कमल शेडगे : अक्षरांना खेळवणारा सम्राट

०६ जुलै २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले.

सुप्रसिद्ध अक्षरकार कमल शेडगे यांचं ४ जुलैला वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं. मुळात चित्रकार असणारे शेडगे अक्षरलेखन, लेटरिंग आणि जहिरातींकडे वळाले. तारूण्यात उचललेला ब्रश अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी कधीही खाली ठेवला नाही. अक्षरांवर प्रेम करा असं सांगणारे शेडगे आजच्या तरूणांसाठी प्रेरणाच होते. त्यांचा जीवनप्रवास सांगणारा चित्रलेखा साप्ताहिकाच्या १३ जुलै २०२०च्या अंकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख इथं देत आहोत.

टायपिंग, डीटीपी कम्पोझिंग आणि आता मोबाईल फोनवर बोलता क्षणी उमटणारी अक्षरे, परस्पर होणारे 'स्पेल करेक्शन' यामुळे हस्ताक्षराला फारसे महत्त्व उरलेले नाही. अशा बदलातही सुलेखनकार कमल शेडगे यांचे नाव त्यांनी वयाची ऐंशी पार केली, तरी गाजत होतं. त्यांची 'कमलाक्षरे' रोज वृत्तपत्रांतून झळकत होती.

कमल शेडगे मूळचे कोकणातले. धुरीवाडा गावचे. चित्रकलेची उपजत आवड. पण वडिलांप्रमाणे ते देखील मुंबईत 'टाइम्स ऑफ इंडिया' दैनिकाच्या कला विभागात नोकरीला लागले. इंग्रजीत काय लिहिले आहे हे विचारून ते स्केचेस काढत. ती प्रभावी असत. शीर्षकं म्हणजे 'लेटरिंग'ही विषयाला साजेशी रेखाटत. या हातोटीनेच त्यांना ओळख आणि नाव मिळवून दिले. शेकडो पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांच्या अक्षरलेखनाने लक्षवेधी केली आहेत. पण त्यांची अक्षरे गेली ५० वर्षे झळकत राहिली, ती नाटकांच्या जाहिरातींतून!

मोठ्या कष्टाने आणि खर्चाने नाट्यनिर्मिती होते. ती प्रत्यक्ष रंगभूमी सादर होण्याआधी जाहिरातीतून झळकते. वृत्तपत्रात मनोरंजनाच्या जाहिरातीचं पान-जागा ठरलेली असते. तिथल्या जाहिरातींच्या गर्दीत, मोजक्या जागेत नाटकाच्या नावासह इतर तपशीलही पाहणाऱ्याच्या नजरेत भरणे आणि त्यातून वाचकाला त्या नाटकाचा प्रेक्षक व्हायला थिएटरपर्यंत आणणे, ही मोठी कसरत असते. ती कसरत कमल शेडगे नाटकाच्या नावातील अक्षरांना कधी वळणदार, तर कधी चित्रमय, तर कधी बोलके करीत हुकमी जिंकायचे.

हेही वाचा : इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाच्या 'लेटरिंग'पासून म्हणजे १९६२ सुरू झालेली ही हुकमत अखेरपर्यंत टिकून होती. त्यांच्या या हातगुणाने हजारहून अधिक नाटकं रंगभूमीवर आली आणि गाजली. नामवंत दिवंगत नाट्यनिर्माते मोहन वाघ यांच्या 'चंद्रलेखा' निर्मित सर्वच नाटकांचे 'लोगो' हे कमल शेडगे यांनी तयार केले होते.

मोहन वाघ निर्मित 'रंग उमलत्या मनाचे' या नाटकाची कमल शेडगे यांनी तयार केलेली जाहिरात आठवते. तेव्हा 'फुटबॉल : वर्ल्ड कप स्पर्धे'ची जोरदार हवा होती. 'रंग उमलत्या मनाचे' या अक्षरांतून त्यांनी 'स्ट्रोक'च्या हलक्याशा फटकाऱ्यांतून आकाशाच्या दिशेने उंच उडालेला फुटबॉल अवघ्या पंधरा-वीस सेंटीमीटर उंचीच्या जाहिरातीत दाखवला होता. सोबत मोहन वाघ यांचे शब्द होते-"एवढ्या उंचीवर तुम्हाला घेऊन जाणारं नाटक!" ही उंची गाठणारी करामत अक्षरांना अर्थपूर्ण करणाऱ्या कमल शेडगे यांच्या अक्षरलेखनात होती.

याची साक्षच सोबतच्या फोटोतील तरुण नाट्य निर्माता राहुल भंडारे यांच्या 'अथर्व थिएटर' निर्मित नाटकांच्या 'लोगो'तून मिळते. एका भेटीत ते म्हणाले,"नाटक असो वा पुस्तक, त्याच्या नावाच्या मांडणीतून वाचक-प्रेक्षकांत त्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. माझा तसा प्रयत्न असतो." म्हणूनच बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला ते गेले. पण नवीन पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून गेलेत. तो पाहण्यासाठी त्यांची "चित्राक्षरे" आणि ''कमलाक्षरे" ही  पुस्तकं नक्की वाचा, पाहा.

हेही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे