नायजेरियन रेमाच्या कॉन्सर्टला भारतीयांची गर्दी का होतेय?

१८ मे २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


'बेबी काम डाऊन' हे गाणं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतंय. खरं तर गाणं रिलीज होऊन एव्हाना एक वर्ष झालंय. हे गाणं गाणारा रेमा नावाचा नायजेरियन रॅपर नुकताच भारत दौऱ्यावर येऊन गेला. दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमधे झालेल्या त्याच्या कॉन्सर्टला त्याच्या असंख्य भारतीय चाहत्यांसोबतच इथल्या सेलिब्रिटींनीही दमदार हजेरी लावली होती.   

गेले तीन दिवस देशभरात वेगवेगळ्या गोष्टींवरून गदारोळ सुरू आहे. कुठं कर्नाटक विधानसभा निकालाची धाकधूक, कुठं 'केरला स्टोरी'ची धामधूम तर कुठं त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वादाचा ढोल वाजतोय. देशभरातल्या डाव्या-उजव्या कार्यकर्त्यांच्या या धांगडधिंग्याच्या नादी न लागता देशातल्या तरुणाईने मात्र वेगळीच धून पकडत धिंगाणा घातलाय. ती धून म्हणजे, 'बेबी काम डाऊन, ओ, काम डाऊन'!

फेब्रुवारी २०२२मधे रिलीज झालेलं हे ऍफ्रोबीट प्रकारातलं गाणं गेलं वर्षभर लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक मोडत चाललंय. या गाण्याचा गायक असलेला नायजेरियन रॅपर रेमा नुकताच तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येऊन गेला. या त्याच्या 'काम डाऊन इंडिया टूर'ला इथल्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी दिलेला प्रतिसाद चर्चेचा विषय ठरलाय.

कोण आहे हा रेमा?

'बेबी काम डाऊन' गाणाऱ्या रेमाचं खरं नाव डिवाइन इकुबोर. नायजेरियातल्या बेनिन शहरात लहानाचा मोठा झालेला डिवाइन लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकतोय. अगदी लहानपणीच तो गाऊ लागला आणि आपण याच क्षेत्रात करियर करायचं असं त्याने ठरवलं. पण बाप आणि भावाच्या अकाली निधनामुळे डिवाइनला घरातला कर्ता पुरुष बनावं लागलं.

एकीकडे कमी वयात आलेली जबाबदारी आणि दुसरीकडे सतत खुणावत राहणारं संगीतविश्व यात डिवाइनची शारीरिक आणि मानसिक दमछाक होणं साहजिकच होतं. पण या सगळ्या ताणतणावावर मात करण्यासाठी शेवटी संगीतच त्याच्या मदतीला धावून यायचं. नायजेरियाचं संगीतविश्व कायमच गजबजलेलं असायचं. प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात डिवाइनचं टिकणं अवघड होतं खरं, पण त्याला त्याच्या जिद्दीनेच तारलं.

एकेकाळी स्थानिक चर्चमधल्या गायकचमूचा म्होरक्या असलेल्या डिवाइनला परिस्थितीमुळे पुढे वेगवेगळ्या स्पर्धा, रॅली आणि बारमधे गावं लागलं. आपल्या हातात कधी माईक येतो, आपण कधी गातो आणि लोकांनी आपल्यावर उधळलेले पैसे घेऊन आपण घरी कसं जातो याचीच तो वाट बघत असायचा. चर्चमधे देवासाठी गातो म्हणून पैसे मिळवण्यापेक्षा स्वतःसाठी गाऊन पैसे कमावणं त्याला जास्त महत्त्वाचं वाटलं.

२०१९मधे डी'प्रिन्स या स्थानिक लोकप्रिय रॅपरच्या 'गुच्ची गँग'वर डिवाइनने केलेला फ्रीस्टाईल रॅप वायरल झाला. ते बघून डी'प्रिन्सने त्याला नवं गाणं रेकॉर्ड करायची ऑफर दिली आणि सोबतच ऍफ्रोबीट संगीतप्रकाराची व्यवस्थित ओळख करून दिली. पुढे काही महिन्यातच त्याने 'रेमा' या नावाचा आपला एक छोटा अल्बम रिलीज केला, जो 'ऍप्पल म्युझिक नायजेरिया'वर बराच काळ ट्रेण्डिंग होता.

ऍफ्रोबीट संगीतप्रकाराचा विशेष प्रभाव

डी'प्रिन्सच्या शिकवणीनंतर रेमावर ऍफ्रोबीट या नायजेरियन संगीतप्रकाराचा विशेष प्रभाव पडला. ऍफ्रोबीटचा आद्य प्रणेता समजला जाणारा नायजेरियन संगीतकार आणि राजकीय कार्यकर्ता फेला कुटी हा रेमाचा आदर्श. सुरवातीच्या काळात फेलाने राजकीय भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय आणि जनसामान्यांच्या अडचणींसाठी प्रबोधनात्मक उपाय म्हणून या संगीताचा वापर केला होता. त्यामुळे अगदी कमी वेळातच ऍफ्रोबीट प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

नायजेरियन संगीत, जॅझ, हायलाईफ, फंक अशा विविध संगीतप्रकारांचा मिलाफ ऍफ्रोबीटमधे पाहायला मिळतो. समजायला अवघड वाटणारा तरीही थिरकायला भाग पाडणारा वाद्यमेळ आणि ताल त्याचबरोबर सामाजिक-राजकीय संदेशाची पेरणी केलेली गाणी ही खरं तर ऍफ्रोबीटची खासियत. ड्रम, हॉर्न, गिटार, पियानो असा वैविध्यपूर्ण आणि मोठा वाद्यमेळ असल्याने गायकांसोबतच वादकांनाही आपलं कौशल्य दाखवण्याची संधी हा संगीतप्रकार देतो.   

ऍफ्रोबीट संगीतप्रकार म्हणलं तर विझकीड, डेविडो आणि बर्ना बॉयसारख्या कलाकारांचं नाव चटकन डोळ्यासमोर येतं. या कलाकारांनी ऍफ्रोबीट संगीताची हिप-हॉप, पॉप आणि रॅपसारख्या आधुनिक संगीतप्रकाराशी सांगड घातली आणि ऍफ्रोबीट संगीत जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. फेलाने रचलेल्या पायाच्या आणि इतर कलाकारांनी रचलेल्या भिंतींच्या साहाय्याने उभारलेल्या ऍफ्रोबीटच्या लोकप्रियतेच्या देवळावर रेमाच्या एकाच गाण्याने कळस चढवलाय.        
     
'काम डाऊन'चं यश

रेमाच्या 'काम डाऊन' या गाण्याला जागतिक स्तरावर न भूतो न भविष्यती असं यश मिळालेलं असलं तरी त्याच्या इतर गाण्यांनीही आपला वेगळा ठसा या संगीतविश्वात उमटवलाय. 'रेमा'मधलं 'डुमेबी' हे रेमाचं पहिलं हिट गाणं. २०१९मधे याच अल्बममधलं 'आयरन मॅन' हे गाणं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याही प्लेलिस्टवर झळकलं होतं.           

अर्थात, २०२२ला आलेल्या 'रेव अँड रोजेस' या अल्बममधल्या 'काम डाऊन' या लोकप्रिय अभिनेत्री सेलेना गोमेजसोबतच्या गाण्याने रेमाला आणि पर्यायाने ऍफ्रोबीटला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं. मेना म्हणजेच मध्य पूर्व तसंच उत्तर आफ्रिकेतल्या १३ देशांमधेही या गाण्याने लोकप्रियतेचे उच्चांक मोडल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे या गाण्याची 'मेना चार्टवरचं पहिलं हिट गाणं' अशी नोंद घेतली गेली.  

एखादं गाणं कितीवेळा विकलं किंवा ऐकलं जातं त्यावरून त्या गाण्याला गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड अशी तीन प्रमाणपत्रं दिली जातात. उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण १५ देशांमधून ६ गोल्ड, १९ प्लॅटिनम आणि १ डायमंड प्रमाणपत्र 'काम डाऊन'ने मिळवलंय. युट्यूबवर सर्वाधिकवेळा पाहिलेल्या ऍफ्रोबीट गाण्याचा मानही 'काम डाऊन'लाच जातो. 'काम डाऊन'चं हे यश ऍफ्रोबीट संगीताच्या भविष्यासाठी महत्त्वाचं मानलं जातंय. 

वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी ब्लॅक एंटरटेन्मेंट टेलीविजन म्हणजेच बेट पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा सर्वात तरुण नायजेरियन कलाकार ठरलाय. वयाची तेविशी पूर्ण केलेल्या रेमाची गेल्या चार-पाच वर्षांतली कारकीर्द कुणालाही हेवा वाटावी अशीच आहे. त्याच्या गाण्यांना जगभरातून मिळत असलेला प्रतिसाद बघून फिफानेही त्याची गाणी त्यांच्या 'फिफा २१' अल्बममधे ठेवली होती.

रेमाची भारतातली लोकप्रियता

सध्या रेमा आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या देशाचे दौरे आखतोय. त्यातलाच एक विशेष दौरा त्याने भारतात केला. तीन दिवस तीन वेगवेगळ्या शहरात आपली कॉन्सर्ट भरवलेल्या रेमाला भारतीयांनी जोरदार प्रतिसाद दिलाय. हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई या भारतातल्या काही प्रमुख शहरांपैकी तीन शहरांमधे भरलेल्या या कॉन्सर्टमधे सामील व्हायचा मोह अनेक भारतीय सेलिब्रिटींनाही आवरला नाही.

रेमा या दौऱ्यात अभिनेत्री नोरा फतेहीसोबत थिरकताना दिसला. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या पेहरावात रेमा दिल्लीच्या कॉन्सर्टमधे दिसला होता. 'काम डाऊन'वर अनेक भारतीयांनी रील्स बनवले होते. त्यापैकी फैजल शेखसारख्या काही मोजक्या इन्फ्लुएन्सरचीही भेट रेमाने घेतली. सुप्रसिद्ध भारतीय रॅपर बादशाहचं गाजलेलं 'जुगनू' हे गाणं रेमाने आपल्या फोनची रिंगटोन म्हणून ठेवल्याचं पाहायला मिळालं.

आपल्याला बादशाहसोबत काम करायचंय असं स्वतः रॅपर असलेल्या रेमाने म्हणणं स्वाभाविकच आहे. पण त्याला त्याहीपुढे जाऊन ए आर रहमानसोबतही काम करायची इच्छा असल्याचं त्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. लहानपणापासून घरात भारतीय सिनेमांमधे वाजणारी गाणी ऐकली जात असल्याचं तो सांगतो. नायजेरियात बॉलीवूडच्या सिनेमांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने भारताबद्दल रेमाच्या मनात साहजिकच अतीव आदर आणि जिव्हाळा असल्याचं दिसतं.

ऍफ्रोबीटला जन्म देणारा फेला भलेही भारतीयांना माहितही नसेल, पण रेमाचं संगीत कानावर पडताच त्यांना ‘काम डाऊन’ व्हावंसं वाटतं. याचं कारण म्हणजे, रेमा आपल्या गाण्यांना ऍफ्रोबीट न म्हणता 'ऍफ्रोरेव' म्हणतो. आपल्या गाण्यांवर भारतीय आणि अरबी संगीताचा प्रभाव असल्याने तो ऍफ्रोरेव हा शब्द वापरतो. भौगोलिक सीमा ओलांडून हा असा सांगीतिक मिलाफ साधणारं रेमाचं संगीत भारतीयांना आवडलं नसतं तर नवलच!