अविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय?

२९ मार्च २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी कमांडो ऑपरेशन करण्याची भारताकडे आताइतकी दुसरी उत्तम वेळ नाही. त्यातून भौगोलिक राजकारण पूर्णपणे बदलून भारताच्या बाजूने वळवण्यासाठी हीच ती वेळ!

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी २२ मार्चला या अर्थाची दोन ओळींची इंग्रजी पोस्ट फेसबूकवर टाकली. या पोस्टवर तेवीसशेपेक्षा जास्त कमेंट आहेत. मामुली अपवाद वगळता सगळेच सरांची बिनपाण्याची हजामत करण्यासाठी उतरले आहेत.

कोरोनासारखी आपत्ती देशावर आणि जगावर कोसळली असताना त्याला तोंड देणं दूरच, धर्माधिकारी सरांना सुचलेली लढाईची खुमखुमी कुणालाच पटलेली नाही. ही पोस्ट माणुसकीला तर सोडाच, साध्या कॉमन सेन्सलाही धरून नाही, हे शेंबड्या पोरालाही समजतं. पण ते सरांना कळलेलं दिसत नाही.

हेही वाचा : कोरोना जगाला एकत्र आणू शकतो: रघुराम राजन

सरांच्या बचावासाठी मुलगा धावला

धर्माधिकारी सरांच्या आयुष्यात याआधी इतकी भयाण टीका त्यांच्यावर झालेली नसेल. त्यात सरांचे नेहमीचे टीकाकार आहेतच. शिवाय आम जनता मोठ्या संख्येने आहे. या टीकेत अभद्र शिव्या आहेत. विनोदी उपहास आहे. जातीवरून टोमणे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडून हाणणं आहे. कल्पक मिम्स आहेत. निर्दय ट्रोलिंग आहे. मुद्देसूद विरोधही आहे. विशेष म्हणजे सरांचे अनेक विद्यार्थीही त्यात आहेत. त्यांना या पोस्टमुळे आपण सरांकडे शिकल्याचा पश्चात्ताप होतोय.

अनेकांनी सरांना सल्ला दिलाय की पोस्ट मागे घ्या आणि माफी मागा. पण सर तयार नाहीत. त्यांनी त्यावर कमेंट टाकून खुलासा केलाय. खुलाशात माघार नाहीच. उलट कमेंट करणाऱ्यांना अडाणी, असभ्य, भाडोत्री आणि पूर्वग्रहदूषित असण्याचा आरोप केलाय. त्यात चीन पाकिस्तान मैत्रीचं राजकारण टीकाकारांना कळत नसल्याचा दावाही आहे. त्यावरही फेसबुकी जनता वेड्यासारखी चढलीय.

सरांचे चिरंजीव सिद्धार्थ यांनीही एक पोस्ट लिहून सरांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. चीन अडचणीत असताना भारताने पाकिस्तानची गचांडी पकडणं योग्य आहे. कोरोना वगैरे माणुसकीच्या गोष्टी हा नेहरुवादी मूर्खपणा आहे. अशी विद्वत्ता सिद्धार्थ यांनी पाजळलीय. साधी एमपीएससीची पहिली पायरीही चढू न शकणाऱ्या सिद्धार्थ यांना अर्थातच ती पोस्ट पेलवली नाही. ती त्यांनी डिलिट केली. घरातली चर्चा सांगण्याच्या बहाण्याने मुलाने वडलांचा केलेला बचाव हाच मुळात धर्माधिकारी सरांचा पराभव आहे.

हेही वाचा : पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

विद्वत्तेला असा नीचपणा शोभतो?

अविनाश धर्माधिकारी सर प्रचंड विद्वान आहेत. ते अनेक विषय आणि तत्त्वज्ञ कोळून प्यालेत. त्यांचं बेदरकार व्यक्तिमत्व आणि अमोघ वक्तृत्व यांनी महाराष्ट्रावर किमान पाव शतक तरी गारूड केलंय. पोस्ट खात्यातल्या एका साध्या कर्मचाऱ्याच्या मुलानं सतत संघर्ष करत आयएएस बनणं. त्याआधी कार्यकर्ता म्हणून दहा वर्षं देश पिंजून काढणं. ते अत्यंत आकर्षक ढंगात पुस्तकात उतरवणं.

आयएएस अधिकारी म्हणून महत्त्वाच्या पदांवर प्रभावी काम करणं. त्यानंतर त्याचा राजीनामा देणं. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या महाराष्ट्रासाठी नव्या सर्विस इंडस्ट्रीची पायाभरणी करणं. त्यातून शेकडोंना अधिकारी बनवणं आणि हजारोंना रोजगार देणं. अशी सरांच्या करियरची जबरदस्त सक्सेस स्टोरी आहे.

अशा थोर्थोर सरांनी ही मूर्खपणाची पोस्ट लिहून माती का खाल्ली? `सर्वे सन्तु निरायमः` अशी प्रार्थना दररोज करणाऱ्या आणि इतरांना करायला लावणाऱ्या माणसाला कोरोनाच्या संकटात वाचवण्याऐवजी मारण्याची विकृती कुठून सुचते? असा हल्ला केल्यास त्याचे अतिशय भयंकर परिणाम सरांना कळत नाहीत का? जगभर माणसं मरत असताना माणुसकीच्या दृष्टीने नीच ठरावा असा हा विचार त्यांना अजूनही योग्यच का वाटतो?

असे प्रश्न सरांचे प्रशंसक आणि विरोधक अशा दोघांनाही पडलेत. त्याचं उत्तर शोधणं आजच्या काळात आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. त्यासाठी `कोलाज`ने सरांसोबत अगदी जवळून काम केलेल्या, त्यांच्याकडून शिकलेल्या, त्यांचं करियर वेगवेगळ्या टप्प्यांत पाहिलेल्या, त्यांच्याकडे नोकरी केलेल्या, त्यांच्याशी आजही संपर्कात असलेल्या दहाएक जणांशी बोलून हे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्याशी चर्चा नाव न छापण्याच्या अटीमुळेच मनमोकळी झालीय. त्या चर्चेतल्या शक्यतांची ही गोळाबेरीज.

हेही वाचा : कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी

सर क्लास क्वारंटाइन झालेत?

यापैकी प्रत्येकाच्या बोलण्यात एक गोष्टी आलीय. सरांचा तोल गेलाय, कारण ते एकटे आहेत. त्यांना कुणीही मित्र नाही. आहेत ते अनुयायी, व्यावसायिक गरजेमुळे बरोबर असणारं टोळकं आणि क्लासमधली पोरं. शिवाय कुटुंबाच्या पलीकडे ते व्यक्तही होऊ शकत नाहीत. त्यालाही खूप मर्यादा आहेत.

नंतर ते जवळच्या लोकांपासून तुटले. ज्ञानप्रबोधिनीपासून ते तुटले. संघानंही त्यांना बाजुला केलं. भाजपने त्यांना कधीच जवळ घेतलं नाही. आज नुकतेच साठीत असताना ते पूर्णपणे एकटे झालेत. त्यांना जमिनीवर ठेवणारं कुणी नाही. त्यामुळे साठी बुद्धी नाठी. हे असं असेलही किंवा नसेलही.

सरांच्या एका जुन्या सहकाऱ्याच्या शब्दांत ते `क्लास क्वारंटाइन` झालेत. तो सरांचाच नाही तर आज महाराष्ट्रातल्या अनेकांचा प्रॉब्लेम आहे. आपापल्या विचारांच्या, वर्गाच्या, जातीच्या टोळक्यांत आपण अडकून बसलो आहोत. त्यामुळे एकुणात समाज काय विचार करतोय, हे समजतच नाही. एकाच प्रकारच्या विचारांचे इको आपल्यावर आदळत राहतात. विरोधी विचार कळतच नाहीत किंवा ते खोटे वाटतात. त्यातून विचारांचा एक फसवा बुडबुडा आपल्याभोवती बनतो. आपण त्या कोषात अडकलो की असं अतर्क्य, टोकाचं बोलायला लागतो. धर्माधिकारी सरांचं असं झालं असावं.

हेही वाचा : आजही सावरकरांना माफीच्या कोठडीतच का उभं केलं जातंय?

व्यावसायिक अपयशामुळे चर्चेत राहण्यासाठी?

मुळात धर्माधिकारी सरांच्या चाणक्य मंडल या स्पर्धा परीक्षांच्या क्लासचं फारसं चांगलं चाललेलं नाही. स्पर्धा परीक्षांचा धंदाच बसलाय. सरांच्या क्लासमधे प्रार्थना, हिंदुत्त्व, ब्राह्मणी वळण आणि सध्याचं मोदीप्रेम यामुळे आजची करियरिस्टिक मुलं लांब राहतात. विचारधारा बाजूला ठेवून अभ्यासावर भर देणाऱ्या प्रोफेशनल क्लासकडे जातात. फक्त यूपीएससी इंटरव्यूच्या तयारीसाठी सरांना डिमांड आहे.

काही जणांचं म्हणणं आहे की या व्यावसायिक अपयशामुळे चर्चेत राहण्यासाठी आणि नव्या विद्यार्थ्यांना आकर्षून घेण्यासाठी धर्माधिकारी सर असं करत असावेत. मुळात अधूनमधून चर्चेत आले तरी सर आयएएसच्या राजीनाम्यानंतर अपेक्षित यश मिळवू शकलेच नाहीत. त्यांना अगदी जवळ वाटत असलेली क्रांती घडलीच नाही. त्यांना अपेक्षित असलेली चळवळही उभी राहिली नाही. ना कार्यकर्ता अधिकारी घडले.

हेही वाचा : तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

आधी पुरोगामी भ्रमिष्ट, आता हिंदुत्ववादी?

त्यांना राज्यसभेवर जायचं होतं म्हणे. पण त्यांना कुणी विधानपरिषदेसाठीही विचारलं नाही. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढल्यानंतर सरांच्या हातात धुपाटणंही उरलं नाही. वाजपेयी सरकारात त्यांना नेहरू युवा केंद्राचं प्रमुखपद मिळालं. पण तिथे मंत्री उमा भारतींशी त्यांचं वाजलं.

गेली सहा वर्षं देशात भाजपचं सरकार आहे. या काळात ते एकतर्फी निष्ठेने मोदीप्रेमाची पिपाणी वाजवत आहेत. पण मोदी त्यांना उभंही करताना दिसत नाहीत. राज्यात फडणवीस सरकारनेही त्यांना चार हात लांब ठेवलं. ते शिवसेनेतही जाऊन आले. तिथे उद्धव ठाकरेंनी त्यांची दखलही घेतली नव्हती.

पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीवाले धर्माधिकारी सरांचा मान ठेवायचे. पुणे महापालिका राष्ट्रवादीकडे असताना चाणक्य मंडलची वादग्रस्त नवी बिल्डिंग उभी राहिली. आता भाजपकडे पालिका असताना ती सहा महिने बंद होती. पण आता सर कुठचेच राहिलेले नाहीत. कारण फडणवीस सरकारच्या काळात अनेकांनी आपला काँग्रेसद्वेषाचा चेहरा उघड केला. पण अनपेक्षितपणे फडणवीस गेल्यामुळे त्यांची समीकरणं बिघडली. फडणवीस सरकारच्या काळात फ्रस्ट्रेशनमुळे अनेक पुरोगाम्यांचं डोकं फिरलं होतं. आता हिंदुत्ववादी भ्रमिष्टासारखे बोलू लागलेत. त्याचं एक उदाहरण म्हणून सरांची पोस्ट दाखवता येते.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

बालपणीच्या संस्कारांचा असाही आविष्कार?

आपण बोलू ते अमलात आणण्यासाठी मोदी जणू काही वाटच बघताहेत, अशा भ्रामक कल्पनेत जगणारेच अशी पोस्ट लिहू शकतात. किंवा आपण मोदींना आंतरराष्ट्रीय संबंधांमधे मार्गदर्शन करत असल्याचा देखावा उभा करण्यासाठीही असं असू शकतं. किमान तसं दाखवून आपल्या शिष्यसंप्रदायावर इम्प्रेशन जमवण्याचाही हा फंडा असू शकतो. 

मोदींच्या सत्ताकाळात हिंदुराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईल असं कट्टर हिंदुत्ववाद्यांना वाटतं. काश्मीरचं ३७० कलम रद्द झालं. अयोध्येत राममंदिर उभं राहतंय. मुसलमानांना हिंदुत्ववाद्यांच्या मनातली जागा दाखवून देण्याचं काम सुरूय. उद्या समान नागरी कायदा होईल. आणि मोदी सर्जिकल स्ट्राइक करत पाकिस्तान जिंकून अखंड हिंदुस्तान उभा करतील. आश्चर्य वाटेल, पण अशी दिवास्वप्नं बघणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत.

सरांनी जगभरातलं ज्ञान मिळवलं असलं तरी त्यांनाही असं वाटणं नाकारता येत नाही.  त्यांच्यात घडत्या वयात दाबून दाबून भरलेले कट्टर संस्कार आजच्या पूरक राजकीय परिस्थितीत उफाळून आलेले असू शकतात. अशा अनेकांच्या संस्कारांचा आविष्कार सोशल मीडियावर उमटत असतो. तसंच एका अवचित क्षणी सरांचंही झालं असू शकतं.

हेही वाचा : एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट

सरांचा लोच्या झालाय खरा

मुळात संघाच्या संस्कारात वाढलेल्यांना लष्करी शौर्याचं जबर आकर्षण असतं. युद्धाच्या कल्पनेने ते चेकाळतात. तो त्यांच्यासाठी देशभक्तीचा कळस असतो. कारण त्यांचा देश नकाशात असतो. माणसात नसतो. माणसांचं काहीही झालं तरी चालेल, देशाचा नकाशा मोठा व्हायला हवा. संघासारख्या सगळ्याच कट्टरतावाद्यांच्या देश आणि देशभक्तीच्या मूळ कल्पनांमधेच हा लोच्या असतोच. सरांच्या बाबतीत इतर शक्यता खऱ्या असतील, नसतील. पण सरांचा हा लोच्या मात्र या पोस्टने उघडा केलाय.

जोतिबा फुले म्हणतात, एकमय लोक म्हणजे राष्ट्र. म्हणजेच सगळे देशबांधव समान पातळीवर जिवाभावाच्या प्रेमाने एकत्र राहतात, तिथे राष्ट्र घडतं. हे उमगतं तेव्हा देशभक्तीच्या दिशा खऱ्या अर्थाने उजळत जातात. डोक्यातल्या धर्म, जात, वर्ण, वर्गाच्या भिंती तुटत जातात. पण विद्वत्तेच्या फुलोऱ्यात या भिंती फक्त लपतात. अशा पोस्टमुळे तो फुलोरा दूर होऊन त्या भिंती पुन्हा लख्ख दिसू लागतात.

सरदाराने युद्धात पकडलेल्या कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या सुनेचा छत्रपती शिवरायांनी साडीचोळी देऊन सत्कार केला. तिला परत घरी पाठवलं. स्वातंत्र्यवीर सावरकर शिवरायांच्या या कृतीली 'सद्गुण विकृती' म्हणतात. मुसलमान द्वेषातून मेंदू आणि हृदयाला टाळं लावल्यामुळे सावरकरांना शिवाजी महाराज समजू शकले नाहीत. स्वत:ला सावरकरवादी म्हणवणाऱ्या धर्माधिकारी सरांचं डोकंही पाकिस्तान म्हटल्यावर असंच बंद झालं असावं. विनोबांच्या 'जय जगत'वर व्याख्यानं देणारे सर कमांडो ऑपरेशनच्या गोष्टी करतात. कुछ तो गडबड हैं दया!

हेही वाचा : कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

आदर्श चाणक्य नाही, कृष्ण हवा

धर्माधिकारी सरांच्या शब्दांत सांगायचं तर भारतातला पहिला ब्युरोक्रॅट असणारा चाणक्य हा त्यांचा आदर्श आहे. पण फोडा आणि राज्य करा असं शिकवणारा चाणक्य भारतीय संस्कृतीचा राजकारणासाठीचा आदर्श कधीच नव्हता. त्यातला सर्वोच्च आदर्श आहे एकच. तो म्हणजे श्रीकृष्ण.

प्रेमाला सर्वोच्च तत्त्वज्ञान मानणारा, युद्धातून खुश्शाल पळून जाणारा, कौरव पांडवांचं युद्ध होऊ नये म्हणून शेवटपर्यंत शिष्टाई करणारा, भर युद्धभूमीत जगण्याचं `गीत` गाणारा, आपल्या शेवटातून युद्धाचे दुष्परिणाम दाखवणारा कृष्ण युद्ध नाकारतो. आणि महत्त्वाचं म्हणजे सत्ताही नाकारतो.

कृष्ण मथुरेचं राज्य जरासंधाला, द्वारकेचं बलरामाला, हस्तिनापूरचं पांडवांना देतो. स्वतः राजा बनत नाही. आयुष्यभर सखा बनून राहतो. कृष्ण धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी झगडतो. चाणक्य सत्तेसाठी अधर्मही चुकीचा मानत नाही. चाणक्य फक्त शत्रूतच नाही, तर स्वकियांमधेही द्वेष पेरतो. सत्ता त्याच्यासाठी सर्वोपरी आहे. त्याला कृष्णासारखं मानापमान, शपथा सहज सोडून देता येत नाहीत. चाणक्याचं `राष्ट्रआराधन` म्हणूनच पोकळ ठरतं आणि चाणक्याला आदर्श मानणाऱ्यांचंही.

हेही वाचा : ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

युद्ध नको, बुद्ध हवा

चाणक्य स्वतः घडवलेल्या सम्राट चंद्रगुप्त मौर्यालाही जगण्याचं तत्त्वज्ञान देऊ शकला नाही. उत्तर आयुष्यात त्याच्या शोधात चंद्रगुप्त महावीरांकडे गेलाय. त्याचा नातू सम्राट अशोक तर कलिंगच्या युद्धामुळेच बुद्धाकडे गेला. त्याने जगभर बुद्धाचे विचार पसरवले. तलवार न उचलतानाही विशाल साम्राज्य उभं केलं. जगाला आपल्या विचारांनी जिंकतो.

आज कोरोना हाकलवण्यासाठी बुद्धाची करुणा हवी आहे. त्या करुणेच्या मध्यावर माणूस आहे. सत्ता नाही. म्हणून त्या करुणेतच देश आहे आणि देशभक्तीही आहे. दलाई लामांना चाणक्य मंडलच्या कार्यक्रमासाठी बोलावणाऱ्या धर्माधिकारी सरांना हे माहीत नाही असं नाही. तरीही ते नको त्या पोस्ट टाकत बसलेत. माणुसकीच्या विरोधातलं त्यांचं युद्धाचं आकर्षण वेदनादायी आहे. कारण आपण कोरोनावर मात करणार आहोतच. पण या विकृत देशभक्तीच्या महामारीवर कोणतंही औषध सध्यातरी आपल्याकडे चालताना दिसत नाहीय.

हेही वाचा :

हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

विवेकानंदांच्या निधनाची बातमी छापून आली नव्हती

पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडणाऱ्या वसंताला साने गुरूजींनी काय सांगितलं?