डॅडी भेटे बापूंना

०७ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : १० मिनिटं


'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास.

वाचण्यापूर्वीचं जाहीर निवेदन 

अरुण गवळी यांनी गांधीविचार परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला ही बातमी तुम्हाला मागेच समजली असेल. तर, त्यांनी सोडवलेला पेपर आमच्या हाती लागलाय! त्यात  विचारलेले प्रश्न आणि त्याची डॅडींनी दिलेली उत्तरं जशीच्या तशी देतोय. ती डोकं बाजूला ठेवून मनसोक्त वाचा. बस्स. निवेदन संपलं!

अरुण गवळी नामक 'आधुनिक वाल्या कोळ्या'च्या जीवनातली एक अत्यंत संस्मरणीय आठवण लोकांना सांगताना आम्हाला मनापासून अत्यंत आनंद होत आहे. अरुण गवळी हे  एक नंबरचे चांगले माणूस. इतके चांगले की लोकांना मदत करता यावी म्हणून ते पुढं सामाजिक कार्यात सहभागी झाले. काही नतद्रष्ट त्याला गुंडगिरी म्हणतात आणि नंतर पोलिसांचाही तसाच गैरसमज झाल्यानं गवळींना नाहक तुरुंगवासही घडला.

पण ते जे करत होते ते फक्त एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ यातलाच सूक्ष्म प्रकार होता. त्याची प्रेरणा त्यांना खुद्द गांधीजींच्या जीवनातूनच मिळाली. म्हणूनच तर तुरुंगात असताना अरुण गवळी हे गांधी विचारपरीक्षेत प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले. गांधीजी आणि अरुण गवळी यांचं सूक्ष्म दृष्टीनं अवलोकन केलं, तर सुज्ञांना अनेक साम्यस्थळं दिसतील. पण आजकाल कोणापाशीही सूक्ष्मात बघण्याइतकी धारदार दृष्टी नसल्यामुळं आम्हीच ही साम्यस्थळं त्यांच्यासाठी शोधून काढली.

गांधीजींना बापू म्हणून जग ओळखतं. बापू म्हणजे बाप माणूस. गवळींनाही जग डॅडीम्हणून हाक मारतं. गांधीजींनी कधी टोपी घातली नाही. पण त्यांच्या नावाने गांधी टोपीओळखली जाते. ती टोपी गवळी नेहमी घालतात. शिवाय त्यांचे कपडेही खादीचेच असतात. गांधीजींनी समाजकार्य केलं. गवळींनीही केलं. गांधीजी म्हणायचे की प्रत्येकाने स्वयंरोजगार करायला हवा. गवळींनी म्हणूनच नोकरी करण्याच्या फंदात न पडता स्वयंरोजगार सुरू केला आणि नंतर इतरांनाही त्यात रोजगार मिळवून दिला.

श्रीमंतांची जास्तीची संपत्ती गरीबांना वाटायला हवी असं तर प्रभू येशू यांच्यासह आपले सकल संत, रॉबिनहूड, तंट्या भिल्ल, कार्ल मार्क्स ते गांधीजी सारेच म्हणतात. गवळींनीही तोच मार्ग अनुसरला. त्यांनीही श्रीमंतांची संपत्ती त्यांच्याशी विद्वत्तापूर्ण वादसंवाद करत त्यांच्याकडून मागितली आणि गरीबांमध्ये वाटून टाकली.

गांधीजींची कर्मभूमी म्हणून साबरमती आणि सेवाग्राम आश्रम प्रसिद्ध आहेत. गवळींची कर्मभूमी दगडी चाळम्हणून प्रसिद्ध आहे. दगडी चाळीत राहणाऱ्या गवळींचं काळीज मात्र दगडाचं कधीच नव्हतं. ते सर्वांनाच जवळ करायचे. वाया गेलेल्या तरुणांना जवळ करत त्यांनी रोजगार मिळवून दिला. इतकंच नाही तर पोलिसांनाही ते जवळ करायचे आणि त्यांचा घरखर्च चालावा म्हणून नियमित मासिक मदत द्यायचे. पण काही जळकुकड्या पोलिसांनीच यासाठी त्यांची बदनामी केली. असो. चालायचंच. समाजकार्य कधीच सोपं नसतं. त्यात हे वाद उठतातच. गांधीजींवरही पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले म्हणून किती टीका झाली हे इतिहास अभ्यासलेल्यांना ठाऊक असेलच. इतरांन ते आता माहीत होईल.

गांधींच्या विरोधात इंग्रज सरकार होते. ते निदान परके होते. इथं तर आपलंच सरकार गवळींच्या विरोधात होतं. गांधीजींनाही कितीतरी वेळा तुरुंगवास सोसावा लागला. गवळींनाही अनेकदा तुरुंगाच्या वाऱ्या कराव्या लागल्या. पण ते डगमगले नाहीत. तुरुंगातही त्यांनी जवळच्या साथी कैद्यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदतच केली. गांधीजींनी सत्तेचा मोह कधी बाळगला नाही. गवळींनीही सत्तेचा मोह कधी बाळगला नाही. स्वतःपेक्षा आपल्या मुलीला सत्तास्थानात जाण्यासाठी मदत करून त्यांनी समाजापुढं एक आदर्श घालून दिला. मेरी छोरीयाँ छोरों से कम से क्या?’, असा महान डायलॉग आमीर खान साहेबांनी म्हणण्याआधीच गवळींनी तो प्रत्यक्षात उतरवला होता. बेटी पढाव, बेटी बचावमोहिमेची गुप्त सुरुवात त्यांच्यामुळंच खरंतर झाली होती.

तर, गवळींविषयी सांगण्यासारखं बरंच काही आहे; पण आज एका विशेष गोष्टीसाठी आम्ही त्यांची आठवण केलीय. आधीच सांगितल्याप्रमाणं गांधीजींविषयी गवळींना अपार आदर आहे. त्यामुळंच तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी गांधी विचारांविषयी वाचन सुरू केलं. मग एक दिवस त्याची परीक्षाही दिली. त्यांना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि गवळींनी त्याची नेमकी काय उत्तरं दिली, हे अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलंय. अगदी व्हॉट्सपवरही त्यासंबंधी माहिती मिळणार नाही, यावरूनच जाणकारांना याची कल्पना येऊ शकेल.

सुदैवानं आम्ही गवळींच्या या ऐतिहासिक परीक्षेचे आय विटनेसआहोत. कारण त्यांना परीक्षेचा पेपर देण्याचं काम आमच्याकडंच होतं. शिवाय त्यांना नीट लिहिता येत नसल्यानं आम्हीच त्यांच्या लेखनिकाचंही काम केलं. त्यामुळं गवळींनी दिलेली उत्तरं अजूनही आमच्या कानात नीट साठलेली आहेत. समस्त सामान्य डॅडी प्रेमींसाठी ती इथं देत आहोत!

प्रश्न १ सत्याग्रह म्हणजे काय?

सत्या होता ना आपल्याकडं मागं! त्याला बँड्राची एरिया पाहिजे होती. पण आता ती एरिया आपण आधीच मामाला दिलेली. त्याला म्हटलं मामा तू इथं समाजसेवा करायची. मामा चोख करत होता तिथल्या लोकांची समाजसेवा. मग आणखी सत्याला कशाला धाडायचं तिथं? पण सत्या जाम पेटलेला. म्हणाला त्यानं आधी तिथं भरपूर समाजसेवा केली होती. त्यालाच या नंतरपण सेवेचा मौका मिळायला पाहिजे. मी म्हटलं नाय. तर तो लागला पुन्हा-पुन्हा आग्रह करायला. मी म्हटलं, सत्या आग्रह करू नको. सत्या आग्रह करू नको. ते बरोबर दिसत नाही. आपण सारे एकच आहोत. पण सत्या आग्रह सोडेनाच. मग लावला त्याला घोडा. म्हणजे त्याला घोड्यावर बसवला. त्याची शादी केली. आता त्याची बायको रोज त्याच्यासमोर आग्रह करते. सत्या निमूटपणे तिचं ऐकतो.

प्रश्न २ अहिंसा म्हणजे काय?

हिंसेचे काही प्रकार असतात. वर्ग असतात. जसे की शाळेत वर्ग असतात. अ वर्ग’, ‘ब वर्ग’, ‘क वर्गहिंसेचेही असेच वर्ग असतात. यातली हिंसा खूपच कडक असते. यात थेट हिंसाच होते. समोरचा पुन्हा कधी दिसत नाही. म्हणून आपल्याला ही हिंसा खूपच आवडते. पण पोलिसांचं त्यावर थोडं वेगळं  मत आहे. आमचे असे मतभेद झाले की पोलिस आपल्याला त्यांच्या ऑफिसमध्ये चर्चेसाठी घेऊन येतात. हा महत्त्वाचा विषय असल्यानं ही चर्चा बरेच दिवस लांबते. काही वेळेस तर महिनोंमहिने चर्चा घडत राहते.

आता आपल्याला त्याची सवय झालीय. अलीकडे आपण घरात कमी आणि पोलिसांच्या ऑफिसातच जास्त राहतो. लोक म्हणतात की ते वाईट आहे. अरे पण पोलिसही तिथंच राहतात की आपल्या सोबतीत. त्यांना कोणी काय बोलत नाय. आपल्याला कशाला काय लोक बोलतात उगाच तेच आपल्याला कळत नाही.

प्रश्न ३ गांधीजींच्या तीन माकडांविषयी सांगा.

गांधी बाबाचे तीन खास पंटर होते. त्यानला तो प्रेमानं माकड म्हणून हाका मारायचा. कारण माकडासारखेच त्यांचे चाळे असायचे. प्रत्येकाचा चाळा वेगळा. एक साला काही बोलायचाच नाही. नुसत्या डोळ्यांनीच खुन्नस द्यायचा समोरच्याला. दुसऱ्याला कोणतंही काम सांगा. साला करायचा नाही. या कानातनं ऐकायचा अन् त्या कानातनं सोडून द्यायचा सारी बात. तर तिसरा कोणाकडे बघायचापण नाही. लई माज साल्याला. गांधी बाबानं त्यानला कसं सोसलं माहीत नाही.

प्रश्न ४ 'गांधीजींचा चरखा' यावर भाष्य करा.

गांधी बाबाच्या या बोलण्यानंच तर आपला उद्धार झाला. बापू म्हणाले, चर खा. मग आपणपण ठरवलं, चरायचं आणि खायचं. म्हणून आपण राजकारणात आलो. इथं सारेच हवं तिथं चरतात आणि हवं ते खातात. तर लोकानला त्याचीपण एलर्जी. ते म्हणाले की, डॅडी चुकीचं काम करतोय. तो स्वतःच चरतोय आणि स्वतःच खातोय. आमच्यासाठी काही स्कोपच ठेवत नाही. हे बाकी कबूल. म्हटलं लोक खरं बोलतात. सारं काही एकट्यानं खाणं बरोबर नाही. मग आपण आपल्या लेकीला पुढं आणला. म्हटलं की तू चर आणि तूच खा. मग लोक शांत झाले. म्हटले की डॅडी खरा बाप माणूस. मुलगा-मुलगी असा भेदभाव करत नाही. आपल्या पोरीला त्यानं पुढं आणलं. तेव्हापासून आपली इज्जत आणखीनच वाढली. बापूचे उपकार.

प्रश्न ५ असहकार आंदोलनाचे महत्त्व सांगा.

हे अगदी फर्मास, जालीम उपायवालं आंदोलन आहे. आधी काही मॅटर झाला की साला संबंधित इसमाशी प्रेमानं बोलावं लागायचं. त्याला गोडीगुलाबीत समजवायला लागायचं. पर लोक पडले चॅप्टर! आपण प्रेमानं बोलतो म्हटल्यावर कोणी आपलं काही ऐकेचना. मग म्हटलं, आता काय करायचं आपण? तेव्हा आपल्याला बापूचा हा असहकार आंदोलन लक्षात आला. अरे म्हटलं, आपण हेच करूया. मग केला ना सुरू. जो आपल्याला क्रॉसमध्ये जायचा त्याच्यासोबत आपण असहकार पुकारायचो आणि इतरांना पण तसंच करायला सांगायचो. मग कोणी त्याला कुठं बाहेर पडू नाही द्यायचा. त्याला टॅक्सी सोडा साधी रिक्शाही मिळायची नाही कुठं जाण्यासाठी. त्याच्या घरीपण कोणी यायचं नाही. त्याची वीज, पाणी, सारं काही बंद. असा असहकार केल्यावर मग तो संबंधित इसम विरघळायचा. आपल्या मागण्या मान्य करायचा. मगच आपण हे आंदोलन मागे घ्यायचो!

प्रश्न ६ उपोषणाचं महत्त्व सांगा.

आधी आपल्याला वाटलं की, आपल्या लांब केसामध्ये ज्या उवा पोसल्या जातात त्याला पोषण म्हणतात. तुरुंगात आल्यापासून त्यांचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय. पण आपल्या एका शेजाऱ्यानं सांगितलं की, डॅडी तसं नसतं. आपण जेवायचं नसतं त्याला उपोषणम्हणतात. ते पण आपल्या काही मागण्या मान्य करण्यासाठी करतात. म्हणजे आपण उपाशी राहायचं, काही खायचं प्यायचं नाही त्यानं समोरचा माणूस विरघळतो आणि तो आपल्या मागण्या मान्य करतो. हे तर खूपच भारी होतं.

मग आपणपण एक दिवस उपोषण करायचा ठरवला. म्हटलं की आपल्याला तुरुंगात टीवी पायजे. रेडिओ पाहिजे. पेपर पाहिजे. खाली फरशीवर अंथरायला पाहिजे. नाहीतर बुडावर कपडे खराब होतात. आवडीचं खाणंपिणं पाहिजे. तर जेलर म्हटले की असं काही मिळणार नाही. हे तुमचं घर नाही. तुरुंग आहे. मग मी म्हटलं की, 'साहेब मग तुम्ही तुमच्या घरी का राहत नाही? आमच्यापेक्षा जास्त तुम्हीच राहता इथं. आम्ही उद्या जाऊ तरी; पण तुम्ही इथंच!' तर जेलर रागावले. म्हणाले, 'याचं खाणंपिणं आजपासून बंद!' आपल्याला मग असा सक्तीचा उपोषण घडलं.

एकंदरीत हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळं आपण ठरवला की यापुढं स्वतः उपोषण करायचं नाही. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोवर समोरच्यालाच उपोषण करायला लावायचं. ही गोष्ट मात्र एकदम कामात आली. त्यामुळं आपला उपोषणाला कायम पाठिंबा असतो.

प्रश्न ७ हिंदू-मुस्लिम एकतेविषयी तुम्हाला काय वाटतं?

खरं तर आपण आपल्या समाजकार्यात कधीच धर्म आणला नाही. आपण सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वच धर्माच्या लोकांची सेवा केली. मागे बाळासाहेब म्हटलेच होते की तुमचा दाऊद आणि आमचा गवळी. तेव्हा आपल्याला लई भरून आला होता. इतक्या वर्षांच्या समाजसेवेचं चीज झाल्यासारखं वाटलं. पण त्यात काही वाईट हेतू नव्हता. आपलं हिंदूवरपण प्रेम आहे आणि मुस्लिम भाईवरही. धरम-करम घरी ठेवायचं. समाजसेवेत तो आणायचा नाही असल्या आपल्या कडक सूचनाच आहेत सर्वांना.

प्रश्न ८ कमी कपडे घालण्याविषयी तुमचं मत सांगा.

गांधी बाबा कमी कपडे घालायचे. पण आपण कमी कपडे घातले तर लोक म्हणतात हा नाटक करतो. कारण आधी आपण गांधी टोपी घालायचो तेव्हाही लोक असेच म्हणायचे. पण आपण लोकांचं ऐकलं नाही. आपण त्यांना व्यवस्थित टोप्या घातल्या नंतर. मुंबईत तसापण फार उकडतं. त्यामुळं कमी कपडे घातलेले बरंच असतं. पण बाहेर आपल्याला कोणी काही असं घालू देईना. मग म्हटलं आता तुरुंगात जाण्याशिवाय इलाज नाही. तिथंच आपल्याला हाफ शर्ट आणि हाफ पँट घालायला मिळेल. मग गेलो. आता बरं वाटतं. पर लोकांना वाटतं की पोलिसांनीच आपल्याला इथं डांबलं म्हणून. त्यांना आपला हा आतला हेतू कसा कळणार म्हणा! पण आता आपण तरी कोणाकोणाला समजवायला जाणार. समाजसेवा करणं खूप कठीण असतं, असं बापूच म्हटले होते. त्यामुळं आपण कोणाचं बोलणं मनावर घेत नाही.

प्रश्न ९ दारुबंदीविषयी तुम्हाला काय वाटतं?

दारूबंदीवर बंदी असायलाच हवी. कितीतरी गरिबांची कुटुंबं दारूवर जगतात. उद्या दारू नसली तर त्या गरिबांनी काय करायचं? त्याचा कोणी विचार करणार आहे का? दारूसारखी चांगली गोष्ट कोणती आहे का? ती असली की परका माणूसपण दोन मिनिटांत आपली पर्सनल स्टोरी सांगू लागतो आपल्याला. दारू कोणाच्याच सोशल स्टेटसमधे कोणताच भेदभाव करत नाही. श्रीमंतपण दारू पितात. गरीबपण दारू पितात. अशी लोकांना एकत्र जोडून ठेवणारी वस्तू बंद करायची म्हणजे काय? गांधी बाबालाही किती मनःस्ताप भोगावा लागला या दारूबंदीमुळे. त्या बिचाऱ्या साधू बाबाला शेळीचं दूध पिऊन दिवस काढावे लागले. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर दारूबंदी बंद करावी.

प्रश्न १० गांधी विचारांमुळं तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला?

आपल्यावर काय परिणाम होत नाही कशाचा. आपल्यामुळं लोकांवर परिणाम होत असतो. मग गांधी विचाराचा परिणाम आपल्यावर कशाला होईल? परंतु तुरुंगातल्या आमच्या वर्दीतल्या लोकांनी ठरवलं की आपल्याला गांधीचा विचार द्यायचा म्हणून. आपण म्हटलं चालंल. द्या आपल्याला विचार. तर ते म्हटले की असा विचार देता येत नसतो. त्याचा स्टडी करावा लागतो. तर आपण म्हटला आपल्या पंटरला की भावड्या, तू या विचाराचा स्टडी करायचा नीट. तर जेलर म्हटला की विचारपण आपणच करायचा म्हणून. मग केला. पण खरं सांगायचं तर आपल्याला काय तो विचार पटला नाही. पटण्यासाठी तो आधी डोक्यात तर घुसायला हवा ना? तो विचार भलताच जाड होता. आणि आपलं डोकं तर छोटं. मग आत कसा जाणार तो?

तर जेलर म्हणला की तुम्ही तो विचार बाहेरच ठेवा. फक्त आम्ही जे सांगतो ते करा म्हणजे झालं. त्यांनी आपल्याला काही प्रश्न दिले. मग पुस्तकपण दिलं. त्यात त्या प्रश्नांची उत्तर कुठं आहेत ते पण सांगितलं. आणि लिहा म्हटलं. मग आपण म्हटलं इतकं सारं तुम्ही स्वतःच करत आहात तर लिहिण्याचं काम पण तुम्हीच करून टाका ना! आपलं नाव काय टाकायचं असेल तर टाका पेपरवर. आपण नाही घाबरत कोणाला. अनेकांच्या पेपर्सवर आपण आपलं नाव टाकलंय. हाय काय आन नाय काय! मग त्यांनी स्वतःच पेपर लिहिला. त्यावर आपलं म्हणजे 'अरुण गवळी' असं नाव टाकलं.

एकूण काय, तर गांधी विचार हा डोक्यात जाणारा प्रकार नाही. ज्याला तो माहीत असतो त्यालाही तो आचरणात आणता येत नाही. ज्याला माहीत नाही त्याचं काय सांगायचं मग? आपण गांधी बाबाला मानतो. म्हणून त्याचं सारंच मानायला पाहिजे, असं थोडंच आहे? त्याचा विचार आपण इतरांसाठी सोडून दिलाय. ज्याला हवा त्यानं तो वापरावा. गांधी बाबा म्हटलेच आहेत की, लोकांना मदत करायची. सारं काही स्वतःजवळ ठेवायचं नाही. अप्पलपोटेपणा चांगला नसतो. आपण तेच करतोय.

गांधीबाबाला आपण आपल्याजवळ ठेवलंय. त्याचा विचार लोकांना दिलाय. आता त्यांनी तो आचरणात आणला नाही तर मग आपण त्याला प्रेमानं समजावणार. जमल्यास त्यासाठी सत्याग्रह करणार. असहकार आंदोलन पुकारणार. अहिंसेच्या माध्यमातनं त्याला उपोषणाला बसवणार. अजून तरी तशी वेळ आलेली नाही. तुम्हाला पण गांधींचा विचार हवा असेल तर डायरेक्ट आपल्याला विचारायचं. सांगा पाहिजे का?