वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईक १९५२ ते १९७९ अशी २७ वर्ष अखंडपणे राजकारणात वावरले. महाराष्ट्रातल्या जनतेची मतंच नाही तर मनं जिंकणारा नेता असं त्यांचं मोठ्या कौतुकानं आणि आदरानं वर्णन केलं जातं. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारं ‘वसंतराव नाईक: कृषी, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते’ हे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलंय. या पुस्तकात डॉ. उत्तम रुद्रवार यांनी नाईकांच्या कृषीक्षेत्रातल्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय. या पुस्तकातला हा संपादित अंश.
आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री असा त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा आलेख. असं असलं तरी ते रमले मात्र शेतीत. शेती आणि शेतकरी हा त्यांच्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय. धरतीच्या कणाकणातून समृद्धी फुलली पाहिजे हा त्यांचा उत्कट ध्यास होता. काळ्या मातीचं हिरवं स्वप्न पाहणारा हा खरा भूमिपुत्र होता. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे हे त्यांनी पाहिलेलं सुंदर स्वप्न. महाराष्ट्राचे कवी वाल्मिकी म्हणजे ग. दि. माडगूळकर यांनी मोठ्या काव्यमय शब्दांत त्यांच्या शेतीविषयक कामगिरीचं वर्णन केलंय. ते म्हणतात, कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती हाच आहे. आणि शेती ही साऱ्या उद्योगाची जननी आहे. याचाच त्यांनी आयुष्यभर विचार केला. किंवा याच विचाराभोवती त्यांनी आपलं जीवनकार्य ठेवलं. शेती हा त्यांचा श्वासोच्छवास होता.
शेतकरी हा आपल्या देशाचा खरा आधारस्तंभ आहे. साक्षात अन्नपूर्णेला अवतार घ्यायला लावणारा हा अन्नदाता मात्र उपाशी असतो, अर्धपोटी राहतो. शेतकऱ्यांची ही स्थिती बघून वसंतराव नाईकांना वाईट वाटायचं. आपल्या देशाचा आधारस्तंभ हा पंगू आहे याची तीव्र जाणीव त्यांना होती. वसंतरावांच्या काळात कमाल भू धारणेचा कायदा झाला. कसेल त्याची जमीन हा विचार त्याच्या मूळाशी होता. सिलिंगचा कायदा म्हणून हा कायदा ओळखला जातो. हा कायदा अस्तित्वात येण्याआधी झालेल्या राष्ट्रीय नियोजन परिषदेच्या बैठकीत सहभागी होताना वसंतरावांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.
शेत जमिनीची किमान धारणा कितीही कमी ठेवावी पण सामान्य शेतकऱ्यांच्या राहणीमानाची पातळी कुठल्या कर्मचाऱ्याच्या पातळीवर तुम्ही ठरवणार आहात? याचा निर्णय अगोदर घ्या. शासनाच्या दरबारातले सचिव, सहसचिव, उपसचिव, सहाय्यक सचिव, कक्ष अधिकारी, लिपीक की चपराशी? यापैकी कुठल्या पातळीवर तुम्ही शेतकऱ्यांचं जीवनमान ठेवणार आहात? हा प्रश्न त्यांनी केला. त्यांच्या या विचारातून आणि प्रश्नांतून शेतकऱ्यांबद्दलचा त्यांचा आत्यंतिक कळवळा आणि पोटतिडीक दिसून आली.
हेही वाचा : पाकिस्तानने महाराजा रणजित सिंहांचा पूर्णाकृती पुतळा का उभारला?
शब्दातून तळमळ व्यक्त होत नसते. तळमळीतून जे शब्द बाहेर पडतात ते परिणाम करुन जातात. त्यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विचार आज सर्वमान्य आहेत. कवी यशवंत मनोहरांच्या शब्दात सांगायचं झाल्यास, येताना उत्तरं घेऊन आलो होतो, जाताना प्रश्न ठेवून जाईन. अशाचं प्रकारे त्यांनी केवळ प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्याची उत्तरंही शोधलीत. त्या उत्तरांच्या मागे तर्कसंगत असं शेतीविषयक तत्वज्ञान होतं.
आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरायला हवं. या विज्ञाननिष्ठ विचारावर वसंतरावांची अभंग निष्ठा होती. पारंपरिक पद्धतीनं केलेली शेती आजच्या काळात फायदेशीर ठरणार नाही. या महत्त्वाच्या विचाराचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. चीनमधे झालेली कृषिक्रांती आणि रशियात झालेली औद्योगिक क्रांती अयशस्वी झाल्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी आपली अवजारं टाकून दिली. तर कामगारांनी त्यांच्या हातातली साधनं फेकून दिली. आणि ते शस्त्रशरण झाले. अशा माध्यमातून यशस्वी होता येत नाही. हरितक्रांती यशस्वी करायची असेल तर कृषिविषयक अवजारांच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिवर्तनातून केली पाहिजे. विज्ञानाची कास धरली पाहिजे. याबाबतीत वसंतराव नाईकांनी केलेलं चिंतन हे मूलगामी होतं.
कोणत्याही व्यवसायाची अस्मिता ही त्या व्यवसायातल्या तेज आणि सत्व यावर अवलंबून असते. शेती, शेतकरी, पावसाचं पाणी आणि शेतात निर्माण होणारं धन-धान्य याचा एकमेकांशी असाधारण संबंध आहे. हे सगळे घटक एकमेकांशी एकरुप आहेत. शेतीचे अविभाज्य अंग आहे याचाच त्यांनी विचार केला. आणि म्हणूनच कार्यक्रम कोणताही असो प्रसंग कोणताही असो हरिदासाची कथा जशी मूळ पदावर तसं ते उत्स्फूर्तपणे शेती हा विषय घेऊन बोलायचे.
अगदी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उत्सवी-आनंदी विद्यार्थ्यांसमोर ते शेतीवर बोलायचे. त्यांचं ते प्रकट चिंतन असायचं. त्याच्या पाठीमागे त्यांचा तर्कसंगत असा युक्तिवाद असायचा. शेतीविषयक त्यांची तळमळ इतकी उत्कट असायची की ऐकणारे प्रभावित व्हायचे. शेती व्यवसाय म्हणून केला पाहिजे. समाज जीवनामधे शेतकऱ्याला सन्मान आणि प्रतिष्ठा लाभली पाहिजे. हा एकमेव ध्यास वसंतरावांनी घेतला होता.
त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात महाराष्ट्राच्या शेती विकासात मोठी क्रांती झाली. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं. आपले न्याय्य हक्कदेखील त्याला आता समजू लागलेत. तो आता संघटित झालाय. त्यांची अस्मिता जागी झालीय.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आता फायदेशीर ठरणार नाही. तेव्हा नदीवर बांध घालून, धरण घालून, पाणी अडवून या परिसरातली जमीन भिजली पाहिजे. ओलिताखाली आली पाहिजे. यासाठी त्यांनी भगिरथ प्रयत्न केले. १९६५ मधे भारत, पाकिस्तान युद्ध झालं. जय जवान, जय किसान हा शास्त्रीजींनी नारा दिला. देशाची लोकसंख्या आणि देशामधे उत्पादन होणारं धान्य याचा मेळ घालण्यासाठी शास्त्रीजींनी लोकांनी आठवड्यातून एक वेळेला उपवास करायला सांगितलं. मात्र धान्यासाठी लाचार होऊन कोणापुढे झोळी पसरणार नाही, असंही बाणेदारपणे सांगितलं.
शास्त्रीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी दोन वर्षात अन्नधान्याच्याबाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या असे उद्गार काढत वसंतराव नाईकांनी लोकांच्या काळजाला हात घातला. जोपर्यंत अन्नधान्याबाबतीत आपण स्वयंपूर्ण होणार नाही तोपर्यंत इतर गोष्टी निरर्थक आहेत असं त्यांना प्रामाणिकपणे वाटायचं. मूलभूत गोष्टींची पूर्तता झाली तरच विकासाच्या इतर गोष्टींना अर्थ असतो ही त्यांची भूमिका उदात्त आणि व्यवहार्यही आहे
पावसाचं पाणी वाहून जातं तेव्हा ते साठवलं पाहिजे आणि पाणी टंचाईच्या काळात त्याचा उपयोग झाला पाहिजे, यासाठी पाझर तलाव, छोटे ओढे, नाले यांना घातलेले बांध, जमिनीचा कस कायम ठेवण्यासाठी तिला खत दिलं पाहिजे. सकस बियाणं वापरली पाहिजेत. यासाठी खत, बियाणं, शासनामार्फत, सहकारी संस्थांमार्फत प्रक्रिया उद्योग सुरु केले पाहिजेत. जसं विदर्भ, मराठवाडा, खानदेशात कापसाचं मोठं पीक होतं. या भागातला शेतकरी त्याला पांढरं सोनं म्हणतात. हे शेतकऱ्यांच रोखीचं मोठं पीक आहे.
कापसापासून सरकी बाहेर काढण्यासाठी तेलघाणी, कापसापासून सूत तयार करण्यासाठी सूत आणि कापड गिरणी असं सहकाराचं जाळंच त्या भागात विणण्याच काम त्यांच्याच काळात सुरू झालं. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य आलं. नव्या बाजारपेठा उभारण्यात आल्या. लोकांच्या खिशात दोन पैसे खुळखुळु लागले. शेतकऱ्यांची मुलं शाळा महाविद्यालयात जाऊ लागली, शिकू लागली, ग्रामीण भागाचे नेतृत्व करु लागली. खेडी ही संस्कृतीचं केंद्र बनली. शेतीविषयक शिक्षणासाठी एक नाही, दोन नाही तर स्वतंत्र कृषि विद्यापीठ निर्माण झालं. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान धरुन याचा साक्षेपाने अभ्यास केला जाऊ लागला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करुन अधिक उत्पादन काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. नवीन संकरित बी-बियाणे पेरण्याची आणि सुधारित अवजारांचा उपयोग, वापर करण्याची नवी दृष्टी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. सामान्यत: माणूस हा स्थितीशील असतो. रुळलेल्या, मळलेल्या परंपरेच्या पायवाटेवरुन तो चालतो. बदल त्याला आवडत नाही. परिवर्तनाचा विचार त्याला पचत नाही. मात्र वसंतरावांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन परिवर्तनाची दिशा दिली.
हेही वाचा :कम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांसाठी अस्पृश्य झालो
१९७२ ला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा दुष्काळ पडला. लागोपाठ दोन, तीन वर्ष दुष्काळात गेली. या विपरीत स्थितीत त्यांनी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना हिंमत दिली. त्यांचं आत्मबळ वाढवलं. त्यांना दिलासा दिला. ‘दुष्काळ आला म्हणून माणसानं खचून जाऊ नये, त्यानं धरतीला बळ दिलं पाहिजे.’ असं ते म्हणत. संकरित ज्वारीचं बियाणं शेतकऱ्यांनी वापरावं म्हणून त्यांनी प्रचाराची राळ उडवली. प्रचाराचा जणू झंजावातच निर्माण झाला.
पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यांनी हे काम नेटाने केलं. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात संकरित बियाणं तयार करण्याचे प्लॉटस घेतले. त्याच्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. नर आणि मादी यांचं बियाणं अंतर ठेऊन कसं पेरतात, नंतर रोपं फुलोऱ्यावर आल्यावर त्यांचा संकर कसा होतो? आणि तत्पूर्वी त्याचं रोपिंग कसं होतं. याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं. या सगळ्याची शास्त्रशुद्ध माहिती देणं आणि त्यावरचं त्यांच भाषण ऐकणं हा वेगळाच अनुभव होता.
१९७० च्या दरम्यान खरोखरच महाराष्ट्र अन्न धान्याबाबतीत स्वावलंबी झाला. विक्रमी धान्य उत्पादन झालं. महाराष्ट्राची गरज भागली आणि इतर प्रातांनाही त्यांनी धान्य पुरवलं. विदर्भ, मराठवाड्यात हायब्रीड ज्वारी हा परवलीचा शब्द बनला. जेमतेम धान्य उत्पादन घेऊन आणि शेतावर काम करणाऱ्या मजुरांची गरज भागवणारा शेतकरी प्रचंड धान्याचं उत्पादन घेऊ लागला. त्याच्या शेतात संकरित धान्याची रास उभी राहिली. पोती ठेवायला घरं लहान पडू लागली. हा नवा चमत्कार वसंतराव नाईकांनी घडवून आणला.
एवढंच करून ते थांबले नाहीत. तर त्यांनी शेतमालाचे भाव बांधून दिले. धान्य उत्पादन वाढल्याबरोबर धान्याच्या किंमती पडू लागल्या. काही वेळेला व्यापाऱ्यांनी मुद्दाम भाव पाडले. अशा वेळी शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून किमान हमी भावावर शासनामार्फत ज्वारीची, धान्याची खरेदी करुन शेतकऱ्यांना सहकार्याचा हात त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी शेतीमाल मोठ्य़ा प्रमाणात उत्पादित करावाच. एवढ्यावर त्यांनी थांबू नये. शेतकऱ्यांमधल्या जाणकारांनी पुढं यावं, पुढाकार घ्यावा आणि शेतीला उद्योगाची जोड द्यावी. केवळ हरितक्रांती नाही तर कृषिऔद्योगिक क्रांती झाली पाहिजे. ही क्रांती यशस्वी होण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.
हेही वाचा :
धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा
वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही
३ ० वर्षांपूर्वी हरवलेल्या सुरेश कांबळेंना व्हॉट्सअपने शोधलं