सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना.
प्रिय,
आजघडीला अवघ्या जगाला कोरोना वायरसनं ग्रासलंय. शाळा, महाविद्यालयं, कार्यालयेच काय, अख्खी गावं अन् शहरंही टाळेबंद झालीत. अर्थात, हे सगळं अपरिहार्य आहे.
घरात बसून तरी काय करणार म्हणून लोक विरंगुळ्याचे मार्ग शोधू लागलेत. कुणी आपलं पाककौशल्य आजमावतंय, कुणी सिनेमा पाहतंय, कुणी वाचनात रमलंय, कुणी आराम तर कुणी कुटुंबीयांसोबत खेळ, गप्पा आणि मजामस्ती करतंय. ‘लॉकडाऊन एक्टिविटी’ फोटोजनी सोशल मीडियाच्या वॉल्स भरून वाहत आहेत.
तू मात्र या सगळ्यात कुठेच दिसत नाहीस. चवदार, नवनवे पदार्थ तर लांबच तुला मिळतील ते दोन घास खायलाही वेळ नाहीय. मस्त हवा तसा आराम तर लांबच तुला तासाभराची विश्रांतीही मिळत नाही. शब्दशः जीव तळहातावर घेऊन तुला विपरित परिस्थितीत काम करावं लागतंय, अहोरात्र जागावं लागतंय. दुखणं घेऊन तुझ्याकडं येणाऱ्या प्रत्येकाची तुला काळजी घ्यायचीय, त्यांच्या वेदना कमी करायच्यात, त्यांना ठणठणीत बरं करायचंय. कारण तू डॉक्टर आहेस, आरोग्यसेवक आहेस!
कोरोना वायरससारख्या बलाढ्य शत्रूला हरवायला वैद्यकीय शस्त्र हाती घेत तू निधड्या छातीनं लढतो आहेस. कधी ओपीडीत, कधी आयसोलेशन वॉर्डात तर कधी थेट एम्बुलन्समधे. कधी कधी तर ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नावाखाली तुला अनाठायी त्रास देणाऱ्या, घर-सोसायटी सोडून जाण्यासाठी धमकावणाऱ्या उथळ समाजघटकांशीही अत्यंत विपरित परिस्थितीत, अगदी निडरपणे तू लढा देतोयस. तू आमचा 'रिअल हिरो' आहेस.
हेही वाचा : कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल
तुझी रूपं तरी किती आहेत. कधी नर्स, कधी ब्रदर बनून बेडवरची चादर बदलणारा, रुग्णाचं मलमूत्रही साफ करणारा, एम्बुलन्सवर अहोरात्र ड्रायवरकी करणारा, कधी कोरोनाला बळी पडलेल्या रुग्णाला स्मशानापर्यंत नेणारा. अशा क्षणी तुझ्यातल्या संवेदनशील माणसाला होणाऱ्या वेदना किती कठीण असतील याची कल्पनाही करवत नाही.
एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर सगळे कष्ट आणि ताण विसरत त्याच्याकडे पाहून आनंदी होणारा तू खरा देवमाणूस. सरकार, मीडिया आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर तुझ्या वाट्याला कौतुक आणि एखादवेळी टीकाही येते. आम्हीही सोशल मीडियावर तुझ्या नावानं एखादी पोस्ट लिहून किंवा तुला फोन करून तुझी ख्यालीखुशाली विचारत असतो.
एरवी साधा खोकला आला तरी तुला फोन करणारे आम्ही, आता तुझ्या हॉस्पिटलकडे वळण्याची हिंमतपण करत नाही. खरंच आम्ही मनातून पूर्ण हादरलोय, भेदरलोय. तू मात्र सगळंच अनिश्चित आणि धूसर असताना कमालीच्या हिमतीनं माणसाला मरणाच्या दारातून परत आणतो आहेस.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
पॉझिटिव रुग्णांची सेवा करताना तू मनोमन जाणतोस की, हा लढा मला एकट्यालाच लढायचाय. या लढाईत अनेकदा तुझ्याकडे पुरेशी हत्यारंच नसल्याचं वास्तव वारंवार समोर येतंय. तुझ्या हातांनी केलेली सेवा अनेकांना धडधाकट बरं करून घरी पाठवतेय. लॉकडाऊनला गंभीर्यानं न घेता मनमानी करणारे लोकही आजूबाजूला आहेतच. कोरोनाची बाधा झाल्यावर होणारे गंभीर परिणाम त्यांना अजून नीट उमगले नाहीत. शेवटी सगळा त्रास तुलाच होतो, आरोग्यव्यवस्थेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत राहतो.
माहितीय मला. गेले कित्येक दिवस तू घरी गेला नाहीस. तुझी बायको, नवरा बहीण, मुलगी, आई, बाबा, सासू, सासरे यांना किती आठवण येत असेल. एखादा सैनिक सीमेवर लढायला जातो ना तसंच काहीसं हे चित्र आहे. कधी एकदा ही महामारी जाते आणि आमचा प्रिय डॉक्टर उंबरठा ओलांडून घरात येतो या आशेवर ते सगळे तुझी वाट बघत आहेत. तुझ्यासारख्या अनेक लोकांनी म्हणे आपापल्या चारचाकीतच सध्या संसार मांडलाय.
गेले कित्येक दिवस आपापल्या मुलांनाही तुम्ही घराच्या दरवाजातूनच बघत आहात. तुझ्या योगदानाचं महत्त्व सरकारला अजूनही पुरतं समजलं नाही. त्यासंबंधीच्या अनेक बातम्या वाचताना मन सुन्न होतं. आतापर्यंत तुझ्यासारख्या ५० हून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या वायरसची बाधा झालीय.
हेही वाचा : कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
समाज म्हणून अजूनही आम्ही तुम्हाला पूर्णतः समजून घेऊ शकत नाहीय. कुठे तुमच्या सुरक्षेसाठीचे मास्क आणि संरक्षण किट अपुरे आहेत, तर कुठे ते अजिबातच नाहीत. तुझ्यासमोर समस्यांचा डोंगर आहे. पण तुझा निर्धार पक्का आहे. घेतलेल्या रुग्णसेवेच्या शपथेला प्राणपणानं जागतोयस. दवाखान्याच्या रणांगणावर ठामपणे उभं राहून अदृश्य वायरसशी चार हात करतोयस, अथकपणे. मृत्यूला मात देण्यासाठी, मानवतेच्या विजयासाठी.
'काळजी घे' असं आम्ही फक्त म्हणू शकतो. एखादा सैनिक शहीद झाला म्हणून काय लढाई थांबत नाही. लगोलग दुसरी फळी त्याच निधड्या छातीने, आत्मविश्वासाने पुढे येते. तू आणि तुझे सर्व सहकारी तेच करताना पाहतोय आम्ही. या भीषण परिस्थितीत तूच आहेस आमच्या आशेचा किरण. रोजच्या बातम्या आणि वाढते आकडे पाहून अस्वस्थ होतो आम्ही. तुझ्यातला रुग्ण सेवेचा निर्धार, तुझा निर्मळ सेवाभाव पाहून मात्र नवी उमेद मिळते, जगण्याची -जगवण्याची. आम्ही तुला घरात राहून फक्त 'लढ' म्हणू शकतो. हाच एक मार्ग दिसतो सध्यातरी तुझ्यावरचा ताण कमी करण्याचा.
'ये और बात के इंसान बनके आया है
मगर वो शख्स जमीं पर खुदा का साया है'
कुणा एका शायरानं लिहिलेल्या या ओळी ज्याला पाहून आठवतील असा तू आहेस. दिलसे सलाम तुला, तुझ्या सहकाऱ्यांना आणि हो, तुझ्या कुटुंबीयांनाही!
हेही वाचा :
किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ
आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया
नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
(डॉ. रेखा शेळके औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात सोशल सायन्सच्या डीन आहेत.)