१९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी

०३ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘शहरातलं उंदराचं मरणसत्र संपलं आणि उंदरांसारखीच पटापट माणसं मरण सुरू झालं,’ फ्रेंच क्रांतिकारी विचारवंत अल्बर्ट काम्यू याच्या द प्लेग या पुस्तकाची ही सुरवात. १९४७ मधे प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत साथरोगाच्या काळात होणारी अर्थव्यवस्थेची दशा, नेत्यांचं राजकारण आणि लोकांची बेफिकीरी या सगळ्याचं चोख वर्णन काम्यूनं केलंय. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतही २० व्या शतकातलं हे वर्णन तंतोतंत जुळतं.

‘एका डॉक्टरकडे दोन किंवा तीनच पेशंट येत होते तोपर्यंत याबाबतीत काहीतरी केलं पाहिजे असा विचार कुणी केला नव्हता. या सगळ्या सुट्या पेशंटना एकत्र आणण्याची गरज होती. हे एकत्रिकरण झालं तेव्हा समोर आलेल्या आकड्यांमुळे सगळ्यांना जोरदार धक्का बसला,’ एनडीटीवीच्या प्राईम टाइम या कार्यक्रमात पत्रकार रवीश कुमार यांनी एका पुस्तकातल्या या ओळी वाचून दाखवल्या.

हे कोणतं पुस्तक? आणि आजची कोरोनाची परिस्थिती त्यात एवढी चोख कशी लिहिली गेलीय? कोरोनामुळं जग लॉकडाऊन झालं तितक्यात या माणसानं हे पुस्तक लिहून, प्रकाशक शोधून प्रकाशितही केलेलं की काय? नाही. कोरोनाची नाही तर एका आजाराच्या काल्पनिक परिस्थितीवर हे पुस्तक लिहिलं गेलंय.

हे पुस्तक म्हणजे १९४७ मधे प्रकाशित झालेली अल्बर्ट काम्यू या फ्रेंच फिलॉसॉफर ‘द प्लेग’ नावाची कांदबरी. मुळात फ्रेंच भाषेत लिहिलेल्या या कादंबरीचे इंग्लिश आणि हिंदीसह जगभरातल्या अनेक भाषांमधेही अनुवाद केले गेलेत.

हेही वाचा : महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

आपण आत्महत्या का करायची नाही?

अल्बर्ट काम्यू यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९१३ मधे अल्जेरियामधे झाला. अल्जेरिया ही तेव्हा फ्रेंच वसाहत होती. म्हणूनच काम्यूला फ्रेंच अल्जेरियन फिलॉसॉफर म्हणून ओळखलं जातं. १९३३ मधे त्याने अल्जेरियाच्या एका युनिवर्सिटीमधे फिलॉसॉफी विषय घेऊन बीए केलं आणि प्लॉटिनस या फिलॉसॉफरवर पीएचडी केली. १९३५ पासून तो फ्रान्समधल्या कम्युनिस्ट पार्टीशी जोडला गेला.

नित्शे, शॉपेनोवर अशा फिलॉसॉफर्सच्या प्रभावाखाली आल्यानं काम्यू अस्तित्ववादाकडे वळाला. १९४२ मधे प्रसिद्ध झालेली त्याची ‘द मिथ्स ऑफ सिसिफस’ ही कादंबरी फार अस्तित्ववादी धाटणीची कथा म्हणून खूप गाजली होती. या संपूर्ण कादंबरीत काम्यू एकच प्रश्न आपल्यासमोर ठेवतो आणि तो म्हणजे सगळं जग इतकं निरर्थक असताना आपण आत्महत्या का करायची नाही? त्याचा हा प्रश्न आणि त्यावर त्यानं दिलेलं उत्तर आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं.

काम्यूच्या कथा या अशाच दर्जेदार असायच्या. म्हणूनच, १९५७ मधे त्याला साहित्याचा नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला होता. १९४१ च्या जानेवारीमधे काम्यूनं एका वायरसच्या प्रादुर्भावाबद्दल एक कथा लिहायला सुरवात केली. प्राण्यांकडून माणसांकडे आलेल्या एका वायरसचा प्रचंड प्रसार व्हायला लागतो. त्यावर नियंत्रण मिळवताना प्रशासनालाही नाकीनऊ येतात. शेवटी, अल्जेरियातल्याच ओरन नावाच्या एका साध्या शहरातली निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या या वायरसपायी मृत्यूमुखी पडते, अशी स्टोरी असलेलं पुस्तक त्याला लिहायचं होतं. आणि त्यानं ते द प्लेग नावानं साकारलंही.

अचानक उंदरं मरू लागतात

काम्यूचं द प्लेग पुस्तक वाचायला सुरवात केल्यावर लगेचच एका अनामिक भीती वातावरणात भरते. ओरन शहरातले लोक पैशाच्या मागे धावत आपलं आयुष्य काढत असतात. आणि अचानक एक मरणसत्र सुरू होतं. डॉक्टर रियो या कथेतल्या पात्राला रस्त्यात एक मेलेला उंदीर दिसतो. दोन पावलं चालत गेल्यावर पुन्हा एक उंदीर मरून पडलेला असतो. पुन्हा काही अंतरावर असाच उंदीर मरून पडलेला असतो.

संपूर्ण शहरात अशाप्रकारचे अनेक उंदीर जिथं तिथं मरून पडलेले असतात. लोकांच्या घरात, शहरातल्या रस्त्यावर कचरापेटीत जिथं तिथं असेच मरून पडलेले उंदीर दृष्टीस पडतात. हळूहळू संख्या भरपूर वाढत जाते. सगळ्या रस्त्यावर या उंदरांचे मेलेले छोटे छोटे मृतदेह पाहून लोकांना किळस वाटू लागते. बरं, इतरवेळी एकाच उंदरावर तुटून पडणारे पक्षी यावेळी त्यांना साधं तोंड लावायलाही पुढे येत नाहीत. शेवटी शहरातले नागरिक वैतागतात आणि शहर प्रशासनाला ते उंदीर उचलण्यासाठी सांगतात. प्रशासन काही करण्याआधीच मृत उंदरांची संख्या एकदम कमी होते.

प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी एक पिशवी घेऊन शहरभर फिरतात. मेलेले, तडफडणारे सगळे उंदीर उचलतात. शेवटी एकदाचा शेवटचा मेलेला उंदीर उचलला जातो. उंदीर मरण्याची घटना अचानक सुरू झाली तशी अचानक संपते. लोकांना हायसं वाटतं. पण उंदरांचं मरणसत्र संपतं आणि माणसांचं सुरू होतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

प्लेगची घोषणा करा

आधी दोन चार सुटे सुटे लोक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात. नंतर ही संख्या वाढत राहते. एका रात्रीत कालपेक्षा दुप्पट लोकांमधे त्याच आजाराची लक्षणं दिसू लागतात. दुसऱ्या रात्रीत हीच संख्या चौपट होते. आणि शहरात नक्की कुठलासा महारोग पसरला असावा, याची लोकांना खात्री होते.

पुढच्या चार दिवसांत मृतांची संख्या पटापट वाढत जाते. पहिल्या दिवशी १६ मग २४ त्यानंतर २८ आणि मग एका दिवसात ३२ लोक मरू लागतात. चौथ्या दिवशी लहान मुलांच्या एका शाळेत हॉस्पिटल उघडलं असल्याची घोषणा केली जाते. काहीतरी कल्पना रंगवत हा रोग काही इतका गंभीर नाही असंच शहरातले नागरिक सांगत राहतात पण ही संख्या बघून त्यांची तोंडंच गप्प होतात.

मृतांचा आकडा ३० वर जाऊन पोचला तेव्हा शहराचे प्रमुख डॉक्टर रियो यांना एक तार लिहिली. ‘शेवटी आता निर्धास्त असणारे सगळेच घाबरू लागलेत. तेव्हा शहरात प्लेगचा प्रादुर्भाव होत असल्याची घोषणा करून टाका. शहरातले सगळे दरवाजे बंद करा,’ असं या तारेत लिहिलेलं असतं.

आजच्या परिस्थितीशी जुळणारं वर्णन

उंदरांमुळे ओरन शहरात प्लेग नावाच्या एका आजाराची साथ पसरलेली असते, असं चित्र काम्यू या कादंबरीतून आपल्यासमोर मांडतो. मृतांची संख्या वाढू लागते तेव्हा आजच्या सारखं शहर लॉकडाऊन होतं. नागरिकांना घरात बसून राहण्याचे आणि स्वच्छता बाळगण्याचे आदेश दिले जातात.  

१८४९ मधे अल्जेरियामधे फ्रेंच वसाहती आल्या तेव्हा त्यांनी सोबत कॉलरा नावाचा आजार आणला होता. ओरनमधल्या खूप लोकांचा कॉलराच्या साथीनं मृत्यू झाला. या सत्यघटनेवर काम्यूची द प्लेग ही कादंबरी आधारलीय असं म्हटलं जातं. वरवर पाहता काम्यूची ही कथा फारच साधी आणि सरळ वाटते. पण त्यात काम्यूनं मांडलेले आर्थिक आणि राजकीय संदर्भ फार महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्यायला हवं.

अशा साथरोगाच्या काळात झालेली अर्थव्यवस्थेची दशा, राजकीय नेत्यांचं राजकारण, लोकांची बेफिकीरी आणि अशावेळी उघडं पडणारं धार्मिक संस्थांचं खोटेपण या सगळ्याचं चोख वर्णन काम्यूनं केलंय. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीतही काम्यूचं २० व्या शतकातलं हे वर्णन तंतोतंत जुळतं. तेव्हाच्या चुकांमधून आपण आजही कहीही शिकलेलो नाही, हेच काम्यूची कादंबरी आजच्या काळात सांगत राहते.

हेही वाचा : हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!

साथरोगाच्या नकाराशी भीती असते

‘अरे! हा एखादा भुकंप असला असता तर बरं झालं असतं! एकदा जमीन हलली आणि संपलं. किती जण मेली आणि किती जिवंत राहिली हे एकदाच मोजून प्रकरण संपलं असतं. पण हा बास्टर्ड आजार! ज्यांना झालेला नाही त्यांच्याही मनात आपलं ठाण मांडून बसतो’

असं एक वाक्य काम्यूनं या कादंबरीत लिहिलंय. आज आपण घरात सुरक्षित आहोत. कोरोनाची कुठलीही लक्षणं आपल्याला दिसत नसली तरी याची भीती आपल्या मनात अगदी पहिल्या दिवसापासून ठाण मांडून बसलीय.

हीच भीती नकाराच्या मूळाशी असते. अशा साथरोगाच्यावेळी येणाऱ्या गंभीर परिस्थितीकडे सगळे मुद्दाम दुर्लक्ष करतात ते या भीतीमुळेच. परिस्थिती नेहमीसारखी सामान्य नाहीय हे चित्रण माणसांना भीतीदायक वाटत असतं. कारण परिस्थिती सामान्य नाही याचा अर्थ आपल्या स्वातंत्र्यावर गदा येणार आहे, असं लोकांना वाटतं. काम्यूच्या  ‘द प्लेग’ मधले लोकही याला अपवाद नव्हते. अनेक आजारी माणसांमधे एकसारखी लक्षण दिसत होती. लोक पटापट मरत होते. सगळ्यांच्या तोंडात प्लेग ही दोनच अक्षरं होती. हा शब्द उच्चारायलाही लोक घाबरत होते. तरीही प्लेग आलाय, हे त्यांना मान्य करायचं नव्हतं.

‘हा प्लेग असणं शक्यच नाहीय. सगळ्यांना माहितीय, पश्चिमेत प्लेग कधीच नाहीसा झालाय,’ एक पात्र म्हणतं. ‘हो, ते सगळ्यांनाच माहीतय,’ दुसरं पात्र त्याला प्रत्युत्तर देतं. ‘जे मेलेत त्यांना कदाचित माहीत नव्हतं.’ आजच्या कोरोनाच्या काळातही अशाच प्रकारचं संभाषण आपल्या कानावर पडतं.

हेही वाचा : फ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन

प्लेग कधीही मरत नाही

अशाप्रकारचे अनेक इंटरेस्टिंग डायलॉग काम्यूने ‘द प्लेग’मधे लिहिलेत. साथरोग खूपच वाढू लागतो तेव्हा एका आठवड्यात ५०० लोकांचा मृत्यू होतो. त्यावेळी कॅथलिक चर्च मधला एक फादर हा प्लेग म्हणजे माणसांना देवाने दिलेली शिक्षा आहे, असं विधान करतो. हे ऐकल्यावर लोकांना प्लेगचं असणं, त्यानं माणसं मरणं योग्यच आहे, असं वाटू लागतं. पण डॉक्टर रियो या पात्राला या वाक्यातला फोलपणा माहीत असतो. नुकत्याच एका चार वर्षाच्या छोट्या मुलाला त्याने प्लेगमुळे मरताना पाहिलेलं असतं. या नुकत्याच समज आलेल्या मुलाला नेमक्या कुठल्या पापांची शिक्षा मिळालीय, याचा डॉक्टर रियो विचार करत राहतो.

साधारण एका वर्षानंतर ओरन शहरातला प्लेग आटोक्यात येतो. सगळे शहरवासी आपल्या सुटकेचं सेलिब्रेशन करू लागतात. दुःख संपलं असं त्यांना वाटतं. आता परत सगळं आधीसारखं होईल, अशी आशा त्यांना असते. पण हा आजार आटोक्यात आला म्हणजे आपण जिंकलो असं नाहीय हे डॉक्टर रियो यांना माहीत असतं. ‘प्लेग कधीही मरत नाही. आपल्या बेडरूममधे, तळघरात, जुन्या बॅगांमधे, रूमालांवर आणि जुन्या पेपरवर प्लेग शांतपणे आपली वाट पाहत असतो. कधीतरी तो परत येणार असतो.’

काम्यूचा प्लेग म्हणजे साधा आजार नाही. माणसाच्या आयुष्यात पाचवीला पुजलेल्या दुःखाला काम्यू प्लेगची उपमा देतोय. माणसाचं आयुष्य दुःखमय असतं अशी बुद्धासारखी मांडणी अस्तित्ववादी करतात. पण बुद्धानं सांगितले तसे अष्टांगमार्ग ते जगाला सांगत नाहीत. माणसाचं दुःख हे कुणा देवामुळे किंवा शक्तीमुळे मिळालेलं नाही. त्यामागे कुठलंही कारण नाही. माणूस जन्मापासून दुःखीच असतो, असा अस्तित्ववादी विचारच काम्यू ‘द प्लेग’मधून मांडत राहतो.

हेही वाचा : 

...तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी