इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?

०५ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी

सध्या बायोपिक सिनेमांचं पेव फुटलंय. त्यात आणखी एका सिनेमाची भर पडलीय. तो सिनेमा म्हणजे ‘स्ये रा नरसिंह रेड्डी.’ हा सिनेमा गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे सोमवारी २ ऑक्टोबरला रिलिज झाला. हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम या चार भाषांमधे रिलिज झाला.

आज बायोपिक ब्लॉकबस्टर ठरत असल्यामुळे सर्वच भाषांमधे वेगवेगळ्या लोकांवर सिनेमे येतायत. पण गंमत ही  की भारतातला पहिला सिनेमा राजा हरिश्चंद्र असो किंवा १९०० मधला जॉन ऑफ आर्क. हे सिनेमे बायोपिकच होते. जगात बायोपिक सिनेमांनाच आजपर्यंत लोकांनी पसंती दिलीय. असाच एक नवा बायोपिक स्ये रा नरसिंह रेड्डी. याला अगदी पहिल्या दिवासापासून लोकांची पसंती मिळतेय.

एक स्वातंत्र्ययोद्धा मोठ्या पडद्यावर

स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमाचं बजेट २०० कोटींचं होतं. याला ओपनिंगही खूप चांगलं मिळालं. पहिल्याच दिवशी ५२ कोटी रुपये कमावलेत. आमिर खानच्या ठग्ज ऑफ हिंदुस्तानलासुद्धा एवढं ओपनिंग मिळालं नव्हतं, असं बिझनेस टुडेच्या बातमीत लिहिलंय. आता पुढच्या काही दिवसांत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू करणार अशी चिन्ह दिसत आहेत.

या सिनेमात साऊथचा सुपरस्टार आणि माजी केंद्रीय मंत्री चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहे. शिवाय अमिताभ बच्चन यांचा गेस्ट अपियरन्स आहे. तसंच सिनेमात नयनतारा, तमन्ना भाटिया, भोजपुरी सिनेमातला स्टार रवी किशन, मुकेश ऋषी आणि अमेरिकन  टीवी हिरो अॅलेक्स ओनेल इत्यादी अॅक्टरनी काम केलंय.

सिनेमाची संपूर्ण कथा ही नरसिंह या शूरवीराभोवती फिरते. ते फ्रीडम फायटर होते. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी विरोधात १८४७ ला केलेल्या लढाईवर सिनेमा बेतलाय. सिनेमाचं डिरेक्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केलंय आणि प्रोड्युसर आहेत राम चरण. चरण हे बॉलिवुडमधे जंजीर सिनेमाच्या रिमेकमधे प्रियांका चोप्राबरोबर पहिल्यांदा झळकले. तर सिनेमाची कथा परुचुरी ब्रदर्स यांनी लिहिलीय. एकूणच साऊथमधले मातब्बर या सिनेमात एकत्र आलेत.

हेही वाचा: द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज

रेड्डींना त्यांच्या प्रांतावरून नाव

स्ये रा नरसिंह रेड्डी हा सिनेमा काहींनी बघितला असेल तर काहींना अजून बघायचा असेल. नरसिंह रेड्डी हे नाव आपण सिनेमाच्या निमित्ताने ऐकतोय. उयलावाडा नरसिंह रेड्डीं हे त्यांचं नाव. हे नाव त्यांना त्यांच्या प्रांतावरुन मिळालं. त्यांच्या कुटुंबाकडे आंध्रप्रदेशमधल्या कोईलकुंटल जिल्ह्यातल्या उयलवाडा मंडल प्रांताची जहांगीर होती. आता या जिल्ह्याचं नाव कुरनूल असं आहे. 

रेड्डी कुटुंबात नरसिंह हे सगळ्यात लहान. त्यांना दोन मोठे भाऊ होते. त्यांच्या जन्माची तारीख आणि इतर माहिती कुठेच उपलब्ध नाही. फक्त त्यांचा जन्म रुपनागुडी या गावात झाल्याचं द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्रातल्या बातमीवरुन समजतं.

ईस्ट इंडिया कंपनी मद्रासमधे आली तेव्हा मद्रासमधल्या अनेक गोष्टी बदलल्या. आपल्या सगळ्यांना माहितीय की ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार हा फक्त देखावा होता. मुळात इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करायचं होतं. जे त्यांनी केलंच.

सगळ्या जमिनी इंग्रजांच्या ताब्यात

जमीनदारांकडे एकवटलेली सत्ता काढून इंग्रजांनी समता प्रस्थापित करत असल्याचा खोटा दिखावा केला. त्याला त्याकाळातले लोक भुलले. इंग्रजांनी शेतजमिनीचं पुन्हा नव्याने वाटप केलं. त्यामागे सामाजिक व्यवस्था सुधारणं हा हेतू नसून फक्त जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नाची वाढ करून ते परदेशात पाठवून, त्याचे बायप्रोडक्टस बनवून जगभरातून नफा मिळवता यावा. आणि एका बाजूने देशावरही कब्जा करता यावा, हा विचार होता. 

ते करताना इंग्रजांनी खूप लोकांच्या जमिनी हडप केल्या. फक्त जमिनी कसायला दिल्या आणि मालकी स्वत:जवळ ठेवली. तर काहींच्या जमिनी घेऊन त्यांना तुटपुंजा मोबदला दिला. ही गोष्ट नंतर लोकांच्या लक्षात येऊ लागली की इंग्रज आपल्याबरोबर फसवतायत. पण तोपर्यंत सगळ्या जमिनी इंग्रजांच्या ताब्यात गेल्या.

हेही वाचा: अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट

इंग्रजांविरुद्ध असंतोषाचा भडका उडाला

गावप्रमुख, जहागिरदार आणि बड्या लोकांना यावेळी काहीच करता आलं नाही. तेही फसले होते. खरंतर ते जमिनीवर अवलंबून होते. त्यांची अवस्था सगळ्यात बिकट होती. नरसिंह रेड्डी यांच्याकडे एकेकाळी जहागीर होती. त्यामुळे ही सर्व व्यवस्था त्यांच्या हातात होती. त्यातले बदल बघून त्यांनी आणि इतर जहागिरदारांनी इंग्रजांच्या ऑर्डरच्या विरोधात याचिका दाखल केली. सर्व सामाजिक मुद्दे मांडले. आणि शेतकऱ्यांना एकत्र आणलं. पण काही फरक पडला नाही. उलट त्यांनी मेलेल्या लोकांच्या जमिनी हडप करायला सुरवात केली.

गावकरी शेतात पीक घेत होते. पण त्यांना त्याबदल्यात नाममात्र पैसे मजुरी म्हणून मिळत होते. गरीब आणखी गरीब होत होते. शेत पिकवणाऱ्यांनाच एका वेळेचं अन्नसुद्धा मिळत नव्हतं. या अन्यायामुळे रेड्डींचा असंतोष वाढत होता. गावकऱ्यांवर होणार अन्याय, त्यांची हालपेष्टा त्यांना बघवली नाही. आणि शेवटी त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडखोरी केली.

हेही वाचा: हनी ट्रॅप: पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत

इंग्रज अधिकाऱ्यांचा जीव घेतला

जुलै १८४६ मधे नरसिंह रेड्डी यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एक सशस्त्र गट बनवला. रेड्डींना लढाईचं ज्ञान त्यांच्या गुरूंनी दिलं. त्याच गुरूंची भूमिका सिनेमात अमिताभ बच्चन यांनी साकारलीय. या उठावात त्यांना हैद्राबादमधल्या भरपूरशा बड्या लोकांनी सहकार्य केलं. पैसे, अन्नधान्य, शस्त्र पुरवले. तसंच सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा या बंडाला आपला पाठिंबा दिला.

रेड्डी यांच्या गटाने इंग्रजांच्या जिल्हा कार्यालयातली तिजोरी लुटली. कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांचा जीव घेतला. रेड्डीबरोबर दोन हजार बंडखोर होते. पण समोर बलाढ्य ब्रिटीश सैन्य. यात सुमारे २०० लढवय्ये ठार झाले. आणि काहींना ताब्यात घेतलं गेलं. रेड्डींनी सर्वांना टेकड्यांवर नेऊन लपवलं आणि स्वत:ही लपले.

ब्रिटिशांनी गावांत बंडखोरांची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे गावकऱ्यांवर प्रेशर येऊ लागलं. इंग्रज त्यांना मारझोड करू लागले, मजुरीचे पैसे देणं बंद केलं. गावातली अशांतता दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे बंडखोर लढवय्यांनी पुन्हा इंग्रजांवर हल्ला केला. यात ९० जणांना पकडण्यात आलं.

नरसिंह रेड्डींना फाशी झाली

हजार लढवय्यांपैकी ११२ जणांना शिक्षा झाली. आणि इतरांना सोडण्यात आलं. नरसिंह रेड्डी यांनाही दोषी ठरविण्यात आलं. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २२ फेब्रुवारी १८४८ ला कोइलकुंटला जिल्ह्यातल्या लोकांनी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. हजारो गावकऱ्यांपुढे रेड्डींना फाशी दिली.

इंग्रजांनी जिल्ह्यातल्या किल्ल्यावर नरसिंह रेड्डींचं मुंडकं १८७७ पर्यंत ठेवलं. हे मुंडकं मुद्दामहून लोकांना दिसेल अशाच ठिकाणी ठेवलं. ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या जिल्हा गॅझेटमधे या घटनेचा तपशील लिहिलाय. त्यात त्यांनी रेड्डींचं वर्णन शूर योद्धा असं केलंय आणि हीच माहिती 'कलोनियलिझम आणि कल्चर' या पुस्तकात लेखक निकोलस बी. ड्रिक्स यांनी दिली. हे पुस्तक आपल्याला ऑनलाईन गुडरीडमधेसुद्धा मिळू शकेल.

ही कहाणी आपल्यासमोर स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमामुळे आली. देशभर पोचली. आपल्या महाराष्ट्रातही असे अनेक शूर योद्धे आहेत, ज्याची कहाणी सांगायला मात्र कुणीही नाही.

हेही वाचा: 

साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का?

भाजपच्या उमेदवार याद्यांमधे कुणाचा बोलबाला?

निवड समिती रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे नारळ देणार?

डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!