भटशाहीची गुलामगिरी झटकणारा वारसा महात्मा फुलेंचाच!

०९ मे २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


अमोल मिटकरी यांच्या 'भार्या समर्पयामि'च्या वादग्रस्त विधानानंतर टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे मिटकरींना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. कारण त्यात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार वक्ते आणि विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरी यांचं 'भार्या समर्पयामि' हे नक्कलयुक्त विधान वादग्रस्त ठरलं. पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर ब्राह्मण महासंघाच्या पुरोहितांनी आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेला. अमोल मिटकरींच्या वक्तव्याबद्दल पंढरपूरच्या ब्राह्मण कार्यकर्त्यांनी पक्षनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अडवून जाब विचारला.

मिटकरी इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे मंचावर होते. ते दोघेही मिटकरी यांच्या नकलेवर हसले, म्हणून मीडियाने त्यांना धारेवर धरलं. त्यासरशी दोघांनी 'मिटकरी जे बोलले, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे,' असं सांगून मोकळे झाले.

लग्नाचे आठ प्रकार

या सार्‍या झटकाझटकीतून बड्या लोकांवरही भटोबाची भीती किती ठाण मांडून आहे, ते स्पष्ट होतं. आमदार मिटकरी जे बोलले, ते अस्थानी असू शकतं. पण ते खोटं नाही. भारतात हिंदू बहुसंख्याक आहेत आणि यातले बहुसंख्याक विवाह हे शास्त्रशुद्ध शब्दांत सांगायचे; तर 'देवाब्राह्मणाच्या साक्षी’ने होतात. तरीही कायद्यानुसार मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक ठरतं.

वधू-वरांप्रमाणेच त्यांच्या पालकांना आणि मानपानासाठी रुसवे-फुगवे करणाऱ्यांनाही लग्नविधीची पुरेशी माहिती नसते. अरेंज मॅरेज, लव मॅरेज, आंतरजातीय-धर्मीय विवाह, 'कोर्ट' ऊर्फ रजिस्टर मॅरेज; इतकीच माहिती असते. 

मनुस्मृतीनुसार ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच असे लग्नाचे आठ प्रकार आहेत. त्यातल्या कुठल्या प्रकारात आपला विवाह होतोय आणि झालाय, ते समजून घेण्याची तसदी लाखात एखादाच घेत असेल. तेच लग्नविधी मंत्राबाबतचं आहे. लग्नच नाही तर सर्वच धार्मिक विधीत भट- ब्राह्मण काय बोलतो; ते समजलं असतं, तर त्याची गरज कशाला लागली असती? ज्याचं त्यानंच पाठ करून म्हटलं असतं!

यजमानाने फक्त 'मम' म्हणायचं

धार्मिक विधी करताना यजमानाने जे बोलायचं असतं; ते भट-ब्राह्मण बोलतो. यजमानाने त्याला 'मम' म्हणून मान्यता द्यायची असते. यातला 'कन्यादानाचा संकल्प मंत्र' असा आहे - ममपुत्रिममुक नाम्नी कन्या वरार्थिनी श्रीरुपिणी प्रजापती दैवत्यां प्रजोत्पादनार्थ तुम्यंमहं संप्रदे न मम कन्या पतिगृण्हात कवान्॥

अर्थात, 'माझी कन्या अमुक नावाची वरार्थिनी, पतीची इच्छा करणारी श्रीस्वरूपी प्रजापती देवतेची कन्या प्रजोत्पादन करण्यासाठी मी तुला देत आहे. ही तुझी आहे; माझी नाही. आपण कन्येचा स्वीकार करावा.' असा हा मंत्र भटजी मुलीच्या वडलांकडून वदवून घेतो. याचा अर्थ काय होतो?

हेही वाचा: ग्लोबल लोकल मेळ घालायचा असेल तर महात्मा फुले हवेत

मुलीवर हक्क भट-ब्राह्मणांचा?

असाच प्रकार कन्यादान आणि वराने वधूचा स्वीकार करण्याच्या 'पाणिग्रहण' मंत्रोच्चाराच्या वेळेस होतो. 'हे स्त्रिये, तू मला पती करून, माझ्या संगतीने राहून वृद्धावस्था संपादन करणार आहेस. म्हणून तुला सौभाग्य प्राप्त होण्याकरिता मी तुझा हात धरितो. भग, अर्यमा, सविता आणि पूषा या चार देवांनी गृहस्थाश्रमातील सर्व कर्मे चालविण्याकरिता तुला माझ्या स्वाधीन केले आहे!'

हा 'पाणिग्रहण' मंत्राचा अर्थ आहे. हा मंत्र आधी भट-ब्राह्मण बोलतो. ते 'वर' बोलण्याचा प्रश्नच नाही. त्याच्या वाणीला संस्कृताचे वळणच नसल्याने तो भटाने सूचित केल्यानुसार 'मम' बोलून 'तू जे बोललास ते मान्य' अशी संमती देतो.

आणखी बराच तपशील आहे. हा शब्दश: प्रकार 'भार्या समर्पयामि' असाच असतो. त्याबाबत इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या ग्रंथात सविस्तर लिहिलंय. त्यातला 'अग्रोपभोगाचा हक्क' देवासमान समजणारे 'भूदेव' ऊर्फ भट-ब्राह्मण; यजमानाच्या 'भार्या समर्पयामि'द्वारे कशाप्रकारे प्रत्यक्षात बजावत होते, याची संतापकारी माहिती आहे.

पुरोहितांच्या पापाची शास्त्रशुद्ध चिरफाड

या सर्व वैदिक छिनालबाजीला अमोल मिटकरी यांनी प्रथम वाचा फोडली असं नाही. या विषयावर अमरावतीच्या 'दाढी’ गावचे शामराव सीताराम कुलट लिखित ४८ पानांची 'भटजीच वधूचा नवरा' या शीर्षकाची पुस्तिका १९३१मधे प्रकाशित झाली आहे. त्यांचा या शीर्षकाचा लेख मुकुंदराव पाटील संपादित 'दीनमित्र' या वर्तमानपत्रात ४ मे १९२७ला प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी लोकहितार्थ अधिक माहितीची भर घालून आणि शीर्षकात 'पुरोहितांची पापे' याची जोड देऊन लेखाचं पुस्तक केलं.

'सत्यशोधक' विचाराच्या कुलट यांचं शिक्षण तिसऱ्या इयत्तेपर्यंतच झालं होतं. पण, त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करून चिकित्सक पद्धतीने 'पुरोहितांच्या पापी' व्यवहाराची शास्त्रशुद्ध चिरफाड केली. त्यांची सत्यशोधक दृष्टी आणि चिकित्सेची वृत्ती आजच्या सुशिक्षित समाजाने स्वीकारून त्याचा व्यवहारात वापर केला पाहिजे. 'कन्यादान म्हणजे वस्तूदान नाही,' एवढ्यावरच अकलेचे सात फेरे मारून भटीपाशात अडकू नये.

टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे हे अमोल मिटकरी यांना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. या अधिकारात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे. तो भटशाहीची गुलामगिरी झटकणारा आहे. म्हणूनच पुस्तिकेच्या शेवटी शामराव कुलट कळवळून लिहितात-

भट सांगे जे जे कर्म, ते ते मानुनिया धर्म।
म्हणुनिया चुकले वर्म, दीन दीन रे॥
मतीमूढा हिंदूजनता, मेंढरा समान रे॥

या मेंढरांत उच्चशिक्षित राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधीही असावेत, हे लज्जास्पद आहे.

हेही वाचा: 

बगलबाज अर्जुनापेक्षा दगलबाज शिवराय शतपट श्रेष्ठ

महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

(लेख साप्ताहिक चित्रलेखातून साभार)