पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावणी, टाळ्या वाजवण्याचं आवाहन केल्यावर त्याला विरोध झाला. पण पंतप्रधानांनी मास्क वापर म्हटल्यावर सगळ्यांनी त्याचं अंमल सुरू केला. तिकडे अमेरिकेत मात्र मास्क वापरण्यावरून देशात दोन गट निर्माण झाले. ‘मास्क‘वाद निर्माण झालाय.
‘अदृश्य चीनी वायरसला हरवण्याच्या प्रयत्नात आम्ही सारे एकजूट झालोय. आणि अनेकजण सांगतात, की तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळू शकत नसाल तर तोंडाला मास्क लावणं ही देशभक्ती आहे. माझ्यापेक्षा म्हणजेच तुमच्या आवडत्या राष्ट्राध्यक्षापेक्षा जास्त देशभक्त दुसरं कुणी नसणार!’ – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
मास्क हे कोरोना वायरसविरोधातल्या लढ्याचं एक प्रतीक बनलंय. मास्कमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास फार मोठा हातभार लागतो, हे वेगवेगळ्या संशोधनातूनही सिद्ध झालंय. कोरोनाच्या सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनीच मास्क वापरणं गरजेचं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेसह तज्ञांनीही सांगितलं. त्याचवेळी काहींनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचं सांगितलं. त्यामुळे लोकांमधे संभ्रम झाला.
जगभरातल्या बाजारात मास्कचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. पण जसंजसं कोरोनाचा विविधांगी अभ्यास समोर येऊ लागला तसातसा या वायरसचा धोकाही स्पष्ट होऊ लागला. त्यामुळेच कोरोनाबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांमधे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओकडून वेळोवेळी आवश्यक ते बदल सुचवण्यात आले. डब्ल्यूएचओच्या एका अभ्यासानुसार, मास्कचा योग्य वापर केल्यास कोरोनाच्या प्रसाराचा धोका ८५ टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे अनेक देशांनीही मास्क वापरणं बंधनकारक केलं.
हेही वाचा : अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
कोरोनावरची लस येईपर्यंत घराबाहेर पडताना, कामावर जाताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना आपल्याला मास्क वापरावा लागणार आहे. पण काही देशांत मास्कला विरोध होतोय. मास्कविरोधात आंदोलनं सुरू आहेत. मास्कची झंझट कशाला असा सवाल करत आहेत. दारू पिऊन गाडी चालवू नये किंवा सीटबेल्ट न लावता गाडी चालवणं हे लोकांच्या अंगवळणी पडायला जसा वेळ लागला, तसं तोंडाला मास्क लावण्याची सवय लागायलाही वेळ लागेल. त्यासाठी प्रयत्नही करावे लागतील.
सरकारला ठोस धोरण राबवावं लागेल. सीटबेल्ट लावून गाडी चालवण्यासाठी जसा कायदा केला तसा कायदा करावा लागेल. मेक्सिकोसारख्या देशात सरकारने पुढाकार घेत लोकांना मास्कचं मोफत वाटप केलं. भारतातही आपण सरकारनं सांगितल्यावर लगेच मास्क वापरायला सुरवात केली. गावागावात वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी मास्क बनवून लोकांना मोफत वाटले.
जपान, चीन, तैवान, हाँगकाँग यासारख्या आशियाई देशांमधे २००३ मधे सार्सचा उद्रेक झाला तेव्हापासून लोकांनी मास्क वापरणं सुरू केलंय. त्यामुळेच या देशांमधे युरोप, अमेरिकेच्या तुलनेत कोरोनाचा जास्त फैलाव झाला नसल्याचं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. मास्कचे लाख फायदे असले तरी यावरून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतलं राजकारण तापलंय.
अमेरिकेत ४० लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झालीय, तर आतापर्यंत जवळपास दीड लाख लोकांचा जीव गेलाय. कोरोनानं एवढा धुमाकूळ घातला असतानाही अमेरिकेत कोरोनाला अटकाव करणाऱ्या मास्कच्या वापरावरून दोन गट पडलेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मास्क वापरण्यासाठी देशपातळीवर कायदा लागू न करणाऱ्या गटाचे नेते बनलेत.
ट्रम्प यांनी मास्कविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी स्वतःला या कॅम्पेनमधून बाजूला केलंय. याउलट अमेरिकेतला विरोधी पक्ष डेमोक्रॅटिकच्या नेत्यांनी मास्क वापराला पाठिंबा दिलाय. डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांनी मास्क वापराचा कायदा लागू केलाय. अमेरिकत सध्या राष्ट्राध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मास्क’वादाने नव्या चर्चेला तोंड फोडलंय.
कोरोनाला एक साधा फ्लूचा वायरस म्हणणारे ट्रम्प सुरवातीपासूनच मास्क वापराच्या विरोधात आहेत. पण १२ जुलैला सैन्यदलाच्या एका दवाखान्याला भेट देताना त्यांनी पहिल्यांदा मास्क वापरला. ट्रम्प यांनी मास्क वापरला, अशी ब्रेकिंग न्यूज जगभरात झळकली.
ट्रम्प यांचा हा फोटो त्या दिवशी जगभरात खूप वायरल झाला. आपल्या मास्क घालण्याविषयी ते म्हणाले, ‘मी कधीच मास्कच्या विरोधात नाही. पण मास्क वापरायची एक निश्चित वेळ आणि जागा आहे.’ मी मास्कविरोधी नाही असं म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच मी मास्क वापरणार नाही असं स्पष्ट केलं होतं. आणि एवढंच नाही तर मास्क वापरणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांची खिल्लीही उडवली होती.
हेही वाचा : अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव
ट्रम्प यांनी गेल्या मंगळवारी मास्क लावलेला फोटो ट्विटरवर शेअर करत आपण अव्वल देशभक्त असल्याचा दावा केला. पण ट्रम्प यांची आतापर्यंतची भूमिका बघितल्यास त्यांच्या या ट्विटचा एवढा साधासरळ अर्थ निघत नाही. त्यांनी आपल्या विरोधकांना टोमणा मारण्यासाठीही देशभक्तीचं सर्टिफिकेट बाहेर काढलेलं असावं. कारण, काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकी नागरिकांनी मास्क वापरणं बंधनकारक केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यांवर गदा नको, असं म्हणत ट्रम्प आपल्या या युक्तिवादाचा बचाव करतात.
ट्रम्प यांच्या या ट्विटचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. अमेरिकेचे प्रमुख साथरोगतज्ञ डॉ. अँथोनी फाऊची यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यासंबंधी कठोर नियम अमलात आणावेत, असं आवाहन सरकारला केलं होतं. पण फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ‘मास्क वापरल्यानं सारं काही संपेल, या विधानाशी मी सहमत नाही’ असं स्पष्टीकरण दिलं.
आरोग्य अधिकाऱ्यांनी सुरवातीला दिलेल्या वक्तव्यांचा हवाला देत ते म्हणाले, ‘डॉ. फाऊची मास्क वापरण्याची गरज नाही म्हणत होते. आमचे मुख्य शल्यचिकित्सकही असंच सांगायचे. आता ते अचानकपणे सर्वांनी मास्क वापरावा असं सांगत आहेत. तुम्हाला माहितीय का, की मास्क वापरल्यानं काही समस्याही उद्भवतात.’
असोसिएट प्रेस अर्थात एपी या वृत्तसंस्थेनं ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांशी बोलून मास्कचं पॉलिटिक्स समजून घेतलं. या लोकांच्या मते, मास्क वापरल्यानं आपण कमजोर दिसू आणि यातून लोकांचं लक्ष अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्याऐवजी आरोग्य संकटावर केंद्रित होईल. ट्रम्प यांना देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा स्वतःच्या जीवाचीच जास्त काळजी आहे, असं जनमत बनेल, अशी भीती ट्रम्प यांना वाटते.
मास्कला विरोध करणारे ट्रम्प काही एकटेच राजकारणी नाहीत. कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिकेनंतर ब्राझीलचा दुसरा नंबर येतो. त्या ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सेनारो यांनी तर कहरच केला. बोल्सेनारो यांनी एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. पत्रकार परिषदेतच त्यांनी स्वतःलाही कोरोना झाल्याचं सांगितलं. तोंडाला मास्क न लावताच ते पत्रकारांशी बोलत होते.
या प्रकरणात पत्रकारांनी बोल्सेनारो यांच्याविरोधात खटला दाखल केलाय. आणि मास्क न वापरणारे राजकारणी फक्त परदेशातच आहेत, असं नाही. पण मास्क वापराला कुणी विरोध केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावायला सांगितल्यावर टीका झाली होती, तसं काही मास्कच्या बाबतीत झालं नाही. तरीही आपल्याकडेही टीवी सुरू केल्यावर अशा बेजबाबदार राजकारण्यांची फौजच्या फौज दिसते. यामधे कुठला पक्ष चांगला किंवा वाईट असं काही नाही. मास्क वापरल्यानं आपण दुबळे दिसू अशी भीती या सगळ्यांना वाटते.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
रॉयल सोसायटी या ब्रिटिश संस्थेच्या अभ्यासानुसार, जगभरातल्या जवळपास ७१ देशांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यासंबंधी कायदेकानून लागू केलेत. १७ देशांनी तर हरेक ठिकाणी मास्क वापरण्याचा कायदा केलाय. ब्रिटनमधे केवळ कोरोना हॉटस्पॉट, दवाखाने किंवा सार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. २४ जुलैपासून हा नियम अमलात येणार आहे. पण सरकारच्या या निर्णयाविरोधात काही लोक मानवाधिकारांची ढाल पुढे करत सरसकट मास्क वापराला विरोध करत आहेत. भारतात १ मेपासून मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय.
मास्क वापरल्यानं जीव वाचतो, हे आपल्याला कळालंय. पण हाच मास्क अर्थव्यवस्थेच्याही दाणापाण्याची सोय करतो, असं कुणी आपल्याला सांगितलं तर आपण त्याला वेड्यात काढू. पण जिथे मास्क घातल्यानं काहीजणांना गुदमरल्यासारखं होतं, त्याच मास्कमुळे आता अर्थव्यवस्थेलाही मोकळा श्वास घेणं शक्य होत असल्याचं एका अहवालातून समोर आलंय.
कोरोनानं आतापर्यंत सहा-सात लाख लोकांचा जीव घेतलाय. आणि जे जिवंत आहेत, त्यांच्यापैकी अनेकांना बेरोजगार केलंय. कोरोनाचं हे संकट एवढ्यात संपणार नसल्याने जवळपास सगळ्याच मोठमोठ्या संस्था, संघटनांनी आता कोरोनासोबत जगायला शिका, असं सांगणं सुरू केलंय. त्यामुळे कोरोनाला जे करायचं ते करू द्या, पण लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं चिखलात खोलवर रुतलेलं चाक मात्र आता बाहेर काढा अशी मागणी होतेय.
कोरोनासोबत जगणं कसं सुरू करता येईल, त्यासाठीचे वेगवेगळे मार्ग सांगितले जात आहेत. वैद्यकीय उपायांसोबतच हात धुणे, शारीरिक अंतर राखणे आणि मास्क वापरणं हे कोरोनाला रोखण्यासाठीचे महत्त्वाचे मार्ग आहेत. लॅन्सेट या मेडिकल जर्नलमधे प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, शारीरिक अंतर राखणे, हात धुणे यासारख्या उपाययोजनांसोबतच व्यापक पातळीवर मास्क वापरून अर्थव्यवस्थेचं गाडं सुरक्षितपणे पुढं हाकता येऊ शकतं.
आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था गोल्डमन सॅक्सने गेल्या महिन्यात मास्कचा वापर आणि अर्थव्यवस्था यावर एक अहवाल प्रसिद्ध केलाय. हा अहवाल सांगतो, ‘मास्क वापरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास ही गोष्ट फक्त सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनंच नाही तर अर्थव्यवस्थेच्याही हिताची आहे. कारण नव्यानं लॉकडाऊन न लावता बाजाराचं चक्र सुरू ठेवता येईल. अन्यथा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.’
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान झालं. आरोग्य संकट सोडवताना आर्थिक संकट उभं झालं. अशावेळी कठोर लॉकडाऊन न लावता नीटपणे मास्क वापरण्याचं धोरण अमलात आणलं तर कोरोनाच्या फैलावाला मोठा लगाम बसेल. नव्यानं संक्रमणाच्या घटनांमधे फार मोठी घट होईल.
हेही वाचा : ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
या अहवालानुसार, अमेरिकेनं राष्ट्रीय पातळीवर मास्क वापरण्यासाठीचं धोरण अमलात आणल्यास देशाच्या जीडीपीचा ५ टक्के तोटा कमी होऊ शकतो. फोर्ब्ज मासिकाच्या मते, ही अपेक्षित बचत १ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. मास्क वापरणं बंधनकारक केल्यास कोरोनाच्या दैनंदिन वाढीचा दर १.६ टक्क्यांवरून ०.६ टक्के होईल. तसंच मास्क बंधनकारक केल्यास कोरोनाच्या वाढीचा साप्ताहिक दर १० टक्क्यांनी कमी होईल. मास्कशिवाय कोरोनाचा साप्ताहिक वाढीचा दर १७.३ टक्के आहे, तो मास्क वापरणं बंधनकारक केल्यास थेट ७.३ टक्क्यांवर येईल.
लॉकडाऊनमुळे अमेरिकेच्या जीडीपीचं आतापर्यंत जे नुकसान झालंय त्यात मास्क वापरामुळे कमीत कमी पाच टक्के सुधारणा होऊ शकते. मास्क वापरण्यावरून सरकारं, राजकारणी यांच्यात मतभेद असले तर बहुसंख्य जनतेच्या मनात याबद्दल कोणताही संभ्रम नाही. न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या एका सर्वेक्षणात सहभागी ५४ टक्के लोकांनी आपण मास्क वापरत असल्याचं सांगितलं. २२ टक्के लोकांनी गरजेनुसार मास्कचा वापर करत असल्याचं तर केवळ २२ टक्के लोकांनी कधीतरी किंवा कधी मास्क वापरलं नसल्याचं सांगितलं.
भारतात दोन महिन्यांचा लॉकडाऊन संपल्यावर अनलॉकिंगच्या प्रक्रियेदरम्यान पुन्हा कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरू झालाय. सरकार, प्रशासन यांची घाबरगुंडी उडालीय. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा छोटे-छोटो लॉकडाऊन लागू करण्यात आलेत.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मुंबई शहर सोडलं तर सध्या जवळजवळ सारा महाराष्ट्र छोट्या-छोट्या लॉकडाऊनमधे अडकलाय. या लॉकडाऊनला उद्योग संघटनांनी, व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. भारतातही मास्कचा प्रभावी वापर करून उद्योगधंद्यांचं गाडं पुढं हाकता येऊ शकतं. मास्क वापरण्याबद्दल लोकांमधे जनजागृती करणं ही काळाची गरज आहे. आपलं अमूल्य जीवन, रोजगार आणि अर्थव्यवस्था या सगळ्यांना मास्कमुळे एक सुरक्षा कवच मिळेल.
हेही वाचा :
चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?
अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट
वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?