जुलैमधे भारतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. भाजपनं या निवडणुकीसाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिलीय. त्या भारतातली सगळ्यात मोठी आणि सर्वात जुन्या संथाल नावाच्या आदिवासी जमातीतून येतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला तर त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत.
पुढच्या महिन्यात भारतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी भाजपकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू मैदानात आहेत. तर विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिलीय. संथाल आदिवासी जमातीशी संबंधित असलेल्या द्रौपदी मुर्मूंना उमेदवारी देत भाजपने देशातल्या आदिवासी वोटबँकवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलाय. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणासाठी का होईना, पण देशभरातल्या या आदिवासी जमातीची चर्चा होतेय.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८.६ टक्के लोकसंख्या ही आदिवासी आहे. संथाल किंवा संथाली ही भारतातली सगळ्यात मोठी आणि सर्वात जुन्या आदिवासी जमातींपैकी एक आहे. भारताच्या झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार आणि ओडिशा राज्यात जवळपास ६८ लाख संथाली आदिवासी राहतात.
झारखंड आणि पश्चिम बंगालमधे संथालींची संख्या २५ लाखांहून अधिक आहे. २०११च्या जनगणनेनुसार, भारतीय आदिवासी जमातींच्या टक्केवारीच्या तुलनेत संथालींचं प्रमाण पश्चिम बंगालमधे ४७.४३ टक्के, झारखंडमधे ३१.८४ टक्के, बिहारमधे ३०.३८ टक्के, ओडिशामधे ९.३३ टक्के आणि आसाममधे ५.४९ टक्के इतकं होतं.
याचाच अर्थ, भारतातल्या एकूण आदिवासी लोकसंख्येत २३ टक्क्यांहून अधिक संथाली आदिवासींचा समावेश आहे. भारताबरोबरच बांगलादेश, भूतान आणि नेपाळमधेही या जमातीची वस्ती दिसून येते. बांगलादेशमधे संथाली ही लोकसंख्येच्या आधारे सर्वात मोठी आदिवासी जमात मानली जाते.
संथाली आदिवासी जमातीला आधी खेरवार असंही म्हणलं जात होतं. काही संथाली लोककथांनुसार, झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातलं अहुरी हे गाव त्यांचं मूळ गाव मानलं जातं. संथाल समाजात सात मोठी आणि पाच लहान अशी एकूण बारा प्रमुख कुळं असून प्रत्येक कुळाला एखादा प्राणी, पक्षी किंवा खाद्यपदार्थ कुलचिन्ह म्हणून नेमून दिलाय. राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या मुर्मूंचं कुलचिन्ह नीलगाय आहे.
झारखंड आणि बंगालमधले काही खेरवार संथाली स्वतःला महिषासुराचे वंशज समजतात. यातले बहुतांश संथाली हे असुर आदिवासी म्हणून ओळखले जातात, जो मूळ खेरवार संथाली आदिवासींचाच एक उपसमूह मानला जातो. शारदीय नवरात्रोत्सवात देशभर आनंदोत्सव साजरा केला जातो पण आर्यांनी केलेल्या आक्रमणाचा राग म्हणून आजही या जमातीचे लोक दुर्गापूजेच्या उत्सवात देवीची पूजा न करता महिषासुराला पुजून आपला शोक व्यक्त करतात.
मूळचे निसर्गपूजक असलेले हे संथाली एखाद्या देवराईशेजारी आपलं वास्तव्य करतात. या जंगलात बोंगा म्हणजेच पवित्र आत्म्यांचा वास असतो, अशी संथालींची धारणा आहे. संथालींचे सगळे वार्षिक उत्सव या जंगलांमधेच साजरे केले जातात. यात सोहराई, करम, सक्रात, बाहा आणि दन्साईसारख्या उत्सवांचा समावेश आहे. त्याचबरोबर ‘हूल दिवस’सारखा ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेला दिवसही संथाली एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतात.
हेही वाचाः नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील
१८५७चं बंड होण्यापूर्वी देशभरात अनेक ठिकाणी इंग्रजांना छोट्या-मोठ्या उठावांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यापैकीच एक होता संथालींनी केलेला सशस्त्र उठाव. इंग्रजांनी संथालींकडून जमिनी हिसकावून घेत स्थानिक जमीनदारांच्या ताब्यात दिल्या. कधीकाळी शेतमालक असलेले संथाली तिथंच शेतमजूर म्हणून राबू लागले. सक्तीचा शेतसारा भरताना त्यांना सावकारांची गरज भासू लागली. जमीनदार, सावकार आणि इंग्रजांनी संथालींचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं.
त्यांच्या जाचाला कंटाळून शेवटी संथालींनी बंड करायचं ठरवलं. सध्याच्या साहिबगंज जिल्ह्यातलं भोगनाडी गाव या ‘हूल क्रांती’चं केंद्र बनलं. ३० जून १८५५ला भोगनाडीत भरलेल्या सभेत सिदो आणि कान्हू या मुर्मू भावंडांकडे नेतृत्व सोपवलं गेलं. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ चांद आणि भैरब मुर्मू तसंच झानो आणि फुलो मुर्मू या बहिणीही सहभागी झाल्या. तब्बल दहा हजार लढवय्या आणि काटक संथालींची फौज त्यांनी उभी केली.
धनुष्यबाण हे या संथालींचं प्रमुख शस्त्र होतं. त्यासोबत काठ्या-कुऱ्हाडी, भाले घेऊन त्यांनी इंग्रज, जमीनदार आणि सावकारांवर हल्ले चढवले. संथालींना कर्जाच्या विळख्यात अडकवून त्यांच्या सुपीक जमिनी टाचेखाली तुडवणारे सावकरांचे कागदी घोडे या बंडात संथालींनी जाळून नष्ट केले. संथालींच्या झोपड्या जमीनदोस्त करून डामडौलात उभ्या राहिलेल्या कित्येक गढ्या लुटल्या. रेल्वे इंजिनियर असलेल्या गोऱ्या साहेबांच्या वसाहतीत जाळपोळ केली.
संथालींचा वाढता उपद्रव पाहून ब्रिटिशांनी सैन्याची मदत घेतली. पारंपारिक हत्यारं घेऊन लढणारे संथाली ब्रिटीशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे टिकू शकले नाहीत. सिदो आणि कान्हूच्या बलिदानानंतर ‘हूल क्रांती’ थंड पडली. त्या क्रांतिकारक मुर्मू भावंडांची आठवण म्हणून आजही ३० जूनला संथाली समाजात ‘हूल दिवस’ साजरा केला जातो. या दिवशी जनना, झुमर, सर्फा, पैका अशा लोकनृत्यांचं सादरीकरण केलं जातं.
संथाल किंवा संथाली ही संथाली जमातीची अधिकृत भाषा आहे. भारतात ऑस्ट्रो-एशियाटिक, इंडो-आर्यन, द्रविडीयन आणि सायनो तिबेटीयन असे चार प्रकारचे भाषाकुळ आहेत. यातल्या ऑस्ट्रो-एशियाटिक भाषाकुळातल्या मुंडा भाषासमूहात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून संथाली ओळखली जाते. पश्चिम बंगाल आणि झारखंडमधे या भाषेला दुसऱ्या राज्यभाषेचा दर्जा दिला गेलाय.
शंभरेक वर्षांपूर्वी संथाली ही फक्त बोलीभाषा म्हणूनच प्रचलित होती. ही भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरुपात आली होती. पण संथाली साहित्यिक रघुनाथ मुर्मू यांनी १९२५मधे ‘ओल चिकी’ ही लिपी संथाली भाषेसाठी विकसित केली. या लिपीमुळे संथालींना स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळवणं आणखीनच सोपं झालं.
उत्तर बिहार आणि पश्चिम बंगालमधे बोलली जाणारी उत्तर संथाली ही संथालींची प्रमुख बोलीभाषा आहे. त्याचबरोबर ओडिशा आणि दक्षिण बिहारमधे दक्षिण संथाली ही बोलीभाषा प्रचलित आहे, तर लिहण्यासाठी संथाली लिपीबरोबरच बंगाली, रोमन, उडिया आणि आसामी लिपीचाही वापर केला जातो.
हेही वाचाः किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
जुन्या लोककथांनुसार, संथालींच्या पूर्वजांनी धर्म शोधण्यासाठी हवेत एक बाण सोडला. तो साल झाडाखाली सापडला. या झाडाला संताली भाषेत ‘सरजोम’ तर बाणाला ‘सर’ म्हणलं जातं, त्यामुळे तो बाण बघितल्यावर संताली स्त्रिया ‘सरना’ म्हणजेच पवित्र जंगल किंवा देवराई तर पुरुष ‘सरी’ म्हणजेच सत्य असं ओरडले. तेव्हापासून ‘सरना धोरोम’ आणि ‘सरी धोरोम’ हे संतालींचे प्रमुख धर्म बनले.
प्रत्येक जंगलात साल झाडाखाली अदृश्य रुपात वावरणारी आणि दगडाच्या रुपात पुजली जाणारी सिंगबोंगा ही वनदेवता हे या धर्माचं प्रमुख दैवत आहे. ही वनदेवता आपलं रक्षण आणि पालनपोषण करते असा संथालींचा समज आहे. वर्षातून दोन वेळा या देवतेला प्राण्याचा बळी दिला जातो. त्याचबरोबर धरती आयो या देवतेला पृथ्वीचं रूप मानून तिचीही पूजा केली जाते.
बिहार आणि झारखंडमधे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अनेक संथालींचं धर्मांतर करून घेतलंय. पण आजही कित्येक ख्रिश्चन संथाली जुन्या प्रथा-परंपरांचं पालन करतात. असं असलं तरी, सरना किंवा सरी धोरोमचं पालन करणाऱ्या इतर संथालींच्या मते, हे धर्मांतरीत संथाली ‘अशुद्ध’ मानले जातात. संथालींच्या दाराच्या चौकटीवर बोटांनी रेखाटलेल्या कसल्यातरी गंधाच्या सरळ रेषा या त्या घरातल्या लोकांचं शुद्ध संथाली म्हणजेच सरना किंवा सरी असल्याचं प्रतिक मानलं जातं.
पण खरं तर, सरना असो किंवा सरी, हे दोन्ही ‘धोरोम’ संविधानानुसार धर्माच्या व्याख्येत बसत नाहीत. गेली काही वर्षं अनेक आदिवासी संघटना आणि विशेषतः ख्रिस्ती मिशनऱ्या संथालींच्या या दोन्ही पंथांना ‘सरी धोरोम’ या धर्माच्या नावाने मान्यता मिळावी म्हणून झगडत आहेत. झारखंडमधे या धर्माला ‘सरना धर्म’ अशी अधिकृत मान्यता मिळावी म्हणून २०२०मधे ‘सरना कोड’ नावाचा एक ठरावही केंद्र सरकारकडे पाठवला गेला होता.
पण सरना हे हिंदूच आहेत, असं म्हणत तो ठराव फेटाळून लावला गेला. त्यामुळे मूळचा निसर्गपूजक आणि कृषिप्रधान असलेला हा समाज कायद्याच्या दृष्टीने हिंदू धर्माचाच एक भाग मानला जातो. खरं तर, केंद्र सरकारने ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून होत असलेल्या धर्मांतराला आळा बसावा आणि धर्मांतरीत आदिवासींच्या शुद्धीकरण म्हणजेच ‘घरवापसी’ला ख्रिस्ती मिशनऱ्यांनी विरोध करून नये यासाठीच ‘आदिवासी संस्कृती संवर्धना’च्या नावाखाली या मागण्या फेटाळून लावल्या आहेत.
हेही वाचाः अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी
कागदोपत्री हिंदू किंवा ख्रिश्चन समजले जाणारे संथाली कितीही सांस्कृतिक आक्रमण झालं तरी निसर्गाशी आपली नाळ जोडून आहेत. जसं हिंदू धर्मात निराकार, निर्गुण ईश्वराला सत्य किंवा मूळ समजलं जातं, तसंच संथाली समाज साल झाडाच्या रूपाने निसर्गाला ‘सरी’ मानतो. बदलत्या काळासोबत संथाली समाजही अपडेट झालाय, हे खरं पण त्याने या बदलातही निसर्गाला आपल्या सोबत ठेवायचा पुरेपूर प्रयत्न केलाय.
बहुतांश संथाली आदिवासींची घरं ही पक्क्या स्वरुपाची आहेत. मग ही घरं पारंपारिक बांधणीसारखी अगदी दगड आणि मातीची असोत किंवा आधुनिक बांधणीसारखी सिमेंटची, पण ती रंगवण्यासाठी फक्त आणि फक्त नैसर्गिक रंगात भिजवलेल्या मातीचाच वापर केला जातो. गडद आणि फिक्या रंगात माती भिजवून भिंतीवर त्या मातीचे थर देऊन रंगकाम केलं जातं. त्यावर पानं, फुलं, झाडं, चांदण्या, सूर्य यांची चित्रं काढली जातात. त्रिकोण, चौकोन, षटकोनासारखे साधेसोपे आकार काढले जातात.
संथालींचा पेहरावही अपडेट झालाय पण विशेष प्रसंगी पारंपारिक पेहरावही केला जातो. त्यांच्या साध्याश्या कपड्यांवरही बऱ्याचदा पानाफुलांचीच चित्रं असतात. उजळ रंगाचं किंवा रंगीबेरंगी कापड घेऊन त्यावर पानाफुलांच्या मोहक चित्रांचं भरतकाम केलं जातं. मग हे कापड अगदी रुमाल ते साडीपर्यंत कशासाठीही वापरलं जातं. या चित्ररूपाने का होईना, पण निसर्ग कायम आपल्यासोबत आहे, ही भावना संथालींच्या मनात असते.
संथाली समाज हा मुळातच स्वाभिमानी समजला जातो. आपली अस्मिता धोक्यात आणणारी दडपशाही या समाजाने वेळोवेळी झुगारून लावलीय. आपली संस्कृती, परंपरा प्राणपणाने सांभाळणारे संथाली मुख्य प्रवाहाशीही तितक्याच सहजतेने जुळवून घेताना दिसतात. मग ते राजकारणाचं क्षेत्र असेल किंवा साहित्याचं, अनेक संथालींनी आपली ओळख आणि अस्मिता जपण्यासाठी पुरेसं योगदान दिलेलं आहे.
संथाली भाषेसाठी ‘ओलचिकी’ लिपी विकसित करणाऱ्या रघुनाथ मुर्मू यांना संथाली समाजात ‘गुरु गोम्के’ म्हणजेच महान शिक्षक म्हणून ओळखलं जातं. २०२०मधे पहिल्या संथाली लेखिका दमयंती बेसरा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. साहित्य अकादमीकडून दरवर्षी दिले जाणारे संथाली भाषा विशेष पुरस्कार पटकावणारे श्याम सुंदर बेसरा, खेरवाल सोरेन, गोबिंद चंद्र मांझी, रुपचंद हांसदा, निरंजन हांसदा हेही काही लोकप्रिय संथाली साहित्यिक आहेत.
वयाच्या अवघ्या तिशीतच स्वतंत्र झारखंड राज्याची मागणी करत शिबू सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. सुरवातीला फक्त संथाली आदिवासींपुरतं मर्यादित असलेलं शिबू सोरेन हे नाव झारखंड मुक्ती मोर्चाच्या झंझावातानंतर देशभर पोचलं आणि आदिवासी समाजाचे प्रमुख नेते म्हणून शिबू सोरेन यांना देशपातळीवर मान्यता मिळाली. पुढे ते झारखंड राज्याचे तिसरे मुख्यमंत्रीही बनले. त्यांचे पुत्र हेमंत सोरेन हे झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.
त्यासोबतच, झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि देशातल्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल द्रौपदी मुर्मू, संथाली भाषेला संविधानिक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे सल्खान मुर्मू, संसदेत संथाली भाषेतून बोलण्याचा अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न करणारे खगेन मुर्मू, झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी तसंच पहिल्या संथाली महिला खासदार उमा सरेन हे भारताच्या राजकीय वर्तुळातले प्रमुख संथाली चेहरे आहेत.
हेही वाचाः
चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत
मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे
जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?