अमेरिकेतले प्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्स यांचा अपघात झाल्यापासून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अनिश महाजन या मूळच्या जळगाव डॉक्टरचं नाव खूप चर्चेत आलंय. कोरोनाच्या काळातही हे महाजन महत्त्वाची भूमिका बजावत होते. शिवाय, ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या सरकारमधेही त्यांनी काम केलं होतं. गातल्या सगळ्यांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात असं महाजन यांचं स्वप्न आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेसोबतच अनेक देशांच्या पेपरच्या हेडलाइनमधे एक मराठमोळं नाव येतंय. या व्यक्तीचे बाईट घ्यायला, ते काय सांगतायत ते समजून घ्यायला, त्यांचं म्हणणं कोट करायला मीडिया जीव काढतोय. डॉक्टर अनिश महाजन हे ते नाव. टायगर वूड्स या प्रसिद्ध अमेरिकन खेळाडूचा अपघात झाल्यापासून डॉ. महाजन त्याच्यावर उपचार करतायत. त्यामुळेच कशाहीपेक्षा जास्त डॉक्टर वूड्स यांचे शब्द अमेरिकन मीडियासाठी महत्त्वाचे झालेत.
टायगर वूड्स गोल्फ नावाचा एक खेळ खेळतात. हॉकीसारख्या काठीनं एक छोटा बॉल जमिनीवरच्या एका भोकामधे मारण्याचा हा खेळ आपण टीवीवर अनेकदा पाहिला असेल. बघताना हा खेळ फारच सोपा वाटतो. पण खेळात बॉल ठेवायच्या स्टँडच्या उंचीवरून ड्रायवर, फेरी वूड शॉट, पिचिंग, चिपिंग असे बॉल मारण्याचे अनेक प्रकार पडतात. टायगर वूड्स यांच्यासारखं भारी गोल्फ खेळाडू बनायचं असेल तर या सगळ्या प्रकरांमधे तरबेज असावं लागतं.
आत्तापर्यंत वूड्स यांनी १५ गोल्फ चॅम्पियनशीप जिंकल्यात. गोल्फमधले अनेक वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. ते जगातले सगळ्यात प्रसिद्ध गोल्फ खेळाडू आहेत. शिवाय, सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या खेळाडूंमधेही त्यांचा क्रमांक लागतो.
२३ फेब्रुवारीला सकाळी ७ च्या सुमारास त्यांच्या कारचा जोरदार अपघात झाला. ते एकटे गाडी चालवत लॉस एंजिल्स या शहरातल्या हॉथोर्न बुलेवार्ड या ठिकाणी जात होते. त्यावेळी गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने गाडी पहिले एका फलकाला आणि नंतर झाडाला धडकली आणि अनेक वेळा पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. तिथे राहणाऱ्या एका माणसाने या अपघाताची खबर पोलिसांना दिली.
पोलिसांनी त्यांना गाडीतून बाहेर काढलं तेव्हाही ते रक्तबंबाळ अवस्थेत होते. म्हणून त्यांना तातडीने सेडार्स सिनाई मेडिकल सेंटरमधे दाखल केलं गेलं. त्यानंतर लॉस एंजिल्समधल्या हार्बर - यूसीएलए या मेडिकल सेंटरमधे ठेवण्यात आलं. तेव्हापासून डॉक्टर अनिश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी डॉक्टची टीम वूड्स यांची काळजी घेतेय.
हेही वाचा : मिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल
आशिष महाजन यांच्या खासगी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया युनिवर्सिटी अंतर्गत येणाऱ्या डेविड जेफेन स्कूल ऑफ मेडिसिन या कॉलेजचे कुलगुरू म्हणून ते काम पाहतात. ‘हार्बर-यूसीएलए मेडिकल सेंटर’ या हॉस्पिटलचे ते सीईओही आहेत. तिथेच ते चीफ मेडिकल ऑफिसर म्हणूनही काम पाहतात. या हॉस्पिटलमधल्या १२ विभागांचे ते प्रमुख आहेत. हॉस्पिटलचं व्यवस्थापन, दर्जा आणि सगळ्यांना सगळ्या वैद्यकीय सोयी पुरवल्या जातायत की नाही याची काळजी ते घेतात.
४२५ बेडचं हे भव्य हॉस्पिटल अमेरिकेतल्या इमर्जन्सी केसेस घेणाऱ्या पाच हॉस्पिटल्सपैकी एक आहे. कारचा किंवा फॅक्टरीमधे वगैरे अपघात झाल्यानंतर पहिल्या पायरीवर तातडीने करायचे उपचार तिथं होतात. त्यासाठी सर्जन, इमर्जन्सीचे डॉक्टर, भूलतज्ञ अशी मोठी टीम तिथं सज्ज करण्यात आलीय.
‘मी टायगर वूड्स यांना खेळताना टीवीवर पहात आलोत. २०१९ चं मास्टर चॅम्पियनशिप त्यांनी ज्या पद्धतीने जिंकली ते खूपच प्रेरणादायी होतं आणि त्यातून अनेक जखमा सहन करूनही खेळात परत यायच्या त्यांच्या इच्छाशक्तीवरून ते माणूस म्हणून किती धीराचे आहेत हे कळतं,’ असं डॉक्टर महाजन यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.
याआधीही वूड्स यांच्या गाडीचा अनेकदा अपघात झालाय. मागे त्यांच्या पाठीवरही ४ वेळा सर्जरी करण्यात आली होती. तेव्हा त्यांना आपला खेळही थांबवावा लागला. त्या सगळ्या प्रसंगाला धीराने तोंड देत ते पुन्हा गोल्फ खेळू लागले. नुसते खेळले नाहीत तर ५८ व्या क्रमांकावर गेलेलं आपलं स्थान त्यांनी दोनच वर्षात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणलं. यावरून याही अपघातातून वूड्स बरे होतील असा विश्वास महाजन यांना वाटतो.
वूड्स हे जितके मोठे आणि जगप्रसिद्ध खेळाडू आहेत तितकाच त्यांचा अपघातही गंभीर होता. सगळ्या न्यूजपेपरच्या हेडलाईन्स, न्यूज चॅनेल्सच्या ब्रेकिंग न्यूज वूड्स यांच्या अपघातांच्या डिटेल्सने भरल्या होत्या. अशातच वूड्स यांची तब्येत कशी आहे हे समजून घेण्यासठी डॉक्टर महाजन यांच्या प्रत्येक शब्दाकडे प्रसार माध्यमं लक्षं ठेवून असतात. आधीच अनेकवेळा जखमा आणि पाठीची सर्जरी झाल्यामुळे वूड्स यांची तब्येत नाजूक आहे. त्यात आता सगळ्या जगाचं प्रेशर सांभाळत हे गंभीर प्रकरण डॉक्टर महाजन लक्षपूर्वक सांभाळतायत.
‘आमच्याकडे असा पेशंट येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या महत्त्वाच्या सगळ्या प्रक्रिया काम करतायत की नाही हे पहावं लागतं आणि त्याला नेमक्या कुठे दुखापती झाल्यात याचा विचार करावा लागतो. मेंदूत दुखापत झाली असेल तर लगोलग न्यूरोसर्जनना बोलावलं जातं. अंतर्गत दुखापती असतील तर जनरल सर्जन येतात. हाडांना काही झालं असेल तर ऑर्थोपेडिक ट्रॉमा स्पेशालिस्टना यावं लागतं,’ असं डॉक्टर महाजन इंडियन एक्सप्रेसला सांगत होते. या सगळ्याचं नियोजन ते करतात.
हेही वाचा : कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?
डॉक्टर महाजन पहिल्यांदा प्रसार माध्यमात चमकले ते डिसेंबर महिन्यात. लॉस एंजिल्स हे कोविड १९ चा हॉट्सपॉटचं बनलं होतं. रोज १० हजाराच्या घरात पेशंट समोर येत होते. तितक्याच लोकांचे मृत्यूही होत होते. या सगळ्यात महाजन यांच्या हॉस्पिटलमधले डॉक्टर जास्तीच्या शिफ्टमधे काम करत होते. अशावेळी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचं काय होतं याविषयीची वाचा महाजन यांनी फोडली.
‘सुरवातीला खूप काळजी आणि ताण होता. दुसरी आणि तिसरी लाट आली तेव्हा मोठ्या संख्येने येणारे पेशंट आणि त्यांना सांभाळताना येणारा थकवा या गोष्टी सांभाळणं मोठं आव्हान होतं. आमच्या कर्मचारीही मानसिक तणावात होते,’ असं एका ऑनलाईन मुलाखतीत बोलताना महाजन सांगत होते.
या लांबलचक आणि भयाकन वर्षात त्यांच्या हॉस्पिटलमधल्या अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्यतज्ञांची मदत घ्यावी लागली होती असं महाजन सांगतात. अगदी ख्रिसमसच्या दिवशीही सगळ्यांना काम करावं लागत होतं. मजा, आराम हे स्वप्नवतच वाटत होतं. तेव्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना आधार देण्याचं काम महाजन यांचं होतं. ख्रिसमसची संध्याकाळीही त्यांच्यासाठी खाणं पिणं मागवणं, थोडं वातावरण आनंदी व्हावं यासाठी प्रयत्न करणं अशा अनेक गोष्टी महाजन यांनी केल्या. त्याचसोबत स्वतःचंही मानसिक आरोग्य सांभाळलं.
डॉक्टर महाजन यांचं ब्राऊन युनिवर्सिटीमधून पब्लिक पॉलिसीमधे ग्रॅज्यूएशन केलंय. त्यानंतर त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिनही केलं. हार्वर्ड स्कूल ऑप पब्लिक हेल्थ मधून आंतरराष्ट्रीय आरोग्य या विषयात पब्लिक हेल्थमधे मास्टर्स आणि कॅलिफोर्निया युनिवर्सिटीतून हेल्थ सर्विसमधे एमएसही पूर्ण केलंय. गेली १५ वर्ष ते आरोग्यात काम करतायत. या वर्षांत अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्यात. ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या सरकारमधेही काम केलंय.
महाजन हे मूळचे जळगावचे आहेत. त्यांचे आजोबा यादव शिवराम महाजन हे पाचवेळा कॉंग्रेसकडून लोकसभेत निवडून आले होते. एकदा बुलढाण्यातून आणि चार वेळा बुलढाण्यातून. डॉक्टर अनिश यांचे वडील प्रकाश महाजन १९७० मधे अमेरिकेत इंजिनिअरिंग शिकण्यासाठी गेले आणि तिथलेच झाले.
डॉक्टर महाजन अनेकदा भारतात येत असत. आजोबांच्या सामाजिक कार्याचा प्रभाव त्यांच्यावर आहे. गावातल्या लोकांना निस्वार्थी मदत करताना त्यांनी लहानपणी आजोबांना पाहिलंय. तिच भावना त्यांच्यात आहे. त्यामुळेच फक्त डॉक्टरकी करून स्वतःचे खिसे भरण्यापेक्षा जगातल्या सगळ्यांना आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात.
हेही वाचा : स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?
तुम्ही माणूस असाल तर आरोग्य सेवा हा तुमचा अधिकार आहे, असं महाजन यांना वाटतं. अमेरिकेत आरोग्य सेवा तुम्ही कोण आहात यावर अवलंबून असते. तुम्ही स्थलांतरित आहात का, तुमचा सामाजिक दर्जा काय आहे यावर तुम्हाला कशाप्रकारची वागणूक मिळेल हे ठरतं. अशीच परिस्थिती आपल्याला भारतातही दिसते, असं महाजन म्हणतात. इथं गरीब आणि श्रीमंत लोकांना वेगवेगळ्या सेवा असतात, हे महाजन यांना खटकतं.
सगळ्यांना सारख्या आरोग्य सेवा मिळायला हव्यात हे त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठीच त्यांनी ओबामा यांच्या सरकारमधे काम केलं होतं. व्हाईट हाऊसमधे मॅनेजमेंट आणि बजेट विभागात ते काम करत होते. अफॉडेबल केअर ऍक्ट या कायद्यावर ओबामा तेव्हा काम करत होते. अमेरिकेतल्या सगळ्यांना स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी मेडिकएडची तरतूद या कायद्यात केली होती. या कायद्याच्या निर्मितीत आणि तो पारित होण्यासाठी विशेष सल्लागार म्हणून महाजन काम करत होते.
अनिश यांच्या वेबसाईटवर त्यांचे दोन लेख प्रसिद्ध करण्यात आलेत. त्यातही त्यांना हा सगळ्यांसाठी आरोग्य तयार करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. ‘एक डॉक्टर म्हणून अनिश यांना नेहमीच ज्यांना काहीही मिळालं नाही अशांसाठी काम करण्याची इच्छा असते. आजोबांकडून प्रेरणा घेऊन अनिश यांनी सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास केला आहे.
आरोग्य व्यवस्थेतली असमानता कमी करण्यासाठी आणि पेशंटच्या सोयीसाठी अनिश सतत प्रयत्न करत असतात,’ अशी ओळख त्यांच्या या वेबसाईटवर लिहिण्यात आलीय. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भूमीतले हे डॉक्टर ग्लोबल अवकाश मनात ठेवून काम करतात ही आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे.
हेही वाचा :
बाई आणि तंत्रज्ञान : जमाना बदल गया है बॉस
नोकरीच्या योग्यतेचे नाहीत भारतातले पदवीधर तरुण
चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?
बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र