इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो.
कोणताही लेखक साहित्याच्या माध्यमातून आत्मशोध घेत असतो. ज्या काळात, समाजात हा लेखक वावरत असतो, त्याचाही त्याच्या लेखनावर परिणाम होत असतो. व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक प्रभाव यांच्या मिश्रणातूनच त्याचं लेखन साकारत असतं. त्यामुळे लेखकाचा आत्मशोध हा या अर्थाने समाजशोधही असतो. मात्र कोणताही लेखक प्रत्येकवेळी त्यात यशस्वी ठरतोच, असं नाही. बहुतेक लेखकांच्या साहित्यकृतींमधून डावे, उजवेपणा दाखवता येतो. एखाद्या कादंबरीत तो ज्या उंचीला पोचलेला असतो, तेवढी उंची त्याला प्रयत्न करूनही दुसऱ्या साहित्यकृतीमधे साध्य होत नसते.
समकालीन वास्तवाला, जीवनातल्या चिरंतन मूल्यांना लेखक किती ताकदीने भिडतो यावरही त्याचं यशापयश अवलंबून असण्याची शक्यता असते. काळाच्या पटावर त्या साहित्यकृतीचं टिकणं न टिकणंसुद्धा अशाच काही घटकांवर अवलंबून असतं. काळ बदलला तरी नव्या संदर्भात लेखकाच्या साहित्याचं मूल्यमापन होत राहतं. त्याची वाचनीयता कायम असते. त्याचं अर्थवाही प्रवाहीपण जाणवत असतं. कोणत्याही भाषेतल्या लेखकाच्या साहित्यकृतीबाबत हे लागू पडतं. जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘अॅनिमल फार्म’ आणि ‘१९८४’ या दोन कादंबऱ्यांचा त्यामधे नक्कीच समावेश करावा लागतो.
इंटरनेट आणि सोशल मीडियाने आपलं जगणं व्यापलंय. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती त्याच प्रकारच्या आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी जे राजकीय वास्तव कादंबरीच्या माध्यमातून मांडलं, त्याचा प्रत्यय आजही जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो, हे ऑरवेल यांचं मोठं यश आहे.
ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’ लिहिली तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा दाहक अनुभव ताजा होता. ब्रिटनसोबत संपूर्ण युरोप हिटलरच्या महासंहारात लपेटून गेला होता.
हिटलर, मुसोलिनी यांच्या रूपाने अवतरलेला नाझीवाद, फॅसिझमचा भस्मासूर जगाला जितका घातक होता, तितकीच रशियातली स्टॅलिनची साम्यवादी हुकूमशाही ब्रिटनमधल्या लोकशाहीवाद्यांना घातक वाटत होती. ऑरवेलच्या दोन्ही कादंबऱ्यांवर या सगळ्या परिस्थितीचा प्रभाव जाणवतो. मात्र त्यांची शैली पूर्णपणे वेगळी आहे.
हेही वाचा : १९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी
जॉर्ज ऑरवेल यांचं मूळ नाव एरिक आर्थर बोअर. २५ जून १९०३ हा त्यांचा जन्मदिवस. भारताशी ऑरवेल यांचं जन्माचं नातं आहे. तेव्हाच्या बंगाल प्रांतातल्या म्हणजेच आताच्या बिहारमधल्या मोतीहारी इथं त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कस्टम खात्यात नोकरीला होते. १९०७ च्या दरम्यान हे कुटुंब लंडनला गेलं.
जॉर्ज ऑरवेल वयाच्या १९ व्या वर्षी ब्रह्मदेशात इंडियन इम्पिरियर पोलिस सेवेत दाखल झाले. पाच वर्ष त्यांनी तिथं नोकरी केली. पुढे याच ब्रह्मदेशातल्या अनुभवावर त्यांनी १९३४ मधे बर्माज डेज ही कादंबरी लिहिली.
काही काळ ते पॅरिसमधे राहिले. वर्तमानपत्राचे गठ्ठे उचलले. झोपडपट्टीत, फूटपाथवर दिवस काढले. शाळामास्तरची नोकरी केली. एका पुस्तकाच्या दुकानात अर्धवेळ विक्रेता म्हणून काम केलं. इंग्रजी मॅगजीनमधे कादंबऱ्यांची परीक्षणे लिहिली. लंडन आणि पॅरिसमधल्या अनुभवांवर 'डाऊन अँड आऊटरन पॅरिस अँड लंडन' या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं.
लंडनच्या उत्तर भागाचा दौरा करून १९३७ मधे 'द रोड टू वयगन पीयर' या पुस्तकाचं लेखन केलं. 'अ क्लर्जिमन्स डॉटर', 'कीप द अॅ स्पिडिस्ट्रा फ्लाईन' या कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलं.
१९३६च्या अखेरला यादवी युद्धाच्या रिपोर्टिंगसाठी म्हणून ऑरवेल स्पेनला गेले. त्यावेळेस जनरल फ्रॅन्कोच्या विरोधात बंडखोरांनी युद्ध पुकारलं होतं. फ्रॅन्कोला हिटलर आणि मुसोलिनीचा पाठिंबा होता. स्पेनच्या या युद्धाने त्यांचं आयुष्य बदलून गेलं. स्पेनमधे फॅसिस्ट आणि कम्युनिस्ट राजवटीचं जे दर्शन झालं, त्यातून १९३८ मधे 'होमेज टू कॅटोलोनिया' आणि १९३९ मधे 'कमिंग अप फॉर एअर' ही दोन पुस्तकं लिहिली.
अनुभव, इतिहास, विश्लेषण असं या पुस्तकांचं स्वरूप आहे. 'कमिंग अप फॉर एअर' या कादंबरीत महायुद्धाचे पडसाद स्पष्टपणे दिसून येतात.
ऑरवेल ऑगस्ट १९४१ मधे बीबीसीच्या भारतीय विभागात प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. दोन वर्षातच त्यांनी ही नोकरी सोडली आणि ते ट्रिब्युनचे संपादक झाले. महायुद्धाचा वणवा पसरत असतानाच्या काळात त्यांनी एक कादंबरी लिहिली. १९४३ मधे लेखन सुरू केलं. ऑगस्ट १९४४ मधे तिचं लेखन पूर्ण केलं. १७ ऑगस्ट १९४५ ला कादंबरी प्रकाशित झाली. तिचंं नाव ‘अॅेनिमल फार्म’. त्या घटनेला आता ७५ वर्ष पूर्ण झालीत.
जगभरातल्या अनेक भाषांमधे तिचा अनुवाद झाला आहे. यानंतर त्यांची ‘१९८४’ ही कादंबरी १९४९ मधे प्रकाशित झाली. त्याचं लेखन सुरू असताना जॉर्ज ऑरवेल यांना टीबी झाला. २१ जानेवारी १९५० मधे त्यांचा मृत्यू झाला.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
मराठी लेखकांनाही अॅनिमल फार्म आणि १९८४ या कादंबऱ्यांनी भुरळ घातली आहे. प्रा. मधुकर तोरडमल यानी ‘अॅनिमल फार्म’वर आधारित नाटक लिहिलं. अलीकडेच नव्या पिढीतल्या लेखक प्रवीण बांदेकर यांनी इंडियन अॅनिमल फार्म नावाची भारतीय राजकारणाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी चर्चेत आहे.
ऑरवेल यांच्या दोन्ही कादंबऱ्या भाषेत उपलब्ध आहेत. ‘अॅनिमल फार्म’चा श्रीकांत लागू यांनी, तर १९८४ ही कादंबरी अशोक पाध्ये यांनी अनुवादित केलीय. विशेष म्हणजे आणीबाणीच्या काळात हे पुस्तक प्रसिद्ध करण्याचं धाडस एकाही प्रकाशकानं दाखवलं नाही. १९८४ मधे प्रसिद्ध झाली.
‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ हे अनेक प्रसंगांमधे वापरलं जाणारं वाक्य ‘१९८४’ याच कादंबरीतलं आहे. मानवी जगण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अमानुष राजवटीचं चित्रण या कादंबरीत आहे. भीती हीच हुकूमशाहीची शक्ती कशी असते याचं चित्रण यात आहे.
जनतेने स्वेच्छेनं आपल्यावर प्रेम करावं, भक्ती करावी असं यातल्या ‘बिग बी’ला वाटतं. हुकूमशाही टोकाला गेल्यानंतर काय घडू शकतं, हुकूमशाही ही मानवी रक्तातच असते का? असा प्रश्न ही कादंबरी उपस्थित करते.
‘अॅनिमल फार्म’ ही उपहासांनी भरलेली दंतकथा आहे. पंचतंत्र, कथासरित्सागर किंवा इसापनीतीमधली गोष्ट असावी तशा प्रकारची ही कादंबरी आहे. जोन्स यांच्या शेतामधल्या प्राण्यांची ही कथा आहे.
एका रात्री मेजर नावाचा डुक्कर शेतातल्या सर्व प्राण्यांची सभा बोलावतो. घोडे, गाढव, कुत्री, मांजरे, कोंबड्या असे सगळे प्राणी त्या सभेला हजर असतात. त्यात तो क्रांतीचा विचार मांडतो. मानवप्राणी हा आपला शत्रू आहे. त्याच्या शोषणाची तो अनेक उदाहरणे मांडतो. त्याचा राग माणसांवर आहे.
माणूस हा एकच असा सजीव प्राणी आहे, जो स्वतः काहीही निर्माण न करता हडप करतो आहे. तो स्वतः दूध देत नाही. अंडी घालत नाही. नांगर ओढण्याची शक्ती त्याच्यात नाही. आपल्या नष्ट होण्याचं मूळ मानवजातीनं सुरू केलेल्या छळवादात आहे, असं मेजर कॉम्रेड बंधूंना सांगतो.
मेजरच्या मृत्यूनंतर त्याचा विचार रुजवण्याचं काम नेपोलियन स्नोबॉल हे डुकरांचे नेते करतात आणि खरोखरच हे प्राणी मालकाला फार्म हाऊसमधून पळवून लावून क्रांती घडवतात. त्यातून डुकरांचं राज्य सुरू होतं.
जे दोन पायांवर चालतात, त्यांना शत्रू समजावं, चार पायावर चालतात किंवा ज्यांना पंख आहेत, त्यांना मित्र समजावं. कुणीही प्राणी अंगावर कपडे घालणार नाही. गादीवर झोपणार नाही. दारू पिणार नाही. कुणीही प्राणी दुसऱ्या प्राण्याला ठार करणार नाही. सर्व प्राणी समान आहेत अशा सप्तसूत्रांनी हे राज्य सुरू होतं.
हेही वाचा : किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
नंतर या छोट्याशा राज्यात डुकरांचं वर्चस्व वाढत जातं. तेव्हा काही प्राणी अधिक समान आहेत. त्यांचे म्हणून काही अधिक हक्क आहेत, असं यशस्वीपणानं बिंबवलं जातं. त्यातून मग कोंबड्यांची अंडी, गायीचं दूध डुकरांसाठी राखीव ठेवलं जातं.
डुकरांच्या नेत्यांमधेही अंतर्गत मतभेद होतात. पाळीव कुत्र्यांच्या मदतीने सुरक्षारक्षकांची सेना उभारलेल्या नेपोलियन याच्या हाती सर्व सत्ता एकवटत जाते. गोंडस, भुलवणाऱ्या शब्दांचा वापर करत सत्ताधारी कसे शोषण करत जातात याचं चित्रण या कादंबरीत आहे.
यातल्या प्रत्येक प्राण्याला एक व्यक्तिमत्त्व आहे. दणकट ताकदीचा निष्ठावंत वाटणारा बॉक्सर घोडा, बेंजामीन हा गाढव हे मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे नमुने आहेत. ‘मानव प्राणी आपले शत्रू आहेत’ या विचारांपासून कादंबरी सुरू होते. शेवटी डुकरेच माणसारखी दोन पायांवर चालू लागतात. जोन्सच्या घराचा ताबा घेतात. टाळायचे ठरले होते तेच करू लागतात.
कादंबरी केवळ साम्यवादी राजवटीपुरती मर्यादित राहत नाही. लोकशाही व्यवस्थेत, निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन घडवून सत्तेवर येणाऱ्या नेत्यांमधेही नेपोलियन आणि स्नोबॉलचे नमुने दिसून येतात. भ्रष्टाचारमुक्त कारभाराची घोषणा देत नेते सत्तेवर येतात, तेच कसे भ्रष्ट होत जातात हे आपण सातत्याने अनुभवत असतो. त्या अर्थाने बदल किंवा क्रांतीच्या घोषणा या निरर्थकच ठरतात.
अवघ्या ७५ पानांची कादंबरी गंमतशीर, हसवता हसवता विचार करायला लावणारी आहे. रशियातल्या साम्यवादी राजवटीवर टीका करण्याचा हेतू त्यातल्या ‘कॉम्रेड’ या शब्दाच्या वापरामुळे तर स्पष्टच दिसतो.
‘स्वातंत्र्यात सुरक्षित असणार्याक इंग्रजांना भविष्यातल्या समाजाचं भयावह चित्र दाखविण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलं आहे. राजकीय हेतू आणि कलात्मक दिशा एकत्र करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे’, असं ऑरवेल यांनी पुस्तकाबद्दल म्हटलंय.
स्टॅलिन आणि हिटलर हे दोघेही मानवी स्वातंत्र्याचे सारखेच शत्रू आहेत. हे दोघेही सर्वग्रासी हुकूमशहा आहेत, असं त्यांचं मत होतं. सर्व मानव समान आहेत, असं कार्ल मार्क्स म्हणतो. कादंबरीचा नायक एका ठिकाणी म्हणतो, ‘सर्व प्राणी समान आहेत, मात्र काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत.’ हे लोकशाही, हुकूमशाही अशा सर्व प्रकारच्या व्यवस्थांमधे दिसणारं विधान आहे.
‘एकाधिकारशाही ही एका व्यक्तीचीच असते, असं नाही. कधी ती पक्षाची असते. एखाद्या घराण्याची असते.’ त्यामुळे ‘अॅनिमल फार्म’मधले नमुने जगभरात अजूनही सापडतात. ते आपल्याभोवती वावरत आहेत, असं वाटू लागतं.
नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, पुतीन, जिनपिंग यांचे राजकीय निर्णय, वागणं आणि वावरणं अॅनिमल फार्ममधल्या पात्रांसारखंच वाटतं. त्यामुळेच ‘कादंबरीच्या माध्यमातून सत्तेच्या चिरंतन खेळाचा भाष्यकार’ म्हणून ऑरवेल हा भविष्यवेधी लेखक ठरतो.
हेही वाचा :
तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध
शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा
आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू