अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

३० एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचं परवा निधन झालं. आज विद्या बाळही नाहीत आणि अपर्णाताईही. पण विद्याताईंनी अपर्णाताईंना लिहिलेलं एक पत्र आपल्यासोबत आहे. दोघी नातेसंबंधांसाठी काम करायच्या. पण दोघींचा मार्ग वेगळा. अपर्णाताई महिलांना वागण्याबोलण्याचे नियम सांगायच्या तर विद्याताई नियमांमागची कारण सांगण्याचा आग्रह धरायच्या. याचसाठी विद्याताईंनी अपर्णाताईंना पत्र लिहिलं.

नाट्य कलावंत, सामाजिक कार्यकर्त्या आणि वक्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचं  मंगळवारी २८ एप्रिलला निधन झालं. त्या ६५ वर्षांच्या होत्या. हिंदुत्ववादी विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णाताईंनी  ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर तीन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली. तुटणारी घरं वाचवली पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले. यूट्यूबवर तर त्यांच्या भाषणांना तुफान प्रतिसाद मिळायचा. आपल्या भाषणातून त्या विशेषतः तरुणींना, महिलांना उपदेश करत, सल्ला देत. नवऱ्याला चहा देतानाही बाईचा हात थरथरला पाहिजे; हीच खरी संस्कृती, असं त्या म्हणायच्या.

अडचणी सोडवणारा त्यांचा साधासोपा मार्ग मात्र खूप वादग्रस्त ठरला. विशेषतः मुलींचं शिक्षण, त्यांचं घराबाहेर फिरणं, पोशाख आदी मुद्यांवर केलेल्या विधानांवरूनही अपर्णाताईंना वेळोवेळी टीकेच्या धनी व्हावं लागलं. त्यांचे हे विचार एकविसाव्या शतकातल्या तरुणतरुणींना पुन्हा मागे फिरवून मध्ययुगीन काळात नेणारे होते. म्हणूनच त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारं एक खुलं पत्र ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका विद्या बाळ यांनी लिहिलं. स्त्रीपुरुष नातेसंबंधासाठी वाहिलेल्या मिळून साऱ्याजणी मासिकाच्या मार्च २०१९ अंकात हे पत्र आलं होतं. गेल्या ३० जानेवारीला वयाच्या ८३ व्या वर्षी विद्याताईंचं निधन झालं. विद्याताईंच्या त्या पत्राचा संपादित भाग इथं देत आहोत.

हेही वाचा : चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया

अपर्णाताई रामतीर्थकर,

सप्रेम नमस्कार!

आजच्या स्त्रियांच्या काळजीपोटी तुम्ही अतिशय पोटतिडकीने काही गोष्टी त्यांना आचरणात आणायला सांगता. उदा. स्त्रियांनी शिकावं, डॉक्टर व्हावं, इंजिनीअर व्हावं, अंतराळात जावं, पाताळात जावं वगैरे. पण त्यांना भाकरी करता आली पाहिजे, स्त्रियांनी संध्याकाळी केस विंचरता कामा नयेत, मुलांसमोर केस मोकळे सोडता कामा नयेत, ४९८अ कलमाच्या गैरवापरामुळे दहा लाख पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत, ही तुमची विधानं एकविसाव्या शतकातल्या समाजवास्तवाशी सुसंगत आहेत का? याचा तुम्ही एकदा शांतपणे विचार करावा, अशी विनंती आहे.

घरकाम हा एक केवळ पूर्ण वेळाचा नव्हे तर सततचा ओवरटाइम करायला लावणारा प्रकार आहे. त्यात रजा नाही, बोनस नाही, सुट्टी नाही. तेव्हा शिकून नोकरी करणाऱ्या स्त्रीसाठी या घरकामातून सुटका देणाऱ्या जीवनशैलीचा विचार आपण करणार की नाही? घरकाम आणि नोकरी ही दोन्ही कामं करणाऱ्या बाईला तिच्या घरातल्या पुरूषांनी मदत करावी, समजून घ्यावं, सहकार्य करावं असं पुरुषांना आवाहन करायला हवं हे समजून घेऊन मिळवत्या बायकोच्या कामाला मदतच नाही, तर त्यातली काही जबाबदारी आपणहून स्वीकारणारे पुरुष आहेत आणि त्यामुळे त्या दोघांचं सहजीवन अधिक आनंददायी झाल्याचा अनुभव आहे याचीही दखल आपण घ्यायला हवी.

आणि हो, संध्याकाळी स्रियांनी केस विंचरणं, मोकळे सोडणं यात गैर काय? समोरचा पुरुष दीर असो, मुलगा असो, तो चळेल याची भीती तुम्हाला वाटते? मग यासाठी पुरुषाच्या मनात स्त्री ही केवळ मादी, उपभोगाची वस्तू नसून माणूस आहे, असा विचार रुजवण्याचं काम आपण करायचं की सगळा उपदेश फक्त स्त्रियांना करायचा? मग पुरुष शहाणे आणि केवळ पुरुष न राहता, नर न राहता ‘माणूस’ होणार तरी कसे आणि कधी? पद्मा गोळे यांनी ५० वर्षांपूर्वीच एका कवितेत स्पष्ट म्हटले आहे, ‘मी नच केवळ मादी, मी माणूस माणूस आधी!’ पुरुषांना हे समजवायला हवं!

तुम्ही सांगता आहात, ते स्त्रीच्या वागण्याबोलण्याच्या संदर्भातले नियम. उदा. आवरून-सावरून बसा, पुरुषाच्या स्पर्शाबाबत सावध राहा, आपली प्रतिष्ठा सांभाळा, हे योग्यच आहेत. पण हे केवळ नियमापुरते नियम सांगण्यापेक्षा या नियमांमागची कारणं काय ती स्त्रीला समजायला नकोत? त्यासाठी तिला स्वत:ला विचार करण्याची सवय हवी, मुभा हवी. ही मुभा, ही संधी, या सगळ्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे शिक्षण.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

तुम्हाला माहीत असेलच की, जोतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘आज स्त्रियांना माणसासारखं जगता येत नाही. त्यांना शिक्षण मिळालं की, त्या माणसासारखं विचारपूर्वक जगू शकतील.’ आपण आपला आत्मसन्मान, प्रतिष्ठा हे सारं सांभाळण्यासाठी कसं वागावं, कसं जगावं हे शिक्षणामुळे समजू लागतं. 

फुले, आगरकर, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादिकांनी स्त्री पुरुष विषमता अन्यायकारक आहे, हे लक्षात घेतलं. म्हणून तर त्यांनी स्त्रियांचं आत्मभान जागं करण्यासाठी जिवाचं रान केलं. या पार्श्वभूमीवर तुम्ही स्त्रियांना पुन्हा एकदा ‘चूल आणि मूल यांच्या जोखडात आनंदाने नांदू या,’ असं सांगता याचा थोडा फेरविचार करावा ही विनंती.

चूल महत्त्वाचीच, पण आई-बाबा आणि मुलं यांनी ‘घर आपलं सर्वांचं आहे, घरातल्या प्रत्येकाला वाढण्याची, विकासाची संधी मिळाली पाहिजे, आपल्या आनंदाबरोबरच घरातल्या इतरांच्या आनंदाची कदर केली पाहिजे’ हे समजून घेतलं पाहिजे. फक्त स्त्रीच्या त्यागावर, तिच्या मनाचा, तिच्या अपेक्षा यांचा विचार न करता घराचं घरपण आणि त्यातलं समाधान हाती लागणं केवळ अशक्य आहे.

सगळ्या स्त्रियांनी स्वत:च्या आशा-आकांक्षांचा विचार न करता केवळ पुरुषाच्या सेवेत, पुरुषाच्या आज्ञेत त्याला सांभाळत राहाण्यानं, स्त्रीपुरुषांचं सहजीवन आनंददायी होईल? खरं तर जुन्या काळात स्त्रिया आपलं मन मारून, आपल्याला काय हवं नको त्याचा विचार सुद्धा न करता जगत राहिल्या! शिवाय त्यांच्यावर शारीरिक-मानसिक अत्याचार झाले. त्यापायी अनेकींनी आत्महत्या केली किंवा कधीकधी त्यांची हत्यासुद्धा झाली.

हे सामाजिक वास्तव बदलण्यासाठी तर ४९८ अ हे कलम कायद्यात नव्याने आलं. तुम्ही म्हणता तसा काही स्त्रियांनी गैरवापर केलाही असेल. मी ते अमान्य करत नाही. पण अशा खोट्या तक्रारी किती आणि त्यापायी तुम्ही म्हणता दहा लाख पुरुषांनी आत्महत्या केल्या? तुमच्याकडे यासाठीच्या शासकीय पाहणीचा पुरावा आहे का? याउलट गेली शेकडो वर्ष पुरुषसत्ताक व्यवस्थेत कौटुंबिक छळातून स्त्रियांचे मृत्यू किती झाले असतील? त्या स्त्रिया कुणा ना कुणा पुरुषाच्या लेकी, बहिणी असतीलच ना? त्याविषयी ब्र न उच्चारणारे पुरुष आज ४९८ अ कलमाच्या गैरवापराविरुद्ध ओरडा करताहेत!

बाई म्हणून आपलं बायांशी काही नातं आहे की नाही? की पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या वाहक म्हणून आपणही पुरुषांच्या बाजूने स्त्रियांविरुद्ध गळा काढणार? कोणत्याही प्रश्नाचं सामाजिक गांभीर्य संख्येवरून ठरतं. ४९८ अ कलमाचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या आणि गेल्या शेकडो वर्षांत नाहक बळी गेलेल्या स्त्रियांची संख्या यांचा काही ताळमेळ आपण लावणार की नाही?

हेही वाचा : कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

अपर्णाताई, आता दिवस आलेत ते स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषांना काही सांगण्याचे, जगभरात आता पुरुषांमधील, पुरुषसत्ताक व्यवस्थेमधील अन्यायाचा विचार करण्याचे. पुरुषसत्ताक व्यवस्था स्त्रियांसाठीच अन्याय्य नाही तर पुरुषही त्याचे बळी आहेत. हे आजही अनेक पुरुषांना समजलेलं नाही. त्यांना ते समजावून सांगण्याची गरज आहे.

तुमचा ज्या ‘स्त्रीमुक्तीवाल्या’ स्त्रियांवर राग आहे, त्या खरं तर काय सांगतात आणि त्याचा विपर्यास आणि गैरवापर कोण कसा करतं ते लक्षात घ्यायला हवं. ‘स्त्रीमुक्तीवाल्या’ पुरुषसत्ताक व्यवस्था हद्दपार करून स्त्रीसत्ताक व्यवस्था आणण्याच्या विरोधातच आहेत. स्त्री पुरुषांनी एकमेकांचा सूड न घेता, सहकार्य करत, समतेच्या तत्त्वाला धरून जगावं अशी माझ्यासारख्या अनेक ‘स्त्रीमुक्तीवाल्या’ स्त्रियांची धडपड आहे.

घर, कुटुंब निश्चितच महत्त्वाचं आहे. पण त्यातली आचारसंहिता ही लोकशाहीच्या समता, स्वातंत्र्य, प्रेम या तत्त्वांना करून हवी. हुकूमशाही पद्धतीनं तयार केलेल्या नियमांमुळे कुटुंबातल्या घटकांना ना स्वातंत्र्य उपभोगता येतं, ना तिथे समता नांदू शकते.

अपर्णाताई, मी जे काही सांगते ते एका सर्वसामान्य बाईचं सागणं म्हणून बाजूला टाकू नका. कारण हे खरंच की, मी विचारवंत नाही. पण ज्यांनी महाराष्ट्राची वैचारिक, सांस्कृतिक शान उजळली, त्या विचारवंतांच्या विचारांची मी केवळ वाहक आहे. हे फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंतच्या थोरामोठ्यांचे विचार आहेत. ते अर्थातच मला पटले आहेत.

स्त्रीने किंवा पुरुषाने परस्परांना अकारण देव मानून स्वतःचं माणूसपण समर्पित करता कामा नये. दोघांनी परस्परांचं ‘माणूसपण’ समजून घेत, माणुसकी जपावी. म्हणजे केवळ पुरुषांची किंवा केवळ स्त्रियांची सत्ता समाजावर राज्य करू शकणार नाही. उलट स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांच्याशी परंपरेनं चिकटवलेल्या गुणधर्माच्या पल्याडचा विचार करणाऱ्या माणसांच्या समाजात आपण अधिक स्वास्थ्यपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगू शकू.

या पत्राचा तुम्ही मनापासून शांतपणे विचार करावा, ही विनंती.

८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्यातला भगिनीभाव वाढावा, या सदिच्छेसह.

प्रतिसादाच्या अपेक्षेत.

धन्यवाद,
विद्या बाळ

हेही वाचा : 

नेशन वॉन्ट्स टू नो अर्नब, ये जबां किसकी हैं?

इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कुळकथा

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने 

मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?