अशोक शिंदे : प्रार्थना समाजाचा वारसा चालवणारे महर्षींचे नातू

०४ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नातू अशोक शिंदे यांचं ३० एप्रिल २०२१ ला वयाच्‍या ८५ व्‍या वर्षी पुण्यात निधन झालं. ते पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. १९७१ च्‍या भारत-पाकिस्‍तान युद्धात फायटर पायलट म्‍हणून शौर्य गाजवल्‍याबद्दल अशोक शिंदे यांना भारत सरकारच्‍या वतीने वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या आठवणी सांगणारं हे छोटं टिपण.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे थोरले चिरंजीव प्रतापराव शिंदे यांचे अशोक शिंदे हे पुत्र. पुण्यातल्या सामाजिक सुधारणा चळवळीत अशोक शिंदे यांचा सहभाग होता. पुणे प्रार्थना समाजाचे ते अध्यक्ष होते. त्‍यांनी सामाजिक विषयावरही काही लेखन केलं. भारतीय हवाई दलातून एअर कमांडर म्हणून अशोक शिंदे निवृत्त झाले. १९७१ च्‍या भारत-पाकिस्‍तान युद्धात फायटर पायलट म्‍हणून शौर्य गाजवल्‍याबद्दल अशोक शिंदे यांना भारत सरकाच्‍या वतीने वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

प्रतापराव शिंदे हे पुणे कण्टोन्मेंट बोर्डात नोकरीला होते. त्यांना उर्मिला, दमयंती, सुजाता, अशोक, दिलीप, शंतनू आणि नवीनचंद्र अशी सात मुलं होती. उर्मिला यांचं लग्न अमेरिकेतल्या युटा स्टेट युनिवर्सिटीतले प्राध्यापक डॉ. दत्ताजीराव साळुंखे यांच्याशी झालं. तर दमयंती यांची गाठ एन.सी.एल चे संचालक बेंडाळे यांच्याशी बांधली गेली. सुजाता या प्रसिद्ध समीक्षक डॉ. गो.मा. पवार यांच्या पत्नी.

चौथ्या क्रमांकाचे अशोक. पाचव्‍या क्रमांकाचे शंतनू. शंतनू हे अमेरिकेत लॉस एंजेल्‍सला इथं स्थायिक आहेत. तर दिलीप, नवीनचंद्र हे पुण्यात असतात. या सगळ्या भावंडावर त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांचा मोठा प्रभाव होता. बडोद्याच्‍या गायकवाड घराण्यातले पदच्‍युत राजे मल्‍हारराव यांचे पुत्र गणपतराव यांच्‍या त्‍या कन्‍या होत्‍या.

हेही वाचा : महर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर

हवाई दलात नोकरी

अशोक शिंदे यांचं शालेय शिक्षण न्‍यू इंग्‍लिश स्‍कुलमधे झालं. तर कॉलेज शिक्षणासाठी ते वाडिया कॉलेजमधे होते. महर्षी शिंदे यांच्‍या मृत्‍यूनंतर शिंदे कुटुंबात अनेक अडचणी आल्या. त्‍या काळात अशोक शिंदे यांनी सचोटीनं शिक्षण घेतलं. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांच्‍या अप्रकाशित आत्‍मचरित्रात अशोक यांच्‍याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत.

महर्षी शिंदे यांनी बांधलेल्या ‘रामविहार' या घरात या सगळ्या नातवंडांची जडणघडण झाली. शाळेत अनेक प्रकारच्या परीक्षेत अशोक शिंदे भाग घ्यायचे. हिंदी भाषा, चित्रकला परीक्षेत ते भाग घेत. प्रिन्सिपल वी.के. जोग यांनी अशोक शिंदे यांना शिक्षण घेताना मदत केली. विद्यार्थीदशेत ते अतिशय काटकसरीने आणि साधेपणाने राहत. लहानपणापासून त्यांचा कोणत्‍या गोष्टीसाठी आग्रह किंवा हट्ट नसायचा. महर्षींची बहीण जनाक्का या रामविहारची देखभाल करायच्या. त्यांचा या मुलांना विशेष लळा असायचा.

अशोक शिंदे यांनी पंजाबमधल्या आदमापूर आणि दिल्‍ली इथं हवाई दलात नोकरी केली. १९७१ च्‍या भारत-पाकिस्‍तान युद्धात त्यांनी पायलट म्‍हणून अभिमानास्‍पद कामगिरी केली. त्‍यावेळी पुण्यात लक्ष्मीबाई शिंदे तसंच अशोक शिंदे यांचा शाळांमधून आणि काही संस्‍थांच्‍या वतीने सत्‍कार झाला. लक्ष्मीबाईंना आपल्‍या मुलाच्‍या या कामगिरीचा अभिमान वाटायचा. प्रत्‍यक्ष युद्धावरून अशोक शिंदे पहिल्‍यांदाच घरी परतल्‍यानंतर घराच्या दारात बहीण सुजाता यांनी पंचारतीने ओवाळून कपाळाला टिळा लावून पेढा भरवल्‍याची नोंद लक्ष्मीबाईंच्‍या आत्‍मचरित्रात आहे.

हेही वाचा : वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

महर्षींचा वारसा

अशोक शिंदे हे स्‍वभावाने अतिशय शांत, मितभाषी  होते. महर्षी शिंदे यांचा नातू असल्‍याचा त्‍यांना फार अभिमान होता. निवृत्तीनंतर त्‍यांनी आजोबा महर्षीं शिंदे यांच्‍या ब्राह्मधर्माच्‍या आणि प्रार्थना समाजाचा वारसा निष्ठेने सांभाळला. ते पुणे प्रार्थना समाजाशी दीर्घकाळ निगडित होते. समाजाच्‍या नैमित्तिक उपक्रमात ते सहभागी व्हायचे. महर्षी शिंदे यांचं संशोधन आणि वाङ्‌मय पुढे आणण्यात त्‍यांचे मेहुणे प्रा. गो.मा. पवार यांनी आपली हयात घालवली. यासाठी त्‍यांना पवार यांच्‍याबद्दल फार धन्‍यता वाटे.

२०१७ ला शिवाजी युनिवर्सिटीतल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्‍या वतीने रा.ना. चव्‍हाण लिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - एक दर्शन भाग - २’  या ग्रंथाच्‍या प्रकाशनासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्‍यावेळी त्‍यांनी केलेल्‍या छोटेखानी भाषणात महर्षीच्‍या आठवणी सांगितल्‍या होत्‍या. 

त्यानंतर अशोक शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी लिहाव्‍यात असं मी त्यांना सुचवलं. पण त्‍यांना मराठी लिहिण्याचा सराव नव्‍हता. दीर्घकाळ महाराष्ट्राबाहेर नोकरी केल्‍यामुळे कदाचित तसे असेल. मग याबद्दल एकदा गो.मा. पवार यांच्याशी बोललो. त्यांनीही फोनवरून आठवणी लिहिण्याची विनंती अशोक शिंदेना केली. त्यानंतर ते तयार झाले.

हेही वाचा : कामगारांसाठी बनवलेली जीन्स, स्टाईल स्टेटमेंट झाली

महात्मा गांधींच्या मांडीवर

९, १५, १७ ऑगस्‍ट २०१७ ला त्यांनी आत्मपर स्वरूपाची इंग्रजीतली तीन छोटी टिपणं  प्रा. संतोष कोटी यांच्‍या मेलवर पाठवली. या लेखनाचा अनुवाद प्रा. संतोष कोटी यांनी केला. या आठवणी त्‍यांना सलग एकत्र आठवण्यात आणि लिहिण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी कळवलं.

या टिपणात अशोक शिंदे यांनी त्‍यांच्‍या बालपणातल्या काही आठवणी सांगितल्‍यात. तीन वर्षाचे असताना महात्‍मा गांधी घरी आल्‍यानंतर महर्षींनी आशीर्वादासाठी गांधीजींच्‍या मांडीवर ठेवल्‍याची आठवण आहे. न्‍यू इंग्‍लिश स्‍कूलमधे शाळेत जातानाच्‍या काही आठवणी आहेत. एक प्रकारे ते शालेय जीवनातले संस्‍कारधडेच आहेत. 

ओंकारेश्र्वर घाटावर रात्री फिरायला जाताना  त्‍यांच्‍या मनातल्या भूतांविषयी भीती काका रवींद्र शिंदे यांनी काढून टाकली. रवींद्र शिंदे हे महर्षींचे द्वितीय चिरंजीव. काही काळ ते ग्‍वाल्‍हेर आणि बडोदा लष्करात होते. काकांच्या धीराचा अशोक शिंदे यांनी कृतज्ञतापूर्वक उल्‍लेख केलाय. तसंच शनिवार पेठेजवळ नदीवरच्या फूटपाथवरचा एक अनुभव आणि त्‍यातल्या आईच्‍या शिकवणुकीचा संस्‍कार नोंदवलाय.

त्यांनी महर्षींच्‍या निधनाच्या दिवशीचा अनुभवही कथन केलाय. तसंच वडलांचा पराकोटीचा प्रामाणिकपणा, आई आणि आजीविषयीच्‍या आठवणी दिल्‍यात. अशोक शिंदे यांच्‍या एअर फोर्समधल्या सुरवातीच्या प्रशिक्षण काळातल्या रोमहर्षक आठवणी सांगितल्‍यात. अशोक शिंदे यांच्‍या सत्शील आणि सुजाण व्‍यक्‍तिमत्त्वाचं प्रतिबिंब त्‍यांच्‍या लेखनात पहायला मिळतं.

हेही वाचा : 

वाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

संत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का?

किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!