आवाज कुणाचा?... टेक्नॉलॉजीचा

१९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


अॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे.

'आई पाणी दे', 'आई मला भूक लागली', अशी वाक्यं आपण लहान मुलांच्या तोंडी सहज ऐकतो. लहान मूलच नाही, तर आपणही आपल्या गरज समोरच्या व्यक्तीपर्यंत बोलूनच कळवतो. आपल्या मुलाने बोललेला पहिला शब्दही लक्षात ठेवला जातो. आपली मुलं पहिल्यांदा आई म्हणली की बाबा, हे आयुष्यभर कौतुकाने सांगितलं जातं.

पण अनेक मुलांचे पालक मात्र आपल्या मुलाच्या तोंडून शब्द ऐकण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक मुलं हा पहिला शब्द बोलूच शकत नाहीत. आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. मुलं उशिरा बोलतात या समजुतीपायी बऱ्याचदा त्यावर काही उपचारच केले जात नाहीत. उशिराने आपलं मूल `विशेष` आहे हे लक्षात येतं, तेव्हा मात्र पालकांना धक्का बसतो. आमच्या मुलांना बोलताच येणार नाही का? त्यांचं म्हणणे शब्दात मांडताच येणार नाही का? असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे राहतात.

विशेष मुलांना अपुरं संभाषण कौशल्य, बोलायच्या भाषेचं मर्यादित ज्ञान, शारीरिक विकासात अडथळे, अतिसंवेदनशीलता अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ही मुलं काही संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना योग्य प्रतिसाद देता येत नाही. त्यामुळे या विशेष मुलांना संभाषण करायला शिकवणं हे स्पीच थेरपिस्ट आणि पालकांसमोर मोठं आव्हान असते. त्यासाठी विशेष शिक्षण, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, म्युझिक थेरपी अशा अनेक उपचार पद्धतींचा उपयोग केला जातो. पण त्या सगळ्याच मुलांपर्यंत पोचू शकत नाहीत.

अशा सगळ्या मुलांसाठी अजित नारायणन यांचा `आवाज` महत्त्वाचा ठरलाय. आयआयटी मद्रास येथून ग्रॅज्युएशन केल्यानंतर बहुसंख्य आयआयटीयनसारखेच अजितही सिलिकॉन वॅलीत होते. २००७ साली ते भारतात परतले. पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पुढच्याच वर्षी त्यांनी चेन्नईत विशेष मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. ते करताना त्यांच्या लक्षात आले की या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. आपलं इनोवेशन आणि सामाजिक बांधिलकी वापरून अर्थार्जनही होऊ शकेल अशी कंपनी सुरू करायचा त्यांनी विचार केला.

सामाजिक प्रभाव, नाविन्यपूर्ण शोध आणि नफा या तिन्ही गोष्टींची सांगड घालून एक चांगली कंपनी काढायचा विचारही त्यांनी केला. २००९-१० मध्ये अजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मुलांसाठी  आवाज Avaz  नावाचं अॅप तयार केलं. अजित नारायणन सांगतात, ` १०० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात फक्त १८०० स्पीच थेरपिस्ट आहेत. आपल्या एक तृतीयांश लोकसंख्या असणाऱ्या अमेरिकेत आपल्या पेक्षा १०० पट जास्त स्पीच थेरपिस्ट आहे. ही दरी टेक्नॉलॉजीने भरून काढण्यासाठी आवाजचा जन्म झालाय.`

हे अॅप्लिकेशन आयपॅड तसंच अँड्रॉइड या दोन्ही महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालू शकतं. सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिन्ड्रोम तसेच ऑटिझम असणाऱ्या मुलांचा विचार करून हे अॅप तयार केलंय. ते विशेष मुलं, त्यांचे पालक आणि थेरपिस्ट यांना खूप उपयुक्त ठरतंय. मुलं खूपच कमी वेळात उत्कृष्टरित्या याचा वापर करायला शिकली. परदेशात तयार झालेली अशी अॅप्लिकेशन यापूर्वीही होती. पण त्यात भारतीय मानसिकतेचा विचार नव्हता. तसंच इथले शब्द आणि वातावरण याला ती अनुरूप नव्हतीच. `आवाज`ने त्याची कोंडी फोडली.

चित्र आणि उच्चाराची सांगड

`आवाज`च्या मदतीने या मुलांना संभाषण साधण्याची आवड निर्माण होऊ लागली. विशेष म्हणजे हे अॅप मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या सहा प्रादेशिक भाषांमध्ये विकसित केलंय. `आवाज` हे चित्र आणि उच्चार या दोन्हींची उत्तम सांगड घालतं आणि याच चित्रांचं बोलणाऱ्या भाषेत रूपांतर करते. यामधून मुलांना वाक्य तयार करता येतात. त्यांना संभाषण साधणं सोपं झालंय. यात नवीन वाक्यांचा समावेश करणं आणि नवीन शब्द शोधणं ही महत्वपूर्ण गोष्ट आकर्षक पद्धतीने झालीय. त्यामुळे आजवर मुकी असणारी ही मुलं `आवाज`मधून उत्तम संभाषण साधू लागली आहेत.

विशेष म्हणजे यामध्ये टाइप केलेला मेसेज सोशल मीडियावरसुद्धा टाकता येतो किंवा एखाद्या व्यक्तीला मेलद्वारे पाठवता येतो. `आवाज` मुलांना फक्त भाषा आणि उच्चार शिकवतंच नाही तर त्यांना व्याकरणाचंही ज्ञान देतं. विशेषतः ऑटिझमने ग्रस्त मुलांचं संभाषण कौशल्यं वाढवून स्वावलंबी बनवण्यात `आवाज`चा मोलाचा वाटा आहे.

२०१७ साली तामिळनाडू सरकारने ३२ जिल्ह्यांमधील विशेष मुलांच्या शाळा तसंच प्राथमिक निदान केंद्रांमध्ये `आवाज`ने सज्ज असलेल्या टॅबलेट्सचं वाटप केलं. स्वतः  पुढाकार घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक सुविधा विशेष मुलांपर्यंत पोहोचवणारं तामिळनाडू देशातलं पहिलं राज्य ठरलं. त्यामुळे `आवाज`चा आवाज तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यामागोमाग हे अप्लिकेशन देशातही विशेष मुलांपर्यंत पोचू लागलंय.

आयटीतले आदर्श

विशेष मुलांच्या आयुष्यात टेक्नॉलॉजी काय बदल घडवू शकते, याचं `आवाज` हे उदाहरण बनलंय. त्यामुळे अजित नारायणन हेदेखील आयटी क्षेत्रातला एक आदर्श ठरू लागलेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. ते म्हणतात, `आजवर कधीच व्यक्त न झालेलं एखादं मूल व्यक्त होऊ लागतं, तेव्हा त्याच्यातील क्षमता खुलू लागतात. ते फक्त त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच मोठा ठेवा असतो. जे कदाचित कधीच उघड झालं नसतं तो ठेवा आपल्याला यातून सापडतो.`

मूकबधिर असणारी हेलन केलर व्यक्त व्हायला कशी शिकली हा आपल्यासाठी गेली अनेक दशकं अचंब्याचा आणि त्याचबरोबर प्रेरणेचा विषय आहे. आता मात्र टेक्नॉलॉजीचा हात धरून अनेक हेलन केलर घडत आहे. त्यात हेलन केलरच्या आयुष्याइतकी काव्यात्मकता नसेल, पण प्रेरणा नक्कीच आहे.