डेस्मंड टुटू: दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीचे आयकॉन

२८ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

आजच्या आफ्रिकेला गुलामगिरीचा मोठा इतिहास आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या वास्तव्यात त्याचे चटके महात्मा गांधींनाही बसले. त्याला विरोध करत या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ त्यांनी तिथल्या भारतीयांना दिलंच पण भारतात येऊन ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात आंदोलन पुकारलं. नेल्सन मंडेलांनी महात्मा गांधीजींच्या लढ्याची प्रेरणा घेत दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढा उभारला.

वर्णद्वेषाविरोधातली ही चळवळ हळूहळू आफ्रिकेत पसरू लागली. नेल्सन मंडेला यांच्यासोबत एफडब्ल्यू क्लार्क, केनेथ कौंडा अशा अनेकांनी जागोजागी या चळवळीचं नेतृत्व केलं. त्यातून कृष्णवर्णीयांचं होणारं शोषण जगभर पोचलं. त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष उभा राहिला. डेस्मंड टुटू हे याच वर्णभेदविरोधी चळवळीतलं एक महत्वाचं नाव होतं. त्यामुळेच त्यांचं जाणं हे एका पिढीचं जाणं आहे.

हेही वाचा: ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!

शाळा, कॉलेजमधे वर्णद्वेषाचे चटके

डेस्मंड टुटू यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९३१ला दक्षिण आफ्रिकेतल्या क्लेर्कडॉर्प शहरात झाला. वडील शिक्षक असले तरी घरचं वातावरण फार गरिबीचं होतं. त्यांची आई घरकाम करायची. डेस्मंड यांचं प्राथमिक शिक्षण जोहान्सबर्गमधे झालं. अभ्यासात ते फार काही हुशार नव्हते. पण शाळेत त्यांना रग्बी हा खेळ आवडायचा.

शाळा, कॉलेजमधेच त्यांना वर्णद्वेषाचे चटके बसले होते. शिक्षक होण्यासाठी लागणारा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. पुढे १९५४ला एका शाळेत त्यांनी इंग्रजी आणि इतिहास विषय शिकवायला सुरवात केली. त्याचवेळी त्यांचं बहिणीची मैत्रिणी असलेल्या नोमालिजो लिया शेनक्सेनवर प्रेम जडलं. जून १९५५मधे त्यांनी लग्नही केलं.

डेस्मंड टुटू यांनी कॉलेज काळात धर्मशास्त्र, बायबल आणि चर्चच्या इतिहासावर अभ्यास केला होता. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदविरोधी चळवळ जोमात होती. शाळा, कॉलेजमधे वर्णद्वेषाचा आलेल्या अनुभवामुळे आपसूक ते या चळवळीकडे ओढले गेले.

पहिले कृष्णवर्णीय धर्मगुरू

वयाच्या ३० व्या वर्षी ते एका चर्चचे पाद्री बनले. १९७५ला जोहान्सबर्गचं बिशप पद त्यांच्याकडे आलं. धर्मगुरू म्हणून त्यांची चर्चा होऊ लागली. कारण हे पद  दक्षिण आफ्रिकेतल्या चर्चचं चौथं मोठं पद समजलं जायचं. या पदावर पोचणारे ते पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती होते. १९८६ला त्यांच्याकडे केपटाऊनचं आर्चबिशप पद आलं.

आर्चबिशप असताना त्यांनी या पदाचा वापर हा सर्वसामान्यांसाठी केला. गावोगावी जाऊन वर्णद्वेषाविरोधात प्रबोधन केलं. सामाजिक अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहिले. दक्षिण आफ्रिकेत जे काही आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलकांचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांचं नाव घेतलं गेलं.

नेल्सन मंडेला यांच्या बरोबरीने या आंदोलनात ते उतरले होते. १९८०च्या दशकात एक प्रतीक बनून ते समोर आले. १९८४ला त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांचं नाव जगभर पोचलं.

हेही वाचा: कंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

ठाम भूमिकांची कायम चर्चा

१९९४ला नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हा डेस्मंड टुटू यांनी दक्षिण आफ्रिकेचा 'रेनबो नेशन' असा उल्लेख केला. १९९६ला ते आर्चबिशप पदावरून रिटायर झाले. पुढे त्यांच्याकडे 'ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशन'ची जबाबदारी आली. श्वेतवर्णीय सरकारच्या सत्ता काळात झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी ही समिती तयार करण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिकेतल्या १९४८ ते १९९१ दरम्यानच्या वर्णद्वेषाविरोधातल्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी झाले होते. श्वेतवर्णीयांच्या सत्ता आणि शोषणाला त्यांचा विरोध होता. तशीच ठाम भूमिका त्यांनी प्रत्येकवेळी घेतली. मंडेला यांच्या सत्ता काळात आफ्रिकन नॅशनल काँग्रेस वादाच्या भोवऱ्यात अडकली. तेव्हा मंडेला यांच्यावरही टीका करायला त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. माजी राष्ट्रपती जॅकब जुमा यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी आवाज उठवला.

एड्ससारख्या मुद्यावर काम केलं. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. समलैंगिकांसोबत होणारा भेदभाव त्यांनी कृष्णवर्णीय आणि महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाइतकाच वाईट असल्याचं म्हटलं होतं. इस्रायल-फिलिपीन्स संघर्षासारख्या आंतरराष्ट्रीय घटनांवरही त्यांनी वेळोवेळी आपलं म्हणणं मांडलं.

एका पिढीचं जाणं

डेस्मंड टुटू यांना १६ ऑक्टोबर १९८४ला नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्याआधी तीन वर्ष त्यांचं नाव नोबेलच्या स्पर्धेत राहीलं. २००७ला गांधी शांतता पुरस्कारही मिळाला. तर २०१५ला त्यांना दुसऱ्या एलिझाबेथ राणीनं 'द ऑर्डर ऑफ द कंपेनियंस ऑनर'नं सन्मानित केलं. जगभरातल्या १०० पेक्षा अधिक युनिवर्सिटींनी मानद पदवी देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला होता.

टुटू यांनी वेगवेगळ्या विषयांवर ७ पुस्तकंही लिहिली होती. त्यांची विचारधारा नेमकी कोणती हे त्यांना विचारलं गेलं तेव्हा २००९ला 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'वरून आपण समाजवादी असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. १९९७पासून ते कॅन्सरशी लढा देत होते. २०१०पासून त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाणंही बंद केलं होतं.

त्यांचं जाणं हे एका पिढीचं जाणं असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा यांनी म्हटलंय. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना 'युनिवर्सल स्पिरिट' म्हटलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'डेस्मंड टुटू जगातल्या असंख्य लोकांचा प्रकाश' असल्याचं म्हणत त्यांना अलविदा केलंय.

हेही वाचा: 

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कुळकथा