अशोक चव्हाण भाजपमधे गेल्यास फायदा कुणाचा?

०७ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


राज्याच्या राजकारणात अशोक चव्हाण काँग्रेसचे बिनीचे नेते आहेत. आपल्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता ते कोणालाही लागू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा जोर धरतायत. अशोक चव्हाणांसारखा बाहुबली नेता जर गळाला लागला तर चव्हाणांच्या मदतीने मराठवाड्यात शिवसेनेला नामोहरम करुन भाजपाच्या जागा वाढवता येतील.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चेनं राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. खुद्द चव्हाणांनी आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रातल्या सकाळच्या शपथविधीनं आणि एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारासोबत केलेल्या बंडाने राजकारणात काहीही होऊ शकतं अशी आता लोकांची ठाम समजूत झाली आहे.

चव्हाणांच्या स्पष्टीकणानंतरही त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा थांबायचं नाव घेत नाहीत. पण या चर्चांच्या गुऱ्हाळात खरा महत्वाचा प्रश्न हा आहे की, चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश केला तर फायदा कोणाचा होणार?

भाजपचे दोन हेतू

राज्याच्या राजकारणात अशोक चव्हाण काँग्रेसचे बिनीचे नेते आहेत. दोन वेळा त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय. भाजपला २०२४मधे स्वबळावर ३५० खासदार निवडून आणायचे आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राची सत्ता स्वबळावर मिळवायची आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा वगळता इतर भागात भाजपाने बऱ्यापैकी वर्चस्व मिळवलंय. विदर्भात ज्या प्रमाणे भाजपाची ताकद आहे त्याप्रमाणे मराठवाड्यात भाजपची ताकद नाही. याचं कारण मराठवाड्यात शिवसेनेचे प्राबल्य जास्त आहे. शिवसेनेला नामोहरम करेल असा नेता आज भाजप जवळ नाही.

अशोक चव्हाणांसारखा बाहुबली नेता जर गळाला लागला तर भाजपचे दोन हेतू साध्य होतील. चव्हाणांच्या मदतीने मराठवाड्यात शिवसेनेला नामोहरम करुन भाजपाच्या जागा वाढवता येतील. दुसरं शिवसेनेच्या जागा कमी होतील. भविष्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्या इतपत शिवसेनेची ताकद उरणार नाही.

हेही वाचा: राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

शिवसेनेला धक्का द्यायची तयारी

शंकरराव चव्हाण ५० वर्ष राजकारणात केवळ सक्रीय राहिले नाही तर सदैव सत्तेतच राहिले. त्यानंतर अशोक चव्हाणही गेली २५-३० वर्ष सत्तेत राहिले. त्यामुळे त्यांचे समर्थक केवळ मराठवाड्यात नाही तर राज्यभर आहेत. त्याचा फायदा भाजपला होईल.

मराठवाड्यात नांदेडवर चव्हाणांचं वादातीत वर्चस्व आहेच. शिवाय हिंगोली, परभणी, लातूर, औरंगाबाद, वाशीम या जिल्ह्यातही चव्हाणांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चव्हाणांच्या पक्षांतराने काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. पण काँग्रेसपेक्षाही शिवसेनेला तडाखा देण्याच्या दृष्टीने चव्हाणांची मोठी मदत होणार असल्याने भाजप त्यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करत असावी हे नाकारता येत नाही.

अशोक चव्हाण मराठा समाजातून येतात. राज्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. मराठा आरक्षणासाठी जी समिती नेमण्यात आली होती, त्याचं अध्यक्षपदही अशोक चव्हाणांकडेच होतं. राज्यात बहुसंख्येने असणाऱ्या समाजाचा एक शक्तीशाली नेता भाजपच्या गोटात येणार असेल तर त्याचा फायदा पक्षाला होईल या दृष्टीनेही भाजपमधे हालचाली सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर चव्हाणांची अशी अवस्था

अशोक चव्हाणांसाठी हे पक्षांतर किती लाभदायक ठरेल हे मात्र सांगणं कठीण आहे. अगदी नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर यापूर्वी जिल्ह्यातल्या भास्करराव पाटील खतगावकर, सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर, बापूसाहेब गोरठेकर, सुभाष वानखेडे अशा अनेक नेत्यांनी यापूर्वी भाजप प्रवेश केला. काँग्रेस, राष्ट्रवादीमधे मोठी मोठी पदं भूषवलेली नेतेमंडळी भाजपमधे प्रवेश केल्यानंतर घरी बसून आहेत. त्यांच्या क्षमतांचा, नेतृत्वाचा विचार भाजपने गंभीरपणे केला नाही हे नाकारुन चालणार नाही.

यापैकी भास्करराव पाटील, बापूसाहेब गोरठेकर, सुभाष वानखेडे हे स्वगृही परतले. भारतीय जनता पक्ष अशोक चव्हाणांची अशी अवस्था नक्कीच करणार नाही. पण खरा प्रश्न हा आहे की, समजा चव्हाणांना आज काँग्रेस सोडायची झाली तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.

विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यापैकी दोन तृतीयांश आमदारांनी पक्षांतर केलं तरच त्यांची आमदारकी शाबूत राहू शकते. चव्हाणांसोबत आज १२ आमदार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या बाराही आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर त्यांना भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करावा लागेल. खरी परीक्षा पुढे राहणार आहे.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

मुस्लिम मतदारांचं काय होणार?

अशोक चव्हाणांच्या राजकारणाचा खरा आधार मुस्लीम मतदार आहे. मुस्लीम मतदारांच्या भरवशावरच त्यांनी आतापर्यतच्या बहुतांश निवडणुका सहज जिंकल्या आहेत. नांदेड महापालिकाही केवळ मुस्लीम मतदारामुळेच चव्हाणांच्या ताब्यात आहे. समजा चव्हाणांनी पुढची निवडणूक भाजप अथवा शिंदे गटाकडून लढवली तर ही मुस्लीम मतं चव्हाणांच्या बाजूने जातील का? याचं कारण सद्यस्थितीत भाजप आणि शिंदे गटाने कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतलीय.

आपला देश धर्मनिरपेक्ष असला तरी निवडणुका धर्मनिरपेक्ष होत नाहीत हे वास्तव आहे. ते नाकारता येणार नाही. आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर मुस्लीम मतं भाजप किंवा शिवसेनेच्या आता शिंदेगटही पारड्यात अभावानेच जाताना दिसली.

ही सर्व परिस्थिती पाहता अशोक चव्हाणांसाठी हे पक्षांतर दीर्घकाळ लाभदायी ठरेल अशी शक्यता नाही. या ऊलट त्यांचं पक्षांतर एमआयएमसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात एमआयएमचा राजकीय चंचुप्रवेश नांदेडमधूनच झाला होता हे विसरता कामा नये.

फायदा भाजप, शिंदेगटालाच

चव्हाण यांनी यापूर्वी दोनवेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवलंय. महाविकास आघाडी सरकारमधे राजकीय सोय म्हणून चव्हाणांनी कॅबिनेट मंत्रीपद स्वीकारलं असलं तरी त्यांचा अनुभव, योग्यता ही मुख्यमंत्रीपद मिळण्यासारखीच आहे. पण भारतीय जनता पक्षात किंवा शिंदे गटात प्रवेश गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. याचं कारण २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर देशाचं राजकारण एकदा पुन्हा आमुलाग्र बदलणार आहे. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत चव्हाणांचं स्थान कुठं असेल हे सांगणं आज तरी कठीण आहे.

अशोक चव्हाण राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ नेते आहेत. आपल्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता ते कोणालाही लागू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा जोर धरत आहेत. पण कायदेशीरदृष्ट्या अडचणीत नसतील तर ते काँग्रेस सोडण्याची शक्यता कमीच आहे. याचं कारण त्यांच्या पक्षांतराचा लाभ स्वत:पेक्षा भाजपला किंवा शिंदेगटाला अधिक होईल हे समजण्या इतपत प्रगल्भता त्यांच्यात निश्चित आहे. पण राजकारणात काहीही होऊ शकतं हेही तेवढंच खरं आहे.

हेही वाचा: 

उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीने फडणवीसांचे सत्तास्थापनेचे मनसुबे उधळले

पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती

संघर्ष करायचा की शरणागती पत्करायची, हे ठाकरे कुटुंबाला ठरवावं लागेल

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)