टाळेबंदीने उद्ध्वस्त झाला आठवडी बाजार

१७ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : १२ मिनिटं


प्राचीन भारतीय व्यापारी पद्धतीतला बलुतेदारी, आलुतेदारी, फिरस्ते यांच्यावर आधारलेला, गावोगावी ग्रामीण आणि तळागाळातील अर्थकारणाचं चक्र असणारा आठवडी बाजार पुन्हा उभारी धरेल की नाही माहीत नाही. नोटबंदीनंतर आठवडी बाजारावर झालेला हा दुसरा आणि सर्वात मोठा आघात आहे. अनेक वस्तू आणि सेवा आणि यांच्यावर आधारित सहजीवनाचा आणि आत्मनिर्भरता यांचा वारसा असणारा आठवडी बाजार कायम स्वरूपी नष्ट होईल का?

कोरोनासाथीमुळे लावलेली टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया आता सुरू झालीय. ही टाळेबंदी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी कितपत यशस्वी झाली याचं उत्तर आत्ताच मिळणं कठीण आहे. पण टाळेबंदीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मात्र मोठेच टाळे लागण्याची शक्यता खूपच बळावलीय हे वास्तव आहे. नोटबंदी आणि जीएसटी यांच्या तडाख्याने आधीच डबघाईला आलेल्या छोट्या आणि मध्यम उद्योगधंद्यांचे कंबरडे या टाळेबंदीमुळे पुरते मोडले आहे. यामुळे त्यावर अवलंबून असणारे लाखो कामगार आणि मजूर बेरोजगार झाले आहेत.

लहान व्यापारी आणि व्यावसायिक यांचंही नुकसान झालंय. याच बरोबर या सर्वांवर अवलंबून असणारा गावोगावी असणारा आठवडी बाजारसुध्दा पूर्णतः कोलमडून गेला आहे. आठवडी बाजारातील विक्रेते आणि खरेदीदार जणू अचानक गायबच झाले आहेत अशी भयाण अवस्था आज केवळ उस्मानाबादच्या नव्हे तर अनेक तालुका आणि जिल्हा आठवडी बाजारांमधे दिसून येत आहे.

आठवडी बाजार बंद पडणार?

उस्मानाबादेत यावर्षी झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ग्रंथाली प्रकाशनाने  उस्मानाबादच्या आठवडी बाजारावर मी लिहीलेले  'आठवडी बाजार आणि समाज जीवन' हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाची प्रेरणाच मुळी २०१६ मधे भारत सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे आठवडी बाजारावर कोसळलेले संकट ही होती!

माझे पुस्तक उस्मानाबादच्या आठवडी बाजारावर असले तरीही गावोगावी असणारा आठवडी बाजार जवळपास एकसारखाच असतो. आठवडी बाजाराचा सर्वांगीण मागोवा घेण्याचा प्रयत्न मी केला होता. नोटबंदीनंतर आज या आठवडी बाजाराची पुन्हा आठवण येण्याचं कारण म्हणजे दुसरी एक बंदी - टाळेबंदी! नोटाबंदी आणि जीएसटीवेळी जसे छोटे आणि मध्यम उद्योग आणि कामगार मजूर यांची दुर्दशा झाली तशीच दुर्दशा या टाळेबंदीने पुन्हा केलीय. मग आठवडी बाजारही या दुर्दशेला अपवाद कसा राहील? आठवडी बाजार ही संकल्पनाच टाळेबंदीमुळे मोडीत निघणार की काय अशी शंका येते. 

हेही वाचा : १९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय

टाळेबंदीमुळे कोलमडली व्यवस्था 

बऱ्याचदा कॅलेंडरवरील काळात एकाच पानावर असलेले मानवी समाज सामाजिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या बरोबरच चालत असतील असे नाही. एकाच वेळी एकाच गावात एक समूह एकविसाव्या शतकात तर एक समूह विसाव्या शतकाच्या मध्यात असतो, तर एखादा समूह नव्वदीतले उदारीकरण अनुभवत असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. तळागाळातील आणि असंघटित क्षेत्रातील लोकांची गरज भागविण्याचे  मुख्य काम आठवडी बाजार करत असतो. टाळेबंदीच्या काळातही हाच वर्ग सर्वात जास्त  पिडीत होता. म्हणून आठवडी बाजारावर याचे मोठे परिणाम दिसून आले.

मेट्रो शहरातील उच्चमध्यमवर्गीय समाज आठवड्याचे कामाचे संपूर्ण दिवस बहुधा कार्यालयीन कामातच व्यतीत करतो. महिन्यातून एकदाच महिन्याचे सारे आवश्यक जिन्नस तसेच काही वेळा अनावश्यक गोष्टीही मॉलमधून खरेदी करतो. मध्यमवर्गीय समाज आवश्यकतेहून अधिक खरेदी न करता खरेदीची सांगड उपलब्धतेपेक्षा गरजांशी अधिक जोडणारा असतो. हा वर्ग जवळच्या किराणा भुसार दुकानातून महिन्याची एकदम खरेदी करतो. 

हाच समाज मोठ्या शहरांऐवजी लहान शहरे, गावे यांतून राहात असेल तर उलट पीक काढणीनंतर म्हणजे दिवाळीनंतर वर्षभराचे धान्य भरुन ठेवण्याकडे त्याचा कल असतो. तर दैनंदिन अथवा आठवडी रोजगारावर काम करणारा श्रमजीवी त्या आठवड्याचे वेतन पदरी पडले की पुढील आठवड्याची तजवीज करण्यासाठी आठवडी बाजाराची वाट धरतो. माणसांचे हे प्राधान्यक्रम नकळत त्यांच्या आर्थिक स्तरांचे, भौगोलिक ठिकाणांचे आणि  मागणी-पुरवठा व्यवस्थेचे निदर्शक ठरत असतात. ही संपूर्ण व्यवस्था टाळेबंदीमुळे कोसळून पडली आहे.   

प्रत्येक जातीचा प्रतिनिधी

टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे २३ मार्च ते १४ एप्रिल २०२० या काळात दळणवळण पूर्ण बंद होते. त्यामुळे आठवडी बाजारात उलाढाल करणारे लोक पंचक्रोशीत असणाऱ्या प्रमुख गावांमधे आठवड्यातील प्रत्येक वार ठरवून या गावात सोमवारी, त्या गावात मंगळवारी, असे आठवडी बाजाराचे चक्र ठरवले जात असे. प्रत्येक विक्रेता प्रत्येक बाजारात जातो असे नव्हे अनेकजण केवळ तीन चार बाजारात जाणारे असतात.

आठवड्याभराच्या किंवा पंधरवड्याच्या उधारीवर माल खरेदी करतात आणि आठवडभर विक्री करून पहिल्या मालाचे पैसे देऊन पुन्हा दुसऱ्या आठवड्याचा माल खरेदी करतातय परस्परांच्या विश्वासावर बाजारातील हे व्यवहार गेल्या शेकडो वर्षापासून चालत आले आहेत. टाळेबंदीच्या काळात सर्व काही अनिश्चित असल्यामुळे विश्वास कोणी आणि कशाच्या आधारे ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला.

जुन्या काळात आठवडी बाजारातील व्यवहार हे वस्तू विनिमय पद्धतीने होत असत. त्यामुळे गावातील विविध सेवा देणारे-घेणारे, वस्तू उत्पादन करणारे-खरेदी करणारे लोक आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि चरितार्थासाठी अशा बाजारांवर अवलंबून असतं! वस्तू विनिमय असल्यामुळे परंपरागत व्यवसाय करणारे लोक इथे खरीददार आणि  विक्रेतेही असतात. त्यामुळे प्रत्येक जातीचा प्रतिनिधी या बाजारात आढळतो.

जुने कपडे विकणारा काशीकापडे समाज, झाडू विकणारा मातंग समाज, फुटाणे विकणारा भोई समाज, कुलूप दुरुस्ती करणारा जोरी समाज किंवा लोखंडी वस्तू निर्माण करून विकणारा घिसाडी समाज, अशी विविध जातींची आणि जाती निहाय व्यवसायांची संख्या आठवडी बाजारात असते, म्हणजे होती असे म्हणावे लागेल! व्यवसाय आणि जाती यांचा संबंध आता राहिलेला नाही कारण बाजारात मागणी कशाला आहे हे पाहून सध्या लोक व्यवसाय निवडतात.

हेही वाचा :  कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?

लग्नसराईच्या काळातच टाळेबंदी 

‘हे पुस्तक म्हणजे प्रत्येक गावातील आठवडी बाजारात वर्षानुवर्ष जेमतेम उत्पन्नावर आपले आयुष्य पुढे रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यातच आनंद मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचे चरित्र आहे. या लोकांनी व्यवस्थित जागा नाही, बाजारात माझ्यासमोर इथे स्वच्छता नाही, भाजी आणि इतर विक्रीसाठी निवारा नाही की पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, अशा अनेक तक्रारी समोर मांडल्या होत्या.  या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आठवडी बाजारात सोई सुविधा मिळाव्या, स्वच्छता आणि आरोग्य यावर विशेष लक्ष दिले गेले आणि या विक्रेत्यांसाठी कांही विकासाच्या योजना आल्या तर या पुस्तकाचा खरा उद्देश सफल झाला असे मी मानतो.’ असं मी या पुस्तकाच्या मनोगतात व्यक्त केलंय.

टाळेबंदीच्या काळात दळणवळण बंद असल्याने परगावाहून आठवडी बाजारात येणारे विक्रेते आपल्या गावीच बंदिस्त झाले. ज्यांचा विक्रीचा माल नाशवंत नव्हता त्यांचे नुकसान झाले नाही. मात्र पैसे मालात गुंतून पडले. नाशवंत माल तर विक्रेत्यांना अखेर अक्षरश: कवडीमोल विकावा लागला किंवा वाटून टाकावा लागला. 

मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने म्हणजे लग्नसराईचा काळ! आठवडी बाजारातील अनेक विक्रेत्यांनी त्यांचा पैसा गुंतवून हा लग्नसराईसाठी माल खरेदी केला होता. यात प्रामुख्याने कपड्याचे व्यापारी, पितळी तथा तांब्याची दागिने विकणारे परदेशी सोनार, काचेच्या बांगड्या विकणारे कासार आणि इतर दुकानदार, शिवाय बंजारा समाजाच्या लग्नात वापरले जाणारे कपडे विकणारे लोक होते. पण कोरोना वायरसच्या संसर्गामुळे लग्न समारंभच रद्द झाले. त्यामुळे अनेकांचे पैसे मालात गुंतले आणि नवीन रोजगार करावा तर तोही बंद झाला.

हॉटेल चालू करण्याचा प्रयत्न

टाळेबंदीच्या ऐन मध्यात म्हणजे मे महिन्यात शासनाने काही बाबी शिथील केल्या. पण ही शिथिलता जीवनाव्यशव्यक वस्तूंबाबत होती. आठवडी बाजारातल्या ज्या विक्रेत्यांच्या वस्तू जीवनावश्यक नव्हत्या त्यांना मात्र काहीच करता आले नाही. आठवडी बाजारात इतर वस्तूंसोबत भाजीची दुकानेही असतात. पण जीवनावश्यक वस्तू म्हणून मिळणारी भाजी मूळ भाजी मार्केटमधे सुरवातीपासूनच मिळत असल्यामुळे लोकांना भाजी खरेदीसाठी आठवडी बाजारात जाण्याची गरजच उरली नाही. पण इतर दुकानांना अडचण निर्माण झाली.

बाजारात पाव विकणारे, फुटाणे, लाह्या भजी विकणारा भोई समाज यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. अखेरीस महामार्गावरील हॉटेलांना परवानगी मिळाली तेव्हा याच लोकांनी महामार्गावर लहान हॉटेल चालू करण्याचा प्रयत्न केला. तोही प्रत्येकाकडे भांडवल नसल्यामुळे शक्य झाले नाही.

टाळेबंदीचा काळ खरं तर सणांचा आणि यात्रांचा काळ होता. सण आणि यात्रा साज-या कराव्या की नाही, त्यात श्रद्धा वा अंधश्रद्धा किती, त्यातील प्रथा-परंपरा योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. पण याच सण, समारंभ, यात्रा, जत्रा यावर तळागाळातील अनेक लोकांचे पोट अवलंबून असते. गुढी पाडवा, अक्षय तृतीया, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद असे अनेक प्रमुख सण या काळात होते. 

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

अनेकांचे धंदे बुडाले

आमच्या भागात तुळजापुर, तेर, येरमाळा, हिंगळजवाडी या गावच्या यात्राही होत्या. आठवडी बाजारातील विक्रेत्यांसाठी या यात्रा म्हणजे पर्वणीच असतात. शिवाय सण असेल तर धंदा तेजीत असतो. या काळात दरवर्षी विक्री होवून पैसे सुटायचे ते यावर्षी मिळूच शकले नाहीत. हीच कहाणी आठवडी बाजारातील प्रत्येक विक्रेत्याची आहे.

गावरान कोंबड्या विकणाऱ्या विक्रेत्यांकडे गावातून नवीन कोंबड्या आल्याच नाहीत.  कारण खेडेगावांशी संपर्कच तुटला होता. अनेकांनी आपल्याकडील अन्नसाठ्याची विक्री करण्याऐवजी पुढील काळासाठी राखून ठेवणे योग्य समजले. ग्रामीण भागातील लोक हे या बाजारातील ग्राहकांचे पुरवठादार! पण अनेक गावांनी गावाचे रस्ते बंद करून खंदक खोदले होते. म्हणजे टाळेबंदीबरोबर गावबंदीसुद्धा होती. गावातून कोणीही बाहेर जायचे नाही आणि गावात कोणी यायचे नाही असा शिरस्ता काही गावांनी केला होता. त्यामुळे प्रत्येक  गावातील गरजा गावातच भागवणे आणि गावाबाहेरील लोकांना प्रवेश नाकारणे ही उपाय योजना केली गेली.

गावांना आपल्या गरजा गावातच भागवाव्या लागल्यामुळे बलुतेदारीसारखी स्थिती पुन्हा निर्माण झाली. त्यातून गावात राहणा-या अनेक विक्रेत्यांना मालातून नफा मिळविण्यापेक्षा कसेही करून पैसे रिकामे करणे ही प्राथमिकता ठरली. कारण धंदा बंद, पैसा नाही, रोजगार नाही, मग उपाशी राहण्यापेक्षा जसा जमेल तसा गावातच माल विकून इतर खर्चासाठी पैसा मोकळा करण्यात अनेकांचे धंदे बुडाले! 

तंबाखूचा चढलेला भाव

दगडी जाते, पाटा, वरवंटा विकणाऱ्या पाथ्रुड समाजाकडे गेली अनेक महिने ग्राहक फिरकलेलाच नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी या समाजाने बांधकाम व्यवसायातील मजूरीकडे आपला मोर्चा वळवला आहे. टाळेबंदी उठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर बांधकाम व्यवसाय आणि शेतीकामे यांना प्रथम शिथिल केले होते. त्यामुळे अनेक दुकानदार शेतीत मजुरी करण्यास निघून गेले तर ज्यांना शेतकी जमत नाही ते बांधकामात मजुरी करू लागले आहेत. फुटाणे, लाह्या, भजी, खारेमुरे विकणारा भोई समाज आपल्याच गावी हॉटेल व्यवसायाकडे वळला आहे, पण भांडवल नसल्यामुळे सर्वांना तेही शक्य होत नाही.

विशेष म्हणजे हा भोई समाज दरवर्षी गाठी वा साखरेचे हार पाडव्याच्या निमित्ताने बनवतो. पण यावर्षी ऐन पाडव्याच्या वेळी टाळेबंदी यामुळे हे हार विकलेच गेले नाहीत. आता हे हार पुढील वर्षी विक्रीयोग्य राहणार नाहीत त्यामुळे  त्यांनी यात गुंतवलेले पैसे हे कायमस्वरूपी बुडाले असेच म्हणावे लागते. पाडव्याच्या निमित्ताने लोक फडा आणि केरसुणी विकत घेतात. परंतु यावर्षी याची विक्री झालीच नाही. आता हे फडे केरसुण्या तयार करणारा मातंग समाज हे सामान वर्षभर कसे सांभाळणार? बुरूड समाजाची देखील अशीच अवस्था! लग्नात रुखवतात देण्यासाठी लागणारे साहित्य या वर्षी लग्नसराई नसल्यामुळे न्यायला कोणी आलेच नाही. ना दुरडी विकली गेली ना सूप!

तंबाखू विक्रेते मात्र या टाळेबंदीत  घरातून गुपचूप तंबाखू विकत होते. त्यामुळे टाळेबंदी शिथिल झाली तेंव्हा बाजारात तंबाखू खूपच कमी होती. टाळेबंदीत पानशॉप्स बंद असल्यामुळे अनेक लोकांनी त्यांची विविध सुपाऱ्या, पाने आणि गुटखा खाण्याची तल्लफ याच तंबाखूवर भागवली. विशेष म्हणजे दळणवळण बंद असल्यामुळे त्यामुळे या वर्षी नवीन माल बाजारात आलाच नाही. जुना माल कमी पडला म्हणून चढ्या भावाने तंबाखूची विक्री झाली. 

हेही वाचा : विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे

परस्पर अवलंबित्व असणारी व्यवस्था

जून महिन्यात छत्री, कुलूप आणि स्टोव्ह दुरुस्त करणाऱ्या झोरी समाजाने मात्र  आठवडी बाजारात  बाजार नसतानाही दुकान थाटले होते. त्यांच्याकडे अनेक स्टोव्ह आणि छत्र्या  दुरुस्तीस आल्या होत्या. पण जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात झोरी गल्लीतील दोन लोकांना कोरोनाची लागण झाली आणि सर्वांनाच क्वारंटाईन व्हावे लागले! व्यवसाय बंद! 

चुनखडी विकणाऱ्या लोणारी  समाजाची अवस्था अगदी सुरवातीला अशीच बिकट होती. पण बांधकाम व्यवसायाला सुरूवात झाल्यावर कांही प्रमाणात ग्राहक येवू लागले. जुने कपडे विकणाऱ्या काशीकापडे समाजाचा व्यवसाय मात्र पूर्णतः बंद आहे. या वर्षी पोळा देखील कसा होईल हे माहित नाही. त्यामुळे पोळ्याचा बाजाराची अवस्था बिकट असणार आहे. सुकट मासे विकणा-या विक्रेत्यांची घरेच आठवडी बाजाराच्या जागीच असल्यामुळे अनेक ग्राहकांनी टाळेबंदीतही त्यांच्या घरी जाऊन सुके मासे घेतले अशी माहिती या विक्रेत्यांनी दिली.

माणसाच्या गरजा भागवण्यासाठी प्राचीन काळीच श्रमविभागणीतून व्यवस्था निर्माण झाल्या तर कांही भागात त्या गरज पाहून आवर्जून  निर्माण केल्या गेल्या. जीवन जगण्यासाठी पारंपारीक जातनिहाय,  गावनिहाय व्यवसाय सोडून मग उपलब्ध असेल तो व्यवसाय लोक करू लागले. यापैकीच एक म्हणजे बलुतेदारी ही एक व्यवस्था आपल्या देशात बराच काळ बळकट होती. आठवडी बाजारात हीच परस्पर अवलंबित्व असणारी व्यवस्था वेगळ्या रूपात अस्तीत्वात होती. आज जागतिकीकरणामुळे उत्पादन आणि उपभोगाचे वर्तुळ कमालीचे व्यापक झाल्याने ही व्यवस्था हळूहळू नामशेष होत जात असली तरी तिचे बरेवाईट अवशेष आठवडी बाजारातील व्यवसायांतून दिसतात.

मूळ बारा बलुतेदार, कारू आणि नारू यांच्या पलिकडेही काही कामे ही विशिष्ट जात, विशिष्ट समाज वंशपरंपरागत पद्धतीने आपल्या पिढीजात कौशल्याच्या आधारे करत येताना दिसतात. या सर्व व्यवस्थेवर झालेला हा टाळेबंदीचा आघात आजवर सर्वात मोठा आहे. 

मास्कही आला आठवडी बाजारात

ग्रामीण भारतीय व्यापार पद्धती बलुतेदारी, अलुतेदारी, फिरस्ते यांच्यावर आधारलेली जात, व्यवसाय, कुटुंब, गाव आणि शेती यावर आधारलेला, गावोगावी ग्रामीण आणि तळागाळातील अर्थकारणाचे चक्र असणारा आठवडी बाजार पुन्हा उभारी धरेल की नाही माहित नाही. नोटबंदीनंतर आठवडी बाजारावर झालेला हा दुसरा आणि सर्वात मोठा आघात आहे.

यामुळे विविध वस्तूंच्या निर्मितीचे जातीपातीत बंद असणारे कौशल्य जर मुक्त झाले तर अधिक चांगल्या वस्तूंची निर्मिती होईल किंवा नवीन सेवा उद्योगदेखील चालू होईल. मात्र हे झाले नाही तर अनेक वस्तू आणि सेवा आणि यांच्यावर आधारित सहजीवनाचा आणि आत्मनिर्भरता यांचा वारसा असणारा आठवडी बाजार कायम स्वरूपी नष्ट होईल काय?  नेमके काय होईल हे सांगता येत नाही.

आठवडी बाजारात टाळेबंदीनंतर पाहीले असता पूर्वीचे अनेक विक्रेते गायबच झाले होते जणू! सर्वकांही विरळ विरळ दिसत होते. विक्रेते आले नव्हते त्यांच्या जागा मात्र तशाच रिक्त ठेवल्या होत्या. त्यावर कोणीही वेगळे वस्तूचे दुकान थाटले नव्हते! जणू त्या जागेचे अनभिषिक्त सम्राट ते विक्रेतेच होते! 

पण एक बाब पाहून जरा समाधान वाटले. आठवडी बाजारात एक नवीन वस्तू विकणाऱ्या तीन दुकानांनी बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळच जागा पटकावली आहे! ती म्हणजे सध्या हवा,  अन्न,  पाणी यांच्यासारखीच तुम्हा आम्हासाठी जीवनावश्यक बनलेली वस्तू अर्थात् ' कापडी मास्क' ! कोरोना नंतरच्या आगामी नव्या युगाची नांदी ही  म्हणावे काय?

हेही वाचा : 

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

आपण खरेदी करत असलेल्या पेट्रोलवर सरकार लावत १७५% टॅक्स

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी