या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय

०५ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


म्हाताऱ्या माणसांसाठी कोरोना वायरस जास्त धोकादायक असल्याचं आपण ऐकलं असेल. पण अमेरिकेतल्या आजी या सगळ्याला अपवाद ठरल्यात. मेमधे त्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती. त्यातून त्या बाहेर आल्या. पण जीवघेण्या साथरोगाशी सामना करायची ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. १०० वर्षांपूर्वी त्यांना स्पॅनिश फ्लूचीही लागण झाली होती. त्यातूनही त्या वाचल्या. नुकताच त्यांनी आपला १०८ वा वाढदिवस साजरा केलाय.

साथरोगाच्या काळात घरातल्या लहान मुलांची आणि म्हाताऱ्या माणसांची आपण सगळ्यात जास्त काळजी घेत असतो. ब्लड प्रेशर, डायबेटिस किंवा इतर काही आजार असणाऱ्या म्हाताऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक असतो, हेही आपण पेपरमधून वगैरे वाचलं असेल. अमेरिका, स्पेन या देशातही कोरोनाचा बळी ठरलेल्यांमधे म्हाताऱ्या माणसांची संख्या सर्वाधिक असल्याचं आपण वाचलं असेल. ६५ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी हा वायरस जीवघेणा ठरू शकतो, असं अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेनंही स्पष्ट केलंय.

पण अमेरिकेतल्या १०८ वर्षांच्या आजी या सगळ्याला अपवाद ठरल्यात. कोरोनाशी दोन हात करून त्या त्यातून सुखरूपणे बाहेर आल्यात. इतकंच नाही तर व्यवस्थित चालतायत, रोजची कामं करतायत, नाचतायत, खातायत, पितायत. गंमत म्हणजे, १०० वर्षांपूर्वी जगभरात थैमान घातलेल्या स्पॅनिश फ्लूचीही त्यांना लागण झाली होती आणि त्यातूनही त्या संपूर्ण बऱ्या होऊन बाहेर आल्या होत्या. या आजीचं नाव आहे ऍना डेल प्रिओर. ऍसबरी पार्क प्रेस या वृत्तसंस्थेनं पहिल्यांदा त्यांची गोष्ट जगासमोर आणली.

६ व्या वर्षी स्पॅनिश फ्लूची लागण

५ सप्टेंबर १९१२ ला अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधे ऍना यांचा जन्म झाला. त्यांचे आई वडील दोघेही मूक बधीर होते. घरात साईन लँग्वेज म्हणजेच खाणाखुणांच्या भाषेत संवाद व्हायचा. ऍना यांना ४ भावंड. त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असणारी त्यांची एक बहिण हेलन आजही जिवंत आहे. ऍना यांच्याप्रमाणेच हेलन यांनीही स्पॅनिश फ्लूसोबत कोरोनाशी दोन हात केलेत.

योगायोगाने या दोघींचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. ऍना सहा वर्षांच्या असताना म्हणजे १९१८मधे त्यांना स्पॅनिश फ्लूची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांच्या भावडांनाही साथरोगाची लक्षणं दिसू लागली. आसपास अनेक लोक या साथरोगात आपला जीव गमावत होते. जगाच्या जवळपास एक तृतीयांश लोकसंख्येचा स्पॅनिश फ्लूमुळे मृत्यू झाला होता. पण हेलन आणि ऍना दोघींनीही स्पॅनिश फ्लूवर मात केली. आजच्या इतकी प्रगती नसताना, औषधं, लस नसताना त्या स्पॅनिश फ्लूमधून बाहेर आल्या.

हेही वाचा : कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात

आजही गाण्यावर पाय थिरकतात

ऍना शिवणकाम करून स्वतःचं पोट भरायच्या. फ्रँक डेल प्रिओर यांच्याशी त्यांचं लग्न झालं. फ्रँक हे प्रोफेशल टँगो डान्सर होते. त्यांच्याकडूनच ऍना यांच्याकडे नृत्याची, टँगो डान्सची आवड आली. एखाद्या पार्टनरसोबत करायचा या टँगो डान्समधे पायाने ताल धरावा लागतो. उर्जा, वेळ आणि पायाचं फिरणं यांचा अगदी कस लागतो. फ्रँकसोबत ऍना अनेकदा स्टेजवरही नाचल्यात.

आजही कोणतंही गाणं ऐकलं की ऍना यांचे पाय थिरकू लागतात. तारुण्याची उमेद, त्यावेळची उर्जा शरीरात राहिली नसली तरीही त्यांचे पाय ताल विसरलेले नाहीत. त्यामुळेच की काय ऍना आजही व्यवस्थित चालू शकतात.

मेमधे झाली कोरोनाची लागण

फ्रँक आणि ऍना यांना दोन मुली झाल्या. आज या दोन्ही मुली जिवंत नाहीत. फ्रँक यांना जाऊनही अनेक वर्ष लोटलीयत. त्यांच्या ६६ वर्षांच्या एका नातीवर डार्लेन जॅस्मिन यांच्यावर ऍना यांची जबाबदारी आहे. न्यू जर्सीमधल्या एका वृद्धाश्रमात ऍना राहतात. ऍना यांचा हा रंजक प्रवास पाहून वृद्धाश्रमातल्या नर्सही अगदी भारावून गेल्यात.

मे २०२० मधे या वृद्धाश्रमात राहत असतानाच ऍना यांना कोरोनाची लागण झाली. फोर्ब्स मासिकाला दिलेल्या मुलाखतीत वृद्धाश्रमातली नर्स लॉरा हॅले सांगते, ‘ऍना यांना खूप ताप भरला. थोडा कफही होता. त्यांनी काहाही खाणं पिणं सोडून दिलं. अन्नावरची इच्छा उडाली. पण तरीही त्यांना ऑक्सिजन किंवा बाहेरून श्वास देण्याची गरज पडली नाही. त्यांना हॉस्पिटलमधे नेऊन ऍडमिटही करण्यात आलं नाही. साधारण एक महिन्यांनी त्या व्यवस्थित बऱ्या झाल्या.’

ऍना आता आपली नेहमीसारखी कामं करतात. शिवणकाम आणि स्विमिंगही करतात. कोरोनाचा कोणताही मोठा परिणाम त्यांच्यावर झालेला दिसत नाही. ’आजीला कोरोना झाल्याची बातमी मला कळाली तेव्हा फार धक्का बसला. वाटलं, हेच ते. आता संपलं. आजी यातच जाणार असं मला वाटलं होतं.’ ऍना यांची नात जॅस्मिन फोर्ब्सच्या मुलाखतीत बोलत होती.

हेही वाचा : कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

निरोगी आयुष्याचं गुपित काय?

स्पॅनिश फ्लू हा कोरोनापेक्षा जास्त धोकादायक होता. तोही श्वसन संस्थेशी निगडीतच आजार. कोरोनाचा ऍना यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही याचं कारण त्यांना स्पॅनिश फ्लूच्या संसर्गात असण्याची शक्यता आहे, असं जॅस्मिन यांना वाटतं. पण तुम्ही कशामुळे वाचलात असं ऍना यांना विचारलं तर त्या म्हणतात, ‘मी सगळ्यांशी चांगलं वागले, सगळ्यांना मदत केली आणि देवावर विश्वास ठेवला म्हणून.’

ऍना यांचं मन खूप स्वच्छ आणि नितळ आहे. त्यांचं हे मनच त्यांच्या शरीराला उभारी देत असणार. त्या जोडीला डान्स आहेच. त्यांचा जीव की प्राण असणारा हा डान्स त्यांना त्यांच्या फ्रँक यांच्याशी जोडत असणार. ‘डान्स केल्याने खरंच खूप छान वाटतं. मला स्वतःला निरोगी ठेवायचंय,’ असं ऍना सांगतात.

‘ती सतत फिरत असायची. ब्रुकलीनमधे रहायचो तेव्हा ती आणि मी अनेकदा किराणामालाच्या दुकानात जाऊन आलोय. कुठेही जायचं असेल तर शक्यतो ती चालतच जायची. दररोज रात्री ती तिच्या हाताने जेवण बनवायची. भाज्या, ऑलिव ऑईल, सुका मेवा, फळं असं मेडिटेरियन पद्धतीचं, खूप पौष्टिक जेवणं ती बनवायची.’ असं जॅस्मिन सांगतात. ऍना यांच्या या निरोगी आयुष्याचंही हेच गुपित असावं. मला सगळं खायला आवडतं असं त्या सांगतात. त्या सगळं आवडीने करतात, आवडीने खातात. आनंदी असतात आणि म्हणूनच त्यांना असं दिर्घायुष्य लाभलंय.

अगदी १०० वर्षांच्या होईपर्यंत ऍना रोज भरपूर चालायच्या. जवळच असणाऱ्या मॅकडोनल्डमधे किंवा कॉफी शॉपमधे आपल्या मित्र मैत्रिणींना भेटायलाही जायच्या, असं वृद्धाश्रमातल्या नर्सेस सांगतात. आम्ही लोकांना हे सांगतो तेव्हा आमच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. पण ऍनाकडे बघून आम्हाला खूपच छान वाटतं, असं त्या म्हणतात.

१०८ व्या वाढदिवसाची धमाल

एवढं वय झालं असलं तरीही ऍना काही त्यांच्या शेवटच्या घटका वगैरे मोजत नाहीयत. उलट खूप उमेदीने त्या जगतायत. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ५ सप्टेंबर २०२० ला ऍना यांचा १०८ वा वाढदिवस झाला. कोविड १९ या आजाराला मागे सोडून त्यांनी अगदी जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला.

त्यांच्या वाढदिवसादिवशी वृद्धाश्रमासमोर छोटी पार्टी ठेवली होती. कोरोनाच्या प्रसारामुळे त्यांची नात, नातू आणि इतर घरचे लोक येऊ शकले नाहीत. पण वृद्धाश्रमातला सगळे कर्मचारी होते. शहराच्या महापौरांनाही आमंत्रण होते. या पार्टीला सगळे लोक आले होते.  एखाद्या राणीसारखं त्यांना सजवण्यात आलं होतं. ‘मला खूप खास वाटतंय, आजच्या दिवशी मी किती महत्त्वाची आहे, याची जाणीव होतेय,’ असं ऍना वाढदिवसाला टीवी चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत सांगत होत्या.

हेही वाचा : आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

कोरोना यांना काही करू शकला नाही

असं रसरशीत आयुष्य जगणाऱ्या ऍना या एकट्या नाहीत. त्यांच्या बहिणीनंही त्यांच्याप्रमाणेच कोरोना आणि स्पॅनिश फ्लूवर मात करून जगण्याची उमेद कायम ठेवलीय. न्यू जर्सीतल्याच एका १०८ वर्षांच्या सिल्विया गोल्डशेल यांना स्पॅनिश फ्लू झाला नव्हता. पण कोरोनाच्या संसर्गातून त्या बाहेर आल्यात.

जेरोण्टोलोजी साईटकडून अशा घटनांची नोंद ठेवली जाते. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, इटलीतही एका १०१ वर्षांच्या आजोबांनी कोरोना आणि स्पॅनिश फ्लू दोघांचा सामना केलाय. अशी आणखी ७ ते ८ माणसं एकट्या अमेरिकेत सापडतील. पण स्पेनमधल्या ११३ वर्षांच्या आजी या कोरोनाशी लढणारी सगळ्यात म्हातारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. या सगळ्या म्हाताऱ्यांनी जगलेलं रसरशीत आयुष्य, त्यांची भरपूर काम करण्याची, चांगलं अन्न खाण्याची सवय आणि मनाने वेळोवेळी घेतलेली उभारी यामुळेच कोरोनाही त्यांना काही करू शकला नाही. 

हेही वाचा : 

जो बायडन टीमवर ओबामा काळाचा प्रभाव?

कांगारुंच्या धूर्त खेळीनं भारताला वन डे सिरीजमधे चितपट केलं

मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय

ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं