राज्यात घडणाऱ्या सत्तांतराचा अर्थ आपण कसा लावायचा?

०३ जुलै २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातलं खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच ते एक राजकीय प्रारूपही आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? ते समजून येतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात. 

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार जवळपास अडीच वर्ष टिकलं. अडीच वर्षांनंतर उद्धव ठाकरे सरकार सत्तेवरून पायउतार झालं. शिवसेनेचे बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होईल, असं वाटत असतानाच अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला.

ही घोषणा अनेकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली. त्यावर अनेक दिवस चर्चा होत राहील. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या बाहेर राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यावरून फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे मंत्रिमंडळात सहभागी झाले. हा निर्णयही मती गुंग करणारा आहे.

किंगमेकर ठरले फडणवीस

गेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित महाराष्ट्राच्या राजकारणावर निर्णायक प्रभाव होता. त्यांना एकत्रित ५६ टक्के जागा मिळाल्या होत्या. परंतु सत्तेवर निर्णायक नियंत्रण कोणाचे? हा मुद्दा उपस्थित झाला. या मुद्द्यापासून सत्तासंघर्ष तीव्र झाला. सरतेशेवटी अडीच वर्षांनंतर जून महिन्याच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तास्पर्धेत चीतपट केलं.

देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची ताकद आहे. तेच खरे किंगमेकर आहेत, असं त्यांनी साधारणपणे स्पष्ट केलंय. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच केवळ किंगमेकर नाहीत, तर देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातील खरे किंगमेकर आहेत. अशी नवी प्रतिमा त्यांनी यशस्वीपणे उभी केली, हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय.

याचा अर्थ, देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे एक राजकीय प्रारूपही आहे. ही घडामोड जून २०२२मधे सुस्पष्टपणे दिसून आलीय. फडणवीस हे एक राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? हे समजून येतं. तसंच शिंदे यांच्याकडे सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात. तसंच किंगमेकर फडणवीस शिंदे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून का सहभागी झाले? या प्रश्नाचं चित्तवेधक उत्तरही मिळू शकतं.

हेही वाचा: तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

फडणवीसांचं राजकीय प्रारूप

शिंदे यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस उभे आहेत. या सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. यांची पाळेमुळे राजकीय प्रारूप घडवण्यात आहेत. फडणवीस यांनी नवीन प्रारूप घडवलं. फडणवीस राजकीय प्रारूप हे ठाकरे राजकीय प्रारूपापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय प्रारूपांमधे जवळपास छत्तीसचा आकडा दिसतो.

शिंदे यांचं प्रारूप घडलेलं नाही. शिंदे प्रयोगाचा एक भक्कम आधार फडणवीस आहेत. तसंच आनंद दिघे यांचा वारसा हा त्यांचा सांस्कृतिक दुसरा आधार आहे. यामुळे शिंदे यांची आजची पायाभरणी ही एका अर्थाने हिंदुत्व समाज हीच आहे. शिंदे यांच्या सत्तेचा मुख्य आधार फडणवीस आहेत. फडणवीस राजकीय प्रारूपाची पाच मुख्य शक्तिस्थाने आहेत.

फडणवीस प्रारूपाची शक्तिस्थाने

एक, देवेंद्र फडणवीस राजकीय प्रारूपाचं पहिलं शक्तिस्थान हिंदुत्व समाज हे आहे. हिंदू समाज आणि हिंदुत्व समाज या दोन गोष्टींमधे फरक आहे. फडणवीस यांनी जुन्या समाजाच्या संकल्पना वितळवल्या. उदाहरणार्थ, बहुजन समाज, मराठा समाज, ओबीसी समाज, हिंदू समाज इत्यादी. त्यांनी हिंदुत्व समाज ही संकल्पना राजकारणाच्या प्रक्रियेशी जोडून घेतली. ही घडामोड प्रचंड मोठी आहे.

ही कथा शिंदे गट पुन:पुन्हा मांडत होता, हे लक्षात घ्यावं लागेल. ही सत्यकथा उद्धव ठाकरे यांना मान्य नव्हती. या सूत्राची सुरवात २००९पासून झाली होती. २०१४मधेही फडणवीस आणि ठाकरे यांच्यात या मुद्द्यावर आधारित संघर्ष होता. २०१४ ते २०१९ या कालावधीत या मुद्द्यावर फडणवीस आणि ठाकरे यांच्यात दुरावा वाढला होता.

पण शिंदे आणि फडणवीस यांच्या हिंदुत्व विचारांचा धागा समान होता. आनंद दिघे हे शिंदेंचे आदर्श गुरू आणि प्रतीक आहे. फडणवीस यांना त्या विचारांबद्दल आदर आहे. पण ठाकरे ब्रँड हा फडणवीस आणि शिंदे यांचा अंतिम आदर्श नाही. ठाकरे ब्रँड हा उद्धव ठाकरे यांचा आदर्श आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या सत्तांतरांच्या प्रक्रियेतला कळीचा दिसतो. हाच मुख्य संघर्ष होता.

हेही वाचा: तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?

गल्ली ते दिल्ली नियंत्रण

दोन, फडणवीस राजकीय प्रारूपाचं दुसरं शक्तिस्थान दिल्ली आणि महाराष्ट्र यांच्यातला समन्वय हे आहे. दिल्ली हे सत्तेचं केंद्र १९४७पासून आजपर्यंत राहिलंय, हे फडणवीस यांनी समजून घेतलं. त्यांनी दिल्लीविरोधी भूमिका कधीच घेतली नाही. त्यांनी हा राजकीय इतिहास समजून घेतला.

पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी यादरम्यान जे दिल्लीविरोधी गेले, ते राजकारणातून बाहेर पडले. तसंच ज्यांनी जुळवून घेतलं, ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे शिल्पकार झाले. हा मुद्दा फडणवीस यांच्या विचारांचा सकारात्मक भाग आहे. या मुद्द्याशी एकनाथ शिंदे यांनी जुळवून घेतलं, तर उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा हा मुद्दा नकारात्मक भाग आहे.

तीन, महाराष्ट्राच्या राजकारणाला शहरी आणि ग्रामीण असे दोन चेहरे आहेत. फडणवीस शहरी चेहरा आहेत; पण त्याबरोबरच त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राशी जुळवून घेतलंय. हा फडणवीस यांचा मुख्य प्रकल्प आहे. या दोन्ही गोष्टींमधे भर घालणारं नेतृत्व फडणवीस यांना हवं होतं. शिंदे यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस यांची ही गरज पूर्ण झाली.

जातसमूह आणि वर्गांची बांधणी

चौथं शक्तिस्थान राजकीय समाजशास्त्र हे आहे. कारण उच्च जाती, सीकेपी, मराठा, ओबीसी, नवबौद्ध या पाचपैकी तीन समूहांची जुळवाजुळव करावी लागते. देवेंद्र फडणवीस यांनी यापैकी काही समूहांची बांधणी केलीय. अशी जुळवाजुळव उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली नाही.

पाच, महाराष्ट्राच्या राजकारणात व्यावसायिक आणि उद्योजक यांचा एक वर्ग प्रभावी आहे. या वर्गाची बांधणी फडणवीस यांनी केलीय. यामुळे शहरी महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे. शहरी भागातला दुसरा स्पर्धक शिवसेना पक्ष होता. भाजपच्या विस्तारातला एक अडथळा अर्थातच शिवसेना हा पक्ष होता. यामुळे एका राजकीय प्रारूपाचे शिल्पकार म्हणून फडणवीस यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता.

हेही वाचा: शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर

फडणवीस यांच्या प्रारूपाला विरोध

देवेंद्र फडणवीस राजकीय प्रारूप हे मोठा फेरबदल करणारं आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रारूप हे फडणवीस प्रारूपविरोधी काम करत होतं. तसंच उद्धव ठाकरे प्रारूपही फडणवीस प्रारूपविरोधी काम करत होतं. या गोष्टीचं आत्मभान फडणवीस यांना निश्चितपणं आलं होतं. यामुळे राजकारणाचा महाराष्ट्रातला पट फडणवीस विरोधी ठाकरे किंवा शरद पवार असा उदयास आला होता. या संदर्भातल्या घडामोडी सतत घडत होत्या.

उदाहरणार्थ अजित पवार यांची बंडखोरी रोखली गेली. त्यानंतर शरद पवारांनी भाजपविरोधी भूमिका घेतली. तसंच ताजी घडामोड म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीत एक उमेदवार देण्यात पवारांचा पुढाकार दिसत होता. यामुळे फडणवीस यांच्यापुढे सरळसरळ संघर्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा शिवसेनेचा हिंदू मतदार आणि हिंदू ओळख फडणवीस यांनी हिंदुत्व समाजात विलीन करण्याची प्रक्रिया राबवली.

दिल्लीच्या राजकारणाचा मोठा प्रभाव

फडणवीस प्रारूप असूनही फडणवीस दिल्लीच्या राजकारणापासून दूर होते. हा एक प्रकारचा पेचप्रसंग उभा राहिला होता, त्यामुळे कधीतरी फडणवीस या पेचप्रसंगावर मात करणार होते. त्यांना यासाठी एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची वाटली. त्यांनी शिंदे गटाच्या माध्यमातून ही कोंडी फोडलीय. यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांनी प्रवेश केलाय. फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण आपल्या हाती ठेवून दिल्लीचं राजकारण करण्याची मनाची तयारी केली, असं दिसतं.

दिल्लीच्या राजकीय सत्तेचा एक हमरस्ता उत्तर प्रदेशातून जातो, तर राजकीय अर्थकारण म्हणून दुसरा हमरस्ता महाराष्ट्रातून जातो. कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या गोष्टींमुळे फडणवीस यांनी थेट राजकीय उलथपालथी घडवल्या. तसंच त्यांनी शिंदे यांच्या हाती सत्ता सोपवली. उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडची कोंडी केली. ठाकरे ब्रँडला त्यांच्या आमदारांनी रोखलं. या सर्व प्रक्रियेत शहरी महाराष्ट्राचा पुढाकार दिसतो.

आज सत्ता शिंदे गटाकडे आली. पण ही सत्ता पुढच्या काळात दहा-पंधरा वर्षं भाजपच्या दारी मुक्कामी राहील, अशी घटना घडली. महाराष्ट्रात भाजपशी सत्तास्पर्धा करण्याची क्षमता दुसर्‍या पक्षाकडे शिल्लक राहणार नाही. यामुळे ही घडामोड आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरलीय. याबरोबरच दिल्लीमधून भाजपच्या अध्यक्षांची भूमिका फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमधे सामील होण्यातून व्यक्त झाली.

एकनाथ शिंदे ‘मुख्यमंत्री’ आणि देवेंद्र फडणवीस ‘उपमुख्यमंत्री’ अशी नवीन व्यूहरचना दिल्लीची आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात किंगमेकर यांचा सहभाग हा चित्तवेधक मुद्दा आहे. या नव्या सत्ता समीकरणात महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील सत्तासंरचना दिसते. तसंच फडणवीस राजकीय प्रारूपाच्या विस्ताराच्या घडामोडीही दिसतात.

हेही वाचा: 

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण

शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)