सत्तरीतल्या रजनीकांतची नवी राजकीय इनिंग कुणाच्या फायद्याची?

१२ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?

गेली पाच दशकं द्राविडी राष्ट्रवाद हा तामिळनाडूच्या राजकारणाचा महत्वाचा गाभा राहिलाय. द्राविडी राजकारण करणारे नेते कायम सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेत. त्याचबरोबर सिनेमातले नायक राजकीय पटलावर नेते म्हणून यशस्वीही ठरलेत. त्यांचं त्यांचं आपलं असं खास वलय आहे.

ते वलय तामिळी जनतेवर गारुड निर्माण करणारं आहे. असं असलं तरी द्राविडी राष्ट्रवाद आणि उत्तर भारतीय संस्कृतीला विरोध हे तिथल्या राजकारणातले महत्वाचे मुद्दे आहेत. भाषिक अस्मितेशिवाय तिथलं राजकारण पुढं सरकत नाही.

पेरियार, अण्णादुराई, एमजीआर, करुणानिधी, जयललिता यांची छाप तिथल्या राजकारणावर आजही कायम आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तिथल्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. या दोन पक्षांभोवती तिथलं राजकारण आजतागायत फिरत आलंय. पण करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात पोकळी निर्माण झाली. अभिनेता म्हणून एक काळ गाजवलेल्या कमल हसन यांनी मक्कलं निधी मय्यम या पक्षाची स्थापना करत नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न केला.

सुपरस्टार रजनीकांत यांनीही आपल्या नव्या पक्षाचं नाव घोषित केलंय. त्यांचा फॅन क्लब कोटीत असला तरी राजकारण मात्र पूर्णपणे वेगळं असतं. त्यामुळे रजनीकांत यांच्यासाठी हा प्रवास सोपा नक्कीच नाहीय. तामिळनाडू विधानसभेची निवडणूक ऐन तोंडावर आहे. तामिळी लोकांनी अभिनेता म्हणून रजनीकांत यांना दिलेली साथ त्यांच्या राजकीय भूमिकेसोबतही असेल का ते पहावं लागेल.

हेही वाचा: रजनीकांतचं पॉलिटिक्स सिनेमातून बोलतंय

ओळख सुपरस्टारची

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० ला तेव्हाच्या म्हैसूर आताच्या कर्नाटकातल्या बंगळुरूत एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव शिवाजी गायकवाड. जिजाबाई आणि रामजी राव असं त्यांच्या आईवडलांचं नाव. लहान असतानाच वयाच्या ९ व्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यांचं कुटुंब मूळचं महाराष्ट्रातल्या पुण्यातलं. वडील रिटायर झाल्यावर गायकवाड कुटुंब बंगळुरूला स्थायिक झालं. रजनीकांत कुटुंबातलं सगळ्यात धाकटं भावंडं.

रजनीकांत यांचं प्राथमिक शिक्षण बंगळुरूतल्या गवीपुरम गवर्नमेंट कन्नड मॉडल या शाळेत झालं. लहान असताना त्यांना क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल खेळायची आवड होती. त्यांच्या भावामुळे रामकृष्ण मिशननं स्थापन केलेल्या एका हिंदू मठात त्यांचं जाणं व्हायचं. तिथं वेद, इतिहासाचं शिक्षण दिलं जायचं. त्यातून त्यांच्या मनात अध्यात्माविषयी कुतूहल निर्माण झालं. गोडी निर्माण झाली. ते करतानाच त्यांनी नाटकातही काम करायला सुरवात केली. एका नाटकात केलेल्या एकलव्याच्या भूमिकेचं कन्नडमधले महाकवी द. रा. बेंद्रे यांनी त्यांचं कौतुक केलं.

रजनीकांत आचार्य पब्लिक स्कुलमधे दाखल झाले. पुढचं शिक्षण तिथंच पूर्ण केलं. ते करताना त्यांनी आपला बराच वेळ नाटकात काम करण्यासाठी दिला. रोजी रोटीसाठी हमालीचं कामही करावं लागलं. पुढं बंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्विसमधे बस कंडक्टर म्हणून रुजू झाले. कन्नड नाटककार टोपी मुनिअप्पा यांनी त्यांच्या पौराणिक नाटकांमधे काम करण्याची संधी रजनीकांतना दिली. एकीकडे बस कंडक्टर म्हणून काम तर दुसरीकडे नाटकं चालू होती. त्यांची अभिनय क्षेत्रातली सुरवात कन्नड नाटकांतून झाली. दुर्योधनाच्या भूमिकेमुळे ते बरेच लोकप्रिय झाले.

नाटकासोबत सिनेमात एण्ट्री

रजनीकांत यांचे मित्र राज बहादूर यांनी त्यांच्यातल्या अभिनेत्याला जिवंत ठेवलं. कुटुंबाचा सपोर्ट नसतानाही मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधे शिकण्यासाठी बहादूर यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलं. इतकंच नाही तर त्यांना आर्थिक पाठबळही दिलं. मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधे असताना तामिळ दिग्दर्शक बालचंद्रन यांनी रजनीकांत यांना तमिळ शिकायचा सल्ला दिला.

पुढे बालचंद्रन यांच्या 'अपूर्व रागल' या सिनेमातून त्यांची तमिळ फिल्म इंडस्ट्रीत एण्ट्री झाली. श्रीदेवी आणि कमल हसन अशी बडी स्टार कास्ट त्यांच्या सोबत होती. पण रजनीकांत यांची सिनेमातली भूमिका खूप छोटी होती.

सुरवातीला नकारात्मक भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. एसपी मुथुरामन यांच्या ओरु केल्विकुरी या सिनेमात पहिल्यांदा ते नायकाच्या भूमिकेत दिसले. तमिळ सिनेमा चिलकम चेपिंडी या सिनेमानं त्यांना मुख्य अभिनेता म्हणून पुढं आणलं. तर बिल्ला या सिनेमानं त्यांना पहिलं व्यावसायिक यश मिळवून दिलं. या सिनेमानंच कमल हसन यांना मागे टाकत दक्षिण भारताचा आघाडीचा स्टार बनवलं. अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचा हा रिमेक होता. पुढे अमिताभ यांच्या ११ सिनेमांचे त्यांनी तामिळ रिमेक केले.

१९७८ मधे त्यांचे तमिळ, तेलुगू, आणि कन्नड भाषेतल्या २० सिनेमे आले. एम भास्कर यांच्या तामिळ फिल्म बैरावीनं त्यांना सुपरस्टार ही ओळख दिली. टी रामा राव यांचा अंधा कानून रजनीकांत यांचा पहिला हिंदी सिनेमा. त्यावेळी तो सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला होता. १९८५ मधे १०० सिनेमांचा आकडा गाठणारे रजनीकांत यांनी १९८८ मधे ब्लडस्टोनमधून इंग्रजीत प्रवेश केला. त्यांचा राजा चायना रोजा पहिला भारतीय सिनेमा ज्यात लाइव ऍक्शन आणि ऍनिमेशन होतं. १९९० ते २००१ मधले रजनीकांत यांचे सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम, कन्नड यांच्यासोबत त्यांनी बंगाली भाषेतही सिनेमा केला.

हेही वाचा: हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं

रजनीकांत यांचं पॉलिटिकल स्टेटमेंट

थेट राजकारणात उतरण्याआधी आपल्या फॅन्सशी सिनेमातून रजनीकांत बोलतच होते.  द्राविडी राष्ट्रवादाची मांडणी करू पाहणारा काला सिनेमा असेल नाहीतर पेट्टातला हिंदू मुस्लिम एकत्रिकरणाचा प्रयोग. त्यांनी एक वातावरण तयार केलं. त्याआधी १९९६ मधे त्यांनी पहिल्यांदा आपल्या राजकारणातल्या प्रवेशाचं सूतोवाच केलं होतं. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जयललिता त्यावेळी सत्तेवर होत्या. आपला दत्तक मुलगा वीएन सुधाकरन याच्या लग्नात केलेला बेसुमार खर्च त्यावेळी चर्चेचा विषय ठरलेला होता.

रजनीकांत यांचं त्यावेळी पहिलं पोलिटिकल स्टेटमेंट आलं होतं. सरकारमधे खूप भ्रष्टाचार असून असं सरकार सत्तेवर असता नये असं त्यांनी म्हटलं होतं. रजनीकांत यांनी त्याच काळात तमिळ मनिला काँग्रेस या पक्षांचं समर्थनही केलं होतं. एखाद्या पक्षाला थेट समर्थन देण्याची ही रजनीकांत यांची पहिलीच वेळ होती असं महत्वाचं निरीक्षण बीबीसी हिंदीवरच्या एका लेखात वाचायला मिळतं. अण्णाद्रमुकबद्दल लोकांच्या मनात त्या काळात बराच रोष होता. तमिळ मनिला काँग्रेस हा पक्ष एआयडीएमकेला विरोध म्हणून जन्माला आला होता.

तमिळनाडूतला पारंपरिक विरोधक असलेल्या द्रमुकशी मनिला काँग्रेसनं युती केली. दोन्ही पक्ष पुढच्या वेळेस राज्यात सत्तेवर आले. १९९८च्या लोकसभेच्या निवडणुकीतही रजनीकांत यांनी द्रमुकचं समर्थन केलं. २००४ मधे आलेल्या बाबा या सिनेमातून त्यांचं पोलिटिकल स्टेटमेंट पहिल्यांदा अगदी ठळकपणे दिसून आलं.

२०१४ मधे राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची घोषणा केली. चेन्नईतल्या रजनीकांत यांच्या घरी दोघांची भेटही झाली. रजनीकांत यांनी मोदींचं तोंड भरून कौतुकही केलं होतं.

पक्षाचीही घोषणा

२०१७ मधे रजनीकांत यांनी चेन्नईत आपण राजकारणात येत असल्याची घोषणा केली होती. त्यांचा तामिळनाडूत एक स्वतंत्र फॅन क्लबही आहे. राजकारणात येत असल्याची घोषणा करत असताना त्यांनी आपली पुढची भूमिकाही स्पष्ट केली होती. देशाचं राजकारण बदलायची गरज असून आपल्याला आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी एक स्वतंत्र वेबसाइटही लॉंच केली होती.

येत्या तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा आपण लढवणारं असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण त्यांची भूमिका भाजपला पोषक असेल असेही आरोप आतापासून होतायत. त्याला कारणही तसंच आहे. रजनी मक्कल मंद्रक या आपल्या पक्षाच्या मुख्य समन्वयक पदावर त्यांनी भाजप आणि संघ परिवारातल्या अर्जुनमूर्तींची नियुक्ती केलीय. महत्वाचं म्हणजे गेल्या पाच दशकांच्या राजकारणात द्रमुक आणि अण्णा द्रमुक या पक्षांव्यतिरिक्त तामिळच्या जनतेनं इतर कुणालाही थारा दिलेला नाही.

हेही वाचा: हैदराबादचा निकाल भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा

तामिळनाडूचं राजकारण बदलेल?

तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर खूप मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली. भाजप तिथं आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करतंय. कन्याकुमारी, तिरूनलवेली आणि कोयम्बतूर या भागांमधे भाजपचा थोडाफार बेस आहे. तिथल्या ब्राम्हण समुदायावर त्यांची मदार आहे. मात्र २ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त त्यांची लोकसंख्या नाही. त्यामुळे भाजपला रजनीकांत यांना आपल्याकडे खेचावं लागेल. पण त्यांच्या तामिळनाडूत अण्णाद्रमुकशी वाटाघाटी सुरुयत. सध्या रजनीकांत भाजपपासून चार हात लांब असल्याचं दिसतंय. रजनीकांत यांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला तरी त्यांना सध्याच्या प्रस्थापित पक्षांशी म्हणजेच द्रमुक, अण्णाद्रमुकशी थेट लढावं लागेल.

जयललिता आणि करुणानिधी हयात नसले तरी त्यांचं वलय पक्षावर आणि मतदारांवर आजही आहे. शिवाय पक्ष म्हणून त्यांच्याकडे केडरही आहे. भलेही जयललिता आणि करुणानिधी यांच्यावेळचा प्रभाव ओसरला असेल. रजनीकांत यात नवखे आहेत. त्यामुळे त्यांना आधी पाया तयार करावा लागेल. पण तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीतली रजनीकांत यांची एन्ट्री मात्र इंटरेस्टिंग असेल. तिथल्या आजपर्यंतच्या राजकारणात सुपरस्टारचं एक वेगळं वलय आहे. ती छाप रजनीकांत पाडण्यात यशस्वी होतायत का ते पहायला थोडा वेळ वाट पहावी लागेल.

हेही वाचा: 

सह्याद्रीला पुन्हा हिमालयाची हाक

लाच न देण्याची चैन कुणाला परवडणार?

फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

डॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते

सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?