लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं.
या महाराष्ट्र दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्यासारख्या एका दलिताने करावं हा एक अपूर्व असा योग असला तरी हे आचार्य अत्रे यांचे कार्य मी करीत आहे याची मला जाणीव आहे.
दलित साहित्यिकांचे वेगळे संमेलन भरवून हा सवतासुभा का उभा करता, असा प्रश्न काही मंडळी करीत आहेत. काहींच्या मते, अस्पृश्यता निवारण करणारा कायदाच अस्तित्वात असल्यामुळे आज दलित हा शब्दच निरर्थक झाला आहे. पण हा प्रश्न निर्माण करणारे दलितांना माणूस मानतात. पण त्या दलितांचा एक वर्ग आहे ही गोष्ट ते मान्य करीत नाहीत. त्यामुळे हा वरील प्रश्न निर्माण होत आहे.
कारण केवळ महाराष्ट्रापुरते जरी बोलायचे झाले तरी दलित माणसाचा मोठा वर्ग या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्यांचे जीवन वेगळे असून, इतर वर्गाशी ते संलग्न आहे. हा वर्ग या देशात अग्रेसर असून, त्याच्या न्यायी संघर्षाचे परिणाम सर्व समाजावर होत असतात. तो या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक पाया आहे. पण तो पिळला जाणार नि कष्ट करणारा दलित म्हणून निराळा आहे. उपेक्षित आहे. अशा या दलिताला आपले जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही. आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे. त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे एवढीच त्याची मागणी आहे. आपला चेहरा आहे तसा दिसावा असं वाटणं गैर नाही.
कारण तरंगमय तळ्यात पडलेली सावली जशी लांबकुळी नि डगमगती दिसते तद्वत आजचा दलित साहित्यात दिसतो. हा दलित आजच्या समाजाचे हृदय आहे, त्या हृदयाचे प्रदम्य स्पंदन होत असते. त्यात हर्ष, खेद, कोमल, कठोर अशा भावना जागृत झाल्यात, त्या भावनांचे तंतू जुळून त्या त्याच्या भावनांचा उगम कशात होतो याची कोणी नीट दखल घेत नाही. हा माणूस कष्टासारखे खडतर कर्म का करतो हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही, तोपर्यंत तो त्याचे दलिताचे साहित्य निर्माण करु शकत नाही. दलित वर्गाचे अथांग जीवन दिसण्यासाठी लेखकाला एक दिव्य दृष्टी असावी लागते. तो त्या वर्गाशी एकनिष्ट असावा लागतो. तो वस्तुनिष्ठ असावा लागतो. आणि त्याचा दलितवर्गाच्या सर्व न्यायी संघर्षावर नि त्याच्या अंतिम विजयावर विश्वास असला पाहिजे. म्हणजे तो लेखक ध्येयवादी असला पाहिजे. नि त्याची कल्पकता ही अशीच हवी.
माणूस जगतो का? नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार करणे जरुरी आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो, तो उंच गगनाला गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगाला पेट देतो किंवा पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असतो. कधी कधी त्याची आणि मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मरण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरूंगाला पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाही तर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे या मरणातील अंतर लेखकाने मोजून पाहावे नि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे.
दलितातही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो कारण तो हाडामासांचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवावर महाकाव्य रचणारा त्याला हवा असतो.
हेही वाचा : शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही
एका झाडाखाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून दोन मुलं नि बायको यांना जगविणारा दलित वरवर कंगाल दिसला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच असते. कुटुंबसंस्थेवरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो. परंतु त्याची कुटुंबसंस्थाच भांडवलधारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे, याची कारण परंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसण्याविषयी लिहावे. जपून लिहावे, कारण या समाजाची घडीन घडी त्या दलिताने व्यापवली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, 'हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे.' अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा. मग लिहा. कारण 'जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे' हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही.
म्हणून दलिताविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्यावी. त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या असावा लागतो. कारण जो कलावंत जनतेसोबत असतो त्याच्याबरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्व श्रेष्ठ कलावंतांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे. आणि तो डोळा सदैव पुढे आणि जनतेबरोबर असणे जरूर आहे.
परवा मराठी भाषेसाठी जनतेने अभूतपूर्व असा संग्राम दिला. खऱ्या अर्थाने तो लढा मराठी साहित्यासाठीच होता नि आहे. त्या लढ्यात सोळा सोळा वर्षांच्या मुलींनी आत्मबलिदान दिले. त्या लढ्यात जे कलावंत जनतेबरोबर होते, त्यांनी या महाभारतावर कवण रचली. कुणाच्या काव्याच्या करवती तापल्या. कुणाची कृपणता वीररस उधळू लागली. कुणी मराठी भाषेची महती गायिली. त्या कलावंतांना हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. परंतु जो कलावंत जनतेबरोबर नसतो, तो बंद खोलीतील कला मांडीवरच्या खुणा मोजते नि मांडीवरच्या खुणा मोजणारी आम्हा दलितांची खुणा नसते. आमची कला डमडम गोळीच्या खुणा मोजते. ती आमची कला, ते आमचे साहित्य त्याचबरोबर दलित स्त्रीच्या गालावरच्या जी सुंदर कलाकृती असेल ती कलाकृती आमची. जो कलावंत ध्येय जाणत नाही, जनता जाणत नाही, तो कोणत्या मार्गाने जातो याची कैक उदाहरणे देता येतील. आम्हाला जे दिसते ते आम्ही लिहितो. कला ही वर्गातील असावी, प्रचारातीत असावी असा त्याचा दावा असतो आणि अशा या कलावंताचा आज बोलबालाही कमी नाही. परंतु जो जनतेला जाणत नाही, तो तिला विद्रुप करतो याचे नमुने मराठी साहित्यात मुबलक मिळतात.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
एका बारा वर्षाच्या मुलीचे बोक्यावर प्रेम बसणे आणि त्याने कामवासना तृप्त करावी म्हणून तिची चड्डी फाडणे या कथेला काय नाव देता येईल? ही माणसाला हैवान करीत नाही? एक कारकून संततिनियमन करावे म्हणून स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेतो, पण त्याची पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहते म्हणून तो झुरतो, याचा अर्थ ती बाई व्यभिचारी होत नाही? कथेपासून आम्ही काय शिकावे?
महिला संघाची अध्यक्ष बाई पुण्याहून मुंबईत येत असता गाडीत भेटलेल्या एका माणसाबरोबर अखेरचा डाव खेळते. ही माणसांची निंदा नाही का? या फडकेंच्या कथेत मराठी माणूस नाही आणि दलित तर मुळीच नाही. हे फडके पति-पत्नीचे वाङ्मय असेही नाही, याचाच अर्थ जो ध्येय जाणत नाही तो जनतेला विद्रूपच वाटतो. हे सर्व मनोविश्लेषणवादाची रापी घेऊन माणसांची कातडी सोलू लागले आहेत. म्हणून हे दलितांचे वेगळे साहित्य संमेलन भरत आहे एवढेच. हे मनोविश्लेषणवादी आपल्या वाङ्ममयाचे समर्थन करताना म्हणतात, जीवनाच्या दोन बाजू असतात. त्यापैकी एकीचा खोल जाऊन आम्ही अंत घेतो, पण नाशिकात गंगा आणि गटार दोन्ही अस्तित्वात आहे. तुम्ही गंगेऐवजी गटारच का पसंत करता?
आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे. कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवन-संघर्षाने झडली आहे. जेव्हा दलितांची सावली असह्य होती तेव्हा महानुभावपंथीय साहित्यिकांनी सर्वांना ज्ञान मिळाले पाहिजे, ज्ञान हे मोक्ष असे समजून त्यांनी बंड केले. ते आमचे साहित्यिक. माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे असा दावा मांडून ज्यांनी दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला सुंदर ज्ञानेश्वरी दिली ते आमचे साहित्यिक. चुकलेले महाराचे मूल कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ, ते आमचे साहित्यिक. जो दलिताला कडेवर घेतो, त्याला जिभेवर घेतो आणि त्याला जो विद्रुप करतो, त्याला दलित विद्रुप करतो अशी इतिहासाची साक्ष आहे.
शब्दांना नुसता आकार देणे सोपे असते. त्या आकाराला आत्मा देणे त्याहून अवघड आहे. पण त्या आत्म्यामागची इतिहास-परंपरा शोधणे आणि तिचा अर्थ लावणे फार अवघड आहे. हा आचार्य अत्रे यांचा खुलासा आम्ही दलित लेखकांनी समजून त्याचा अर्थ लावावा आणि इतिहास परंपरा शोधण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आपल्या वर्गाचे इमान पटवून त्याचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेऊन त्याचे साहित्य निर्माण करू या. या दलिताचे जीवन सुखी आणि समृद्ध कसे होईल याची काळजी करू या, दलिताला नि त्याच्या जीवनाला वरच्या पातळीवर नेण्याचा आपल्या कलेतून प्रयत्न करू या.
काही विद्वान म्हणतात, 'अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली आहे. तेव्हा दलित हा प्राणी अस्तित्वात नाही', परंतु हा केवळ भ्रम आहे. एका गावात एका सार्वजनिक आडावर पाणी भरताना उच्चवर्णीय हिंदूंची काळजे धडधडतात. महारामांगाचा पोवरा जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत आपला पोवरा पाण्यात सोडत नाहीत. कित्येक हॉटेलात 'खास' कप ठेवलेले आढळतात. याचे कारण युगायुगाचे समज एका क्षणात नष्ट होत नसतात. म्हणून आम्ही दलित साहित्य निर्माण केले पाहिजे. एके ठिकाणी गॉर्की म्हणतो, 'शब्द आणि कल्पनाच्या साधनावर उभारलेल्या या कलेचे खरे वैशिष्ट्य मानवी चुकांचे ज्ञान करून देणे हेच आहे असे म्हणता येत नाही. मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस, असा साक्षात्कार मानवाला करून देणे वाङ्मयाचे खरे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्मय सदैव क्रांतिकारक असते.' म्हणूनही वरील अर्थाने परिपूर्ण असे साहित्य निर्माण करू या आणि लेखण्या दलितांच्या चरणी अर्पूया एवढेच.
हेही वाचा :
किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?
प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत
विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव
नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत छापून येते तेव्हा,
नाना शंकरशेठ होते म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं
बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्यांसाठी काढला