गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं?

०२ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ११ मिनिटं


एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती.

गांधींनी देश तोडला, गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले, गांधींनी मुस्लिमांचं लागुलचालन केलं, गांधींनी सुभाषबाबूंवर अन्याय केला, गांधींनी भगतसिंगना वाचवलं नाही अशा असंख्य आरोपांमधे आणखी एक आरोप सातत्याने गांधीजींवर केला जातो तो म्हणजे गांधी जातीयवादी होते. सोशल मीडियावरील फुटकळांनीच नाही तर काही नामांकित व्यक्तींनीसुद्धा हा आरोप गांधींवर केलाय. मध्यंतरी डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या आणि सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांनीही अशाच प्रकारचा आरोप गांधींवर केला होता. पण गांधी खरोखरच जातीयवादी असतील तर त्यांच्या अनेक वक्तव्यांचा आणि कृतींचे अर्थ कसे लावावेत हे मात्र समजत नाही.

गांधींनी दक्षिण अफ्रिकेतून आल्या आल्या अहमदाबाद येथील कोचरब इथे आश्रम स्थापन केला. त्या आश्रमात एक जोडपं अस्पृश्य जातीच होतं. म्हणून आश्रमातच नव्हे तर त्या संपूर्ण भागात खळबळ माजली. त्या जोडप्याला आश्रमात ठेवू नये, असा दबाव जेवढा आश्रमातून होता तेवढाच तो बाहेरुनही वाढला होता. त्या जोडप्याला आश्रमाबाहेर काढलं नाही, तर आश्रमासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली जाईल, अशी धमकीही आश्रमाला आर्थिक मदत करणाऱ्याने गांधीना दिली होती. त्या आश्रमातील त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा या मुद्द्यावर आश्रम सोडण्याची तयारी केली होती. एवढेच नाही तर खुद्द कस्तुरबादेखील या दबावाला बळी पडल्या होत्या. त्याही जवळ जवळ आश्रम सोडण्याच्या मानसिकतेमध्ये आल्या होत्या.

गांधी मात्र या प्रखर विरोधानंतरही कोणालाच बधले नाहीत. त्यांनी सर्वांनाच ठणकावून सांगितलं की, ‘ज्यांना आश्रम सोडून जायचं त्यांनी आश्रम सोडून जावं, ज्यांना आश्रमाची आर्थिक नाकेबंदी करायची त्यांनी ती करावी. पण कोणत्याही परिस्थितीत हे अस्पृश्य जोडपं आश्रम सोडून जाणार नाही.’ खरं तर त्या वेळी नुकतेच भारतात आलेले गांधी पुरते स्थिरावलेही नव्हते. आश्रमच बंद झाला असता तर, त्यांची अवस्था बेवारशासारखी झाली असती. तरीही ते एका अस्पृश्य जोडप्यासाठी सर्वस्वपणाला लावायला तयार होतात. ही त्यांची कृती कोणत्या अर्थाने जातीयवादी ठरु शकते?

गांधी भारतात येण्याआधीपासून सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय स्वातंत्र्य असा टोकाचा वाद सुरु होता. काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठाला कोणत्याही प्रकारे सामाजिक प्रश्नांचा ‘विटाळ’ नको आणि तसं झाल्यास ते व्यासपीठच पेटवून देवू, इतपत प्रखर आणि तीव्र विरोधी भावना असतानाही गांधी नागपूरच्या १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव स्वत: मांडतात. तो काय गांधी जातीयवादी आहेत म्हणून? हे जर गांधी जातीयवादी आहेत, तर १९१८ मध्ये ते जाहीरपणे म्हणतात, ‘या देशाच्या सर्वोच्चपदी भंग्याची वा चांभाराची मुलगी असणं हे माझं स्वप्न आहे आणि तोच माझ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे.’ सनातन्यांचा प्रचंड विरोध सहन करीत गांधी यावरुन उठणारं वादळ अंगावर ओढवून घेतात. का? तर गांधी जातीयवादी आहेत म्हणून?

हेही वाचा : गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

‘अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही, तर ती सैतानाची करामत आहे. सैतानाने नेहमीच धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे’ असं ते म्हणत. एवढं म्हणूनही वर ते स्वत:ला धार्मिक म्हणवत. यावरून त्यांनी जे धर्मांधाना अंगावर घेतलं, ते काय जातीयवादी होते म्हणून?

गांधींचं आणखी एक वाक्य म्हणजे, ‘अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही, आणि जर तसं असेल तर मग असा हिंदू धर्म मला नको. मी हिंदू धर्मावर जीवापेक्षाही अधिक प्रेम करत असल्याने मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होवू लागला आहे.’

गांधींच्या वर दिलेल्या तिन्ही वाक्यामध्ये ते कुठंही जातीभेदाचं समर्थन करतात, असं दिसत नाही. कोचरब आश्रमाच्या दरम्यान त्यांनी केलेली कृती जातीयवाद्यांच्या थोबाडीत मारणारीच आहे. एवढीच नाही तर यासारखी असंख्य उदाहरणं देता येतील. आणि तरीही गांधींना कोणी जातीयवादी म्हणत असतील तर त्याला आपण काय म्हणणार?

येरवडा तुरुंगातून सुटल्यावर महात्मा गांधींनी प्रदीर्घ अशी साडेबारा हजार मैलांची ‘हरिजन यात्रा’ काढली. त्या यात्रेमुळे सवर्ण हिंदूंमध्ये प्रचंड अस्वस्थता खळबळ आणि प्रसंगी संतापाचीही भावना होती. त्यांच्या या यात्रेला अडथळा निर्माण करुन रोखण्याचेही अनेक प्रयत्न झाले. एवढंच नाही तर १९३४ मध्येच पुण्याला हरिजन यात्रेच्या दरम्यानच त्यांच्यावर बॉम्बहल्ला झाला. सुदैवाने त्यातून ते बचावले.

गांधी अस्पृश्यता निवारण्यासाठी प्रयत्न करतात. हरिजनांच्या मंदिर प्रवेशासाठी चळवळ चालवतात म्हणून गांधी धर्मच बुडवायला निघालेत, या द्वेषातून धर्ममार्तंड थेट त्यांच्या जीवावर उठले होते. एवढंच नाही तर याच कारणासाठी त्यांची हत्याही झाली. हत्या करणाऱ्यांनी हत्येची काहीही कारणं दिली असोत. तरी देखील गांधींवर जातीयवादाचा आरोप होत असेल, तर हा आरोप अश्लाघ्यच नाही तर या आरोपकर्त्यांनी नीचतेची पातळी ओलांडलीय, असंच स्पष्ट होतं.

जातीयवाद्यांनी, मनुवाद्यांनी अस्पृश्यता निवारण्याचा खटाटोप करतो म्हणून त्याचा जीव घ्यावा आणि इतरांनी त्यांच्यावर ते जातीयवादी आहेत असा जीवघेणा आरोप करावा? खरंतर ‘वर्गा’वर लक्ष केंद्रित करुन डाव्यांनी भारतीय समाजातील जातवास्तवाचं मध्यवर्ती स्थान नाकारलं. दुसऱ्या बाजूला अस्पृश्यता विरोधी मोहीम स्वातंत्र्याच्या उद्दीष्टांवरुन लक्ष विचलित करणारी आहे, असं पंडित नेहरुंचं दीर्घकाळ प्रामाणिक मत होते.

पुणे तुरुंगात गांधींबरोबर असलेल्या सरदार पटेल यांनी गांधींना स्पष्ट सल्ला दिला होता, परंपरावादी आणि आंबेडकरांचे अनुयायी यांच्यात त्यांनी मधे पडू नये. दोन्ही बाजूला आपसात भांडू देत. पण गांधींनी पटेल यांचा सल्ला नाकारला. ते म्हणाले की, ‘यामुळे लक्षावधी दलितांना असं वाटता कामा नये की, आपण त्यांना वाऱ्यावर सोडलंय.’

परंपरावाद्यांच्या वादळात एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निभाव लागणार नाही हे समजून उमजून गांधींनी हे वादळ स्वत:वर ओढून घेतलं होतं. हे कदाचित खरं असेल की डॉ. बाबासाहेबांनी या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य दिलं तसं गांधींनी दिलं नसेल. पण याला कारणंही आहेत. दोघांमध्ये या प्रश्नावरुन मतभेदही आहेत आणि तसे मतभेद असणे स्वाभाविकही आहे.

हेही वाचा : डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

गांधीजी आणि बाबासाहेब या दोघांच्याही संघर्षरेषा भिन्न आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित विरुद्ध सवर्ण ही संघर्ष रेषा आखली असेल तर गांधींची संघर्षरेषा साम्राज्यवादी ब्रिटीश विरुद्ध भारत अशी आहे. त्यामुळे गांधीना या प्रश्नावर आंबेडकरांइतकं आक्रमक होणं शक्य झालं नाही. कारण स्वातंत्र्यलढ्यासाठी सवर्ण आणि दलितांच्या एकीचं बळ त्यांना हवं होतं. स्वातंत्र्यलढ्याला हानी पोचणार नाही याचं भान ठेवण्याचा ताण त्यांच्यावर होताच. दुसऱ्या बाजूला आंबेडकर या ताणातून मुक्त होते. हे सर्व लक्षात न घेता गांधीना जातीयवादी ठरवणं अन्यायकारकच आहे.

एका बाजूला त्यांना परंपरावाद्यांच्या विरोधात लढायचंय. तर दुसऱ्या बाजूला देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते ब्रिटीशांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. तिसऱ्या बाजूला त्यांना हिंदू मुस्लीम ऐक्यासाठीही जीवाचं रान करायचंय. हे सर्व करताना स्वातंत्र्यलढ्याची फळं शेवटच्या माणसांच्या पदरात पडतील का, याचीही चिंता आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे बघताना याही गोष्टींकडे बघून गांधींच्या भुमिकेचं मुल्यांकन व्हायला हवं.

‘गांधी चातुर्वर्ण्य मानत होते’ हे वाक्य शंभर टक्के खरंय आणि तेवढंच ते खोटंय. आता या वाक्याने अधिकच गोँधळ उडण्याची शक्यता आहे. कारण हे वाक्य त्यांनी वापरलेल्या पूर्ण वाक्यातील अर्धाच भाग आहे. गांधी म्हणाले होते, `मी चातुर्वर्ण्य मानतो. पण असा चातुर्वर्ण्य ज्यात उच्चनीच भेदभाव नसेल.` असा चातुर्वर्ण्य नव्हताच. हे वाक्य ‘आजीबाईंना मिश्या असत्या तर’ अशा धर्तीचं आहे.

उच्चनीच भेदभावाशिवाय चातुर्वर्ण्य नाही. गांधी अस्तित्वात असलेला चातुर्वर्ण्य मानत नाहीत आणि असा चातुर्वर्ण्य मानतात जो मुळी अस्तित्वातच नाही. हा केवळ शाब्दिक कसरतीचा भाग नाही. गांधींनी त्यांच्या आयुष्यात कधी उच्चनीच भेदभाव केलेला दिसत नाही. श्रमालाच प्रतिष्ठा असली पाहिजे. म्हणजे कोणाला प्रतिष्ठा असली पाहिजे? तर चातुवर्ण्याच्या सगळ्यात खालच्या पायरीवर असलेल्या शुद्राला प्रतिष्ठा असली पाहिजे.

चातुर्वर्ण्याच्या कोणत्या तात्विक मांडणीत श्रमाची प्रतिष्ठा आणि पर्यायाने शुद्राला प्रतिष्ठा आहे? श्रम न करताच जो खातो तो चोर आहे. आता हा श्रम न करणारा कोण आहे? तर ज्याचा जन्म ब्रम्हदेवाच्या तोंडातूनच झाला म्हणून तो जन्मत:च श्रेष्ठ आहे. चातुर्वर्ण्याच्या उतरंडीवर जो जन्मत:च शिखरावरच बसलाय म्हणून तो इतर वर्णाच्याही बोकांडी बसलाय. त्याला श्रम करण्याची गरज नाही. कारण अध्ययन करणं हाच त्याचा एकाधिकार आहे. त्या वर्णाला तो श्रम करत नाही म्हणून गांधी त्याला चोर म्हणत असेल तरीही गांधी चातुर्वर्ण्य मानत होते, असं आपण म्हणत असू तर आपण आपलेच ‘चेकअप’ करुन घेणं आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे.

गांधींचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे गांधी धर्माचा अवकाश अजिबात सोडायला तयार नव्हते. ही गोष्ट चांगली की वाईट यावर वादच नाही तर वादंगही होऊ शकतो. गांधींना हा अवकाश तर घट्ट धरुन ठेवायचाच आहे. पण ज्या धर्मांधांनी या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुन त्यावर ताबा मिळवलाय, बळजबरी कब्जा मिळवलाय, त्यांना तिथून हुसकावूनही लावायचंय. तसं नसतं तर आधीच येऊन गेलेले गांधींचं वाक्य आपण तपासून पाहू.

ते म्हणतात, ‘मी हिंदू धर्मावर जीवापेक्षाही अधिक प्रेम करीत असल्यामुळे...’ म्हणजे माझं हिंदू धर्मावर प्रेम आहे, नुसतंच प्रेम नाही तर ते जीवपलीकडे आहे. असं म्हणत धर्माचा अवकाश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि दुसऱ्या वाक्यात ‘मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागलाय` म्हणजे जे अस्पृश्यतेचं समर्थन करत असतील त्यांचं हिंदू धर्मावर अजिबात प्रेम नाही. आणि खरोखरच त्यांच हिंदू धर्मावर प्रेम असतं तर, त्यांनी हा कलंकाचा भार सहन केलाच नसता. मी हे करतो आहे कारण माझं हिंदू धर्मावर जीवापाड प्रेम आहे. तुम्ही ते करत नाही कारण तुमचं कवडीचंही प्रेम हिंदू धर्मावर नाही.

‘माझा हिंदू धर्मावर जीवपल्याड प्रेम आहे.’ हे वाक्यच मुळी धर्माचा अवकाश ताब्यात घेण्यासाठी वापरलंय आणि पर्यायाने अस्पृश्यता पाळणारे जे धर्मावर कब्जा करुन बसलेत त्यांना हुसकावून लावण्यासाठी आहे. हे जरा बारकाईने बघितल्यास लक्षात येईल. दुसऱ्या एका वाक्यात, ‘अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही,’ असं गांधी म्हणतात. या वाक्याचा दुसरा अर्थ असाही होतो की जे अस्पृश्यता पाळतात ते हिंदू धर्मीय असूच शकत नाहीत. परत इथं पहिल्यांदा धर्माचा जो काही अवकाश आहे तो व्यापणं आणि ज्यांनी हा अवकाश व्यापलाय त्यांना तिथून हुसकावणं.

मनुवाद्यांनी गांधीना ‘धर्मबुडव्या’ ठरवत त्यांची हत्याच नव्हे तर ‘वध’ करावा. त्यांना ‘राक्षस’ ठरवावं आणि मनुविरोधकांनी त्यांना मनुसमर्थक जातीयवादी चातुर्वर्ण्य मानणारे म्हणत त्यांना दुश्मन ठरवावं याच्या एवढं दुसरं दुर्देव नाही. धर्मांधाच्या नजरेत गांधींचे असंख्य ‘प्रमाद’ आहेत. त्याचाच प्रसाद म्हणून त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.

एकतर गांधी धर्माचा अवकाश कब्जात घेवून बसले आहेत. त्यातही धर्माचा अर्थ ते सांगताहेत. हे खरंतर ‘पाप’ आहे. कारण गांधी ज्या जाती, वर्णाचे आहेत. त्या जाती, वर्णाला धर्माचा अर्थ सांगण्याचा अधिकारच नाही. तसा तो सांगत असेल तर हे महापाप आहे. कारण चातुर्वर्ण्यानुसार हा कर्मसंकर आहे. असा कर्मसंकर करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. शंबुकाने हे पाप केलं होतं म्हणून रामाने त्याचा वध केला. कारण शुद्र असूनही त्याने वेदाचे अध्ययन केलं आणि कर्मसंकर केला. संत तुकारामानेही ‘वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा’ असं म्हणत कर्मसंकर केला, म्हणून त्यांची ‘सदेह वैकुंठात’ रवानगी करण्यात आली. गांधी तर आयुष्यभर हा कर्मसंकर घडवून आणत होते. इसकी सजा मिलेगी, भरपूर मिलेगी, म्हणत धर्माच्या गब्बरांनी त्यांना हत्येची शिक्षा दिलीच आहे.

भंगीकाम, मेलेल्या ढोरांची कातडी सोलण्याची कामं कोणी करावी तर ती शुद्रांनी. पण गांधींनी ही कामं सवर्णांनाही करायला लावली. एवढंच नाही तर ही कामं गांधींच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनीही केली. अस्पृश्यता निवारण मोहिमेत असो, श्रमाला प्रतिष्ठा देण्याच्या नावाखाली असो, गांधींनी असली ‘हलकी’ कामं, हलक्या जातींनी करावयाची काम वरच्या जातींच्या लोकांना करायला लावली. त्यासाठी त्यांनी अनेक सवर्णांना प्रेरीत केलं आणि समाजात मोठ्या प्रमाणात कर्मसंकर घडवून आणला. गांधी चातुर्वर्ण्य मानत असते तर असा कर्मसंकर गांधींनी घडवून आणला असता?

हेही वाचा : गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात

कोकणातील आप्पासाहेब पटवर्धन शुद्ध चित्तपावन ब्राम्हण. त्यांनी आयुष्यभर गांधींच्या सांगण्यावरुन भंगीकाम आणि चांभारकाम केलं. लोक त्यांची घृणा करत आणि म्हणत, गांधीतर मेलेल्या माणसांनाही जिवंत करतो आणि दोन पायांवर चालायला शिकवतो, असं ऐकलं होतं. पण हा तर दोन पायांवर चालणाऱ्या माणसांनाही डुकरासारखा चार पायांवर चालायला लावतो. डुकराचा विष्ठेचा जो संबंध तोच संबंध आप्पासाहेब पटवर्धनांच्या भंगी कामाशी लोकांनी विशेषत: धर्ममार्तंडांनी जोडला होता.

आप्पासाहेब पटवर्धन हे तर एक उदाहरण झालं. अशी असंख्य उदाहरणं आहेत की गांधींच्या सांगण्यावरुन समाजात कर्मसंकर घडून येत होता. आणि चातुर्वर्ण्यामधे असा कर्मसंकर करणारा आणि घडवून आणणारा केवळ ‘वधा’लाच पात्र आहे. आणि त्यांच्या दृष्टीने गांधी शेवटी वधाला पात्र ठरलेच ना?

चातुर्वर्ण्यामधे जेवढा ‘कर्मसंकर’ निषिद्ध आहे त्याहीपेक्षा निषिद्ध वर्णसंकर आहे. गांधींनी कर्मसंकर तर घडवून आणलाच पण, वर्णसंकरही घडवून आणण्याला उघड प्रोत्साहन दिलं. या वर्णसंकराला तर क्षमाच नाही. आणि तो घडवून आणणाऱ्याला तर नाहीच नाही.

सुरवाती सुरवातीच्या काळात गांधी कोणत्याही लग्नाला जात आणि वधुवरांना आशीर्वाद देत. पण नंतरच्या काळात त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. ते कोणत्याही सजातीय विवाहाला म्हणजे जातीअंतर्गत विवाहाला हजर राहिले नाहीत. पण विवाह एक सवर्ण आणि दलित, त्यांच्या भाषेत हरिजन असा असेल तर अशा लग्नाला ते आवर्जून उपस्थित राहत होते. हे सरळ सरळ चातुर्वर्ण्याविरोधात वर्णसंकर घडवून आणण्याबाबतची गांधींची बंडखोरी होती.

गांधी या निर्णयाबाबत इतके कठोर होते की त्यांच्या या निर्णयाचा फटका खुद्द त्यांच्या ‘घरातच’ बसला. महादेवभाई देसाई आणि महात्मा गांधी यांचे पितापुत्राचे मानलेले नाते होते. महादेवभाई देसाईंना महात्मा गांधी पुत्रवत मानत. त्याच महादेव भाईंच्या मुलाचं लग्न ठरलं. म्हणजे एका अर्थाने गांधींचा नातू, नारायण देसाईंचं लग्न. पण या लग्नाला गांधी गेले नाहीत. कारण ते लग्न सजातीय होत.

महादेवभाई देसाईंनी आपल्या परीनं समजावून बघितलं. त्यांच्या वतीने त्यांनी गांधींचे जवळचे मित्र नरेनभाईंनाही या मोहिमेवर लावलं की त्यांनी या लग्नात हजर रहावं. पण त्याला यश आलं नाही. अखेर गांधी त्यांना म्हणाले, एक वेळ दुसऱ्या कुणाबाबतीत अपवाद होऊ शकतो. पण घरच्या मुलासाठी माझ्या प्रतिज्ञेत कसा अपवाद करू?

कर्मसंकर आणि वर्णसंकर घडवून आणणाऱ्या गांधींना जेवढं त्यांच्या शत्रूंनी ओळखलं होतं, तेवढं त्यांच्या मित्रांना ओळखता आले नाहीत. गांधी जातीयवादी आहेत. गांधी चातुर्वर्ण्य मानतात, असं म्हणत ते जातीयवाद्यांना, मनुवाद्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतच करीत राहिले. आज जातीयवाद्यांच्या, मनुवाद्यांचा, हिंदुत्ववाद्यांचा अश्वमेध चौफेर उधळलेला दिसतो. त्याची बीज महात्मा गांधींना ओळखण्यात पुरोगाम्यांनी, क्रांतिकारकांनी केलेल्या महाभयंकर चुकीत आहेत, असं वाटतं.

हेही वाचा : 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट

(लेखक हे ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. )