आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
'सामना हा मराठी सिनेमा ४५ वर्षांपूर्वी आला. विजय तेंडुलकर यांची पटकथा आणि संवाद, जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन आणि निळू फुले म्हणजे हिंदुराव पाटील आणि डॉ. श्रीराम लागू म्हणजे खादीधारी मास्तर यांच्या अभिनयाची जुगलबंदी यामुळे तो प्रामुख्याने लक्षात राहिला. आणि प्रचंड गाजला तो त्यातील आशय आणि विषय यामुळे. विषय काय तर महाराष्ट्रातील सहकार उद्योगांभोवती चालणारं राजकारण आणि आशय काय - तर एक ध्येयवादी आणि एक व्यवहारवादी यांच्यातील संघर्ष.
पण तो संघर्ष वरवरचा नव्हता, बटबटीत नव्हता. तो संघर्ष केवळ दोन व्यक्तींमधला नव्हता, दोन वृत्तींमधला होता. त्या दोन्ही वृत्तींमधल्या समाजधारणा भिन्न होत्या, पण परस्परविरोधी नव्हत्या. किंबहुना परस्परपूरक म्हणता येतील अशा होत्या. कारण त्या दोन्ही वृत्तींना परस्परांची ताकद आणि मर्यादा यांचं पुरेपूर भान होतं. एवढंच नाही तर परस्परांचं महत्त्व आणि मोठेपण मान्य होतं. परिणामी, परस्परांविषयी आंतरिक पातळीवर आकर्षण आणि आदरभाव हेही होतं.
पाच वर्षांपूर्वी 'सामना' या सिनेमाला ४० वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने एका आयोजित कार्यक्रमात, जब्बार पटेल यांनी एक मार्मिक आठवण सांगितली. त्यांनी सिनेमाची पटकथा वाचल्यावर विजय तेंडुलकरांना असा प्रश्न विचारला होता की, 'तुम्ही या सिनेमातल्या हिंदुराव पाटील ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा एका सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन अशी का दाखवली आहे, एखादा आमदार किंवा खासदार का नाही?' त्यावर तेंडुलकरांनी दिलेलं उत्तर असं होतं की, 'सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन स्थानिक पातळीवर जे काही करू शकतो, ते कोणताही आमदार वा खासदार करू शकत नाही.
ही आठवण ऐकली तेव्हा तेंडुलकरांची साहित्यिकाची राजकीय जाण किती कमालीची प्रगल्भ होती, असं आम्हाला वाटलं. याचं कारण त्या कार्यक्रमाच्या काहीच महिने आधी, श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ९४ वर्षांचे आप्पासाहेब सा. रे. पाटील यांना एका मुलाखतीत असाच प्रश्न विचारला गेला होता. तो असा की, 'तुम्ही वयाच्या ३६ व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालात आणि वयाच्या ८० नंतर दोनदा झालात, दरम्यानच्या काळात आमदार आणि खासदार होण्यासाठी आणखी तीन निवडणुका लढवल्यात; पण तुम्हाला आमदार, खासदार आणि मंत्रिपद यांचं आकर्षण नसावं असं दिसतं, याचं कारण काय?'
या प्रश्नाला त्यांनी उत्स्फूर्त दिलेलं उत्तर होतं, 'साखर कारखान्याच्या चेअरमनला जे काही करता येते, ते आमदार-खासदार यांना करता येत नाही म्हणून!' त्याच मुलाखतीत ते पुढे म्हणाले, 'राजकारणाची मला आवड नाही, पण सामाजिक कार्य करायचं असेल तर राजकारणात असावंच लागतं. त्या विधानाचं अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, 'मला विधायक कामात रस होता आणि ध्येयवाद ही त्यामागची प्रेरणा होती.'
हेही वाचा : गोवा मुक्ती दिन : स्वातंत्र्यवीरांची आठवण करण्याचा दिवस
वरील दोन उदाहरणं थोड्या विस्तारानं सांगण्याचं कारण, तेंडुलकरांचं आकलन आणि आप्पासाहेबांचं मनोगत किती मार्मिक आहे, हे तर अधोरेखित करायचं आहेच. पण आणखी एका मूलभूत मुद्याकडे लक्ष वेधायचंय. तो असा की, मूलतः ध्येयवादी आणि व्यवहारवादी या वृत्ती परस्परविरोधी नसून, परस्परपूरक आहेत. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्यातली दरी क्रमाक्रमाने वाढत गेलीय. सामना सिनेमा आला तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून पाव शतक झालं होतं आणि त्या दोन प्रवृत्तींमधली दरी कमालीची रुंदावलीय, हे सूचित करणारा तो सिनेमा होता.
त्यालाही आता अर्धशतक होत आलंय. त्या दोन प्रवृत्तींमधे पूर्णतः फारकत झाली असावी, असं सध्याचं चित्र आहे. आणि ही अशी फारकत झाली आहे खरी', असं आप्पासाहेब सा.रे. पाटील यांनाही वाटत होतं. त्याची त्यांना मोठी खंतही वाटत होती. एवढंच नाही तर, सहकाराच्या क्षेत्रात आता ध्येयवाद उरलेला नाही आणि विधायक कार्य आता हितसंबंधांच्या घट्ट जाळ्यात अडकलंय, अशी त्यांची अखेरच्या काळातली भावना होती.
अशा या आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष कालच्या ११ डिसेंबरला सुरू झाले आहे. १९२१ ते २०१५ असे ९४ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेने त्यांच्या मनाची पकड घेतली आणि त्यानंतरची ७० वर्षे त्यांचे ते झपाटलेपण कायम राहिले.
महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन कदाचित सुखी आणि समृद्धदेखील जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख सांगितली जाते आणि त्या जिल्ह्यातला सर्वाधिक धन कदाचित सुखी आणि समृद्ध तालुका म्हणून जयसिंगपूर म्हणजे शिरोळचा उल्लेख केला जातो. मात्र गेल्या पाव शतकात जरी हे स्थान त्या परिसराला लाभलं असलं तरी त्याच्या आधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे प्रमुख कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
अखेरची ३५ वर्ष ते तिथल्या साखर कारखान्याचे अध्यक्ष किंवा चेअरमन होते. तो त्यांचा सर्वोच्च आविष्कार होता. पण त्यांनी सुरवात केली ती सहकार तत्त्वावर खानावळ सुरू करून. साने गुरुजींच्या गोष्टीतला रामा खानावळवाला, घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घरचं जेवण मिळावं, असं सुख देण्यासाठी धडपडतो. ती प्रेरणा घेऊन आप्पासाहेबांनी खानावळ सुरू केली होती.
त्यानंतर शेती आणि शेतीपूरक उद्योगांशी निगडित सहकार तत्त्वाचे अनेक प्रयोग तर त्यांनी केलेच, पण स्थानिक पातळीवर 'इंद्रधनुष्य' हे जिल्हा दैनिक त्यांनी सहकार तत्त्वावर दहा-बारा वर्ष चालवलं. त्याचे सल्लागार संपादक म्हणून वि.स. खांडेकर यांना घेतले होते, यात सर्व काही आलेच.
हेही वाचा : आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?
औपचारिक शिक्षण सातवीपर्यंत झालेलं, नाका-कारकून म्हणून वयाच्या १७ व्या वर्षी सुरवात केलेली आणि वयाच्या २४ व्या वर्षी स्थानिक पातळीवरच्या खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक अशी त्यांच्या आयुष्याची पायाभरणी होती. पण राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून त्यांची मानसिक बैठक तयार झाली होती आणि एस. एम. जोशी आणि रावसाहेब पटवर्धन यांना ते वैचारिक गुरू आणि मार्गदर्शक मानत होते. समाजवादी विचारांचे नेते, कार्यकर्ते आणि संस्था-संघटना यांच्या सहवासात ते अखेरपर्यंत रमत होते. पण कोणत्याही समाजवादी पक्षाचे सदस्य ते कधीच नव्हते.
वयाच्या ७५ नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तीन विधानसभा निवडणुका लढवल्या. त्या आधीच्या निवडणुका त्यांनी पुरोगामी पक्षांच्या पाठिंब्याने, पण अपक्ष म्हणून लढवल्या होत्या. वयाच्या पस्तिशीत अपक्ष आमदार झाल्यानंतरही पुढची चाळीस वर्ष ते कोणत्याही राजकीय पक्षात गेले नव्हते. याचा योग्य अर्थ लावता आला पाहिजे.
त्याचं एक कारण स्थानिक पातळीवर राजकीय दृष्टीनं तेच सोईचं असणार हे उघड आहे; पण दुसरं कारण तितकंच प्रबळ असणार, ते म्हणजे त्यांना मूलतः राजकारणाची आवड नव्हती. विधायक कार्यासाठी ते करावं लागत होतं.
वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांनी परदेश दौरे करायला सुरुवात केली आणि पुढच्या चाळीस वर्षांत ३१ देश पाहिले आणि अनुभवले. ते कशासाठी तर तेथील जे काही चांगले आहे ते आपल्या परिसरात आणता यावं यासाठी! अर्थातच त्यांना विशेष रस होता तो शेती आणि सहकार यातच. साहजिकच, आपल्या मातीत आणि आपल्या माणसांत करता येतील असे प्रयोग त्यांना विशेष भावले. परिणामी इस्रायल आणि जॉर्डन या लहान देशांतली काम पाहून ते अधिक प्रभावित झाले.
विकासाची भाषा ते फारसे बोलत नव्हते, 'आपल्या सभोवतालच्या माणसांचं जीवनमान उंचावलं पाहिजे हे आणि अशी विधानं त्यांच्या बोलण्यात सतत येत असत. 'सभोवतालची माणसं' म्हणताना आपले सगे-सोयरे, पाठीराखे किंवा आपल्याशी संबंधित संस्था संघटना एवढंच त्यांना अभिप्रेत नव्हतं.
जे लोक अधिक उत्तम काम उदात्त भावनेने करतील त्या सर्वांचं त्यांना कौतुक होतं. मग ते स्वच्छता करणारा कर्मचारी असो, झाडांची निगा राखणारा माळी असो, तजेलदार जनावरे ठेवणारा पशुपालक असो, जमिनीत मनापासून राबणारा सर्जनशील शेतकरी असो, विशिष्ट प्रश्नासाठी लढणारा सामाजिक कार्यकर्ता असो, नि:स्पृह आणि सचोटी असणारा प्रशासकीय अधिकारी असो वा ध्येयवादी जीवनाचे अनोखे दर्शन घडवणारा लेखक/साहित्यिक असो.
हेही वाचा : कोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता?
जीवनमान उंचावलं पाहिजे या त्यांच्या म्हणण्यात आवश्यक त्या भौतिक सुविधांचा लाभ घेत, साहित्य आणि कला यांचा आस्वाद घेत पुढे जायला हवं ही धारणा पक्की होती. त्यांच्या ध्येयवादात त्यागाचे अवडंबर आणि आयुष्याची फरफट यांना स्थान नव्हतं आणि सभोवतालच्या अनेक ध्येयवेड्या माणसांमधे या दोन्हींपैकी काही तरी दिसायचं तेव्हा त्यांना दुःख व्हायचं. म्हणूनच कदाचित, अशा ध्येयवाद्यांना थोडेसं सुख मिळावं यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचं.
अर्थातच ध्येयवाद्यांच्या संगतीत राहून, आपला ताजेपणा टिकवण्याची कला त्यांना आत्मसात झाली होती. अखेरपर्यंत दिवसाचे बारा ते सोळा तास काम करण्यासाठीची ऊर्जा त्यांना त्यातूनच मिळत होती. आपल्या सभोवतालावर रोज आदळणारे आशय आणि विषय समजून घेण्याचा आणि त्यांना योग्य प्रतिसाद देण्याचा रियाज त्यांनी सातत्याने केला. त्याच वेळी आपण कुठून आलो आहोत याचे भान सुटू न देता, झालेल्या आणि न झालेल्या बदलांविषयीचे त्यांचे चिंतनही कधी थांबले नाही.
आपल्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या घटकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी शेती, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि लहान मोठे उद्योग इत्यादी क्षेत्रांत अनेक संस्थांची उभारणी केली. ते करताना साखर कारखाना, अन्य सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायती, नगरपालिका इत्यादी प्रकारच्या स्थानिक पातळीवरील अनेक निवडणुका लढवल्या. पण त्यात कट कारस्थानं आणि खुनशी राजकारण यांना स्थान दिलं नाही. त्याहून अधिक विशेष हे आहे की, विविध क्षेत्रांतल्या किती व्यक्तींना, संस्थांना, संघटनांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली याची गणतीच नाही. आणि ते करताना 'परतावा' म्हणून किंचितही अपेक्षा बाळगल्या नाहीत. मात्र त्यांना त्यातून विधायक कार्यासाठी ऊर्जा मिळत होती हे निश्चित!
असे हे आप्पासाहेब सा. रे. पाटील साधना ट्रस्टचे तब्बल तीन दशके विश्वस्त होते, त्यातील अखेरची दहा वर्षे कार्यकारी विश्वस्त होते. साधनाला आर्थिक स्थैर्य लाभावं, पायाभूत सुविधा वाढाव्यात यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. ध्येयवादी वाटचालीला बळ मिळावं एवढाच त्यामागचा त्यांचा उद्देश होता. त्यांच्या हयातीत कधीही त्यांच्यावरील लेख साधनात प्रसिद्ध होणार नाही, अशीच त्यांनी काळजी घेतली. मात्र त्यांच्या अखेरच्या काळातील दहा मुलाखतींचं पुस्तक तेवढं साधना प्रकाशनाकडून आलं, तेही त्यांच्या मृत्यूनंतर.
आता त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. त्यांच्या कर्मभूमीत, सध्याच्या कोविड काळामुळे कोणतेही उत्सव, समारंभ झाले नाहीत. उपक्रम राबवला गेला तो प्रामुख्याने स्वच्छतेचा आणि रक्तदानाचा. मात्र हा काळ संपलेला असेल तेव्हा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची अखेर आलेली असेल, त्यावेळी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम तिथं आयोजित केले जातील. त्याचवेळी 'महाराष्ट्रात सहकार चळवळीचे काय झाले?' या विषयावरील विशेषांक किंवा परिसंवाद साधनाच्या वतीने येईल. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
हेही वाचा :
कविता व्यक्तीला संवेदनशील बनवते
'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
(हे २६ डिसेंबर २०२० च्या साधना साप्ताहिकाचे संपादकीय आहे.)