अमित शहा ज्युनियर एनटीआरची अचानक भेट का घेतात?

२५ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

‘द ग्लोरी ऑफ इंडियन सिनेमा’ अशी टॅगलाईन घेऊन आलेल्या ‘आरआरआर’ने यावर्षी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. गेल्या रविवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ‘यंग टायगर’ ज्युनियर एनटीआर म्हणजेच तारकला आपल्या भेटीसाठी बोलवलं. ‘आरआरआर’मधल्या तारकच्या अभिनयाने प्रभावित होऊन शहा यांनी सिनेमाविषयक चर्चेसाठी त्याला आमंत्रण पाठवल्याचं भाजप तेलंगणाचे पदाधिकारी सांगतात.

हैदराबादमधे झालेल्या या भेटीत दोघांमधे अनेक विषयांवर बराच वेळ चर्चा झाल्याचं बोललं जातं. पण गेली काही वर्षं ‘ऑपरेशन कमळ’च्या ध्यासाने झपाटलेले शहा फक्त सिनेमा आवडला म्हणून एका नटाला भेटायला तयार झाले हे कुणाच्याही पचनी पडण्यासारखं नाही. त्यामुळे या भेटीला राजकीय वळण लागलंय. आपला लाडका सिनेनायक तारकच्या गळ्यात भावी मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार का हा प्रश्न त्याच्या चाहतेवर्गात पुन्हा जोम धरू लागलाय.

आता मिशन तेलंगणा?

तेलंगणातल्या मुनूगोडमधे विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहा यांनी हैदराबाद दौऱ्यावर आहेत. मुळात या विधानसभेत पोटनिवडणुकीची गरज नसतानाही भाजप इथं पोटनिवडणूक लादू पाहत असल्याचा आरोप तेलंगणा विधानपरिषद सभापती कोत्ता सुकंदर रेड्डी यांनी आपल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या मते, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप तेलंगणात आपला जम बसवू पाहतोय.

स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीपासून या राज्यात तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसची एकहाती सत्ता आहे. गेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा भाजपकडून टी. राजा सिंग हा एकच उमेदवार निवडून आला. नंतर दोन पोटनिवडणुकींमधे विजय मिळवून भाजपने कसंबसं आपलं त्रिकुट जमवलं खरं, पण सिंग पक्षातून निलंबित झाल्यामुळे सध्या भाजपकडे दोनच आमदारांचं संख्याबळ शिल्लक आहे.

२०१८च्या विधानसभा निवडणुकीत कोमाटीरेड्डी राज गोपाल रेड्डी यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत मुनूगोडमधून आमदारकी मिळवली होती. यावर्षी ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवल्याने इथं पुन्हा पोटनिवडणूक जाहीर झालीय. त्यांच्या भाजप प्रवेशाने इथलं राजकारण ढवळून निघालंय. कोमाटीरेड्डी यांना प्रलोभनं देऊन राजीनामा देण्यास भाग पाडल्याचाही आरोप सभापती रेड्डी यांनी केलाय.

इतरपक्षीय पदाधिकाऱ्यांना दबावतंत्राखाली आणून सत्तास्थापनेचा असा प्रयोग भाजपसाठी नवा नाही. तेलंगणातल्या पोटनिवडणुकींचा आधार घेत एकेक गड काबीज करू पाहणाऱ्या भाजपला यासाठी बरीच मेहनत करावी लागणार असल्याचं दिसतं. तितका वेळ वाया घालवण्याची भाजप पक्षश्रेष्ठींची तयारी नाही. त्यामुळेच एकेकाळी तेलुगू देसम पार्टी म्हणजेच टीडीपीचा स्टार प्रचारक असलेला तारक अमित शहांना भेटतो, तेव्हा त्याला आपसूकच राजकीय महत्त्व प्राप्त होतं. 

हेही वाचा: हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

ज्युनियर एनटीआरच का?

‘विश्वविख्यात नटसार्वभौम’ म्हणून गौरवले जाणारे नंदमुरी तारक राम राव म्हणजे एनटीआर हे ज्युनियर एनटीआरचे आजोबा. आपल्या अभिनयाने करोडोंच्या मनावर राज्य केल्यानंतर एनटीआर यांनी वयाच्या साठाव्या वर्षी, १९८२मधे तेलुगूभाषिकांचा स्वाभिमान जपणारी ‘तेलुगू देसम पार्टी’ स्थापन केली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेल्या काँग्रेसच्या विजयरथाला लगाम लावणारी प्रादेशिक पार्टी म्हणून टीडीपीचा देशभर बोलबाला झाला.

१९८३मधे आंध्रप्रदेश विधानसभेत एकहाती सत्ता मिळवत टीडीपीने काँग्रेसची १६ वर्षांची सत्ता उलथून लावली. लागोपाठ नऊ महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत टीडीपी हा केंद्रात विरोधी बाकावर बसणारा पहिला प्रादेशिक पक्ष बनला. टीडीपीने तेलुगू अस्मितेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. सध्या टीडीपी केंद्रात आणि आंध्रप्रदेश-तेलंगणा या राज्यांमधे सत्तेचा भाग नसला तरी पक्षाचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही.

२०१८ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान मोदींनी आंध्रप्रदेशवर अन्याय केल्याचा आरोप करत टीडीपीने रालोआला सोडचिठ्ठी दिली. सध्या आंध्रप्रदेशमधे वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणात टीआरएसची एकहाती सत्ता आल्याने भाजप आणि टीडीपीसाठी आगामी निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत. आता अवघ्या दोन वर्षांवर आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याच्या उद्देशाने भाजप पुन्हा टीडीपीच्या दारात आलाय.

२००९च्या निवडणुकांमधे टीडीपीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम केल्यानंतर तारकने राजकारणापासून लांब राहायचं ठरवलंय. पण तारकची सिनेकारकीर्द आणि दोन्ही राज्यांमधे अफाट पसरलेला चाहतावर्ग पाहता, आपल्या आजोबांचा वारसा सक्षमपणे पुढे चालवण्यात तो यशस्वी ठरलाय हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल. तेलुगू सिनेरसिकांना तारकमधे त्याच्या आजोबांची छबी दिसते. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांना तो मुख्यमंत्री व्हावा असं मनापासून वाटतं.

तेलुगू सिनेमावर प्रेमाचा वर्षाव

तारक हे घराणेशाहीच्या गर्तेत अडकलेल्या तेलुगू सिनेसृष्टीतलं मोठं नाव आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला आणि एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा सिनेमा बराच गाजला. दक्षिणेत कमळ फुलवायच्या उद्देशाने भाजपने गेल्या महिन्यात कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेश-तेलंगणा या राज्यांतून प्रतिनिधिक स्वरुपात ज्या चारजणांना राज्यसभेवर पाठवलंय, त्यात राजामौलींचे वडील आणि या सिनेमाचे कथालेखक विजयेंद्र प्रसाद यांचाही समावेश आहे.

दक्षिणेकडे आपापल्या भाषिक आणि प्रादेशिक अस्मितांचा मान ठेवणाऱ्या वेगवेगळ्या सिनेसृष्टींपैकी, तेलुगू सिनेसृष्टीतलं वातावरण भाजपच्या विचारधारेशी बरंचसं मिळतंजुळतं आहे. त्याचबरोबर, इथली जोरदार आर्थिक उलाढाल आणि ‘स्टार कल्चर’मुळे आयता उपलब्ध होणारा जनसमुदाय या गोष्टींमुळे अनेक राजकीय पक्षांसाठी ही सिनेसृष्टी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरलीय. त्यामुळे इथल्या कलाकारांवर आणि कलाकृतींवर भाजपची विशेष मेहेरनजर आहे. 

नुकत्याच झालेल्या भेटीत अमित शहा यांनी तारकसोबत ‘आरआरआर’ आणि तेलुगू सिनेमाच्या सध्याच्या परिस्थितीवर भरभरून चर्चा आणि कौतुक केल्याचं पर्यटन राज्यमंत्री जी. किशन रेड्डी मीडियाला सांगतात. या भेटीत शहा यांनी आवर्जून एनटीआर यांच्या जुन्या सिनेमांसोबतच त्यांनी कशाप्रकारे टीडीपीच्या सुरवातीच्या काळात बलाढ्य काँग्रेसचा पराभव केला याचीही आठवण काढल्याचं रेड्डी सांगतात.

कारकिर्दीच्या बहरत्या काळात धार्मिक-पौराणिक भूमिका साकारून एनटीआर तेलुगूभाषिकांच्या गळ्यातला ताईत बनले होते. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण खेळणाऱ्या भाजपसाठी तारकने आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणं निश्चितच फायद्याचं ठरणार आहे. एकंदरीतच, आपल्या सिनेकारकिर्दीसोबतच आपल्या कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमीमुळे, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातल्या आगामी सत्ताकारणात हा ‘यंग टायगर’ हुकमाचा एक्का ठरू शकतो.

हेही वाचा: 

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!

हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?