जुगारात गुंतलेल्या कार्ट्याला पुस्तकाचा नाद लावणारा बा भीमा!

०५ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ८ मिनिटं


बुलढाण्याचा मोईन एक सिनेमा बघतो आणि जुगाराचा नाद सोडून पुस्तकांच्या जगात रमतो. एक लाख रुपयांच्या ‘स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कारा’चा मानकरी होतो. जिथं गाडी जात नाही तिथं मोईनने दोन हजारहून अधिक पुस्तकांचा स्टडी बंकर उभारलाय. हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाल्याचं तो म्हणतो. जुगाराच्या अड्ड्यावरून स्टडी बंकरपर्यंतचा त्याचा हा प्रवास सांगतोय मोईन ह्युमॅनिस्ट.

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत माझं एकंदरीत आयुष्य हे काळोखात होतं. भविष्य अंधकाराच्या समुद्रात हेलकावे खात होतं. मी म्हणजे गावातला एक उडानटप्पू आणि लोफर कार्टं! कुणाचाही अजिबात धाक नसलेला मी एकंदरीत वाया गेलेला मुलगा होतो. या काळात माझं शिक्षणाकडे अजिबात लक्ष नव्हतं.

माझं भविष्यात काय होईल? या प्रश्नांची चिंता ना मला होती ना आईवडलांना. मार्गदर्शनाचा अभाव, आजूबाजूचा परिसर आणि शिक्षणाबद्दल असलेली उदासीनता हे या मागचं प्रमुख कारण होतं. मी ज्या बौद्ध वस्तीत राहतो, तिथले माझे आजूबाजूचे मित्रही माझ्यासारखेच होते. त्यांनाही शिक्षणाचं काहीच गांभीर्य नव्हतं.

हेही वाचा: युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

आईवडलांचं दुर्लक्ष

आईवडिल शाळेत पाठवायचे म्हणून फक्त शाळेत जायचो. शाळेत जाऊन मधल्या सुट्टीत पळून यायचो आणि गल्लीतल्या मित्रांसोबत सरळ नदी गाठायचो. संध्याकाळपर्यंत पोहत राहायचो. कधीकधी इतर मित्रांच्या सोबत त्यांच्या शेळ्यांमागे जायचो. आजूबाजूच्या अड्ड्यावर जुगार खेळायचो. खूप पैसे हरायचो तर कधी जिंकायचोही. वडलांकडून पैसे रडून रडून घ्यायचो आणि इकडं हरवून टाकायचो.

आईवडलांनी कधीही शाळेची पायरी न ओलांडल्यानं त्यांना शिक्षणाचं महत्व एवढं माहिती नव्हतंच. जसं आजकालचे पालक शाळेसाठी, अभ्यासासाठी आपल्या मुलांवर जबरदस्ती करतात तसं मला कधीही माझ्या आईवडलांनी केलं नाही. ‘मोईन अभ्यास कर’ असं मला अजूनही कुणीच म्हटलेलं आठवत नाही. एकंदरीत मला तेव्हा जी मोकळीक मिळाली होती तशी माझ्या नजरेत कुणालाही मिळाली नव्हती.

अभ्यास म्हणजे अंधश्रद्धा

वेळ कधीही कुणासाठी थांबत नसतो. तो नेहमी चालत राहतो. असेच दिवसामागे दिवस जात होते आणि माझं भविष्य अंधकाराकडे मार्गक्रमण करत होतं. अशातच जिल्हा परिषद शाळेतलं माझं चौथीपर्यंतचं शिक्षण संपलं आणि मी गावातल्या हायस्कूलमधे सेमी-इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला. या शाळेत प्रवेश घेतल्यापासूनच इंग्रजीच्या न्यूनगंडामुळे मी अजूनच मागे पडायला लागलो.

एकंदरीत मी शाळेत जाणंच बंद केलं होतं. पाचवी ते सातवी या दोन वर्षांत मी फक्त दोन महिने शाळेत गेलो असेल. या दोन वर्षांच्या काळात मी खूप काही नको ते उद्योग केले ज्याबद्दल विचार करून आजही मला दुःख होतं. पाचवी, सहावीत आईवडलांनी माझ्याकडं अजिबात लक्ष दिलं नव्हतं, ज्याचा फायदा मी पुरेपूर उचलला होता.

पण आता सातवीत शिक्षकांच्या सांगण्यावरून वडलांनी मला शाळेत पाठवायला सुरवात केली. वडलांच्या थोड्याफार धाकाने मीही शाळेत जायला सुरवात केली खरी, पण माझं फक्त शरीर शाळेत असायचं, मन मात्र मित्रांसोबत नदीवर भटकायचं. यामुळे मला शाळेत नेमकं काय चाललंय हे काहीच कळायचं नाही.

पुस्तकाचा आणि माझा संबंध तर अजिबात नव्हताच! घटक चाचण्यांमधे मला कायम भोपळा मिळायचा. कुठल्या विषयाला कुठले शिक्षक आहेत ते मला त्या सरांचा मार खाल्ल्यावर कळायचं. शाळेतून घरी आल्यावर दप्तर फेकायचं आणि खेळायला जायचं हा माझा रोजचा दिनक्रम होता. बाकी अभ्यास वगैरे करणं ही माझ्यासाठी अंधश्रद्धा होती.

हेही वाचा: नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

बाबासाहेबांच्या चरित्रपटाची ठिणगी

नंतर पुढे प्रथम सत्राच्या परीक्षा संपल्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. पण या सुट्ट्या माझ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरतील हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. एका दुपारी मी घरीच होतो आणि टीवी बघत होतो. टीवीवर चॅनल बदलता बदलता ‘दूरदर्शन’चं चॅनल लागलं. त्या चॅनलवर एक सिनेमा सुरू होणात होता. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’!

सिनेमातला सुरवातीचा ऍनिमेशन वीडियो मला रोचक वाटला आणि मी तो सिनेमा बघायला सुरवात केली. मला आधी अजिबात माहित नव्हतं की, हा सिनेमा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे मी हा सिनेमा बघता बघता यामधे एकंदरीत हरवून गेलो होतो. या सिनेमातला एक एक प्रसंग मला स्पर्शून जात होता.

बौद्ध वस्तीतलं वातावरण

मी बाबासाहेबांबद्दल आजपर्यंत माझ्या बौद्ध वस्तीत फक्त ऐकत आलो होतो. लहानपणापासूनच बाबासाहेबांचे विशेषतः बौद्ध मित्रांच्या घरात, सिनेमातल्या कोर्टात, पोलिस ठाण्यात फोटो बघायचो. गावातल्या चौकात असलेला त्यांचा पुतळा तर नेहमीच बघायचो.

गावातल्या जयंतीतही नेहमी त्यांचा फोटो हमखास दरवर्षी नजरेत पडायचा. दरवर्षी १४ एप्रिलला जयंतीच्या दिवशी आमच्या पूर्ण बौद्ध वाड्यात प्रत्येकाच्या घरी निळे आणि पंचशील झेंडे लावलेले असायचे. वर्षभर जुने, फाटके कपडे घालणारे माझे मित्र नवीन कपडे, बुट घालून जयंतीत नाचायचे. आनंद साजरा करायचे. त्यांना बघून खरंच मला फार आनंद व्हायचा.

हेही वाचा: मुक्काम चैत्यभूमीः ‘जय भीम’ जागवणारी रात्र

सिनेमाने बदललं आयुष्य

ज्या माणसाचे आजपर्यंत आपण फोटो आणि पुतळेच बघितलेत, त्या माणसाचं जीवनकार्य आपण टीवीवर बघतोय आणि एवढ्या उशिरा बघतोय याचंच मला अप्रूप वाटतं होतं. डॉ. बाबासाहेबांचं शिक्षणावर, पुस्तकांवर प्रेम बघून त्यांचे संघर्ष बघून मी एकदम भारावून गेलो. सिनेमा बघितला आणि माझ्या अंगी एक वेगळीच ऊर्जा संचारली होती.

मला हा सिनेमा कितपत समजला होता हे मी सांगू शकत नाही. पण एक नवीनच प्रेरणा आणि चेतना मला मिळाली. आयुष्याला एक कलाटणी, एक दिशा मिळाली आणि इथूनच मी बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या जीवनातले माझे पहिलेवहिले आदर्श मानलं. तशी ही माझी आणि डॉ. बाबासाहेबांची पहिलीच मानसिकरीत्या भेट होती.

खऱ्या अर्थानं या एका सिनेमाच्या रुपाने बाबासाहेबांचा माझ्या आयुष्यात कळत-नकळतपणे प्रवेश झाला. माझ्या आयुष्याची अडीच वर्ष अशीच गेली होती. प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तसाच माझ्या आयुष्यात हा एक ‘लाईफ चेंजिंग मुमेंट’ या अडीच वर्षांनंतर आला आणि इथूनच मी पूर्णपणे बदलून गेलो.

बाबासाहेबांचा पुस्तकांमधला शोध

आता आपणही बा भीमासारखा अभ्यास करायचा, असंख्य वेगवेगळी पुस्तकं वाचायची, रोज शाळेत जाऊन उच्चशिक्षित व्हायचं आणि आपल्या देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायचं असा मनोमन निर्धार केला आणि अशाप्रकारे माझी अभ्यासाला काही अंशी सुरवात झाली. त्या दिवसापासूनच मला डॉ. बाबासाहेबांबद्दल अधिक जाणून घ्यायचं जणू वेडच लागलं.

आता मी नियमित शाळेत जायला सुरवात केली आणि माझी आयुष्याची घसरलेली गाडी थोडी का होईना पण रूळावर आली. रोज मी घरी येऊन शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण करून शाळेतला मराठी, हिंदी पाठ्यपुस्तकांचं वाचन करायचो. त्यातले धडे वाचायचो आणि कविता पाठ करायचो.

अशातच डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर पुन्हा कुठं काही वाचायला मिळतंय का? याचा शोध घेत राहायचो. पाचवी ते दहावीपर्यंतचं शालेय पाठ्यपुस्तक मी तपासलं, पण मला हवी तेवढी बाबासाहेबांबद्दल माहिती काही मिळाली नाही. यामुळे मी थोडा निराश झालो.

पण तरीही मी पुस्तकं शोधायचं माझं कार्य सुरूच ठेवलं. एकेदिवशी तालुक्यातल्या बस स्टँडवर माझ्या हाती ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र’ हे छोटेखानी पुस्तक पडलं आणि मी झपाट्यानं ते वाचून पूर्ण केलं. माझ्या आयुष्यात शालेय पुस्तकाऐवजी मी वाचलेलं आणि खरेदी केलेलं हे पहिलं पुस्तक होतं.

हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

ग्रंथालयाशी झाली ओळख

आठवीत असताना ग्रंथालय असं काही असतं हे मला पहिल्यांदा कळालं. मग मी आजूबाजूच्या तालुक्यातल्या ग्रंथालयात बाबासाहेब आणि इतर महापुरुषांबद्दल लिहिलेली काही छोटीमोठी अशी अनेक पुस्तकं वाचून काढली आणि इथूनच मला वाचनाची गोडी निर्माण झाली. मी आता वेगवेगळी पुस्तकं जमवायला सुरवात केली.

तालुक्याला गेलो तर बस स्टँडवरून हमखास एकतरी पुस्तक खरेदी करायचोच. याच काळात मी खरेदी करून वाचलेलं ‘अग्निपंख’ हे माझ्या आयुष्यातलं सर्वात पहिलं महाग पुस्तक! ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या सिनेमाची डीवीडी आणून तो सिनेमा पुन्हापुन्हा बघितला. मिळतील तशी वेगवेगळी छोटीछोटी पुस्तकं वाचून प्रेरणेनं पेटून उठलो.

आठवीत असताना मी नियमितपणे शाळेत जाऊन अभ्यास सुरू ठेवला. सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरवात केली, वर्गाचा मॉनिटर स्वतःच्या इच्छेनं झालो आणि अभ्यासाला गती दिली. या काळातच मी माझं इतर वाचन वाढवलं. अनेक वेगवेगळी पुस्तकं वाचून काढली.

आपल्या महापुरुषांबद्दल वाचून त्यांना समजून घेण्याचे प्रयत्न केले. यामधे छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, महात्मा गांधी आणि इतर महापुरुषही होते. मी यांच्याबद्दल वाचून अजूनच समृद्ध झालो.

स्वतःचं ग्रंथालय बनवलं

बघता बघता माझ्याजवळ बराच पुस्तकांचा संग्रह जमा झाला. मी अनेक पुस्तकं वाचून संपवली. पुढे माझं पुस्तकांचं वेड दिवसागणिक वाढतच गेलं. पुस्तकासोबत माझी चांगलीच गट्टी जमली. मी याकाळात अनेक कादंबऱ्या वाचल्या आणि वाचून समृद्ध झालो.

पुस्तकं हेच माझे खरे मित्र झाले आणि मी पुस्तकांचा. मी पुस्तकांसाठी वेगळं गुल्लक बनवून फक्त आणि फक्त पुस्तक खरेदीसाठी पैसे जमवायला सुरवात केली. वाचवलेल्या पुस्तकातून पुन्हा अनेक पुस्तकं खरेदी केली.

अशाप्रकारे शून्यातून सुरवात करून आणि डॉ. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन मी माझं एक छोटंसं पुस्तकांचं ग्रंथालय निर्माण केलं. बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून हे ग्रंथालय थोडं थोडं का होईना पण वाढवतोय आणि माझं वाचनही सुरुच आहे आणि कायम असेल.

हेही वाचा: रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

बाबासाहेबच खरे मित्र

आठवी ते दहावी या काळात मी खूप वाचन केलं. वेगवेगळी पुस्तकं खरेदी करून पुस्तकांना आणि बाबासाहेब आंबेडकरांनाच खरे मित्र बनवलं. कारण मी ज्या वातावरण आणि परिसरात वाढलो, त्या परिसरात एक चांगला मित्र म्हणण्यालायक कुणीही नव्हतं; जो मला पुढची वाट दाखवू शकला असता किंवा मार्गदर्शन करू शकला असता.

इयत्ता सातवीपर्यंत माझ्या आयुष्यात असा कुणीही जिवाभावाचा आणि मला समजावून सांगणारा, मला योग्य ती वाट दाखवणारा, शाळेत जा किंवा अभ्यास कर, शिक आणि काहीतरी बनून दाखव असं म्हणणारा एकही मित्र नव्हता आणि अशातच माझ्या आयुष्यात एका निमित्ताने एक मित्र आला. तो शारीरिकरित्या सोबत नव्हता तरी तो त्याच्या विचाराने मला खळखळून जागे करून गेला.

आंबेडकर समजून, उमजून घेऊन या अवलियाला मेंदू आणि हृदयाच्या कप्प्यात घट्ट करून बसवलंय. बा भीमाचे विचार दिशादर्शक आहेत. ‘भविष्याकडे चला’ म्हणणारा हा माणूस मला कायम शिकण्याची, वाचनाची प्रेरणा देत असतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतो.

माझा आणि बाबासाहेबांचा एक वेगळाच बॉण्ड जुळलाय, ज्याला कुठल्याही टॅगची गरज नाही. वेगवेगळ्या वळणावर मला आंबेडकर भेटत असतो आणि माझ्याशी संवाद साधत असतो. तो मला माझा सर्वकाही वाटतो. यामुळे माझ्या कुठल्याही कामात, कार्यात या महामानवाचा सहभाग हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे असतोच.

सुरवात परिवर्तनाची

पुढे जसा मी घडलो, शिकलो तसतसं मला बाबासाहेब समजले. त्यांचं काम समजलं. सातवीपासूनच त्यांना मी आदर्श मानून माझ्या ध्येयाकडे वाटचाल सुरु केली आणि ती सध्याही योग्य पद्धतीने सुरूच आहे. मला आजही आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा बाबासाहेबांचा फोटो माझ्या अभ्यासाच्या खोलीत लावला होता.

तेव्हा मी किती खुश झालो, हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे असलं काही करायचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. ही छोटीशी गोष्ट जरी वाटत असली तरीही माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. आमच्या पिढीत प्रथमच मी ही परिवर्तनाची सुरवात करत होतो.

ही गोष्ट दिसायला सोप्पी होती पण येणाऱ्या काळासाठी महत्वाची असणार होती. कुटुंबाला हे काही समजलं नाही पण त्यांना मी सर्वकाही समजवलं, पटवून दिलं. अभ्यासानं, वाचनानं हे शक्य झालं. मी पूर्ण बदललो. स्वप्न बघू लागलो. माझ्या आयुष्यात पुस्तकं आली ती फक्त या अवलियामुळेच.

हेही वाचा: बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्‍यांसाठी काढला

स्टडी बंकरची संकल्पना

खिशात लावलेल्या दोन पेनांपासून तर डोळ्याला लावलेल्या गोल चष्म्यापर्यंत सर्वकाही मी बाबासाहेब आंबेडकरापासूनच शिकलोय. आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने सुटाबुटात राहायला शिकलो ते फक्त बाबासाहेब आंबेडकरामुळेच. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पदवीधर झालो. स्वतःचा आणि हक्काचा ‘स्टडी बंकर’ उभारू शकलो. 

मी पुण्याला न जाता गावातच राहून अभ्यास करायचं ठरवलं होतं. गावात अभ्यासाचं वातावरण नव्हतं. गावात अभ्यास होणार नाही असं अनेकांनी सांगितलं होतं. म्हणून एका बंद पडलेल्या घराची साफसफाई करून माझं छोटंसं विश्व तिथं थाटलं. त्याला मी स्टडी बंकर नाव दिलं. तिथं माझी लाडकी पुस्तकं आणि भिंतीवर चिटकवलेल्या आपल्या महापुरुषांच्या फोटोशिवाय इतर काहीही नव्हतं.

स्वतःचं एक वातावरण बनवलं होतं. मानसिकता, नियत अभ्यासाची होतीच. खूप काही शिकलो, अनुभवलो. घरात बसूनच देश, विदेश फिरून आलो. इतिहासाच्या समुद्रात बुडी मारून आलो. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी स्टडी बंकरमधे लावल्यापासून मी अभिमानानं ‘जय भीम’ म्हणू लागलो आणि नेहमी म्हणत असतो. जय भीम हा माझ्यासाठी ऊर्जेचा आणि प्रेरणेचा स्त्रोत आहे.

थँक्यू बा भीमा!

‘जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल.’ बाबासाहेबांच्या या वाक्यानं प्रेरीत होऊनच माझ्यासारख्या तळागाळातल्या वाचकांपर्यंत पुस्तकं पोचवण्याची आणि ती वाचायला प्रवृत्त करण्याची जबाबदारी घेऊन ‘वुई रीड’सारखा उपक्रम सुरू करू शकलो.

पुढे मला पुण्यात वाचकाला देण्यात येणारा पहिलावहिला ‘स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार मी बाबासाहेब आंबेडकरांनाच अर्पण केलाय. कारण बा भीमामुळेच माझ्या आयुष्यात पुस्तकं आली. आज विदेशात जाऊन उच्चशिक्षण घेण्याचं स्वप्न बघू शकतो ते फक्त बाबासाहेबांमुळेच. बाबासाहेबांमुळेच मला माझा जिवलग मित्र मिळाला, ज्याने माझं आयुष्य अजून समृद्ध केलं.

कितीतरी पुस्तकांपेक्षा त्यानं मला शिकवलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाचलं नसतं, त्यांना समजून घेऊन, त्यांना आदर्श मानून अभ्यास केला नसता, तर आज माझी काय अवस्था असली असती याबद्दल विचार करूनच भीती वाटते. थँक्यू बा भीमा! तू करोडो दिन दुबळ्यांचं आयुष्य बदललंस आणि तुला समजून घेऊन माझ्यासारख्या मुलाचंही आयुष्य बदललं.

जय भीम!

हेही वाचा: 

शिवाजी पार्कवर निळा समुद्र भरून आला होता तेव्हा

धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?