आसुरन: तामिळ सिनेमातला विद्रोही हुंकाराचं नवं पाऊल

०९ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं.

एखादा शोषित पायाखालचा किडा असतो, तोपर्यंत त्याचा त्रास नसतो. पण एखाद्या क्षणी आत्मसन्मानाची जाणीव होऊन त्याने मान वर केलीच, तर त्याचा गळा कापून अक्षरश: कुत्र्या-गिधाडांना खाऊ घातला जातो. भारतामधल्या जातवास्तवाची ही परिसीमा आहे.

हजारो वर्षे वास्तवात असलेल्या जातिभेदाला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूठमाती दिली. तरी अजूनही मनीमाणशी रुजलेला हा जातवर्चस्ववाद पूर्णतः लयाला गेलाय, असं म्हणता येणार नाही. माध्यमांमधे त्याचे पडसाद उमटत नसतील. पण खैरलांजीसारख्या घटनेचा आवाज इतका मोठा असतो की व्यवस्थेला त्याची दखल घेण्याशिवाय पर्यायच राहत नाही. 

इतरवेळी वरिष्ठ जात, वर्ग, व्यवस्था आणि सत्ता हे हातात हात घालून शोषितांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न करतात. दिग्दर्शक वेत्री मारन यांचा ‘आसुरन’ हेच वास्तव केवळ आपल्यासमोर मांडतो.

सुरांचा विजय तोच आपला पराभव

या सिनेमासाठी नुकताच अभिनेता धनुष याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेमधे तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं. 

मुळात असुर म्हटलं की, आपल्याला काही तरी दुष्ट, वाईट असं काहीसं मनात तरळतं. असुर म्हणजे - केवळ सुर नव्हेत ते, इतका सहज अर्थ आपण घेत नाही. कारण आपल्यावर त्याविषयी खूप काही बिंबवलं गेलंय. कथा-पुराणातून. म्हणूनच आजही या देशातल्या जनतेच्या मनाला, जेत्यांचा विजयोत्सव करत असताना आपण आपलाच पराभव साजरा करतो आहोत, या भावनेचा लवलेशही स्पर्श करत नाही. 

द्रविडीयन भूमीत या जाणिवा आजही शिल्लक आहेत. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृती, कलाकृती आणि चित्रकृतींमधून पाहायला मिळतं. ‘आसुरन’ची कथाही साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक पुमणी यांच्या ‘वेक्कई’ या कादंबरीवर आधारित आहे. एका वाक्यात सांगायचं, तर पंचमीच्या जमिनीच्या एका तुकड्यासाठी एका दलित कुटुंबाने गावातल्या सावकाराशी केलेला संघर्ष म्हणजे ‘आसुरन.’ 

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

खैरलांजींची आठवण देणारी कथा

आपल्याकडे महार वतनी जमिनी आहेत. तशा ब्रिटिश सरकारनं मद्रास प्रांतातली सुमारे १२ लाख एकर जमीन दलितांच्या नावे केलीय. ही जमीन दलितेतरांना विकता येत नाही. तिला पंचमी म्हणतात. दक्षिणेकडे दलितांना पंचम असेही म्हणतात. त्यांना दिलेली जमीन म्हणून पंचमी.

मात्र, ‘आसुरन’ ही काही केवळ दोन कुटुंबांमधल्या संघर्षाची कथा नाही. दिग्दर्शकानं तिचा परीघ इतका व्यापक बनवलाय की, या कथेकडे दर्शक केवळ त्या कुटुंबाची कथा म्हणून पाहूच शकत नाही. त्याच्या मनात खैरलांजीपासून अनेक घटनांचा कल्लोळ माजतो. १९६८ मधे किल्वनमणी येथे ४४ दलित मजुरांचं हत्याकांड झालं होतं. त्यात एक वर्षाच्या बालकापासून ते ७० वर्षांच्या म्हातार्‍यांपर्यंतचा समावेश होता. त्याच्या स्मृती सिनेमा पाहताना जाग्या होतात.

डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग

‘आसुरन’मधला शिवस्वामी हा दलित शेतकरी आपला जमिनीचा तुकडा वाचवण्यासाठी झगडतोय. सावकाराच्या शेतीशी लागून असल्यामुळं त्याचा एक फॅक्टरी उभारण्यासाठी या जमिनीवर डोळा आहे. तो आपल्या जमिनीला विजेच्या तारांचं कुंपण घालतो. तिथून हा संघर्ष पेटतो. या संघर्षात शिवस्वामीच्या थोरल्या मुलाला अटक केली जाते. त्याला सोडवण्यासाठी शिवस्वामीला लज्जास्पदरीतीने सार्‍या गावकर्‍यांचे पाय धरून लोटांगण घालावं लागतं. अगदी गावातल्या पोरासोरांसह. 

तरीही पुढे त्याच्या थोरल्या मुलाची नृशंस हत्या केली जाते. मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून मुंडके तोडून कुत्र्यांना खाऊ घातले जाते. धाकटा कुमारवयीन मुलगा त्या रागात सावकाराची हत्या करतो. त्याला वाचवण्यासाठी हे कुटुंब आपली जमीनही द्यायला एका क्षणी तयार होते. हरेक संघर्षमय प्रसंगाला सामोपचाराच्या भूमिकेतून सामोरे जात असताना अत्याचाराचा रक्तरंजित प्रतिकार करण्याचीही वेळ त्यांच्यावर येते.

सिनेमामधे काही प्रसंग असे आहेत की, डोळ्यांत पाणी यावं. त्यामधे वर सांगितलेला गाव दंडवताचा प्रसंग असो, किंवा दलित मुलीने चप्पल घातली म्हणून तीच चप्पल तिला डोक्यावर घ्यायला लावून भर बाजारातून काढलेली तिची धिंड असो! 

हेही वाचा : आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर

वंचितांचा हुंकार रूपेरी पडद्यावर

असं असलं, तरी हा सिनेमा सुडाची पाठराखण वा उदात्तीकरण करत नाही. दलित, शोषित, वंचित अशा परिघावरील आणि परिघाबाहेरील घटकांच्या आत्मप्रतिष्ठेची जाणीवपेरणी करतो. अंतिमतः शिवस्वामी त्याच्या मुलाला सांगतो, आपल्याकडे जमीन असेल, तर ‘ते’ काढून घेतील. पैसा असेल तर ‘ते’ लुटून नेतील. मात्र, शिक्षण असेल तर कुणीही ते हिरावून घेऊ शकणार नाही. अशाप्रकारे आंबेडकरवादाशी समग्राचा सांधा इथं जुळवला जातो. त्याची महत्ता अधोरेखित केली जाते.

गेल्या दशकभरात हा आंबेडकरवाद तमिळ सिनेमासृष्टीमधे मोठ्या जोमाने प्रवाहित होतोय. वंचितांचा हुंकार त्या माध्यमातून रुपेरी पडदा व्यापून उरतोय. वेत्री मारनसह पा. रंजित, लेनिन भारती, मारी सेल्वराज, बालाजी शक्तिवेल, राजू मुरुगन आदी दिग्दर्शक आपल्या चित्रपटांमधून त्यांचा आवाज आपापल्या पद्धतीने, आपापल्या शैलीत बुलंद करतायत.

दलितांचं ‘लार्जर’ स्वरूप

मुख्य प्रवाहातल्या तमिळ चित्रपटांत वर्गसंघर्ष अर्थात श्रीमंत-गरीब संघर्ष हा सर्वसामान्य आहे. पण तो या दिग्दर्शकांनी आता अधिक टोकदार केलाय. त्या संघर्षाला सूक्ष्म पातळीवर घेऊन जाताना त्यातल्या जातिभेदाचं वास्तव प्रकर्षाने समोर आणलंय. 

पा. रंजित या अवघ्या चाळीशीतल्या दिग्दर्शकाने वास्तवाची मांडणी रुपेरी पडद्यावर अत्यंत जोरकसपणे केलीय. ‘अट्टाकथी’, ‘मद्रास’, ‘कबाली’ आणि ‘काला’ अशा चढत्या क्रमानं त्यानं आपला करिअरग्राफ उंचावला तर आहेच. पण व्यावसायिक चित्रपटांतूनही वंचितांच्या संघर्षाला आवाज प्राप्त करून दिलाय.

व्यावसायिक चित्रपटांत जे दलित आजवर केवळ मजूर, कामगार, व्यसनी, गुन्हेगार आणि त्यांचे साथीदार अशाच भूमिकांतून दिसत होते. त्यांच्यातल्या माणसाला ‘लार्जर’ स्वरूपात सादर करण्याचं त्याचं कौशल्य वादातीत आहे. कोणीतरी त्रयस्थ मसिहा शोषित दलितांचा उद्धार करण्यासाठी धावून येत होता, त्याऐवजी आता त्यांच्यातलाच कुणी अन्यायाविरुद्ध उभा ठाकतो, हे पाहणं आजच्या तरुणांसाठीसुद्धा अत्यंत प्रेरणादायी स्वरूपाचं आहे. तशी आजच्या काळाची गरज आहे.

हेही वाचा : जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

राजकीय स्टेटमेंट करणारा दिग्दर्शक

‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा बाबासाहेबांचा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झालीय, हे रंजितचे सिनेमा सांगत राहतात. त्याच्या सिनेमातली फ्रेमन्फ्रेम या वास्तवानं ओथंबून वाहते. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी नातं सांगू पाहते. ‘काला’मधलं धारावीचं चित्रण त्यातली अस्सलता पाहिल्यावर लक्षात येईल. 

आपल्याला सारं काही ब्लॅक अन् व्हाईटमधे पाहायची सवय असते. ती परिमाणंही रंजित मोडीत काढतो. ‘काला’मधे नायक रजनीकांत सतत काळ्या कपड्यांत आणि डार्क प्रकाशात, तर खलनायक नाना पाटेकर एकदम सफेद कपड्यांत. त्याचं हे मांडणं आपल्या नागराज मंजुळे यांच्या शैलीची आठवण करून देणारं. मात्र, नागराज सामाजिक भाष्याविषयी सजग असणारा, तर रंजित आक्रमक राजकीय स्टेटमेंट करू पाहणारा, असा फरक मात्र ठळक दिसतो.

पा. रंजितखेरीज अन्य दिग्दर्शकांनीही या दशकभरात काही उत्तम सिनेमा निर्माण केले आहेत. त्यात लेनिन भारती यांचा ‘मेर्कू थोडार्ची मलई’, मारी सेल्वराज यांचा ‘परियेरुम पेरुमल’ याचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. ‘परियेरुम पेरुमल’चा निर्माता पुन्हा पा. रंजितच आहे, हेही महत्त्वाचं. या सिनेमात खालच्या जातीचा तरुण आणि वरच्या जातीची तरुणी यांच्या प्रेमाची संघर्षकथा आहे. 

समता प्रस्थापनेची साद

व्यावसायिक डूब देतानाही आंबेडकरवादी मूल्यांचा विसर पडू न देणं, हे त्याचं वैशिष्ट्य इथंही डोकावतं. यातल्या नायकाला डॉ. आंबेडकर यांच्यासारखं मोठा वकील व्हायचंय. अशा अनेक छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींतून समता प्रस्थापनेचा आग्रह हे तरुण दिग्दर्शक धरताहेत, हे खूप महत्त्वाचंय.

जातिभेदाच्या रगाड्यातून आपण आपल्या मानसिकतेची सुटका करून घेत नाही, तोवर या देशातलं काहीच बदलणार नाही. जातिभेदाच्या बेड्यांत जखडलेलं मन शोषणाविरुद्ध, वंचितांच्या हक्कांसाठी कसं बरं हळवं होईल? समोरच्या कोणत्याही व्यक्तीला आपण माणूसपणाच्या निकषावर जोखत नाही, त्याच्याशी जोडले जात नाही, तोवर ही शोषण परंपरा सुरूच राहणार आहे. व्यवस्था, सत्ता त्यांच्या स्वार्थासाठी तिला खतपाणी घालत राहणारच आहेत.

या सार्‍यांपासून सुटका व्हावयाची असेल, तर फुले, शाहू, आंबेडकरांच्या विवेकवाद, विज्ञाननिष्ठा आणि मानवी मूल्य प्रतिष्ठा या त्रिसूत्रीचाच आधार घ्यावा लागणार आहे. असे हे तरुण दिग्दर्शक त्यांच्या कलाकृतींमधून साद घालताहेत. प्रश्न इतकाच आहे की, आपण ती साद ऐकणार की नाही?

हेही वाचा : 

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार.)