गेल्या आठवड्यात आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी गावच्या बबिता ताडे यांनी कौन बनेगा करोडपतीमधे एक कोटी रुपये जिंकले. एका छोट्या गावातली बाई काय करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केलंय. असं कितीतरी टॅलेंट आपल्या गावोगावी पसरलंय. पण बायकांना संधी नाकारणाऱ्या आपल्या समाजात असं टॅलेंट संपवलं जातंय. त्याचं कुणालाच काही वाटत नाही.
बबिताताई तशा मूळ चिखलदऱ्याच्या. त्यांचे वडील खानसामा. त्या वडिलांना लहानपणापासून खूप मदत करायच्या. कष्टाची कामं उपसायच्या. चिखलदऱ्यासारखं ठिकाण म्हणजे पहाडी भाग. पण तरीही त्या आपल्या वडलांना वाणसामान आणून देण्यापासून इतर सर्वच मदत करायच्या.
नंतर त्यांचं लहान वयात लग्न झालं. संसाराला हातभार म्हणून अंजनगाव सुर्जीच्या शाळेत त्या खिचडी बनवायचं काम करू लागल्या. तेही सकाळ आणि दुपार अशा दोन शिफ्टमधे. पण माणसाला एखाद्या गोष्टीच्या ध्यासानं पछाडलं की तो ध्यास त्या व्यक्तीला स्वस्थ बसूच देत नाही.
बबिताताईंना अगदी लहानपणापासूनच शिक्षणाची आवड. त्यामुळे त्या काही ना काही वाचत असायच्या. अशातच सोनी टीवीवर सुरू असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना.
त्यांनी आठव्या पर्वात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांची निवड होऊ शकली नाही. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. हार मानली नाही. नववं पर्व सुरू झाल्यानंतर त्यांनी परत रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांची निवड झाली.
फास्टेस्ट फिंगर फर्स्टमधे त्या अव्वल ठरल्या. केबीसीमधे एक एक पायरी अतिशय चतुरपणे खेळल्या. आणि त्यांनी चक्क एक कोटीपर्यंतच्या प्रश्नांची मजल मारली. एक कोटीसाठी असणाऱ्या प्रश्नाचंही त्यांनी बरोबर उत्तर दिलं. आणि त्या एक कोटी रूपये जिंकल्या.
हेही वाचा: तेरवं : शेतकरी विधवांच्या जगण्याच्या मर्दानी कहाण्या
बबिताताई स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या. त्यासाठी त्या रोज वर्तमानपत्र वाचायच्या. सकाळी वाचणं झालं नाही. तर ते गादीखाली लपवून ठेवायच्या. आणि सगळी कामं आटोपल्यानंतर वाचून काढायच्या. टीवीवरही जास्तीत जास्त बातम्यांचे चॅनल बघायच्या.
त्यांच्या आत पेटलेली ज्ञानाची लालसा त्यांच्याकडून हे सारं करवून घ्यायची. बबिताताईंच्या या अनोख्या यशानं महिला शक्तीबद्दल मनात मंथन सुरू झालं. एखाद्या चांगल्या गोष्टीची जिद्द सवार झाली तर एक महिलादेखील आणि अगदी गावातली यश संपादन करू शकते. हे या निमित्ताने बबिताताईंनी सिद्ध केलं.
आपल्या समाजात बायांना काय कळतं? किंवा बायकांना कुठली आलीय एवढी अक्कल? बायकांचा अकलेशी संबंधा काय? असे शेलकी ताशेरे मारत महिलांची यथेच्छ टिंगलटवाळी केली जाते. छोट्या छोट्या गोष्टींमधे तिची हेटाळणीही होते. यासगळ्यांना बबिता ताडे नावाच्या एका ज्ञानसंपन्न महिला शक्तीची एक सणसणीत चपराक बसलीय.
प्रश्न एक कोटीचा नाही. प्रश्न आहे तो महिलेतल्या सुप्त, दडलेल्या प्रचंड शक्तीचा. महिलेने एखादी गोष्ट ठरवली तर ती कुठेच कमी नसते हे सिद्ध करण्याचा. सर्वसाधारणपणे पाहिलं तर बहुतांश स्त्रियांची शक्ती ही अनुत्पादक म्हणजेच अनप्रोडक्टिव्ह गोष्टी करण्यामागे मोठ्या प्रमाणात खर्च होते. आणि हीच गोष्ट तिच्या प्रगतीला मारक ठरते.
महिला ही पुरुषापेक्षा भिन्न असते. तिच्या शरीराची रचना वेगळी असते. पण म्हणून ती बुद्धीने पुरुषांपेक्षा कमी नसते. पण आपल्या समाजातल्या पुरुषांकडून ही भिन्नता स्वीकारण्याऐवजी तिला दुय्यम समजलं जातं. तिच्या सृजनतेलाच तिची कमतरता ठरवलं जातं.
हेही वाचा: उषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार
एक महिला फक्त महिला म्हणून जगू पाहते. तिच्यातल्या स्वयंभूपणाला, तिच्या इच्छा-आकांक्षांना ती मूर्तरूप देऊ पाहते. हजारो वर्षांपासूनचा इतिहास तपासला तर जाणवतं की अजूनही समाज नावाच्या संस्थेला तिच्याकडे पुरुषाविना बाई म्हणून बघण्याची सवय नाही आणि तशी इच्छाही नाही.
पुरुषाविना महिलेचं काही अस्तित्व, पूर्णत्व नसतं अशी परंपरागत धारणा अजूनही कुटुंबांमधे, समाजात अनुभवायला मिळते. तिचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी तिला आजही संघर्ष करावा लागतो. ते तिला सहजासहजी, निसर्गदत्त मिळत नाही.
या सगळ्याचा विचार केल्यावर वाटतं की असं स्वतःचं अस्तित्व, स्वयंभूपण धारण केलेल्या किती महिला आपल्याला भेटतात? एक स्वतंत्र महिला म्हणून ती कधी भेटलीय का? महिलेचं काही अस्तित्व नाही?
महिलेचा एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून विचार केला जात नाही. मग खोलात जाऊन खरंच महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती फक्त एक महिला म्हणून कधी भेटतच नाही हे जाणवत. महिला म्हणून काही व्यक्तिमत्त्व अस्तित्वातच नाही. तिची वेगळी अशी ओळख नाही. तिची ओळख तितकीच आहे जेवढी ती पुरुषाशी संबंधित आहे. पुरुषाचं अस्तित्व हेच तिचं अस्तित्व आहे. त्याशिवाय तिचा असा स्वतंत्र आत्मा नाही.
ही आश्चर्याची गोष्ट असली तरी हे एक कटू सत्यही आहे. पुरुषाशी संबंधित नातं नसेल तर अशा महिलांना काहीच महत्त्व नाही. त्यामुळे महिलेला आजही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व बनवण्यासाठी झगडावं लागतं.
महिला सावली बनून राहिलीय. पण तिच्यात आत्मा नाही. आणि पुरुषांना तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची असोशीही नाही. उलट तिचं सावलीपणच त्यांच्यासाठी जास्त बहारदार ठरणारं आहे. कारण तिच्यातला असा आत्मा जागा झाला किंवा तिचं आत्मभान जागृत झालं तर महिला विद्रोह करून उठू शकेल. ही एक भीती पुरुषांना आहेच.
वर्षानुवर्ष हे असं महिला-पुरुषांचं जगणं सुरू आहे. शोषक आणि शोषित यांच्यात दमनाचं नातं असतं. आणि अशा नात्यात खोलवर एक घुसमटच असते. आणि तेच अव्याहत सुरू आहे. महिलेजवळ व्यक्तित्व नसणं, आत्मा नसणं हेच पुरुषांसाठी फायद्याचं आहे. कारण ज्या दिवशी तिला ही जाणीव होईल त्या दिवशी संघर्ष सुरू होईल. प्रत्येक महिलेला आपला आत्मा शोधावासा वाटणार नाही, तोपर्यंत हे चक्र अव्याहत चालू राहील.
हेही वाचा: एकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं?
बर्नाड शॉ यांनी एक छोटंसं पुस्तक लिहिलं. त्याचं नाव ‘इंटेलिजन्स विमेन्स गाईड टू सोशलिझम.’ म्हणजे बुद्धिमान महिलेसाठी समाजवादाची पथप्रदर्शिका. हे नाव वाचून लोक संभ्रमात पडले. त्यांनी बर्नाड शॉ यांना विचारलं, समाजवादाचं पथप्रदर्शन केवळ महिलेसाठी आहे, पुरुषांसाठी नाही? काही म्हणाले, तुम्ही पुस्तकाला ‘इंटेलिजन्स मेन्स गाईड टू सोशालिझम’ असं शीर्षक द्यायला हवंत. त्यावर बर्नाड शॉ म्हणाले, ‘मेन्स लिहिल्याने त्यात महिला असतेच. पण विमेन्स लिहिण्याने पुरुष त्यात संमिलित नसतात. फक्त महिलाच अधोरेखित होते.’
ही गोष्ट किती विचित्र आहे की आपण मनुष्य म्हटलं की त्यात महिला सामावलेली असते. पण बाई किंवा महिला म्हटलं की त्यात पुरुष संमिलित नाही. त्यामुळे जिथे पुरुष आहे तिथे महिला आहेच. जसं हजारो वर्षांपासून शूद्रांना पिढ्यांपिढ्या इतका जाच दिला की आपण कोणी माणूस आहोत ही जाणीवच त्यांच्या मनातून काही काळापूर्वी पुसून गेली. तसंच हेही वर्षानुवर्षे बेमालुमपणे सुरू आहे. त्याची जाणीवही कोणाला सहज होत नाही.
पुरुषांच्या मागे उभं राहण्यातच तिचं अस्तित्व आहे. आणि यातच तिची निसर्गदत्त ऊर्जा अक्षरशः वाहून जातेय. पुरुषांपासून वेगळं उभं राहण्याशिवाय तिचं काही अस्तित्व उरतच नाही. खेदाची बाब म्हणजे अनेक महिला हा असाच विचार करतात. मग बिना आत्म्याच्या महिलेच्या जीवनात आनंद, सृजनात्मकता, अभिव्यक्ती असे सुगंध कसे असू शकतील?
जगातल्या अनेक धर्मांमधे असंच सांगितलं गेलं की महिलांसाठी मोक्ष नाही. चीनमधे सहा सात दशकांपूर्वी तर असं मानणं होतं की महिलांयांमधे आत्मा नावाची काही गोष्टच नसते. त्यामुळे त्यांना मारण्याने ती हिंसा ठरत नव्हती. तो गुन्हाही मानला जात नव्हता.
नारी नरक का द्वार है. असं म्हणणाऱ्या साधूसंन्यासी, बाबाबुवांच्या प्रवचनांवर बहिष्कार घालण्याऐवजी महिलांची तिथं अलोट गर्दी असते. हा आमचा अपमान आहे असं म्हणत या महिला वर्गानंच त्याला चोख उत्तर द्यायला हवं. सज्जनांच्या वेशातला असा दुष्टभाव दीर्घकाळपर्यंत चालू राहतो. तो चालवूनही घेतला जातो. कारण तो वरवर पाहून दिसत नाही.
हे शास्त्रकार पुरुष आहेत. त्यामुळे त्यांनी स्त्रियांमधली नकाराची ताकद क्षीण केली आहे. किंवा तिच्यामधे नकाराची ताकदच निर्माण होऊच दिली नाही. आपण कुणाची संपत्ती नाही हे भान आणि स्वतःच्या अस्मितेची प्रखरता तिनेच तिची तेजाळत ठेवायला हवी.
हेही वाचा: डायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या
महिला एखाद्या वेलीसारखी वाढते. पुरुषाच्या आधारानेच आपली वाढ आहे असा तिचा समज. आणि सहजासहजी उपलब्ध असलेल्या गोष्टीची किंमत नसते. त्यामुळे युगानुयुगे महिलेच्या मनात वेदनेचं वास्तव्य आहे. नाही महिला म्हणजे वेदनाच असंच तिचं चित्र अधोरेखित करण्यात आलंय. तशी झुल मग तिच्यावर पांघरली जाते.
ती वेदना मग युगानुरूप फक्त शरीर बदलत जाते. कधी सीता, द्रौपदी युगानुयुगे विठ्ठलाच्या बाजूला उभं राहूनही रखुमाईलाही अरुण कोलटकरांच्या ‘वामांगी’ कवितेतल्यासारखं अठ्ठावीस युगांचं एकटेपण चुकलेलं नाही. तिच्या वेदनेचं केवळ ग्लोरिफिकेशन होत राहतं.
आता तिने माणूस म्हणून नाही तर महिला म्हणून तिचं जगणं ठरवायला हवं. स्वतःच्या जगण्याला स्वतःच आकार द्यायला हवा. कारण ती पुरुषांपेक्षा भिन्न आहे, ती सृजनाची खाण आहे त्यामुळे तिच्या शरीराची रचना वेगळी आहे. पण असमान किंवा कमी नाही.
दुर्दैवानं तिची भिन्नता हा तिचा दुबळेपणा समजला जातो. अखिल मानव जातीचा उगम जिच्या उदरात दडलेलाय ती दुबळी कशी? त्यामुळे प्रत्येक महिलेने आत्मसन्मानाचं भान जागृत ठेवलं तरच तिला तो मान मिळत राहील. आणि हे करणं केवळ तिच्या हाती आहे.
आनंद, सुख वगैरे कोणी कोणाला देत नसतं. तसा आवही कोणी आणू नये. या वाटल्या जाणाऱ्या गोष्टी नाहीत. प्रत्येक आत्मा आतून आनंदी राहिला तरच त्याच्या सहवासातले, आजुबाजूचे आनंदी राहू शकतात. तो आनंद दुसऱ्यापर्यंत आपोआप पोचतो. आपल्या देशात महिलांची संख्या साधारण पुरुषांइतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील महिलांचा आत्मा, तिचं मन असं सतत अशांत राहिलं, तर तिच्या भूगोलात, पर्यावरणात सुखशांती तरी कशी नांदेल?
बबिता ताडेंनी बाईपणाच्या आत्मभानाचा दिवा मनाच्या एका कोपऱ्यात सतत तेवत ठेवला. त्याचा आता पसरलेला प्रकाश. अनेक महिलांना त्यांचं आत्मभान शोधण्यासाठी प्रेरक ठरेल.
हेही वाचा:
मंदीच्या जात्यात रोजगारी भरडतेय
कंदील बलुच: पाकिस्तानी महिलांची प्रेरणा
आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण