अब तेरा क्या होगा जगदीशन?

२४ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


तमिळनाडूचा नारायण जगदीशन हा एक अवलिया क्रिकेटपटू. धावा आणि विक्रम हातात हात घालून त्याच्यासोबत फॉर्म्युला-वन कारच्या वेगानं सुसाट प्रवास करतायत. ओपनर आणि विकेट कीपिंग ही त्याची खासियत आहे. त्याचं सध्याचं वय २६ म्हणजेच कारकीर्द घडू शकेल असं आहे. पण ते टिकेल याची शाश्वती काय? कारण क्रिकेट हा असाच अनिश्चिततेचा खेळ आहे.

२१ नोव्हेंबर २०२२ या दिवशी बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अनपेक्षित, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय अशा क्रिकेट अध्यायाची नोंद झाली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अरुणाचलविरुद्धच्या सामन्यात अनेक विश्वविक्रम पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोलमडले, तर नवे उदयास आले. याचं श्रेय अर्थात नारायण जगदीशनलाच जातं.

एकापाठोपाठ एक विक्रम

रोहित शर्माचा भारताकडून सर्वाधिक २६४ धावांचा विक्रम मोडून काढत जगदीशनने अ-श्रेणी क्रिकेटमधे १४१ चेंडूंमधे २७७ ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवलीय. त्याचबरोबर ११४ चेंडूंमधे वेगानं द्विशतकाच्या विक्रमाची बरोबरी, हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक १५ सिक्सचा विक्रम आणि अ-श्रेणी क्रिकेटमधे सलग पाच शतक साकारणारा तो पहिला बॅट्समन ठरलाय.

जगदीशनने सहा सामन्यांत १५६च्या सरासरीनं ६२४ धावा फटकावून स्पर्धेतला सर्वाधिक धावा काढणारा बॅट्समन होण्याची कर्तबगारी केलीय. अरुणाचलविरुद्धच्या सामन्यात त्याने साई सुदर्शनच्या साथीनं त्यानं ४१६ धावांची विक्रमी भागीदारी केलीय. त्यामुळे तमिळनाडूनंही अ-श्रेणी क्रिकेटमधली ५०६ ही सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि विजय साकारला, तोही तब्बल ४३५ धावांनी.

हेही वाचाः देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

नव्या टीममधे संधी?

आकड्यांची ही मोडतोड करणारा जगदीशनचा हा पराक्रम नक्कीच लक्षवेधी ठरतो. कारण काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधे भारतीय टीम अपयशी ठरली. अनेक वरिष्ठ खेळाडूंवर या अपयशाचं खापर फोडण्यात आलं.

त्यामुळे नव्याची लाट तशी ताजीच आहे आणि जागाही रिक्त आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-२० साठीच्या नवउमेदीच्या टीमची निर्मिती होऊ शकते, हीसुद्धा तशी सकारात्मक गोष्ट आहे. म्हणजेच जगदीशनच्या वाटचालीला पुरेशी संधी आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

असा घडला जगदीशन

जगदीशनचे वडील सी. जे. नारायण हे मुंबईत कार्यरत असताना टाटा ईलेक्ट्रिक कंपनीकडून क्रिकेट खेळायचे. त्यामुळेच वयाच्या नवव्या वर्षीपासूनच जगदीशननं क्रिकेट प्रशिक्षणाला प्रारंभ केला. अर्थात नारायण हेच त्याचे पहिले प्रशिक्षक. जगदीशनला वेगवान बॉलर व्हायचं होतं. पण वडलांच्या सल्ल्यानं त्यानं विकेटकीपरची भूमिका स्वीकारली.

स्टंपच्या मागून प्रत्येक बॉलचं निरीक्षण करण्याच्या सवयीमुळे त्याच्या बॅटींगमधेही ३६० अंशांत खेळण्याची परिपक्वता आली. पुढे ए. जी. गुरूसामी यांचं त्याला मार्गदर्शन लाभलं. २०१६-१७च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात जगदीशननं रणजी पदार्पण केलं. या सामन्यात तमिळनाडूची सुरवात खराब झाली.

पण सातव्या क्रमांकावर बॅटींगला उतरत जगदीशननं दोन सिक्स आणि आठ फोरसह १२३ धावांची झुंजार खेळ साकारली. त्यामुळे तमिळनाडूला ७ बाद ५५५ अशी आश्वासक धावसंख्या उभारता आली. हा सामना जरी अनिर्णीत राहिला, तरी जगदीशननं सामनावीर पुरस्कार पटकावून क्रिकेटजगताला आपली दखल घ्यायला लावली.

हेही वाचाः आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

रणजीनंतरचा प्रवास

जानेवारी २०१७मधे जगदीशनची आंतर-राज्य ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी निवड झाली. पण हैदराबादविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात १६६ धावांचा पाठलाग करताना तो १८ धावांवर बाद झाला, तर तमिळनाडूचा डाव ९३ धावांवर संपुष्टात आल्यामुळे ७२ धावांनी हा सामना गमावला. महिन्याभरात हजारे करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्ध त्यानं पदार्पण केलं.

इथेही जगदीशनची कामगिरी चांगली झाली नाही. पण तमिळनाडूनं जेमतेम पराभव टाळण्यात यश मिळवलं. २०१८च्या ‘आयपीएल’ लिलावात चेन्नई सुपर किंग्जनं जगदीशनला टीममधे स्थान दिलं. पण त्याला प्रत्यक्ष खेळता आलं, ते १० ऑक्टोबर २०२०ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध. 

जगदीशन आजही चेन्नईच्याच टीममधे आहे. पण विकेटकीपर-बॅट्समन ही भूमिका धोनीकडेच असल्यानं इतर पर्यायांचा विचार होणं, तसं कठीणच. पण कोंबडं कितीही झाकलं, तरी आरवायचं थोडीच राहतं. तशीच गुणवत्ता कोंडून ठेवता येत नाही. २०२०-२१ हा क्रिकेट हंगाम जगदीशनसाठी सर्वात महत्त्वाचा ठरला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतल्या आठ सामन्यांत सर्वाधिक म्हणजेच एकूण ३६४ धावा त्याच्या नावावर होत्या. याचप्रमाणे हजारे ट्रॉफी स्पर्धेत तमिळनाडूकडून सर्वाधिक २१७ धावा त्यानं काढल्या. यात पंजाबविरुद्धच्या शतकाचाही समावेश आहे. याच यशोदायी कामगिरीचं सातत्य यंदाही त्यानं टिकवलंय. किंबहुना यंदा त्याची बॅट अधिकच तेजानं तळपतेय.

स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा

मुंबईचे सर्फराज खान, पृथ्वी शॉ गेली काही वर्षे सातत्यानं धावा काढतायत. पण त्यांना भारतीय टीममधे स्थान मिळू शकलेलं नाही. कौंटी क्रिकेटमधे सातत्यानं शतकं झळकावणारा चेतेश्वर पुजारा असो किंवा अजिंक्य रहाणे या कसोटी विशेषज्ञ बॅट्समनना स्थान टिकवण्यासाठी तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागतं.

पद्माकर शिवलकर, राजिंदर गोयल, अमोल मुझुमदार, मिथुन मन्हास आणि एस. शरद यांनी देशांतर्गत क्रिकेट गाजवूनही भारतीय टीममधलं स्थान त्यांच्या नशिबात नव्हतं. गुणवान खेळाडूंची देशात मुळीच वाणवा नव्हती. पण त्या स्थानासाठी असलेले खेळाडू देशाकडून चांगली कामगिरी करत होते. म्हणूनच त्यांना संधी मिळाली नाही

हेही वाचाः महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’  

काही गुणवान, काही धूमकेतू

काही खेळाडू एखाद्या धूमकेतूप्रमाणे चमकले. पण नंतर कालौघात त्यांची कारकीर्द कधी संपली, हेही कळलं नाही. २०११च्या आयपीएलमधे मुंबईच्या पॉल वल्थाटी या स्थानिक क्रिकेटमधे पर्दापणही न केलेल्या बॅट्समननं लक्षवेधी कामगिरी बजावली. किंग्ज ईलेवन पंजाबकडून हा सलामीवीर चौफेर फटकेबाजी करायचा. पण डोळ्याच्या दुखापतीनंतर त्याची कारकीर्द अपेक्षेनुसार उंचावलीच नाही.

याहून मोठ्या आशा दाखवल्या, त्या उन्मुक्त चंदनं. २०१२मधे उन्मुक्तच्या नेतृत्वाखाली भारतानं १९ वर्षांखालचं विश्वविजेतेपद जिंकलं. अभ्यास आणि क्रिकेट या दोन्ही आघाड्यांमधे हुशार असणाऱ्या उन्मुक्तनं या युवा वर्ल्डकपच्या यशस्वी प्रवासाबद्दल २०१३मधे ‘द स्काय इज द लिमिट’ हे पुस्तकही लिहिलं. पण त्याच्या कारकीर्दीचा आलेख मर्यादित राहिला. गेल्याच वर्षी म्हणजे वयाच्या २८व्या वर्षी निवृत्ती पत्करली.

उन्मुक्तच्या यशस्वी टीमचा उपकर्णधार होता, तो महाराष्ट्राचा विजय झोल. १९ वर्षांखालच्या क्रिकेटमधे ११ तास खेळपट्टीवर ठाण मांडून ५३ फोर आणि दोन सिक्ससह महाराष्ट्राकडून नाबाद ४५१ धावांची विक्रमी खेळी साकारणारा हा युवा तारा. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट काही वर्षे खेळला. युवा क्रिकेटमधे भारताचंही प्रतिनिधित्व त्यानं केलं. पण उज्ज्वल भवितव्य तो घडवू शकला नाही.

२०१६मधे शालेय क्रिकेटमधे १५ वर्षीय प्रणव धनावडेनं ऐतिहासिक कामगिरी केली. ती म्हणजे त्याने नाबाद १००९ धावा केल्या. धनावडेच्या कामगिरीचं सचिन तेंडुलकर, धोनी यांनीही कौतुक केलं. राज्याच्या क्रीडामंत्र्यांनी त्याच्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा आर्थिक भार उचलला. पण सातत्याच्या अभावामुळे धनावडेची कारकीर्द उंचावू शकली नाही.

अमरे यांचं विश्लेषण

‘जगदीशनकडे उत्तम गुणवत्ता आहे. पण तितकीच स्पर्धासुद्धा आहे. मग त्याच्या हातात फक्त चांगलं कामगिरी साकारणं, हेच उरतं. ते तो इमानेइतबारे करतोय. निवड समिती त्याची नोंद घेईल, अशी आशा आहे. सातत्य हेच खूप महत्त्वाचं असतं. ते त्याच्या बॅटींगमधे आहे,’ असं माजी बॅट्समन आणि प्रशिक्षक प्रवीण अमरे जगदीशनविषयी सांगतात.

‘भारतीय टीममधे प्रत्येक स्थानासाठी स्पर्धा आहे. त्यामुळेच काही खेळाडूंचं नुकसान होतं. हे आजचं नाही. अगदी पद्माकर शिवलकर यांनी मुंबईसाठी सातत्यपूर्ण कामगिरी दाखवूनही बिशनसिंग बेदी यांच्यामुळे कधीच भारताकडून खेळता आलं नाही, हेच त्यांचं दुर्दैव. त्यामुळे जगदीशनचं वय अनुकूल असलं तरी तो कुणाशी स्पर्धा करतोय, यावरून त्याची संधी ठरते,’ असं विश्लेषण अमरे करतात.

देशांतर्गत क्रिकेटमधे सातत्यानं कामगिरी करणाऱ्या जगदीशनचंही आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल गाजवण्याचं स्वप्न असणं स्वाभाविकच आहे. कामगिरी, सातत्य आणि नशीब या तीन घटकांचा विचार करता, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची कारकीर्द घडू शकते किंवा तो देशांतर्गत क्रिकेटपुरताच मर्यादित राहू शकतो. नाहीतर येत्या काही वर्षांत त्याची कारकीर्द संपूनही जाऊ शकते.

हेही वाचाः 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं