ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो

०१ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


ऐन कारकीर्दीत ऋषी कपूर नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला होता. ‘दामिनी’मधल्या सनी देओलच्या ढाई किलो हातानं ऋषी कपूरच्या सर्वोत्तम अभिनयाची दखल आपल्याला घेता आली नाही. ती संधी घेण्याच्या आतच आज हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती.

मेथड ऍक्टिंगचा संपूर्ण व्यत्यास म्हणजे ऋषी कपूर. चुटकीसरशी हा माणूस काय सहज एक्स्प्रेशन द्यायचा! या सहजतेमुळेच त्याच्या अभिनयाची खोली कोणाला जाणवलीच नसावी. अंडररेटेडचा शिक्का कपाळी घेऊन जगणं त्याच्या नशिबी आलं. त्यातच त्याचे सिनेमे कधीही माफक यशाच्या पलीकडे गेले नाहीत. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध मुलाचा बाप’ अशी काहीशी त्याच्या ट्विटर हँडलची आयडेंटिटी होती.

खरं तर ही ठसठसणारी वेदनाच. अफाट गुणवत्ता असूनही आपल्या हक्काचं यश आपल्याला मिळू नये, मान्यता मिळू नये, याची वेदना किती पराकोटीची असू शकेल? पण त्याने चेहऱ्यावर कधीच ही वेदना दाखवली नाही. तो फटकळ होता, पण हा फटकळपणा आपल्या पात्रतेइतकं यश न मिळाल्याच्या वेदनेतून, निराशेतून आलेला नव्हता. तो मूलत:च असावा. शेवटी तो राज कपूरचा मुलगा होता. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता. प्रिवलेज्ड आयुष्य जगला होता. तेव्हा इतना तो बनता हैं!

हेही वाचा : प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

हिरो असतानाही अँटी हिरो व्हायचं धाडसं

हिरो म्हणून ऐन भरात असताना तो कधी फारसा वादात सापडला नाही. पण गेल्या काही वर्षांत त्याच्या ट्विटच्या खमंग बातम्या झाल्या. रोखठोकपणा हे त्याच्या स्वभावातलं वैशिष्ट्य त्याच्या ट्विटमधे पुरेपूर उतरायचं. हिंदीत म्हणतात त्याप्रमाणे ‘आव देखा ना ताव’ या पद्धतीने तो मनात येईल ते लिहून मोकळं व्हायचा. त्याच्या ट्विटवर फाजिल कमेंट करणाऱ्यांना तो बिनदिक्कत झापायचा.

एकदा रणबीर कपूरच्या एका चाहतीनं ऋषीला ट्विट करून रणबीरचा फोन नंबर मागितला तर याने भडकून ‘मैं उसका पीआरओ नही हूँ|’ अशा शब्दांत तिला फटकारलं होतं. फिल्मी इवेंट्समधे पत्रकार-फोटोग्राफरवर डाफरतानाचे त्याचे अनेक वीडियोही वायरल झाले आणि नेमक्या याच काळात हिरोगिरीचं ओझं खांद्यावर नसल्यामुळे त्याच्यातला अभिनेता मात्र कमालीचा बहरत होता.

सुरवात नव्या रुपातल्या ‘अग्निपथ’मधील रौफ लालाने केली. यातलं त्याचं रूप त्याचं त्यालाही हादरायला लावणारं होतं. वास्तविक ऋषी कपूर खलनायक उत्तम साकारू शकतो, हे अनेक वर्षांपूर्वी 'खोज' या सिनेमाने दाखवून दिलं. रामसेंचा सिनेमा असूनही 'खोज' उत्तम होता. हिरो म्हणून ऐन भरात असतानाही ऋषी कपूरने अँटी हिरो साकारायचं धाडस दाखवलं. पण सिनेमा पडला आणि ऋषी कपूरच्या या भूमिकेची फारशी दखल घेतली गेली नाही.

हेही वाचा : विद्या सिन्हाचं मन सुंदर होतं म्हणून ती सुंदर होती

स्थिरावलेली सेकंड इनिंग

‘अग्निपथ’मधल्या रौफ लालाचं मात्र चांगलं कौतुक झालं. एक तर अमिताभ बच्चनचा ‘अग्निपथ’ प्रदर्शित झाला त्यावेळी अपयशी ठरला असला तरी नंतर त्याला कल्ट स्टेटस प्राप्त झालं होतं. त्यामुळे त्याच्या या रिमेकची चर्चा होतीच. शिवाय करण जोहरला आपला सिनेमा कसा वाजवायचा, हे बरोबर समजतं. त्यामुळे या नव्या ‘अग्निपथ’मधे फारसा दम नसूनही व्यावसायिकदृष्ट्या तो यशस्वी ठरला, हे ऋषी कपूरचं सुदैव. कारण त्यामुळेच त्याचा रौफ लाला प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. अन्यथा अपयशी गोष्टीशी संबंधित सर्वच बाबी आपण लगेच विस्मरणात टाकतो.

रौफ लाला ऋषी कपूरसाठी आणखी एका गोष्टीसाठी महत्त्वाचा होता आणि ती म्हणजे आपल्या तीन दशकांच्या कारकीर्दीत तो पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत होता. त्याच्या आणि प्रेक्षकांच्याही सुदैवाने हा प्रयोग यशस्वी ठरला. ऋषी आपल्या या दुसऱ्या इनिंगमधे खऱ्या अर्थाने स्थिरावला.

हिरोच्या चौकटीत राहून साकारलेल्या त्याच त्याच भूमिकांपेक्षा कितीतरी वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका आपण साकारू शकतो, याची त्याला रौफ लालाने जाणीव करून दिली. मुख्य म्हणजे सिनेमा चालवण्याची जबाबदारी आता त्याच्यावर नव्हती. नव्या पिढीच्या दिग्दर्शकांनाही त्याच्यातल्या अभिनय क्षमतेची जाणीव झाली. त्यानंतर ‘डी डे’, ‘दो दूनी चार’, ‘कपूर अँड सन्स’, ‘मुल्क’, ‘१०२ नॉट आउट’ अशा कितीतरी सिनेमांमधून त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

 ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

वाद्य वाजवण्याचाही अभिनय

सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे ऋषी कपूरचा सगळा भर उत्स्फूर्ततेवर होता. भूमिकेची तयारी म्हणून त्याच्या डोक्यात काही विचारचक्र सुरू असेलही कदाचित, पण पडद्यावर बघताना तो अभिनय करतोय असं वाटायचंच नाही. त्याचा स्वतःचा भूमिकेच्या तयारीवर वगैरे फार विश्वास नव्हता. ऋषी कपूरला आपण विविध सिनेमांमधे गिटार, वॉयलिन, डफली, ट्रम्पेट वगैरे वाद्य वाजवताना पाहिली. तो ही सगळीच वाद्य इतकी समरसून आणि सराईतपणे पडद्यावर वाजवायचा की, जणू काही तो प्रत्यक्षच वाजवतोय, तो ही वाद्य शिकलाय, असा भास होई.

एका मुलाखतीत त्याला विचारलं गेलं की, पडद्यावर ही वाद्यं वाजवण्यासाठी तू तयारी म्हणून त्या वाद्यांचं काही बेसिक शिक्षण घेतोस का? त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘मी अभिनेता आहे. वाद्य वाजवण्याचादेखील मला अभिनयच करायचाय. मी पडद्यावर प्रत्यक्ष वाद्य वाजवण्यापूर्वी ते प्रत्यक्ष शिकू लागलो तर माझ्यातल्या अभिनेत्याचा काय उपयोग?’

हा अभिनय तो इतका सहज, समरसून करायचा की, त्याच्या मागची मेहनत लक्षातच यायची नाही. म्हणजे तो किती थोर अभिनेता असेल? पण खरं म्हणजे यानेच त्याचा घात केला. हा इतका थोर अभिनेता आहे, हे आपल्या लक्षातच आलं नाही. त्यातच त्याच्या कारकीर्दीचा बराचसा भाग नायिकाप्रधान किंवा मल्टिस्टारर सिनेमांनी व्यापलेला. त्यामुळे श्रेय अमिताभ, जीतेंद्र सारख्या इतर हिरो किंवा हिरॉईन घेऊन जायचे.

‘प्रेमरोग’, ‘नगिना’, ‘सागर’, ‘दामिनी’, ‘चांदनी’, ‘दीवाना’ अशा कितीतरी सिनेमांमधे भावखाऊ व्यक्तिरेखा हिरॉईनच्या वाट्याला गेल्यामुळे ऋषी कपूरच्या सहजसुंदर अभिनयाकडे आपलं लक्षच गेलं नाही. किंबहुना आपण ते गृहितच धरलं होतं.

हेही वाचा : हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

नव्या दिग्दर्शकांनी आपलंसं केलं

‘दामिनी’मधे एकीकडे त्याचं सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्यामधे सँडविच होत होतं तर दुसरीकडे लेखक, दिग्दर्शकाने त्याच्यावर अन्याय केला होता. तरीहीही ऋषी कपूरने एकीकडे घराण्याची प्रतिष्ठा आणि दुसरीकडे माहीत असलेलं सत्य आणि बायकोवरचं प्रेम यामुळे होणारी तडफड कमालीच्या सटलपणे दाखवली होती. पण असल्या सटलटीज तद्दन व्यावसायिक सिनेमांच्या प्रेक्षकांच्या पचनी न पडण्याचा तो काळ होता ‘परिंदा’, ‘रंगीला’ आदी सिनेमांमधल्या जॅकीच्या व्यक्तिरेखा ही याची आणखी काही उदाहरणं. त्यामुळे सनीच्या ढाई किलो का हाथच्या वजनाखाली ऋषीचा हा सहजोत्सफूर्त आविष्कार दबला गेला.

हिरो म्हणून काम करायचं थांबवल्यानंतर आणि चरित्र अभिनेता म्हणून दुसरी इनिंग सुरू केल्यावर त्याच्या कारकिर्दीत खरे रंग भरले गेले. ‘डी डे’, ‘दो दूनी चार’, ‘अग्निपथ’, ‘102 नॉट आऊट’, ‘चिंटूजी’ आदी सिनेमांमधून त्याने अभिनयाची अफाट रेंज दाखवली. दो दूनी चारसाठी हबीब फैजल, लक बाय चान्ससाठी झोया अख्तर, कपूर अँड सन्ससाठी शकुन बात्रा, स्टुडंट्स ऑफ द इयरसाठी करण जोहर, अग्निपथसाठी करण मल्होत्रा, डि डेसाठी निखिल अडवाणी, १०२ नॉट आउटसाठी उमेश शुक्ला तर मुल्कसाठी अनुभव सिन्हा अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांनी त्याला सकस भूमिका दिल्या.

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

खरी आव्हानात्मक भूमिका

‘लक बाय चान्स’मधे त्याने साकारलेला निर्माता निव्वळ बहारदार होता. ‘और ये हमेशा टोपी क्यों पहनता हैं?’ या हृतिक रोशनला उद्देशून उद्वेगाने टाकलेल्या डायल़ॉगमागचं त्याचं टायमिंग इतकं अफलातून होतं की, विचारता सोय नाही. ‘दो दूनी चार’मधला त्याचा मध्यमवर्गीय पिता लाजवाब होता.

ऋषी कपूरसाठी खरं म्हणजे ही ‘दो दूनी चार’मधली भूमिका आव्हानात्मक होती. ती या अर्थाने की, त्याने कधीही मध्यमवर्गीय आयुष्य म्हणजे काय ते बघितलेलं नव्हतं. पण व्यक्तिगत आयुष्यात त्याला सर्वस्वी अपरिचित असलेल्या अशा पार्श्वभूमीत, वातावरणात त्याने स्वत:ला इतकं बेमालूम मिसळवून टाकलं होतं की, वर्षानुवर्षं हा माणूस ओढग्रस्तीचं मध्यमवर्गीय आयुष्य जगत असावा असं वाटावं.

पुन्हा त्यात भूमिकेचा अभ्यास, तयारी, मध्यमवर्गीय कुटुंब कसं जगतं त्याचं निरीक्षण वगैरे काही अवडंबर नाही. समोर सीन आला आणि तो उत्स्फूर्तपणे केला, इतकं सगळं सहजसोपं. हे सगळ्याच महान कलाकारांचं लक्षण असावं.

हेही वाचा : इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

साधी सरळ फिलॉसॉफी

एका मुलाखतीत ऋषीने रणबीरचा एक किस्सा सांगितला होता. ‘रॉकस्टार’मधल्या एका गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना रणबीरचा त्याला फोन आला. गाण्यावर लिप सिंक करताना त्याला अडखळायला होतंय, नीट जमत नाहीय, असं त्याचं म्हणणं होतं. ऋषी म्हणाला, कपूर खानदान के बेटे को पडदे पर गाना कैसे गाना हैं ये समझ में नही आ रहा?

पडद्यावर गाण्याचा अभिनय करताना त्यात इतकं समरसून गेलं पाहिजे की, जणू काही आपणच ते गाणं गातोय, असं वाटलं पाहिजे. वरच्या सुरातलं गाणं असेल तर अभिनेत्याच्या गळ्याच्या शिरा देखील ताणलेल्या दिसल्या पाहिजेत. नाही तर अनेक अभिनेत्यांच्या बाबतीत गायक बिचारा गळा फाडून गात असतो आणि पडद्यावर अभिनेत्याच्या चेहऱ्यावरची माशी देखील हलत नाही.

इतकी साधी सरळ फिलॉसॉफी होती त्याची. त्याच्यातला अस्सल अभिनेता फणा उगारून नवी नवी आव्हानं पेलण्यास तयार असतानाच त्याच्या आजाराचं निदान झालं आणि निव्वळ अभिनेता म्हणून कपूर घराण्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या या अभिनेत्याची ऐन भरात आलेली कारकीर्द खुरटली.

काल २९ एप्रिलला इरफान खान गेला, पाठोपाठ आज ३० एप्रिलला ऋषी कपूर. हिंदी चित्रपटसृष्टीतले दोन अस्सल अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले. इरफानच्या अभिनयाचं, त्याच्या स्ट्रगलचं, जागतिक पातळीवर त्याने मिळवलेल्या यशाचं योग्य कौतुक झालं. ऋषी कपूरच्या बाबतीत मात्र क्विंटइसेन्शिअल रोमँटिक हिरोपुरतंच कौतुक मर्यादित राहाण्याची भीती आहे. तसं झालं तर मृत्यूनंतरही तो त्याच्यावर मोठा अन्याय ठरेल.

हेही वाचा : 

माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे 

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा