अमेझॉनचं जंगल म्हणतंय 'थँक यू’!

०५ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


जगभरातल्या विविध देशात कायमच निवडणुका होत असतात. कोणी तरी जिंकतं कोणी तरी हरतं. पण ब्राझीलमधे नुकतीच झालेली अध्यक्षपदाची निवडणूक साऱ्या जगातल्या सर्व प्राणीमात्रांसाठी महत्त्वाची होती. कारण या निवडीवर जगाचं फुफ्फुस असलेल्या, अमेझॉनच्या जंगलाचं भविष्य ठरणार होतं. शेवटी विजय निसर्गाचाच झाला. जंगल कापणारा हरला आणि अमेझॉनच्या जंगलानं ब्राझीलला 'थँक यू' म्हटलं!

मतपेटीच्या माध्यमातून ब्राझीलमधे सत्तांतर झालंय. तिथल्या नागरिकांनी गेली चार वर्ष अध्यक्ष असलेल्या जाईर बोल्सेनारो यांना हरवून, पदावरून दूर केलंय. हा पराभव अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे. कारण याच बोल्सेनारो यांनी जगातलं सर्वात मोठं वर्षावन असलेल्या अमेझॉनच्या जंगलाचा विध्वंस करायला सुरवात केली होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल १५ टक्के जंगल उध्वस्त केलं, असं पर्यावरणविषयक अहवाल सांगतात. त्यामुळे त्यांचा पराभव हा निसर्गाचा विजय, असल्याची प्रतिक्रिया साऱ्या जगभरात उमटली आहे.

कसा दिलाय ब्राझीलनं कौल?

ब्राझीलच्या निवडणुकीत अमेझॉनचं जंगल वाचवणं हा महत्त्वाचा मुद्दा होताच, पण त्यासोबत एकंदरीतच बोल्सेनारो यांचं एककल्ली, हुकुमशाही वृत्तीनं वागणं हे देखील कारणीभूत होतं. त्याचप्रमाणे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे. बेकारी आणि उपासमारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सगळ्याचाच परिणाम ब्राझीलच्या निकालावर झाला आणि बोल्सेनारो यांना खुर्ची खाली करावी लागली. अमेझॉनसह ब्राझीलला सावरण्याचं आश्वासन देणाऱ्या लुला डिसिल्वा यांनी बोल्सेनारो यांचा पराभव केला आहे. 

ब्राझीलच्या निवडणूक यंत्रणेच्या आकडेवारीनुसार, डिसिल्वा यांना ५०.९ टक्के, तर बोल्सोनारो यांना ४९.१ टक्के मतं मिळाली. हा विजय फार मोठ्या मताधिक्याचा नसला, तरी बोल्सेनारो यांना पायउतार व्हावं लागणं, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्या या पराभवानंतर, लुला समर्थकांनी ब्राझीलभर मोठा जल्लोष केला. एवढंच नाही तर जगभरातल्या पर्यावरणाच्या अभ्यासकांनी सोशल मीडियावर आनंदाच्या पोस्टचा अक्षरशः पाऊस पाडला.

राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं तर जगभरात फोफावत असलेल्या भांडवलाशाहीवर आधारीत अतिउजव्या राजकारणाविरोधातला कौल म्हणूनही याकडे पाहता येईल. तसंच लुल्ला यांचा विजय हा डाव्या, समाजवादी विचारांना पुन्हा एकदा संधी अशा दृष्टिनंही पाहिला जातोय. पण या राजकीय साठेमारीपेक्षाही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अमेझॉनच्या जंगलांची सुरक्षा कायम राहणं जगासाठी, माणूस या प्राण्यासह सर्व सजीवांसाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे.

अमेझॉनच्या जंगलाचं महत्त्व का?

ब्राझीलसह एकूण नऊ देशांना व्यापणारं जगातलं सर्वात मोठं जंगल असलेल्या अमेझॉनचं जंगल तब्बल जवळपास ७० लाख चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रात वसलेलं आहे. साधारणतः त्याची ही व्याप्ती समजायची असेल तर, संपूर्ण भारतापेक्षा दीडपट मोठ्या जागेत हे जंगल पसरलंय असं म्हणता येईल. जगभरातल्या सजीवांना जगण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनमधला २० टक्के ऑक्सिजन अमेझॉनमधून तयार होतो, एवढं जरी कळलं तरी त्याचं महत्त्व आपल्याला कळेल.

एवढ्या मोठ्या जंगलात नैसर्गिक जैवविवधताही तेवढीच मोठी आहे. जवळपास ११,२०० वर्षांपूर्वी इथं लोकांनी रहायला सुरवात केली. २५ लाखांपेक्षा जास्त कीटक, वनस्पतींच्या ४०,००० प्रजाती तसंच हजारो पक्षी इथं वास्तव्य करतात. ४३० प्रकारचे सस्तन प्राणी आहेत. ३००० प्रकारचे मासे आढळतात. त्यामुळे पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीनंही अमेझॉनचं जंगल ही पृथ्वीवरची सर्वात मोठी जागा आहे. त्यामुळे ती सुरक्षित राहणं, जीवसृष्टीसाठीही फार महत्त्वाचं आहे.

अमेझॉनचं जंगल हे नऊ देशांचं असलं तरी तिथं वर्चस्व आहे ते ब्राझीलचं. कारण, अमेझॉन जंगलाचा जवळपास ६० टक्के भाग हा ब्राझीलच्या सीमेमधे येतो. त्यामुळे ब्राझीलने अमेझॉनबद्दल घेतलेला कोणताही निर्णय हा त्या पूर्ण जंगलावर परिणाम करतो. गेल्या काही दशकांमधे वाढत्या ऑद्योगिकीकरणामुळे, शहरीकरणामुळे आणि भांडवलशाही प्रवृत्तीमुळे अमेझॉनचं जंगल अनेक बाजुंनी पोखरलं जातंय. या सगळ्याचा दूरदृष्टीने पुढच्या पिढ्यांचा विचार करून, निर्णय घ्यावा लागेल. पण त्यासाठी ब्राझीलचं नेतृत्त्व पर्यावरणाचा विचार मानणारं असणं, जगासाठी गरजेचं आहे.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

बोल्सेनारोंची पर्यावरणविरोधी भूमिका

बोल्सेनारो हे मुळातच दिखाऊ विकासासाठी वाट्टेल ते या विचारांचे आहेत. त्यामुळे त्यांनी सत्तेत येताच, बेसुमार खाणकाम, लाकुडतोड, अनियंत्रित बांधकाम यांना वरदहस्त दिला. पर्यावरणवादी चळवळी चिरडून टाकल्या. जंगलातली जमीन मोकळी करून तिथं विविध उद्योग, शेती, पशुपालन यासाठी मोकळीक दिली. त्यामुळे कंत्राटदारांच्या हातात जगाची ही हरितसंपत्ती देऊन बोल्सेनारो मोकळे झाले.

१ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२१ अशा चार वर्षाच्या काळात बोल्सेनारो हे ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर होते. या काळात तब्बल ३४ हजार चौरस किलोमीटर जंगलाचा विनाश झाला, अशी आकडेवारी सांगते. या नष्ट झालेल्या जंगलांचं क्षेत्र बेल्जियम या देशापेक्षाही जास्त आहे. यावरून हे नुकसान किती मोठं आहे, याचा आपल्याला अंदाज येतो.

एकीकडे अमेझॉनच्या जंगलाला लागणाऱ्या आगी वाढल्या आहेत. या आगींचे विमानानं, सॅटेलाइटनी काढलेले फोटो जगभर वायरल झाले आहेत. या आगी लागल्या आहेत की लावल्या आहेत, असा संशय सर्वत्र व्यक्त होत होतोय. दुसरीकडे जंगलामधे होणारी प्रचंड वृक्षतोडही तशीच सुरू आहे. अमेझॉनमधून दर मिनिटाला एका फुटबॉल मैदानाएवढं जंगल कापून टाकलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे बोल्सेनारो अध्यक्ष झाल्यानंतर या आगींचा आणि वृक्षतोडीच्या घटनांना वेग आला होता. या सगळ्या घटनांबद्दल ब्राझीलवर जगभरातून दबाव होता. पण, या सगळ्या दबावाला किंमत न देता, बोल्सेनारो यांनी आपली धोरणं उद्दामपणे पुढे रेटली.

लुलांनी दिलं 'हिरवं' वचन

बोल्सेनारो यांना हरवून अध्यक्ष झालेले लुला हे देखील २००३ ते २०१० या काळात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष होते. त्या कारकीर्दीत ते मतदारांमधे खूप लोकप्रिय झाले होते. कारण त्यांनी हजारो नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं होतं. पण, पुढे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना त्यांची परंपरा राखता न आल्यानं बोल्सेनारो यांच्या हातात २०१९ मधे सत्ता गेली आणि अमेझॉनमधल्या पर्यावरणासह ब्राझीलची पुरती वाट लागली.

लुला हे घरची गरिबी अनुभवलेले आणि पुढे कामगार वर्गातून मोठे झालेले राजकारणी आहेत. त्यामुळे तळागाळातल्या लोकांच्या दुःखाची त्यांना चांगली जाणीव आहे. कामगार संघटना आणि त्यातल्या राजकारणातून त्यांचा प्रवास झाल्याने ते डाव्या विचारधारेचे मानले जातात. सलग दोन वेळेला लुला अध्यक्ष राहिले. वैचारिकदृष्टय़ा ते डावे असूनही भांडवलाच्या प्रवाहात आणि भांडवलदारांच्या गुंतवणूक निर्णयांत ते अडथळा ठरले नाहीत, हे त्यांचं वैशिष्ट्य मानलं जातं.

ब्राझीलनं पुन्हा एकदा निवडून दिलेल्या लुला यांनी आपल्या भाषणात अमेझॉन वाचवण्याचं 'हिरवं' वचन जगाला दिलं आहे. ते म्हणाले की, 'मी साऱ्या जगाला सांगून इच्छितो की ब्राझील परत आलाय. ब्राझीलनं गमावलेलं वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अमेझॉनचा होत असेला विनाश हा मानवतेसाठी घातक असून, तो थांबवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. सध्या सुरू असलेली या जंगलांची तोड थांबवण्यासाठी, प्रसंगी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा स्वीकार करायलाही आम्ही तयार आहोत.'

एकीकडे अमेझॉनचं जंगल संपत असताना, ब्राझीलची अर्थव्यवस्थाही गाळात चालली आहे. अमेझॉनच्या विनाशामुळे ब्राझीलला जगाने विलन ठरवलं आहे. जणूकाही आम्हाला बहिष्कृत करण्यात आलं होतं. त्यामुळे आता नवा ब्राझील घडवण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. ब्राझीलमधे तीन कोटीहून अधिकजण उपासमारीने बळी पडले आहेत. त्यामुळे अमेझॉनसह अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आपण पुन्हा एकदा उभे राहू, असं लुला यांनी सर्वांना वचन दिलंय.

हेही वाचा: 

एका झाडाची किंमत शोधली कशी?

मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!

‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलूया