लग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक

२३ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


अक्षय कोठावळे हा पुण्यात राहणारा रिक्षाचालक तरुण. लॉकडाऊनमुळे प्रवासी मिळणार नाहीत हे माहीत असूनही अक्षय यांनी रिक्षा पास काढून आणला. कशासाठी? लॉकडाऊनमुळे उपाशी राहिलेल्यांना अन्न पुरवण्यासाठी. थाटामाटात लग्न करायसाठी साठवलेले तब्बल दोन लाख रूपये अक्षय यांनी या कामासाठी वापरलेत. स्वतः हातावर पोट घेऊन जगणारे अक्षय रोज ४०० जणांची भूक भागवतात.

‘पाँ पाँ’ रिक्षेचा भोंगा वाजायचा. आसपासचे लोक सतर्क व्हायचे आणि रिक्षेच्या दिशेनं बघायचे. या लॉकडाऊनमधे सगळी वाहनं बंद असताना ही रिक्षा कशी आली, कुठून आली आणि का आली असे अनेक प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे. रिक्षा चालवणारा तरुण कोरोना संदर्भातली लोकोपयोगी माहिती स्पीकरवरून सांगायचा.

अक्षय कोठावळे हा पुण्यात राहणारा तरूण मुलगा. या वयात तरूण मंडळी काय स्वप्नं पाहत असतात? जोडीदाराची, स्वतःचं घर घेण्याची. त्यांना कसली काळजी असते? हळूहळू कुटुंबाची जबाबदारी उचलण्याची, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याची. हीच स्वप्नं अक्षय यांचीही आहेत. त्यासंबंधीची काळजी अक्षय यांनाही चुकलेली नाही. पण या दोन गोष्टींसोबत आणखी एक अवजड ओझं अक्षय आणि त्यांची रिक्षा वाहतेय. आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवताना दुसऱ्यांचं पोट भरण्याची काळजी अक्षय यांच्या डोक्यावर आहे.

हेही वाचा : विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली

रिक्षातून माहिती देण्याचा उपक्रम

कोरोना वायरसचा प्रसार होऊ लागल्यामुळे देशभर लॉकडाऊन जारी केला गेला. अशात पुण्या-मुंबईसारख्या काही शहरात गावागावातून शिकायला आलेली मुलं, कामासाठी आलेले कामगार, दुसऱ्या राज्यातून कष्ट करायला आलेले मजूर अशी कित्येक माणसं अडकून पडली. त्यांच्या हाताला काम नाही. काम नाही म्हणून पैसा नाही. पैसा नाही म्हणून अन्नही नाही. अशी कित्येक माणसं रस्त्यावर अन्नाची, पाण्याची आशा लावून पुण्याच्या रस्त्यावर नुसती बसलेली असायची.

'कोलाज'शी बोलताना अक्षय सांगत होते, ‘मी रिक्षा घेऊन लोकांपर्यंत कोरोना वायरसची सरकारनं जाहीर केलेली माहिती पोचवायला जायचो. माझ्या आनंद आणि अंकुश या दोन मित्रांनी मला लॉकडाऊनमधे रिक्षा चालवण्यासाठी पास काढून दिला होता. रिक्षा आली की अन्न पाण्यावाचून रस्त्यावर बसलेली लोक दिसायचे. आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन ही रिक्षा आली असावी असं त्यांना वाटायचं. पण ही रिक्षा फक्त माहिती सांगायला आलीय, हे कळल्यावर त्यांचा भ्रमनिरास व्हायचा. पोटातली भूक अजून दाट व्हायची.’

एकदा एका माणसानं अक्षय यांना हे बोलून दाखवलं, ‘ही माहिती वगैरे ठीक आहे. पण अन्नाचं काय?’ कोरोना वायरसपासून कसं वाचायचं यापेक्षा पोटातल्या भूकेला शांत कसं करायचं हा प्रश्न त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा होता. या लोकांना माहितीपेक्षा खरी गरज अन्नाची आहे, हे अक्षय यांनी ओळखलं आणि नवी मोहीम हाती घेतली. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर उपाशी बसलेल्या शक्य तितक्या लोकांना जमेल तसं अन्न पुरवायची.

लग्नासाठी साठवलेले पैसे

लॉकडाऊन नसता तर खरंतर, आजच्या तारखेला अक्षय स्वतःच्या लग्नाची तयारी करत असले असते. २५ मेला त्यांचं लग्न ठरलं होतं. थाटामाटात लग्न व्हावं म्हणून लग्नासाठी पुरेसा पैसाही जमवून ठेवला होता. पण कोरोनाचं सावट आणि लॉकडाऊन यामधे फारसे नातेवाईक लग्नाला येऊ शकत नव्हते. खूप लोकांनी एकत्र जमणं धोक्याचंही होतं. हे ओळखून त्यांनी आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी रूपालीताई यांनी कुटुंबियांशी बोलून लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निश्चय केला.

या निर्णयामुळे लग्नासाठी साठवून ठेवलेले पैसे वाचले होते. तेव्हा अक्षय यांनी हे जमापुंजीतले २ लाख रूपये लोकांना अन्न पुरवण्यासाठी वापरायचं ठरवलं.

अक्षय सांगतात, ‘माझे मित्र आनंद आणि अंकुश तर माझ्यासोबत होतेच. शिवाय, रवींद्र गायकवाड हा आणखी एक मित्र माझ्यासोबत उभा राहिला. आम्ही रिक्षा घेऊन बाजारातून धान्य, भाज्या वगैरे आणलो. पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ आणलं. शेजारीपाजारी राहणाऱ्या चार पाच बायकांना हाताशी घेतलं आणि त्या सामानातून होईल तितकं जेवणं बनवलं.’

अक्षय स्वतः जेवण बनवतात. सगळ्यांनी मिळून त्या जेवण्याचं व्यवस्थित पॅकिंग केलं. त्यानंतर ती सगळी पॅकेट्स रिक्षात भरली आणि अक्षय रिक्षा घेऊन मध्यवर्ती पुण्यातल्या चार पाच ठिकाणी गेले. जो गरजू दिसेल त्याला पॅकेट्स वाटली आणि पॅकेट्स संपल्यावर दुपारी परतले. आपल्यामुळे अनेक लोकांना दोन घास अन्न मिळालं याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

असं चालतं काम

मग हा नित्यक्रम सुरूच झाला. आजही अक्षय आणि त्यांचे मित्र सकाळी ६ च्या सुमाराला उठतात. तांदूळ निवडणं, भाज्यांची कापाकापी अशी जेवण बनवण्याची सगळी तयारी रात्रीच झालेली असते. सकाळी ६:३० ला जेवण बनवणं सुरू होतं. ते पूर्ण व्हायला ९ वाजतात. त्यानंतर पॅकेट बांधायला तास तास-दीड तास जातो. त्यानंतर अक्षय रिक्षा काढतात आणि ४-५ भागात फिरून पॅकेट्स देतात. दररोज जवळपास ४०० लोक जेवतात.

आता अक्षय यांची रिक्षा फक्त माहिती देत नाही तर भुकेल्यांना अन्नही पुरवते. वरवर पाहता आपल्याला हे फक्त अन्नाची गोष्ट दिसत असेल. पण ते अन्न हातात देताना अक्षय यांनी समोरच्याच्या मनात नवी आशा पल्लवित केली असेल. अन्नाच्या एका पॅकेटनं कित्तीतरी लोकांना नवी उमेद मिळाली असेल, आधार वाटला असेल.

रोज ५ जणांना ३०० रूपयांचं सामान

आजपर्यंत अक्षय आणि त्यांची टीम दररोज स्वयंपाक करतात आणि सगळ्यांना पोचवून येतात. कधी खिचडी, कधी पुलाव, कधी सांबार भात आणि शक्य होईल तेव्हा भाजी पोळी. अनेक मोठ्या न्यूज चॅनेल्सनी आणि पेपरांनी त्यांच्या या कामाची दखल घेतली. एनडीटीवी या आघाडीच्या न्यूज चॅनलनंही अक्षय यांच्या या कामाची दखल घेतलीय.

आल्ट न्यूज या फॅक्ट चेकर वेबसाईटमधे कामाला असलेल्या मोहम्मद झुबेर यांनी ट्विटरवरून अक्षय यांचं कौतूक केलं. तिथे त्यांचा अकाउंट नंबर आणि गुगल पेचा नंबर शेअर केला. त्या माध्यमातून अनेक लोकांनी त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा केले.

या पैशाचाही चांगला उपयोग करायचा असं अक्षय यांनी ठरवलं. त्यातून आता ते जेवणाबरोबरच रोज ५ ते ६ जणांना धान्य वाटतात. सम्राट आट्याचं पाच किलोचं पीठ, तीन किलो तांदूळ आणि एक किलो साखर असं एकूण ३०० रूपयाचं सामान रोज ५ जणांच्या घरी पोचवलं जातं. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हे वाटप चालू झालंय.

याशिवाय, लॉकडाऊनमधे गरोदर बायका, म्हातारे, अपंग अशा सगळ्यांना आपल्या रिक्षातून फ्रीमधे हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठीही अक्षय तयार असतात. हे सगळं चालू असतानाच आता आपल्यासारखी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्यांसाठी काहीतरी करायचं असं अक्षय यांच्या मनात आहे.

‘गेल्या अनेक दिवसापासून रिक्षा बंद आहेत. आम्हा रिक्षावाल्यांचंही हातावरचं पोट. माझे अनेक मित्र, त्यांची कुटुंब उपाशीपोटी झोपतायत. आजपासून आम्ही त्यांनाही अन्न पुरवण्याचं काम हाती घेतलंय,’ अक्षय सांगत होते. 

हेही वाचा : कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

अक्षय यांचंही हातावरचंच पोट

पोटापाण्यासाठी अक्षय स्वतःही रिक्षा चालवतात. मग या लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या पोटाची आणि मनाची भूक शांत करणाऱ्या अक्षय यांच्या स्वतःच्या घरची चूल कशी पेटत असेल असा प्रश्न आपल्याला पडतो. अक्षय सांगतात, ‘आमचं एकत्र कुटुंब आहे. मी माझा लहान भाऊ, त्याची बायको, आई वडील आणि काका काकू असे आम्ही सगळे एकत्र राहतो. आता लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होतो. तेव्हा काही साठवलेल्या पैसे आम्ही वापरले. पण आता लॉकडाऊन आणखी वाढला तर आमचंही अवघड आहे.’

स्वतःची रिक्षा घेण्यासाठी अक्षय यांनी कर्ज काढलं होतं. पुढची तीन वर्ष हे कर्ज फेडायचं आहे. घराचं बांधकामही चालू होतं. लॉकडाऊनमुळे ते बांधकाम बंद पडलं. अशातच १८ मेला अक्षय यांच्या वडलांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. तरीही अक्षय यांनी हे काम थांबवलं नाही. अशावेळी घरचं सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांना विरोध होतच असतो.

‘सुरवातीला माझ्या घरच्यांनी माझ्या या कामाला विरोध केला. माझ्या वडलांचाही विरोध होता. मी आमच्या लग्नाचे पैसे वापरल्यामुळे माझी होणारी बायकोही हिरमुसली होती. पण मी त्या सगळ्यांना समजावून सांगितलं. या कामाची गरज त्यांना कळाली. आता ते सगळेच माझ्यासोबत आहेत.’ अक्षय सांगतात. त्यांच्यासोबत हे काम करणारं कुणीही त्यांच्याकडून एक पैसा घेत नाही. शेजारपाजारच्या बायका स्वयंपाकात मदत करतात, पॅकेजिंग करायलाही पुढे येतात. पण कुणीही त्याचा एक पैसा घेत नाही. सगळे आवडीने काम करतात.

मी फुलेवाड्याजवळ राहतो

‘माझी समाजकार्याची आवड माझ्या बायकोला माहीत आहे. सांगली, कोल्हापूर पुराच्या वेळी मी तीन गावात किट्स वाटले होते. आषाढातल्या पंढरपूर वारीतही आम्ही नियमितपणे फूड पॅकेट वाटतो. तशीच गरज आत्ताही वाटली. म्हणून बायकोला समजावलं आणि लग्नासाठी साठवलेले पैसे इथं वापरले. आता लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही अतिशय साध्या पद्धतीने लग्न करणार आहोत,’ असं अक्षय म्हणाले.

लॉकडाऊनमधे लोकांना अन्न वाटताना अक्षय सगळ्या प्रकारची काळजी घेतात. अन्नधान्याप्रमाणेच सॅनिटायझरच्या बाटल्या, मास्क, ग्लोव्ज यावरही त्यांचे पैसे खर्च होतात. योग्य शारीरिक अंतर ठेवून ते अन्न वाटप करतात तेव्हा त्या माणसांशी आपोआप मनाने जोडले जातात.

रोज कित्येक लोकांच्या संपर्कात येतात. तेव्हा आपल्याला कोरोना वायरसची लागण होईल अशी भीती अक्षय यांना वाटत नसेल का असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. पण अक्षय म्हणतात, ‘माझं घर महात्मा फुलेंच्या वाड्याजवळ आहे. प्लेगच्या उद्रेकावेळी हा वाडा हॉस्पिटलसारखा झाला होता. सावित्रीबाई स्वतः प्लेगच्या पेशंटची सेवा करत असताना गेल्या. मला त्या डोळ्यासमोर दिसत राहतात.’

अक्षय यांचं उत्तर ऐकून कुणीही भारावून जाईल. पण नुसतं भावनिक होऊन चालणार नाही. अक्षय यांनी लग्नासाठी साठवलेले पैसे वापरले. आता तेही संपण्याची वेळ जवळ येत चाललीय. अशावेळी त्यांना आणखी मदतीचे हात लागणार आहेत. हे हात समाजातल्या सगळ्या लोकांचे असायला हवेत.

हेही वाचा : 

वाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

संत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?

टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?

महर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर

लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?