महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

०३ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख.

घशात थोडं खवखव करत होतं. दोन दिवसांत थोडा खोकलाही आला. मनात शंका सतावायला लागली, मी कोरोनाला बळी तर पडणार नाही ना? म्हणून २३ तारखेला अमरावती सिविल सर्जनला फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही.

मग मी अकोला सिविल सर्जन डॉ. चव्हाण यांना फोन केला. त्यांना म्हटलं, मला थोडी शंका येतेय. ते म्हणाले, घाबरू नका, उद्या अमरावती सिविल सर्जनशी बोलून गोळ्या पाठवतो आणि तपासणी करायला लावतो. गोळ्या आल्या, तपासणी केली. पण काही निघालं नाही. मी कामाला लागलो.

बायको, मुलगा सांगायचे पण ऐकलं नाही

मला खूप शंका यायच्या. आपल्याला कोरोनाची लागण लागली तर खूप मोठी आफत होईल. आपण रोज घराबाहेर पडत आहो. इतके लोक आपल्याला भेटतात. आपल्यामुळे इतर लोकांचा बळी जाईल. झोप येत नव्हती. त्यात घरी माझा मुलगा देवा नेहमी मला टोकायचा. त्याचा दहावीचा पेपर होता. तो खूप पोटतिडकीने लोकांना भेटू नका म्हणून सांगायचा.

बायको नयना देखील खूप सांगायची. पण लोक ऐकत नव्हते. कुणाला नाही म्हणता येत नव्हतं. काही लोक तर स्वतः म्हणायचे, लोकांना भेटू नका आणि तेच इतर लोकांना घेऊन भेटायला यायचे. भेटणाऱ्यांची गर्दी वाढतच होती. अखेर देवाचे पेपर संपले आणि आम्ही कुरळपूर्णाला आलो. तिथे आमचं अनाथ अपंग पुनर्वसन केंद्र आहे. त्याला लागूनच आमचं छोटंसं पारंपरिक पद्धतीने बांधलेलं घर आहे.

हेही वाचा : दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

कर्मचारी बाहेर, आपण घरात कसं राहायचं?

पण कशाचं काय! टीवीवरच्या बातम्या, सोशल मीडियावरची कोरोनाच्या साथीची माहिती मन सुन्न करणारी होती. घरी गुदमरल्यासारखं व्हायचं. आपण घराच्या बाहेर निघालं पाहिजे, असं वाटायचं. शेवटी घरच्यांची नाराजी घेत अकोला, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यात कोरोना निर्मूलनाच्या कामाला लागलो.

रात्री झोपताना नवनवीन कल्पना यायच्या. अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन अंमलबजावणी करायची. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी रोज घराबाहेर काम करायचे. त्यांच्याबद्दल खूप आस्था वाटायची. ते काम करतात आणि आपण घरी बसायचं, हे बरोबर वाटायचं नाही.

डॉक्टरांना माझ्यासारखा मास्क हवा होता

२६ मार्चला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तिथे एक तरुण डॉक्टर होती. त्यांना विचारपूस केली. आम्ही दोन संशयित रुग्णांना रेफर केलं. तपासणी कीट नाही, चांगले मास्क नाहीत. तुमच्यासारखे मास्क पाहिजे होते, असं ती डॉक्टर म्हणत होती. माझ्या मनात आलं आपला मास्क काढून द्यावा. पण माझी बिमारी त्यांना लागली तर, असा विचार करून राहू दिलं.

मी तशा मास्कसाठी खूप प्रयत्न केले. पण कुठूनही ते सापडले नाहीत. अपूर्ण व्यवस्था, काहीच सुरक्षितता नाही, तरीदेखील डॉक्टर सर्व काम करत असल्याचं पाहून मी खूप प्रभावित झालो. नंतर वेंटिलेटरची व्यवस्था पाहिली. आयसीयू थोड्या कामासाठी बंद होतं. त्यासाठी फोन लावले आणि पत्र द्यायला सांगितलं.

हेही वाचा : छत्तीसगडमधे पुन्हा नक्षलवादी हल्ला होऊ शकतो

डॉक्टर म्हणाले, मी बाँड्रीवर आहे

त्यांनतर मी अमरावती सिविल सर्जन डॉ. निकम यांना फोन करुन माझी तपासणी करून घ्यायला सांगितलं. त्यांनी तपासणीकरता नर्स पाठवली. २७ मार्चला मी कुरळपूर्णा येथे होतो. नयनाला निकम सरांचा फोन आला. रिपोर्ट थोडे डाऊटफुल आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मी फोन केला, तर मला म्हणाले बाँड्रीवर आहे. मी समजून गेलो, काहीतरी प्रॉब्लेम आहे. २९ मार्चला पुन्हा तपासणी करावी लागणार होती. तोपर्यंत आयसोलेट राहावं लागणार होतं.

मग माझा बेड वेगळा, ताट वेगळे अशी घरातली सर्व मोहीम नयनाने सुरू केली. दुरुन वाढणं. मला वेगळ्या कपात चहा आणला. चहा प्याल्यानंतर मी तो कप धुतला. धुतल्यानंतर म्हटलं, हा कप पुन्हा कोणी वापरायला नाही पाहिजे, म्हणून थोडा फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो पूर्ण फुटला.

हेही वाचा : पंजाबराव देशमुखांना आपण आतातरी स्वीकारायला हवं: डॉ. स्वामिनाथन

मी डोळ्याने मरण पाहत होतो

मी एका दिवसात खूप काही विचार करत होतो. माझे रिपोर्ट पॉझिटिव आले तर? मी कोणाकोणाच्या संपर्कात आलो? माझ्यामुळे त्यांचं किती वाईट होईल? काहीही झालं ते व्हायला नको. नयनाची तब्येत नाजूक आहे. तिला झालं तर कसं होईल? सारखे असे विचार येत होते.

देवा लहान आहे. दोन पुतण्या आणि विक्रमची लहान मुलगी. डोकंच काम करत नव्हतं. डोळ्यात पाणी येत होतं. माझ्यामुळे परिवाराला काही वाईट होऊ नये. लोकांचं, कार्यकर्त्यांचं वाईट होऊ नये, असे विचार येत होते.

काही जवळच्या लोकांचे पैसे अंगावर होते. काहींना मदत करायची होती. काही वाईट झालं तर कसं होईल? मी डोळ्याने मरण पाहत होतो. दुःख एवढंच वाटायचं की माझ्यामुळे कोणाला मरण यायला नको.

पण झोप येत नव्हती

नयनाची खूप काळजी वाटत होती. रोज सोबत जेवायचो. आज मात्र काळजी घेऊन दूर एकटा जेवताना अनेक विचार येत होते. माझा हात कुठं लागला तर नसेल. माझा हात म्हणजे विष वाटत होते. कुठे लागायला नको. अनेक गोष्टी मनात येत होत्या. संपर्कात आलेल्या लोकांची काळजी वाटत होती.

२७ तारखेचे रात्री बरोबर ९.४१ वाजले होते. झोपायचं होते, पण झोप येत नव्हती. रिपोर्ट चांगला येईल, असा विचार करून हिंमत धरुन अंग टाकलं. झोपताना देवा आला. हिंमत हारू नका, काही होणार नाही, म्हणाला. नंतर नयना आली. तिनेही मला उदहरणासहित हिंमत दिली.

रोज मी, देवा, नयना एकत्र झोपत होतो. आज मी एकटाच वेगळ्या खोलीत झोपलो होतो. सकाळ झाली. चहा प्यायला जाणार तितक्यात लक्षात आलं, आपल्याला तिकडं जाता येणार नाही. नंतर नयना चहा घेऊन आली. तिने माझ्या कपात चहा टाकला. एकटाच प्यालो.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही

लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

मी पॉझिटिव आलो तर काय होईल?

लोकांचे एसेमेस पाहिले. १०-१५ फोन लावले. काही कामं केली. गावात बाहेरून आलेल्या लोकांचे गट तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. सिविल सर्जनना फोन केला.

ते म्हणत होते, पुन्हा २९ला तपासणी करावी लागेल. मग दोन दिवसांत समजेल. पुन्हा खूप वाईट वाटू लागलं. माझ्या संपर्कात हजारो लोक आले होते. त्यांचं काय होईल? माझ्या परिवारातले सगळे पॉझिटिव आले तर सारं एका क्षणात वाईट होईल.

माझ्या चुकीला काहीच क्षमा नव्हती. मी माझ्या देवाचं, नयनाचं ऐकलं असतं, लोकांना भेटलो नसतो, तर हा अनर्थ घडलाच नसता. मला स्वतःबद्दल खूप वाईट वाटत होतं. मी का ऐकलं नाही? लिहिताना डोळ्यातून पाणी यायचं.

देवा, नयना खूप धीर देत होते. नयनाचं डोकं दुखत होतं. तरी ती माझी काळजी घेत होती. तिला पाहून माझ्या मनात अपराध्याची भावना येत होती. मी तिला सुख तर काहीच दिलं नाही. उलट दुःखच दिलं.

उद्धवजींचा फोन आला, पण

सर्व कार्यकर्ते, कार्यक्रम डोळ्यासमोर येत होते. २५ वर्षं केलेल्या संघर्षाला आता कुठे सुखाची किनार लाभली होती. काही महत्त्वाचे प्रामाणिक कष्ट उपसलेल्या पण गरीब कार्यकत्यांसाठी योजना आखल्या होत्या. त्या मागे पडणार का? अनेक प्रश्न निर्माण होत होते.

मरण डोळ्यासमोर पाहत होतो. इतक्यात मी गावागावात जाऊन लोकजागृतीसाठी लोकांना केलेल्या `घराबाहेर निघू नका` या माझ्या आवाजातल्या सूचना सांगणाऱ्या ऑटोचा आवाज माझ्या कानावर पडला.

मी लोकांना सांगत होतो, खिडकीतून जग पहा आणि जग जिंका. पण मी, माझा परिवार आणि माझ्या संपर्कात आलेले लोकच जगातून जाणार का? या प्रश्नाने मी माझ्यावरच चिडत होतो.

लोकांना मी ज्या सूचना दिल्या, त्या मी पाळल्या असत्या तर? मी खूप हरलेल्या मानसिकतेत होतो. डॉ. प्रफुल्ल कडू आणि डॉ. शिवरत्न शेटे यांना फोन केला. त्यांनी धीर दिला आणि काही औषधे सांगितली.

दुपारी ४ वाजून ३४ मिनिटांनी उद्धवजींचा फोन आला. काही मिनिटं बोलणं झालं. त्यांनी घरीच राहायला सांगितलं. मला बरंच बोलायचं होतं. पण रेंज बरोबर नव्हती.

हेही वाचा : दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्याः वसंतराव नाईक

मी हजारो लोकांना भेटलो होतो

आता उद्या ११ वाजता माझी पुन्हा तपासणी होणार होती. मग पाहू मी निगेटिव आहे की पॉझिटिव. काय होईल माहीत नाही. खूप भीती आहे. कारण मी हजाराच्या वर लोकांना भेटलो होतो. मला पापी व्हायचं नव्हतं. स्वतःच्या मनाला सावरत होतो.

रिपोर्ट पॉझिटिव आला तरी जगावं लागेल. स्वतःची हिंमत वाढवावी लागेल. बस एवढंच हाती आहे. रिपोर्ट निगेटिव आले तर आनंद होईल. कारण माझ्यामुळे कुणी अडचणीत येणार नाही आणि पॉझिटिव आल्या तर हजार लोक अडचणीत येतील. हे दुःख नशिबी येऊ नये. मोबाईलवर बातमी पाहिली, स्पेनच्या राजकुमाराच्या राजघराण्यातला पहिला बळी. आणखीच अस्वस्थ वाटू लागलं.

हेही वाचा : अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

भाऊ, तुमचा रिपोर्ट निगेटिव आहे

तेवढ्यात देवा आला. तो मला ठेवलेल्या ठिकाणी गेला. मी म्हणालो, अरे, तिथं नको जाऊ. तो म्हणाला, बाबा तुमचं असं आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. खरं होतं त्याचं. मी त्यांचं ऐकलं नव्हतं.

आता माझा रिपोर्ट यायला काही तास बाकी होते. रात्रभर झोपच लागली नाही. नयना आणि देवाला हॉस्पिटलमधे भर्ती केलं, असं स्वप्न पडलं. प्रतीक्षेचे तास संपले. माझा रिपोर्ट आला. माझे खासगी सचिव अनुप खांडे यांचा सकाळी साडेसात वाजताच फोन आला. भाऊ, तुमचा रिपोर्ट निगेटिव आला.

डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. मी आनंदाने उंच उडीच मारली. नयनाला मिठी मारली. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. नयनाला तर मी निवडून आल्यापेक्षाही जास्त आनंद झाला. असे आनंदाचे अश्रू माझ्या जनता जनार्दनाच्या डोळ्यात दिसू दे, हीच प्रार्थना आहे.

हेही वाचा : नऊ जणांच्या हौतात्म्यातून झालेल्या कृषी विद्यापीठाची पन्नाशी

इतरांच्या मरणाचे भागीदार बनू नका

माझ्या देशबांधवांनो मी देवाला हाक न मारता, तुम्हाला हाक मारतोय. हात जोडतो. पाया पडतो. आपण नियम पाळा कारण तीन दिवस मी माझा मृत्यू पाहत होतो. मी आजही स्वतः मरायला तयार आहे. पण या आजारामुळे आपण स्वतः इतरांच्या मरणाचे भागीदार बनतो.

हे सर्वांत मोठं दुःख आहे. आपल्यामुळे माझा परिवार, गाव, देश अडचणीत येत असेल तर हात जोडतो, घराबाहेर पडू नका, जिथे आहात तिथेच राहा. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या. घाबरू नका. एवढचं सांगतो, तूच आहे तुझ्या आणि इतरांच्याही जीवनाचा शिल्पकार.

हेही वाचा : 

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

संजय राऊत लिहितातः कोरोना हा निसर्गाने देवधर्माचा केलेला पराभव

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

( लेखक महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण, शालेय शिक्षण, कामगार, बहुजन कल्याण अशा महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री आहेत.)