकडच्या सिनेमातली किंवा कार्यक्रमांतलीही बहुतेक नृत्यं ही परफॉर्मन्स केल्यासारखी असतात. ती इम्प्रेससिव्ह वाटली तरी एक्प्रेससिव्ह नसतात. मात्र ‘द डान्स’मधे किंवा जागतिक पटांमधली नृत्यं मात्र परफॉर्मन्स नाही, तर व्यक्तिरेखेनं त्यावेळच्या भावावस्थेला दिलेलं शारीरिक अभिव्यक्तीचं मुक्त रूप असतं.

हेही वाचा: हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

गंभीर विषयावरचा ‘परदा’

‘परदा - द कट’ ही अमर देवकर दिग्दर्शित आणि अभिनित २० मिनिटांची शॉर्टफिल्म, बोहरा समाजात अजूनही चालू असणार्‍या स्त्रियांमधला शिश्निका हा लैंगिक आनंद देणारा अवयवच काढून टाकण्याच्या निर्घृण प्रथेच्या पार्श्वभूमीवर घडते.

आपल्या दिग्दर्शक प्रियकराला त्याच्या घरी भेटायला आलेल्या तरुणीच्या घुसमटीची जाणीव त्या बंदिस्त जागेत प्रेक्षकांनाही दडपवून टाकते आणि त्यांच्यातल्या उत्कट प्रणय द़ृश्यानंतर खुललेली ती मोकळ्या जागेत विमुक्त झाल्याचा फीलही प्रेक्षकांना देते. या प्रथेचा केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक परिणामही या शॉर्टफिल्ममधे अत्यंत परिणामकारकतेनं येतो.

यातला बहुपदरी आशय थरांवर थर रचलेल्या प्रतीकांमधून उलगडत जातो. याद़ृष्टीनं लोडेड असणारी ही शॉर्टफिल्म एकूणच स्त्री लैंगिक स्वातंत्र्यासाठीचा र. धों. कर्वे यांचा लढा आणि त्या कायदेशीर संघर्षात त्यांना साथ देणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळून जे खटले लढले होते, त्याला समर्पित केलीय. 

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक शॉर्टफिल्म

‘क्लोज्ड टू द लाईट’मधे फॅसिस्टांचा पाडावकाळ सुरु झाल्यानंतर त्यांनी कोवळ्या मुलांनाही सामील करून घेत निर्दयी शैतान बनवून टाकलं, या वस्तुस्थितीचा संदर्भ आहे. एका शेतकरी कुटुंबाच्या अंगणात घडलेल्या प्रसंगाचं चित्रण लाईव घटनाक्रमातून न आणता जणू काही स्थिरचित्रांची मालिकाच असावी, अशा थिजलेल्या द़ृश्य-तपशिलावरून संथ लयीत पॅन आणि रिवर्स पॅन करत घडवलंय.

या विलक्षण शैलीमुळे ही संवादविरहित कलाकृती अगदी अंगावर येते आणि फॅसिस्टविरोधी विचार प्रेक्षकमनात रुजवते. या शॉर्टफिल्मनं प्रायोगिक शॉर्टफिल्मसाठीचा पुरस्कार पटकावला.

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

संयत विद्रोह मांडणारी ‘पिरा’

‘पिरा’ या फज़िल रझाक दिग्दर्शित २० मिनिटांच्या मल्याळम शॉर्टफिल्ममधे विद्रोहाच्या संयत अंमलाचं प्रेरणादायी दर्शन घडतं. मुस्लिम मध्यमवर्गीय कुटुंबातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा असणार्‍या तरुणीला उच्चशिक्षणाची प्रचंड आस आहे. तिच्या इच्छेविरोधात लग्नाचा घाट घातला जातो आणि तिचं दुबई-रिटर्न्ड तरुणासोबत लग्न ठरवलंही जातं आणि त्यांचं फिरणंही सुरु होतं.

नवर्‍या मुलाला ती आवडलीये, तेव्हा तो ‘लग्नानंतरही तू शिकू शकशील, ’ असं आश्वासित करतो. तिला मोबाईलही भेट देतो. मात्र या मुलीच्या स्वप्नाचं आकाश आणखीन विस्तीर्ण आहे. तिला जेएनयूसारख्या विद्यापीठामधून शिक्षण घ्यायचंय. या मोबाईलवरच तिच्या एंट्रन्सचा निकाल येतो. तिचा निर्धार पाहून तो तिला स्टेशनवर पोचवण्याची मदतही करतो.

‘पोचल्यावर फोन कर’ म्हटल्यावर ती बॅगेतला मोबाईल आणि सोन्याची चेन काढून त्याला परत देते आणि त्याला विचारते, ‘आता तू काय करणार?’ तो, लग्नासाठी मुली पाहणार असल्याचं वास्तववादी उत्तर देतो. तो तिला म्हणतो की, ‘शिकून आल्यावर तूही लग्न कर. ’

यावर ती म्हणते, ‘लहानपणापासून वडलांसमोर हिजाब ढळू नये, या धाकात राहिलेय. आता निदान अगोदर थोडं मोकळं तरी वागून घेऊ दे.’ आणि निर्धारानं खुल्या आकाशात तिचा प्रवास सुरु होतो! यातल्या तिच्याशी लग्न ठरलेल्या नवर्‍या मुलाची व्यक्तिरेखाही काळी किंवा पांढरी अशी न रेखाटता ती करड्या छटांतून अगदी वास्तववादी पद्धतीनं साकारलीय.

निव्वळ तांत्रिक अ‍ॅनिमेशन फिल्म

‘अलेक्झांडर पेट्रोव’ या रशियन दिग्दर्शकाच्या पुनरावलोकनीय पॅकेजमधे ‘पेस्टल ऑईल पेंटिंग्ज ऑन ग्लास’ या तंत्रानं केलेल्या अ‍ॅनिमेशन फिल्म पाहता आल्या.

‘द ओल्ड मॅन अँड द सी’चं माध्यमांतर करत बनवलेल्या अ‍ॅनिमेशन फिल्मला ‘ऑस्कर’ आणि ‘ग्रँड प्रिक्स’ असे महत्त्वाचे पुरस्कार मिळालेत. अशा एकूण पाच फिल्म्समधली तरलता अनुभवताना हॉलीवूडच्या अ‍ॅनिमेशन फिल्ममधलं निव्वळ तांत्रिक गोष्टींचं अवडंबर लक्षात येतं.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा