बुद्धप्रिय कबीरः 'जिंदाबाद मुर्दाबाद'चं तत्वज्ञान जगलेला अस्वस्थ कबीर

३० मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


औरंगाबाद इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'चे सचिव बुद्धप्रिय कबीर यांचं बुधवारी २५ मार्च २०२० ला निधन झालं. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या एकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बुद्धप्रिय यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी दिलं होतं. त्यांच्या भारावलेल्या, ध्येयवादी जगण्याची ही एक झलक.

दोन शतकांना सांधणाऱ्या स्थित्यंतराची अस्वस्थता घेऊन जगणारा कार्यकर्ता होते बुद्धप्रिय कबीर. अन्यायकारक व्यवस्थेसोबत लढतानाच लढणाऱ्यांच्या 'व्यवस्थे'लाही प्रसंगी खडे बोल सुनावणारे कार्यकर्ते होते ते. धिप्पाड व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या बुद्धप्रियच्या डोळ्यातली, बोलण्यातली आग अस्वस्थ करणारी होती. शोषित-वंचितांच्या हक्कासाठी लढणारा हिम्मतवान कॉम्रेड कॅन्सरसोबत अखेरच्या क्षणापर्यंत झुंजत राहिला.

करिअरला दिला नकार

शालेय शिक्षणाच्या काळात औरंगाबादच्या घाटी परिसरातल्या गौतम नगर इथं राहत असतानाच बुद्धप्रियना  नामांतर चळवळीचं वातावरण मिळालं. पुढे दहावी पास झाल्यावर त्यांनी  मिलिंद कॉलेजमधे प्रवेश घेतला आणि विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नामांतर चळवळीत सक्रिय झाले. विद्यार्थी चळवळीतला संजय उबाळे पुढे बुद्धप्रिय कबीर होईल आणि अविवाहित राहून चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता होईल, असं त्यावेळी कुणालाही वाटलं नसेल.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर आणि संशोधन विद्यार्थी संघटने'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणारे संजय उबाळे एक उत्तम हॉकीपटू आणि फुटबॉलपटू होते. क्रीडा क्षेत्रात करियर करण्याच्या चालून आलेल्या संधी नाकारून या अवलियाने स्वतःला चळवळीत झोकून दिलं.

बुद्धप्रिय खरंतर आंबेडकरवादी चळवळीच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते. मात्र पुढे समाजवादी आणि नंतर डाव्या-मार्क्सवादी चळवळीकडे ते आकर्षित झाले. खांद्यावर शबनम, अर्धा लाल आणि अर्धा निळा शर्ट घातलेला आणि तसाच झेंडा गाडीला लावून निघालेला हा कॉम्रेड शेवटपर्यंत शोषित-वंचितांची लढाई लढत राहिला. त्यांच्यासोबत  वैचारिक मतभेद असलेल्यांपासून ते अगदी अबोला धरलेली माणसं तुम्हाला भेटतील. मात्र बुद्धप्रियचा प्रामाणिकपणा आणि निष्ठेवर शंका घेणारा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही.

हेही वाचा : बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

वेदनांचा बाजार न मांडणारा कार्यकर्ता

घरदार सोडून संघटनेच्या कार्यालयात राहणारा हा पूर्णवेळ कार्यकर्ता वैयक्तिक आयुष्यात अनेक उपेक्षांचा धनी होता. मात्र कार्यकर्त्यांना चळवळीचे धडे देताना  करताना स्वतःच्या वेदनांचा बाजार त्यांनी कधीच मांडला नाही. आंबेडकरी चळवळीने दिलेला स्वाभिमानी बाणा बुद्धप्रिय कबिरांनी शेवटपर्यंत जपला. नव्याने चळवळीत सक्रिय झालेल्या कार्यकर्त्यांना ऐंशीच्या दशकापासून अनुभवलेली चळवळ आणि विविध घटनांचा, पुस्तकांचा संदर्भ देऊन चहा पितापिता प्रशिक्षित करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.

दलित, आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी बुद्धप्रिय कबीर यांनी स्वतःला पूर्णवेळ चळवळीत झोकून दिलं होतं. 'दलित अत्याचारविरोधी कृती संघर्ष समिती'च्या माध्यमातून अन्याय-अत्याचाराच्या घटनांचं सत्यशोधन करून न्यायालयीन पाठपुरावा करणं, मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर कारवाईसाठी दबाव निर्माण करणं, या सगळ्याच आघाड्यांवर बुद्धप्रिय कबीर अखंड कार्यरत होते. असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना पेन्शन मिळावी या मागणीसाठी झालेलं देशव्यापी आंदोलन, अन्नसुरक्षा कायद्यासाठी झालेलं आंदोलन, अशा कित्येक प्रसंगी बुद्धप्रिय आघाडीवर होते.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना जगाला एकत्र आणू शकतो: रघुराम राजन

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

चळवळीच्या गाडीवर जिल्हाभर भ्रमंती

हल्ली आजारी असतानाही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. काही वर्षांपूर्वी अनेक सामाजिक संघटनांनी मिळून बुद्धप्रिय यांना एक बाईक घेऊन दिली होती. त्याच बाईकवर अर्धा लाल आणि अर्धा निळा झेंडा लावून बुद्धप्रिय कबीर यांची कामानिमित्त जिल्हाभर भ्रमंती सुरू असायची.

पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या वाट्याला येणाऱ्या सगळ्याच अडचणी त्यांच्यासमोर पूर्णवेळ असायच्या. मात्र अडचणींवर मात करण्याची सवय जडलेल्या बुद्धप्रिय यांनी कधीही माघार घेतली नाही. प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठा, आणि तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे बुद्धप्रिय यांच्या शब्दाला मान होता. देशभरातील अनेक विचारवंतांशी त्यांचा असलेला संवाद आणि स्नेह नव्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होता. जे असेल ते थेट स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलणारा फटकळ पण प्रेमळ माणूस म्हणजे बुद्धप्रिय कबीर. 

चहावरील अति प्रेमामुळे असेल कदाचित पण बुद्धप्रिय कबीर यांना एसिडीटीचा प्रचंड त्रास सुरू झाला होता. दोन अडीच वर्षांपूर्वी मी फेसबुकवर साक्य नितीन या मित्राने लिहिलेली पोस्ट वाचली. त्यात एसिडिटीवरील उपचारासंदर्भात माहिती होती. मी ती पोस्ट कॉपी करून बुद्धप्रिय यांना वॉट्सअपवर टाकली. त्यावेळी अनेक घरगुती उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : नागनाथअण्णा जिवंतपणी दंतकथा बनले, त्याची गोष्ट

माणसांची श्रीमंती कमावली

गेल्यावर्षी हा एसिडिटीचा त्रास म्हणजे अन्न नलिकेचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यांच्यावर एक मोठी शास्त्रक्रियासुद्धा करण्यात आली. दरम्यानच्या काळात ते बाहेर येऊ-जाऊ लागले होते. त्यांनी कॅन्सरवर मात केली असे वाटत असतानाच कॅन्सरने उचल खाल्ली आणि आमच्यातला एक निष्ठावान लढवय्या कार्यकर्ता हिरावून घेतला. 

पैशांच्या बाबतीत कफल्लक असलेल्या बुद्धप्रिय कबीर यांनी माणसांची श्रीमंती मात्र खूप कमावली. विविध वयोगटातील, विविध समूहातील, विविध विचारधारांचा गोतावळा कमावला. मात्र कोरोनाच्या काळात देशभरात कर्फ्यु सुरू असताना त्यांचं निधन झालं. पोलीस परवानगी घेऊन मोजक्या लोकांच्या साक्षीने अंत्यविधी पार पडला. अनेकांची इच्छा असूनही शोकसभासुद्धा आयोजित करता येत नाही असे दिवस आहेत.

बुद्धप्रिय कबीर हे विद्यापीठ नामांतर आंदोलन, दलितांवरचे वाढते  हल्ले, खासगीकरणानं कामगारांचे होत असलेले बेहाल, लहानमोठ्या न्याय हक्कांसाठी करावे लागणारे आंदोलन, गटातटांमधे विभागलेला समाज अशा असंख्य अस्वस्थता घेऊन व्यवस्थेला भिडणारा कार्यकर्ता होते.

हेही वाचा : गोविंद पानसरे: डोंगराला भिडणारा म्हातारा

एक प्रयोगशील आणि धाडसी माणूस

संजय उबाळे ही जन्मानं मिळालेली  ओळख पुसून बुद्धप्रिय कबीर ही नवी ओळख निर्माण करणारा निर्भीड कार्यकर्ता. गेल्यावर्षी कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं नामकरण बुद्धम सांकृत्यायन असं केलं होतं. जुनी ओळख पुसून पुन्हा दुर्दम्य इच्छाशक्तीनं उगवणारं झाड म्हणजे बुद्धप्रिय कबीर!

दादा, आता तुम्ही सोबत नसलात तरी तुमच्यासोबतचा प्रत्येक संवाद कायम स्मरणात राहील. वैचारिक मतभेदांपलिकडे तुमच्यासाठी असलेला स्नेह असाच कायम राहील.

जय भीम कॉम्रेड!

हेही वाचा : 

सुषमा अंधारेः माझा बाप संविधान लिहायचा

अविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

मनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक

(लेखक हे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आहेत.)