आसारामच्या अंधभक्तांचं काय करायचं?

०२ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे.

पुण्यात ३० ऑगस्ट २०२२ला विविध संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यांची मागणी होती की, गेली दहा वर्ष तुरुंगात बलात्कारासारखे भीषण आरोप असलेल्या आसाराम बापूची सुटका व्हावी. या मोर्चाला पाच हजाराहून अधिक लोक उपस्थित होते आणि त्यात महिलांचा सहभागही मोठा होता. पुण्यातले हे भक्त ज्या आसाराम बापूसाठी रस्त्यावर उतरले होते,  त्या आसाराम बापूला गांधीनगर कोर्टाने बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा आहे.

आज या आसारामबापूबद्दल टीका करणारे, त्याची दुष्कृत्यं मांडणारे हजारो लेख, वीडियो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण दहा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. कुठे जरा काही वावगं छापून आलं तर ते लिहिणाऱ्यावर, छापणाऱ्यावर ही भक्तमंडळी धावून जात, प्रचंड त्रास देत. अनेक पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. आजही ही भक्तमंडळी शांत झालेली नाहीत. अंधभक्तांच्या या मानसिकतेनं आणखी किती अत्याचार होऊ द्यायचे? याचा समाज म्हणून विचार करायला हवाय.

आसारामची उघड झालेली माहिती भयानक

आजही अनेकांना सत्पुरूष वगैरे वाटत असलेल्या आसाराम बापूची गेल्या दहा वर्षात उघड झालेली कृत्यं ही  किळस आणणारी आणि माणूसपणाला लाज आणणारी आहेत. एक टांगेवाला असलेला हा अर्धशिक्षित माणूस पुढे हजारो कोटी रुपये कमावणारा बाबा बनला. त्याच्या या साम्राज्याला पहिला धक्का बसला तो २००८ मधे. ३ जुलै २००८ला आसाराम बापू यांच्या ट्रस्टद्वारे चालवलेल्या निवासी गुरुकुलात शिकणारी दोन अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली.

दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह साबरमती नदीपात्रात सापडले. या घटनेनंतर आसाराम बापूवर काही लोकांनी जाहीर बोलायला सुरवात केली. लोकदबावामुळे सात जणांवर गुन्हा दाखल झाला. पण दोन्ही मुलांचे पालक या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करत होते. त्यानंतर डी. के. त्रिवेदी आयोगाने राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला. ज्यामधे आयोगाने आसाराम बापूला क्लीन चिट दिली.

२०१३ मधे थेट आसारामवर आणि त्याच्या मुलावर नारायण साईवर जोधपूर आणि गांधीनगर इथं बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. संबंधित सर्व गुन्ह्यांतले अनेक साक्षीदार मृत अवस्थेत आढळले. २०१४ मधे अमृत प्रजापती यांना राजकोटमधे गोळ्या घालून ठार मारलं होतं. ही हत्या आसाराम बापूच्या एका अनुयायाने केल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर आसारामला जन्मठेप सुनावण्यात आली आणि तिथून आसाराम हा भोंदूबाबा असल्यावर शिक्कामोर्तब झालं.

हेही वाचा: आपल्या आतला विवेकाचा आवाज म्हणजे गुरू

यानंतर देशभर तक्रारींचा रीघ वाढला 

२०१३च्या या घटनेनंतर आसाराम बापू विरोधात दररोज नवनवीन खुलासे होऊ लागले. देशातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या जाऊ लागल्या. त्यांच्या आश्रमांवर छापे पडू लागले.  त्याचवेळी त्यांचा सहायक शिवा याला पोलिसांनी बोलतं केलं. त्याने आसाराम बापू रात्री एकांतात महिलांना ‘ध्यान की कुटिया’मधे भेटायचा अशी खळबळजनक माहिती दिली.

त्याच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या क्लिपमुळे तर आसाराम बापू यांच्या ‘लीला’ पोलिसांना प्रत्यक्ष दिसल्या, असंही सांगितलं जातं. आता हे सगळं एकीकडे पेटत असताना त्याच्या आश्रमातल्या व्यवहारांबद्दलही बोबाबोंब होऊ लागली. पैशांची अफरातफर, जमिनी हडप करणं, आत्महत्यांना उद्युक्त करणं इथपासून वेश्याव्यवसायापर्यंतची अनेक प्रकरणं आश्रमातून मीडियापर्यंत आणि पोलीस स्टेशनपर्यंत येऊ लागली.

२०१८ मधे नाशिकच्या गोदापात्रात आसाराम बापूच्या आश्रमावर अतिक्रमण विरोधी पथकानं छापा घातला होता. त्यावेळीही आश्रमाच्या सभामंडपाखाली आणि गोदावरीच्या किनाऱ्यालगत असलेल्या दहा-बारा खोल्या आढळून आल्या होत्या. आश्रमाच्या साधकांकडून या खोल्या ध्यानधारणेसाठी वापरत असल्याचा दावा केला गेला. पण तिथं प्रत्यक्षात काय चालत असेल याची कल्पना पुढे सिद्ध झालेल्या सर्व आरोपांमधून येते.

...तर निवडणुकीत किंमत मोजाल

मला अटक केलीत तर निवडणुकीत त्याची जबर किंमत मोजण्याची तयारी ठेवा… मराठीत आपण ज्याला माज म्हणतो तो दाखवत आसारामने उच्चारलेलं हे वाक्य खूप काही सांगून जातं. २०१३ मधे राजस्थानात त्याला अटक होण्याआधी त्यानं हे वाक्य उच्चारलं होतं. त्यावरून आपल्या देशभर पसरलेल्या भक्तांच्या माध्यमातून हा बाबा किती राजकीय दबाव निर्माण करत होता, याचा अंदाज येतो.

या बाबाच्या पायाला लागलेल्या नेत्यांमधे सर्वपक्षीय नेते आहेत. गेल्या दहा वर्षात या नेत्यांनाही आसारामच्या आश्रमात गेल्याबद्दल टीका सहन करावी लागली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.  मोदी यांचा आसाराम बापूच्या आश्रमातला वीडियो युट्यूबवर सध्या वायरल होतोय. तो आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांनी बघितलाय.

या सगळ्यावरून एकच मुद्दा पुढे येतो की, या बाबाबुवांच्या नादाला लागलेली जी भक्तमंडळी आहेत, त्यांच्यातली वोटबँक ही भल्याभल्या राजकारण्यांना टाळता येत नाही. तसंच या भक्तमंडळींकडे असलेली  आर्थिक आणि सामाजिक ताकदही राजकारणात आवश्यक असते. या सगळ्याचा परिणामी हे बाबाबुवा राजकारण्यांवरही प्रभाव टाकून स्वतःची कुकर्म लपवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात.

हेही वाचा: नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!

आसाराम ही सार्वत्रिक विकृत मानसिकता

आसाराम बापू ही आजची समस्या नाही. इतिहासात याची अनेक उदाहरणं सापडतात. या भोंदूबाबांची नावं लिहायची म्हटली तरी यादी लांबचलांब होत जाईल. अनेक नाटकांनीही या किळसवाण्या प्रवृत्तीवर भाष्य करत, लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. आचार्य अत्रे यांनी १९६० च्या दशकात लिहिलेलं 'बुवा तेथे बाया' हे नाटक असो किंवा ज्ञानेश महाराव यांनी २०१० मधे लिहिलेलं 'संगीत घालीन लोटांगण'सारखं नाटकांनी या विकृतीवर थेट भाष्य केलंय. तरीही लोक काही ऐकत नाहीत, हे वास्तव आहे.

आसाराम ही विकृती अशा भक्तांच्या पाठिंब्यामुळेच आणि काही राज्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच मोठी झाली, हे विसरून चालणार नाही. आजही अनेक भक्तांना असं वाटतंय की, आसाराम निर्दोष आहेत. आजही अनेक राजकारण्यांचे फोटो आणि वीडियो सोशल मीडियावरून वायरल होत आहेत. हे सगळं काय आहे? हे समजून घेतल्याशिवाय आसाराम या प्रवृत्तीचा शोध घेता येणार नाही. कारण, आसाराम ही फक्त व्यक्ती नसून, पिढ्यापिढ्या समाज पोखरणारी प्रवृत्ती आहे.

मतांचं राजकारण असो किंवा आर्थिक व्यवहारांचे हितसंबंध, पण अशा कारणांमुळे राजकाराणी आणि हे बाबाबुवा यांच्यात कायमच जवळीक असलेली आढळलेली आहे. तसंच आयुष्यातल्या प्रापंचिक अडचणींनी वैतागलेले भक्त किंवा कोणत्यातरी किरकोळ फायद्यासाठी किंवा 'हा जातो म्हणून मी जातो’ अशा लोकानुनयातून आलेले भक्त अशा बाबाबुवांकडून नागवले जातात. हे बाबाबुवा त्यांना असं घोळात घेतात की, शेवटपर्यंत त्यांना खरं काय ते कळत नाही.

आजही आसारामची संपत्ती आणि विकृती जिवंत

आसाराम आज तुरुंगात आहे. त्याच वय आज ८१ आहे. त्यामुळे तो तुरुंगातून बाहेर येईल, असं आज तरी वाटत नाही. तरीही त्याच्या देशभरातल्या संपत्तीचा आकडा हा दहा हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था असून तिचं मुख्यालय अहमदाबाद इथं आहे. त्याचा मुलगा नारायण साई आरोपांनी बदनाम झाला असल्यानं, त्यांची मुलगी भारतश्री सगळा व्यवहार पाहते.

आसाराम बापूच्या साम्राज्यामधे ४०० हून अधिक आश्रम, १५०० हून अधिक सेवा समित्या, १७००० हून अधिक बालसंस्कार केंद्रं, ४० पेक्षा जास्त गुरुकुल आहेत, अशी माहिती इंटरनेटवर मिळते. ती किती खरी आहे, हे तपासून पाहता येत नाही. तसंच किती सुरू आहेत हेही कळत नाही. पण, बापूचे भक्त अद्यापही देशात विविध ठिकाणी सक्रिय आहेत, एवढं स्पष्टपणे दिसतं.

आता मुद्दा उरतो तो हाच की या भक्तांचं काय करायचं? आणखी काय सिद्ध झालं की ते बापूविषयीचं वास्तव स्वीकारतील? हे सगळे भक्त अशिक्षित नाहीत. त्यातले अनेक उच्चविद्याविभूषित आणि श्रीमंत वर्गातलेही आहेत. त्यामुळे या सगळ्याचं सामाजिक, मानसिक विश्लेषण करत राहावं लागणार आहे. नाहीतर ही विकृती पुन्हापुन्हा डोकं वर काढत राहते, हे आजवर इतिहासानं दाखवून दिलेलंच आहे.

हेही वाचा: 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

कंदील बलुच: पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष